‘कन्यादान’ एक अनोखा सोहळा!

हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नात ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर केवळ ‘सप्तपदी’ महत्त्वाची आहे, असे नुकतेच अलाहाबाद न्यायालयाने स्पष्ट केले.
Marriage
Marriagesakal

- ॲड. प्रकाश सालसिंगिकर

हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नात ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर केवळ ‘सप्तपदी’ महत्त्वाची आहे, असे नुकतेच अलाहाबाद न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदू धर्मातील लग्नसोहळ्यात कन्यादानाचे अपरंपार महत्त्व आहे. वडील-मुलीच्या नात्याचा अनोखा सोहळा म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सुभाष विद्यार्थी यांनी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिलेल्या निर्णयामुळे हिंदू विवाह संस्था, सप्तपदी, कन्यादान, रूढीप्राप्त धर्मविधी, संस्कार इत्यादी अनेक विषयांवर मीडियामध्ये बातम्या येत आहेत. कुठलेही न्यायालय त्यांच्यापुढे असलेल्या याचिकांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन व त्यासंदर्भात काय काय उपलब्ध आहेत याचा विचार करून दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर निर्णय देत असते; परंतु त्या निर्णयानंतर अनेकांनी कन्यादान योग्य की अयोग्य, अशा मुद्द्यावर आपापले मत मांडले आहे. काही जणांनी तर न्यायालय कसे बरोबर किंवा चुकीचे यावरही मत प्रकट केले आहे. न्यायालयाने कुठल्या परिस्थितीत असा निर्णय दिला हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यामागचा हेतू काय हे कळणे अशक्य आहे.

आशुतोष यादव नामक युवकाचे २०१५ मध्ये लग्न झाले होते. कन्यादान हा एक महत्त्वाचा रितीरिवाज आहे व त्या लग्नात ते झाले की नाही याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी साक्षीदारास बोलवणे गरजेचे आहे. या अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने हिंदू विवाह कायदा कलम सातचा दाखला देत असे म्हटले, की त्यात कुठेही कन्यादानाचा उल्लेख नाही; पण सप्तपदीचा आहे.

अग्निसाक्षीने सप्तपदी झाली म्हणजे विवाह सोहळा पूर्ण झाला होय. पुढे न्यायालयाने या कलमाचा उल्लेख देत असे म्हटले की त्या केससाठी कन्यादान झाले किंवा नाही ही बाब महत्त्वाची नाही म्हणून आशुतोष यादव यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

कलम सात दोन उपक्रमांमध्ये विभागलेले असून त्यातील पहिल्या भागात असे दिले आहे की, ‘हिंदू विवाह त्यातील कोणत्याही पक्षाचे रूढीप्राप्त धर्मविधी व संस्कार यानुसार विधिपूर्वक लावता येईल.’ दुसऱ्या भागात, ‘जिथे असे धर्मविधी व संस्कार त्यात सप्तपदी (म्हणजे, वधू-वरांनी जोडीने होमाग्नीच्या साक्षीने सात पावले टाकणे) समाविष्ट असते तेथे सातवे पाऊल टाकले जाते तेव्हा विवाह पूर्ण व बंधनकारक होतो.’

अशा तरतुदीनुसार जर योग्य प्रकारे विचार केला तर दोन्ही पक्षकारांचे म्हणजे वर-वधूच्या ज्या काही रूढीप्राप्त धर्मविधी व संस्कार असतील त्यानुसार लावलेले लग्न हे कायदेशीर मानले जाईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल पक्षकार सर्वोच्च न्यायालयात जाईल अथवा नाही, तो त्यांचा निर्णय.

तो तिथे गेल्यावर हा निर्णय अयोग्य होता की योग्य हे येणारी वेळच ठरवेल; पण कलम सातमधील तरतुदी समजण्यासाठी सामान्य माणसाला वकिलाची किंवा कुठल्याही न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही, असे मला वाटते. या कलमाच्या दुसऱ्या भागामध्ये जे नमूद केले आहे त्यानुसार दोन्ही पक्षकारांच्या धर्मविधी व संस्कारामध्ये जर सप्तपदीचा सहभाग असेल तरच सातवे पाऊल टाकल्यानंतर विवाह पूर्ण व बंधनकारक होईल, असा अर्थबोध होतो.

या ठिकाणी एक बाब सांगावीशी वाटते, की या कायद्यामध्ये कोठेही धर्मविधी व संस्कार म्हणजे नेमके काय, याची व्याख्या दिलेली नाही. १९५५ मध्ये बनवलेल्या या कायद्याबाबत कायदे करणाऱ्यांना हे माहीत होते की हिंदू धर्मातील रितीरिवाज हे प्रत्येक जातीमध्ये तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार वेगवेगळे असतात.

