esakal | भारतीय चित्रपटसृष्टीतील शतकाचा महानायक
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh.j

विद्रोही सामान्‍य माणूस उभा केला समर्थपणे. प्रेक्षकांच्या मनातला हिरो उभा केला. कथेला साजेशी पटकथा आणि सामान्‍यांच्या मनातल्या संवादाची मिळालेली जोड... आणि महानायकाचा जन्‍म झाला. दुसरा अँटी रोमँटिक हिरो जन्‍माला आला. लोकांना तो प्रचंड आवडला. इतका की आजपर्यंत त्याचे पद कायम आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील शतकाचा महानायक

sakal_logo
By
आशिष उबाळे

चित्रपटाचा महानायक किंवा भारतीय चित्रपटसृष्टीतील शतकाचा महानायक म्हणजे अमिताभ बच्चन हे कुणाला सांगण्याची गरज नाही. त्याच्यापुढे सुपरस्‍टार वगैरे पदे खूप छोटी ठरतात आणि याच कारण हा समाजच आहे. कुठल्‍याही क्षेत्रात मोठेपण तेव्‍हाच येते जेव्‍हा बहुतांश समाज तुमच्या कार्याला, तुमच्या कलेला मान्‍यता देतो आणि तुम्हाला नकळत देवत्व प्राप्‍त करून देतो. असाच हा महानायक अमिताभ बच्चन.

जेव्‍हा राजेश खन्ना सुपरस्‍टार होता, तरुणींच्या गळ्यातला ताईत होता तेव्‍हा सगळी इंडस्‍ट्री रोमँटिक फिल्म तयार करीत होती. तेव्हा अमिताभ बच्चन स्‍वतःची जागा शोधत होता. जंजीर १९७३ चा. तोपर्यंत अमिताभचे १२ फ्लॉप चित्रपट येऊन गेले. फक्त दोनच चित्रपट हीट होते. त्यात एक होता राजेश खन्नासोबतचा आनंद आणि दुसरा होता बॉम्‍बे टू गोवा. अमिताभ यांच्यावर फ्लॉप न्‍यूकमर म्हणून शिक्का बसायची वेळ आली होती. तेव्‍हाचा एक किस्सा असा पण ऐकिवात आला की एका चित्रपटात अमिताभला कास्‍ट करायचे ठरले. सोबत होते त्यावेळचे हिरो नवीन निश्‍चल. त्यांनी दिग्दर्शक, निर्मात्याला सांगितले की अमिताभला त्याची उंची कमी करायला सांगा. तो चित्रपट बच्चन साहेबांना मिळाला नाही. याला नियती म्हणत असावे. कारण नंतरचा इतिहास सगळ्यांना माहीत आहेच.

अशा काळात प्रकाश मेहरांचा जंजीर आला. त्यावेळी सगळे चित्रपट रोमँटिक होते. त्या काळात सलीम जावेद यांनी समाजाच्या मनातल्या एक विद्रोही व निगेटिव्ह वाटणाऱ्या कॅरेक्टरवर लिखाण केले. त्यावेळच्‍या बऱ्याच हिरोंनी हा चित्रपट करायला नकार दिला. सलीम खान यांनी अमिताभचे नाव सुचवले. शेवटी प्रकाश मेहरा यांनी अमिताभला घेऊन जंजीर बनवला आणि चित्रप‍ट रिलिज झाल्यानंतर सगळा नूरच पालटला. चित्रपटसृष्टीचा, समाजाचा चित्रपटाकडे बघण्याचा, चित्रपट व्‍यवसायाचा... सगळाच नूर पालटला.

एका अँग्री यंग मॅनचा जन्‍म झाला. तशी जंजीरची कथा एक अमेरिकन चित्रपट डेथ राईडस् ए हॉर्स यावरून घेतली होती. सलीम जावेद यांनी या कथेला भारतीय संस्‍कृतीची, समाजाची, इथल्‍या प्रवृत्तीची जोड दिली आणि चित्रपट एक इतिहास बनला... एका महानायकाचा जन्‍म झाला. यानंतर दिवार आला. त्याने तर सगळ्यांना आयुष्यभर लक्षात राहील अशी मेरे पास मॉ है ही ओळ दिली.

