‘...लढत राहावंच लागेल’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heramba Kulkarni writes Mumbai Azad Maidan Mahesh Pawar women on alcoholic husband and son
‘...लढत राहावंच लागेल’!

'...लढत राहावंच लागेल’!

‘दारूला पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या दीड वर्षाच्या लेकराला नवऱ्यानं तापलेल्या तव्यावर उभं केलं...’‘माझा नवरा आणि दोन मुलं रोज पिऊन येतात व मजुरीचे पैसे हिसकावून घेतात. न दिल्यास मारतात. त्यामुळे रोज संध्याकाळी मी लवकर स्वयंपाक करते व रात्रभर लपून दुसरीकडे शेतात झोपते...’ मुंबईच्या आझाद मैदानात कधीकाळी जमलेल्या महिलांनी व्यक्त केलेली ही वेदनादायी मनोगतं...

व्यसनी नवऱ्याच्या मृत्यूमुळे तरुणपणीच विधवा होण्याची वेळ इथं जमलेल्या जवळपास प्रत्येक महिलेवर आली होती. या आंदोलनात महिलांनी फाटक्या साड्या आणून त्यांवर सह्या केल्या होत्या व त्यांवर लिहिलं होतं... ‘दादा, या फाटक्या साडीसारखाच आमचा संसार फाटला आहे!’ या फाटक्या साड्यांमुळे महिलांच्या वेदना माध्यमांपर्यंत पोहोचल्या. या दारूबंदीच्या आंदोलनाचे नेते आहेत महेश पवार (९४२३४३५२५५).

पवार हे एकल कलावंत. पथनाट्यं करणारे. हेमलकसा इथं पथनाट्य सादर करण्यासाठी ते एकदा गेले. तिथं बाबा आमटे यांची भेट झाली. या कलेतून ग्रामीण महाराष्ट्राला कशी दिली जाऊ शकते, हे बाबांनी सांगितलं आणि मग पवार यांनी महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांत पथनाट्यं सादर केली. पाणलोटविकास, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा आणि विविध शासकीय योजना असे विषय घेऊन शासनाच्या मदतीनं ते पथनाट्यं सादर करू लागले. त्यातून ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न कळले आणि पथनाट्यकलावंत असलेले पवार सामाजिक कार्यकर्ता झाले.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी हे पवार यांचं गाव. ते ११ वर्षांचे असताना वडील वारले. काबाडकष्ट करत आईनं त्यांना वाढवलं. पवार यांना तसा लहानपणापासूनच नाटकाचा छंद. देवीच्या उत्सवात नाटकं करता करता ते पथनाट्याकडे वळले आणि रंगमंचावरून आंदोलनाच्या मैदानात आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्यातील अनेक कुटुंबांना पवार भेटले. ‘नाम फाउंडेशन’च्या वतीनं या कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून दिली. या कुटुंबांतील महिलांचे गट करून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न केले. दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते.

पथनाट्याच्या निमित्तानं पवार गावोगावी फिरत. त्या वेळी दारूच्या व्यसनापायी मरणारे तरुण पाहून आणि व्यसनी नवऱ्यामुळे महिलांना होणारा त्रास बघून पवार यांनी दारूबंदी हा विषय हातात घेतला. त्यांच्या व्यसनी वडिलांच्या त्रासाला कंटाळून आईनं जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रसंग त्यांच्या मनावर खूप परिणाम करून गेला होता. चंद्रपूरची दारूबंदी झाल्यावर यवतमाळमधील दारूबंदीच्या आंदोलनाकडे ते वळले. त्यांनी ‘स्वामिनी दारूबंदी’ उभारलं.

घाटंजीसारख्या छोट्या तालुक्याच्या गावी पाच हजार महिलांचा व तरुणांचा मोर्चा त्यांनी काढला. दारूबंदी म्हणजे महिलांचं आंदोलन असं समजलं जातं; पण या आंदोलनात तरुणांचा सहभाग मोठा होता. अंदाजे १५ हजार तरुण एकाच वेळी रस्त्यावर आले. त्यांनी मानवी साखळी केली. कळंब ते नागपूर अशी १५० किलोमीटरची पदयात्रा सहा दिवस काढली. या पदयात्रेद्वारे सरकारदरबारी हे गाऱ्हाणं नेण्यात आलं.