त्यामुळे दोन्ही पक्षकारांच्या ज्या काही रूढीप्राप्त धर्मविधी व संस्कार आहेत त्यानुसार त्यांनी केलेले लग्न हे त्यांना बंधनकारक असेल, असे कायद्यामध्ये नमूद केले आहे. विवाहासंदर्भात या रूढीप्राप्त धर्मविधी व संस्कार यांना आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने शब्दबद्ध केलेले दिसून येत नाही. तसे करणे शक्यही नाही. त्यामुळे नेमका कुठला विधी केल्यास अथवा न केल्यास कायद्याच्या विरोधात होईल याबद्दलची स्पष्टता सध्याच्या हिंदू विवाह कायद्यात नाही, असे मला वाटते.

विवाह संस्था आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. अगदी पुराणातसुद्धा कन्यादानाच्या अनेक कथा आपणास ऐकायला मिळतील. पहिले कन्यादान कोणी केले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असला तरी कन्यादानाचे महत्त्व काही कमी झालेले नाही. कन्यादान हा संपूर्ण विवाह सोहळ्यातील अतिशय हळवा आणि भावनिक क्षण असतो.

या क्षणाची सर्वच वाट बघत असतात. विवाह सोहळ्यातील संपूर्ण आनंदी अशा वातावरणात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा क्षण ज्यात सर्वच जण भावनिक होतात. त्याबद्दल ज्या व्यक्तीच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे किंवा होणार आहे ती व्यक्ती योग्य प्रकारे सांगू शकेल.

हिंदू धर्मातील लग्नसोहळ्यात कन्यादानाचे अपरंपार महत्त्व आहे. लग्नातील सर्वात महत्त्वपूर्ण संस्कारांपैकी तो एक मानला जातो. कन्यादान अर्थात दुसऱ्या मुलाच्या हाती आपल्या मुलीला सोपवणे, असा अर्थ सहसा मानला जातो. मात्र कन्यादानाचा असा अर्थ नाही. हिंदू लग्नामध्ये एकूण २२ चरण असतात. त्यामधील कन्यादान अत्यंत महत्त्वाचा चरण आहे.

त्या संस्कारामध्ये मुलीचे वडील केवळ आपली मुलगी दान करत नाहीत, तर अग्नीला साक्षी ठेवून तिचे गोत्र दान करतात. त्यानंतर मुलगी आपल्या माहेरचे अर्थात वडिलांच्या कुळाचे गोत्र सोडते. आपल्या पतीच्या म्हणजेच नवऱ्याच्या वंशाचे गोत्र धारण करते. त्यामुळेच कन्यादानाला महत्त्व प्राप्त होते.

त्याशिवाय कन्यादान सर्वात मोठे पुण्य असल्याचेही पूर्वपरंपरागत समजण्यात येते. इतकेच नाही, तर परंपरेनुसार मंत्रोच्चारणादरम्यान मुलाकडून आपल्या मुलीला कायम सुखात ठेवण्याचे वचनही वडील मागून घेतात आणि आपल्या मुलीची सुरक्षा अन् आनंदाची जबाबदारी आपल्याप्रमाणेच मुलाने सांभाळावी, असे सांगून वडील मुलीला त्याच्याकडे सुपूर्द करतात. कन्यादान म्हणजे वडील आणि मुलीच्या नात्याचा अनोखा सोहळा मानला जातो.

धर्म अथवा जाती कोणतीही असो, त्यामध्ये कुणाला हानी होत नाही. तसेच अशा परंपरांचे पालन केल्याने आनंद व समाधानच मिळते. अशा गोष्टी कितीही जुन्या असल्या तरी त्यामध्ये आडकाठी आणण्याचे कारण नाही. ज्या काही चुकीच्या बाबी आहेत मग त्या कुठल्याही धर्मातील असूदे त्याबद्दल वेळोवेळी कायदे बनवण्यात आलेले आहेत व त्यावर प्रतिबंध केलेला आहे.

एक सांगावेसे वाटते, की कन्यादानासारख्या भावनिक विषयात कुणीही हात घालण्यापेक्षा हिंदू विवाह कायद्यामध्ये वेगवेगळ्या रूढीप्राप्त धर्मविधी व संस्कार याच्या अनुषंगाने संशोधन करून बदल करणे गरजेचे आहे.

prakash.advs@gmail.com

(लेखक उच्च न्यायालयात वकिली करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com