पारध्यांच्या-भटक्यांच्या लेकरांसाठीची धडपड....

तो कोल्हाटी तरुण नुकताच मोटारसायकल चालवायला शिकला होता. एका महिलेला त्याच्या मोटारसायकलची धडक बसली. चौकशीसाठी एक पोलिस अधिकारी घरी आला.
NIvara Balgrah
NIvara Balgrahsakal
Summary

तो कोल्हाटी तरुण नुकताच मोटारसायकल चालवायला शिकला होता. एका महिलेला त्याच्या मोटारसायकलची धडक बसली. चौकशीसाठी एक पोलिस अधिकारी घरी आला.

तो कोल्हाटी तरुण नुकताच मोटारसायकल चालवायला शिकला होता. एका महिलेला त्याच्या मोटारसायकलची धडक बसली. चौकशीसाठी एक पोलिस अधिकारी घरी आला. केस मिटवण्यासाठी त्यानं त्या तरुणाच्या बहिणीसंदर्भात भलतीच मागणी केली. तरुणाला संताप अनावर झाला. घरातील लोक घाबरून गेले.

‘मी तुरुंगात जाईन; पण असं काही करायचं नाही,’ त्या तरुणानं घरच्यांना बजावलं आणि त्या अधिकाऱ्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

कोल्हाटी जमातीचे होणारे असे सारे अपमान झेलत अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा हा कार्यकर्ता म्हणजे नगर जिल्ह्यातील जामखेडच्या ग्रामीण विकास केंद्राचे अरुण जाधव.

जाधव (९४२२२२६०६६) यांचं बालपण नाच-गाणी करणाऱ्या कोल्हाटी परिवारात गेलं. कोल्हाटी महिलांच्या कलेला दाद देण्यापेक्षा त्यांच्या शरीराकडे बघणाऱ्या वखवखलेल्या नजरा, शोषण, आर्थिक असहाय्यतेचा घेतला जाणारा फायदा असे प्रकार त्यांनी पदोपदी बघितले. वडिलांचं नाव न लावता आईचं नाव लावलं म्हणून सतत अपमानित करणारे शिक्षक, विद्यार्थी आणि समाज... हे सारे अपमान गिळत जाधव शिकत राहिले. आपल्या माय-बहिणींचं शोषण करणाऱ्या व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी ‘शिक्षण हेच शस्त्र आहे,’ हे लक्षात घेऊन ते दोन विषयांत एमए झाले, वकील झाले आणि संघर्षाला सिद्ध झाले.

नगर जिल्ह्यात गेल्या २० वर्षांत जातीय अत्याचाराच्या अनेक अमानुष घटना घडल्या. या घटना राज्यस्तरावर गाजल्या. जाधव यांनी या सर्व अत्याचारांचा न्यायालयीन पाठपुरावा केला, मोर्चे काढले, संघर्ष करून संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शन्नो काळे या महिलेला चोरीच्या आरोपावरून अटक झाल्यावर तुरुंगात पोलिसांच्या मारहाणीत झालेला तिचा मृत्यू, अळकुटी इथं चोरीच्या संशयावरून तीन पारधी तरुणांना मारहाण करून, पायात खिळे घुसवून मारण्याचा अत्याचार, सोनई इथं तीन मेहतर तरुणांचे खांडोळी करून झालेले खून, शेळगाव व लिंपणगाव इथले अत्याचार, बबन मिसाळ या कार्यकर्त्याचा गावातील प्रस्थापितांनी केलेला खून आणि शाळेतून ओढत नेऊन प्रेमप्रकरणाच्या रागातून नितीन आगे याचा खर्डा इथला खून ही सारी प्रकरणं वृत्तपत्रांत आली आणि गेली; पण जाधव यांच्या कार्यालयात या प्रत्येक प्रकरणाची भलीमोठी फाईल आहे. त्यात वृत्तपत्रांतील बातम्या आणि न्यायालयीन कागदपत्रं आहेत. सरकारला दिलेली निवेदनं आहेत. एकेका प्रकरणाचा पाठपुरावा थकवणारा असतो.

जाधव सांगतात : ‘अत्याचाराचं असं प्रकरण घडलं की दुसऱ्याच दिवशी आम्ही तिथं पोहोचतो. त्या कुटुंबाला तातडीची मदत देऊन गावाचा कानोसा घेतो. वस्तुस्थिती नक्की कळली की पोलिसांनी सर्व कलमं लावली आहेत ना याची खातरजमा करून घेतो. नसेल तर प्रसंगी आंदोलनं करून आरोपींवर सर्व कलमं लावायला लावतो. शासकीय मदत त्या कुटुंबाला मिळवून देतो. पुढं केस सुरू झाल्यावर साक्षीदार टिकवून ठेवणं हे आव्हान असतं. सतत दडपण, धमक्या येत राहतात.’

जाधव यांना दोन-तीन वेळा मारहाणीचेही प्रयत्न झाले आहेत. या प्रत्येक केससाठी व आंदोलनासाठी एक लाखापेक्षा जास्त खर्च येतो ती रक्कम उभारावी लागते, अशी माहिती त्यांनी दिली. अत्याचाराच्या अनेक प्रकरणांची तड जाधव त्यांच्यामुळे लागली. हे संघर्ष करताना वंचितांच्या पुनर्वसनासाठीही ते काम करतात.