बच्चनला सलीम जावेद मिळाले. दिवार, शोले, त्रिशूल, काला पथ्थर एका पेक्षा एक चित्रपट सुपरहिट आणि मग सगळाच इतिहास. अमिताभ बच्चन एवढा का आणि कसा सुपरहिट झाला... याला कारण परत तेच... आपली समाजरचना, भ्रष्टाचाराने बोकाळलेली सरकारी यंत्रणा आणि त्रस्‍त जनता. हा सगळा राग प्रत्येकाच्या मनात खदखदत होता. समाज आतून अस्‍वस्‍थ होता. त्याला सलीम जावेद यांनी चित्रपटातून वाचा फोडली.. कुणी तरी मसिहा येऊन तो आपल्‍याला यातून बाहेर काढेल असे प्रत्येकाच्या मनात दडले होते. त्या अस्‍वस्‍थतेला वाचा फोडली ती जंजीरच्या नायकाने.

अमिताभ बच्चनची त्या आधीची पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या. त्यांचे १२ चित्रपट फ्लॉट झाले होते. त्यांच्या करिअरवर प्रश्‍नचिन्‍ह लागले होते. त्यांच्यातला अस्‍वस्‍थ कलाकार स्वतःला कुठेतरी प्रेक्षकांसमोर प्रुव्ह करण्याच्या नादात होता किंवा संधी शोधत होता. मी उत्तम कलाकार आहे हे लोकांना आणि चित्रपटसृष्टीला दाखूवन द्यायचे होते. त्या काळाचा विचार करता राजेश खन्नाचा रोमँटिक सुपरस्टार लोकांच्या डोक्यात असताना अशी नकारात्‍मक हिरोची भूमिका स्वीकारणे कठीण.. पण अस्‍वस्‍थ अमिताभला तेवढीच अस्‍वस्‍थ कथा मिळाली आणि त्याने त्याचे सर्वस्‍व ओतले.

विद्रोही सामान्‍य माणूस उभा केला समर्थपणे. प्रेक्षकांच्या मनातला हिरो उभा केला. कथेला साजेशी पटकथा आणि सामान्‍यांच्या मनातल्या संवादाची मिळालेली जोड... आणि महानायकाचा जन्‍म झाला. दुसरा अँटी रोमँटिक हिरो जन्‍माला आला. लोकांना तो प्रचंड आवडला. इतका की आजपर्यंत त्याचे पद कायम आहे. शेवटी चित्रपटाच्‍या हिरोंना समाजच मोठे करतो. अमिताभचा जंजीर, दिवार सुपरहिट होण्यामागे हेच कारण आहे. सावकारी, स्‍मगलिंग, गँग, भाईगिरी, भ्रष्टाचार असा सगळा प्रकार समाजात खूप वाढला होता. सामान्‍य माणसाला याचे चटके सहन करावे लागत होते.

राजकारणाचा पण स्‍वभाव बदलला होता. स्वातंत्र्य मिळवण्यामागे जे एक देशप्रेम होते ते राजकीय कारण संपून आता त्या स्‍वातंत्र्याला ओरबाडून आपली तुंबडी कशी भरायची याला सुरुवात झाली होती. भ्रष्टाचाराचा बोलबाला वाढला होता. सरकारी काम तेव्‍हापासून कमिशन शिवाय होत नव्‍हते. ते आजतागायत सुरू आहे फक्त पद्धत बदलली. प्रमाण कमी जास्‍त आहे. पण सुरूच आहे. स्‍मगलिंग मोठ्या प्रमाणात वाढले होते. ते उघड सुरू झाले होते. स्‍मगलिंगमधल्‍या वस्‍तू आता बदलल्या. तेव्‍हा सोना वर्सोवा बीच पर उतर रहा है एवढेच कळायचे. आता तर आर.डी.एक्स.पासून सगळ येत. पण मार्ग बदलले. तेव्‍हा समाज सरकारी नोकरीवर जास्‍त अवलंबून असायचा आणि तुमच्या आमच्या जीवनातली सगळी कामे सरकारी दप्‍तरात असायची. त्यामुळे सामान्‍य माणूस वैतागला होता. ही सारी खदखद सलीम जावेद यांनी या कथेत मांडली.

सामान्य माणसाच्या मनातला हिरो. या व्‍यवस्‍थेविरुद्ध लढणारा त्यांना लढवय्या हिरो हवा होता. म्हणून हा सिनेमा हिट, सुपरहिट झाला. त्याने सामान्‍य माणसाच्या मनातल्‍या सगळ्या जंजीर तोडून टाकल्‍या. मोकळा श्‍वास घेण्याचा प्रयत्न केला. आणि महानायकाचा जन्‍म झाला.. चित्रपटाचे नाव म्हणून जंजीर होते. सगळा अर्थ त्या नावात आलाय...जंजीर...