विदर्भातल्या ऐन उन्हाळ्यात डांबरी सडकेवर झोपून ‘चटका-आंदोलन’ही करण्यात आलं होतं. ‘एवढी आंदोलनं करूनही सरकारदरबारी त्यांची दखल हवी तशी घेतली जात नाही,’ असं पवार सांगतात. ते म्हणतात, ‘‘यातून नक्कीच निराशा येते; पण तरीही लढत राहावंच लागेल.’’निराधार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं संघटन हे पवार यांचं एक वेगळं काम आहे. ६५ वर्षांपुढील वृद्धांना व विधवांना सरकार एक हजार रुपये पेन्शन देतं. गावोगावी फिरताना हे लोक पवार यांना त्यासंदर्भातील समस्या सांगायचे.

‘बँकेत गेल्यावर पासबुक फेकून दिलं गेलं,’ अशी तक्रार एकदा आल्यावर ते संबंधितांबरोबर बँकेत गेले आणि मग अडचणी लक्षात आल्या. एक हजार रुपये इतकी क्षुल्लक रक्कम तीन ते चार महिन्यांनी मिळते, हे तिथं गेल्यावर कळलं. पैसे जमा झालेत की नाही हे पाहण्यासाठी तालुक्याच्या गावी सतत खेटे घालावे लागतात. कर्मचारी अंगावर ओरडतात. तिथं अंगठा (thumb) द्यावा लागतो; पण ज्येष्ठ नागरिकांच्या अंगठ्याच्या रेषा बुजून गेल्यानं ठसा पुन्हा अद्ययावत करावा लागतो. त्यालाही खर्च येतो. सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन ५८ व्या वर्षी सुरू होते; पण यांना ६५ व्या वर्षापर्यंत थांबावं लागतं...असे इतरही बरेच अडथळे ओलांडूनही पेन्शन नियमित मिळत नाही. राज्यात असे ५० लाख लाभार्थी आहेत. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सर्व निराधारांना एकत्र करून ‘साथी निराधार संघटना’ सुरू केली. या सर्वांना ते एकत्र बोलावतात. त्यांची सहल काढतात. वाढदिवस साजरे करतात. त्यांचं अधिवेशन घेतलं जातं. त्यात कलांचं सादरीकरण होतं. अनेकांना या वयात मोतीबिंदू झालेला असतो. वेगवेगळ्या रुग्णालयांशी संपर्क करून मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात.

‘‘या निराधारांची स्थिती कशी असते,’’ हे विचारल्यावर महेश सांगतात, ‘‘हे सारे भूमिहीन मजूर असतात. आयुष्यभर कष्ट केल्यानं अधिकच वाकलेले असतात, अनेक आजार झालेले असतात; पण तरीही या वयातही जमेल ते काम करत कशीतरी गुजराण करतात. घरातही हे दुर्लक्षित व नकोसे असतात. नवऱ्याच्या व्यसनानं, अपघातानं मृत्यू यांमुळे यातील महिला तरुण वयात विधवा झालेल्या आहेत. कुणाचाच आधार नसताना मजुरी करून, मुलांसाठी जगत राहतात.’’

घाटंजी इथलं पवार यांचं प्रशिक्षणकेंद्र बघण्यासारखं आहे. विविध विषयावर तिथं प्रशिक्षण दिलं जातं. शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते इथं प्रशिक्षणासाठी जातात. आतापर्यंत १५ हजारांहून जास्त व्यक्तींनी प्रशिक्षण घेतलं आहे. पवार यांचं काम असं विविधांगी आहे. ‘पथनाट्य ते दारूबंदी’ आणि ‘निराधार ते प्रशिक्षणकेंद्र...’ सध्या पवार हे निवडणुकीच्या तयारीत मग्न आहेत. ‘राजकारण हे जनतेचे प्रश्न सोडवण्याचं महत्त्वाचं माध्यम असल्यानं निवडणुकीत उतरलं पाहिजे,’ अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत उतरण्याचं पवार यांनी ठरवलं आहे.

Web Title: Heramba Kulkarni Writes Mumbai Azad Maidan Mahesh Pawar Women On Alcoholic Husband And Son

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :womenAlchoholsaptarang
go to top