नगर जिल्ह्यातील पारधी जमातीच्या विकासासाठी राजेंद्र काळे, बापू ओहोळ व जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ‘पारधी विकास आराखडा’ ही संकल्पना मांडली. यात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समूहाला स्थिरावण्यासाठी त्यांना शासकीय कागदपत्रं उपलब्ध करून देणं, घर व शेती नावावर करून देणं, रोजगारासाठी आदिवासी विभागाकडून निधी मिळवून देणं या बाबी प्रत्येक कुटुंबाला त्यांनी उपलब्ध करून दिल्या.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही यात धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यभर याची अंमलबजावणी केली आणि निधीही दिला. पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी झालेलं काम हे समाधान देणारं असल्याचं जाधव सांगतात. नगर व पुणे या जिल्ह्यांत पारधी व भटक्या विमुक्तांना गायरान जमिनीवर अतिक्रमण करायला मदत करून त्यावर शेती करायला जाधव यांनी मदत केली. ७०० ते ८०० एकर जागेवर आज हे लोक जमीन कसत आहेत. यातून ही कुटुंबं स्थिरावायला मदत झाली. राज्यपातळीवर काम करणाऱ्या भटक्या-विमुक्तांच्या वीसपेक्षा जास्त संघटनांचं नेटवर्क अरुण व त्यांच्या मित्रांनी उभारलं आहे. त्यातून विविध कागदपत्रं मिळवून देणं, घर ज्या जागेवर आहे ती जमीन मिळवून देणं अशा अनेक धोरणात्मक मुद्द्यांचा पाठपुरावा हे नेटवर्क करतं.

जाधव राजकारणातही सक्रिय आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समन्वयकपदी राहून त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत. जामखेडचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. सरपंच असताना भटक्या समूहाच्या जागा नावावर करून देणं, त्यांना घरकुलं देणं, वस्तीचा दर्जा देणं अशी कामं त्यांनी केली.

कोल्हाटी जमातीमधील मुली शिकताहेत, अधिकारी होताहेत त्यामुळे पुढील पिढी शोषणाला बळी पडणार नाही असं जाधव ठामपणे सांगतात. भटक्यांच्या कौशल्याला, निसर्गज्ञानाला प्रशिक्षण व अर्थपुरवठा करून त्यांना एका जागी स्थिर करायला हवं असा उपाय ते मांडतात.

हे संघर्ष सुरू असताना पारधी आणि भटक्या-विमुक्तांच्या मुलांसाठी जाधव यांनी अलीकडेच ‘निवारा’ नावाचं वसतिगृह सुरू केलं आहे. त्यात १०० मुलं-मुली आहेत. लोककला केंद्रावर या महिलांची मुलं पडेल ती काम करतात. दुर्लक्षित असतात. स्थलांतर करणाऱ्या भटक्यांबरोबर मुलांचं भविष्यही काळवंडतं. किमान पुढची पिढी बदलावी, शिक्षणानं सक्षम व्हावी म्हणून जाधव यांनी हे वसतिगृह जामखेडजवळ सुरू केलं आहे. पालापालावर फिरून ते मुलं गोळा करतात. सरकारनं वसतिगृहाला फक्त मान्यता दिली आहे, अनुदान मात्र अद्याप मिळत नाही.

जाधव एकीकडे संघर्षाचं काम करत असतानाच, या मुलांच्या रोजच्या खाण्याची सोय करण्यासाठी, वसतिगृहात विविध सुविधा निर्माण करण्यासाठी मदतीची याचना करत फिरत राहतात. छोट्या गावात मोठे देणगीदार नाहीत, तेव्हा; धान्य, किराणामाल, पुस्तकं अशा स्वरूपातली मिळेल ती मदत ते मागतात. जाधव सांगतात, ‘‘गेली ३० वर्षं पारधी-भटक्यांसाठीचा संघर्ष केल्यावर, कोल्हाटी समूहातील मुलांची परवड बघितल्यावर निवासी शिक्षणाचा प्रकल्प हेच उत्तर मला दिसतं. किमान यांच्या पुढच्या पिढ्या शिकल्या तरी ते व्यवस्थेला प्रश्न विचारतील, स्थिरावतील...पण या वसतिगृहासाठी महिन्याला किमान एक लाख रुपये उभे करताना दमछाक होते. मी संघर्ष करतो म्हणून प्रस्थापित मदत करत नाहीत. समाजानं या वसतिगृहाला मदत केली तर भटक्यांचा आणि पारध्यांचा भविष्यकाळ बदलायला वेळ लागणार नाही. हे वसतिगृह स्वयंपूर्ण करायला समाजानं मदत करावी एवढीच समाजाकडे मागणी आहे.’’

जाधव या मुलांसाठी मदत मागताहेत, भटक्या लेकरांच्या उज्ज्वल उद्यासाठी लोकांनी हातभार लावावा, असं त्यांचं मागणं आहे...

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com