सरस्वतीनं केला अंतिम निवाडा...

सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या, तसंच त्यातील शिक्क्यांच्या व गोवंशाच्या अभ्यासातून आर्यांच्या आक्रमणाचा वा स्थलांतराचा कुठलाही पुरावा मिळत नाही
history of india Indus-Saraswati culture ved
history of india Indus-Saraswati culture vedsakal

सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या, तसंच त्यातील शिक्क्यांच्या व गोवंशाच्या अभ्यासातून आर्यांच्या आक्रमणाचा वा स्थलांतराचा कुठलाही पुरावा मिळत नाही, हे गेल्या लेखात आपण पाहिलं. उलट, त्या काळापासून आजपर्यंत भारतात अखंड सांस्कृतिक सातत्य असल्याचंच आढळून येतं.

याबाबतीतला गोंधळ आणि अनिश्चितता दूर करून त्यावर सत्याचा प्रकाशझोत टाकण्याचं काम ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वतीनं करावं हे स्वाभाविकच आहे! भारतीय संस्कृतीत सरस्वती नदीला नेहमीच मोठ्या गौरवाचं स्थान देण्यात आलं आहे.

history of india Indus-Saraswati culture ved
Aurangabad History : फतेहनगर ते छत्रपती संभाजीनगर कितीवेळा बदललं औरंगाबादचं नाव, जाणून घ्या

प्रयागराज इथं गंगा-यमुनेच्या संगमात सरस्वती गुप्त स्वरूपात सहभागी आहे, यावर कोट्यवधी हिंदूंची संपूर्ण श्रद्धा आहे. ऋग्वेदाची निर्मिती सरस्वतीच्या किनारी आजच्या कुरुक्षेत्राच्या परिसरात झाली. प्राचीन काळी या प्रदेशाला ‘ब्रह्मावर्त’ असं नाव होतं व हा जगातील सगळ्यात पवित्र प्रदेश मानला जात असे.

ऋग्वेदात सरस्वतीला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे. तिचा अत्यंत प्रेमानं, आदरानं ‘तू सर्वश्रेष्ठ नदी, सर्वश्रेष्ठ माता, सर्वश्रेष्ठ देवी आहेस’ या शब्दांत उल्लेख केला गेला आहे. ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख साधारणतः ९० वेळा, तर गंगेचा केवळ चार-पाच वेळा येतो, यावरून सरस्वतीचं ऋग्वेदातील महत्त्व लक्षात येतं.

सरस्वतीची भव्यता व तिच्या प्रवाहाची शक्ती यांचं वर्णन ‘ती हिमालयातून मोठमोठ्या पाषाणांना कमलाच्या देठाप्रमाणे सहज मोडून टाकत जमिनीवर अवतरते व समुद्राला जाऊन मिळते’ या शब्दांत करण्यात आलेलं आहे.

history of india Indus-Saraswati culture ved
Valentine Day History: सिंगल लोकांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या 'व्हॅलेंटाईन'चा असा आहे इतिहास

सध्या मात्र सरस्वती नदी अस्तित्वात नाही, त्यामुळे अनेक पाश्चिमात्य आणि डावे इतिहासकार आणि भारतातील त्यांचे समर्थक ‘सरस्वती ही कधीच अस्तित्वात नसलेली एक काल्पनिक (Mythical) नदी आहे,’ असं प्रतिपादन अत्यंत द्वेषानं करताना दिसतात. सिंधू संस्कृतीचा उल्लेख सिंधू-सरस्वती संस्कृती असा केलेला त्यांना अजिबात सहन होत नाही. त्यांना सरस्वतीचा इतका राग का वाटतो, याचा उलगडा आपल्याला लवकरच होणार आहे.

ब्रिटिश राजवटीच्या काळात राजस्थानात काम करणाऱ्या काही ब्रिटिश व भारतीय अधिकाऱ्यांना ‘घग्गर’ या नदीचा कोरडा पडलेला प्रवाह आढळला. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या शिवालिक टेकड्यांमध्ये उगम पावून हरियाना, राजस्थान व गुजरातमार्गे ही नदी पाकिस्तानात प्रवेश करत असे.

तिथं तिला ‘हाक्रा’ या नावानं ओळखलं जात असे. पुन्हा भारतात प्रवेश करून ती शेवटी कच्छच्या आखातात समुद्राला मिळत असे. यानंतर अनेक संशोधकांनी घग्गर-हाक्राचं आटलेलं पात्र, त्याशेजारी वसलेल्या शहरांचा त्यामुळे झालेला शेवट यांचा अभ्यास करून, इथं कधीकाळी मोठी नदी वाहत असावी, अशी शक्यता व्यक्त केली.

history of india Indus-Saraswati culture ved
Kathak History : कथकचा इतिहास उलगडणार!

भारतीय परंपरेतील सरस्वती हीच असावी असंही प्रतिपादन त्यांनी केलं. सॅटेलाईट तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर याचे अधिक ठोस पुरावे मिळू लागले. हे कोरडं पडलेलं पात्र काही ठिकाणी १४ ते १६ किलोमीटर रुंद असल्याचं ‘नासा’च्या व ‘इस्रो’च्या उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये आढळून आलं आहे.

आता वाळवंट बनलेल्या त्या कोरड्या पात्रात विहिरी खोदल्या असता, त्यांत चौदा हजार वर्षांपूर्वी हिमालयात उगम पावलेलं पाणी आढळून आलं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून, कोरडं पडलेलं घग्गर-हाक्राचं पात्र हीच प्राचीन सरस्वती आहे, यावर शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केलं.

सरस्वतीच्या विलयाचा इतिहास

शिवालिक टेकड्यांमध्ये उगम पावणारी व पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी नदी इतकी विशाल, शक्तिशाली व लांबवर सतत वाहणारी नदी असू शकत नाही. अभ्यासाअंती संशोधकांना असं आढळलं की, पूर्वेला यमुना व पश्चिमेला सतलज या हिमनदीत उगम पावणाऱ्या नद्यांचा एकेक प्रवाह सरस्वतीला येऊन मिळत असे.

history of india Indus-Saraswati culture ved
Breakfast History : अन् सुरू झाली नाश्त्याची परंपरा!

या बारमाही पाण्यामुळे सरस्वती ही इतकी मोठी व शक्तिशाली नदी होती. हिमालयातील भूगर्भाची स्थिती अस्थिर असल्यामुळे तिथं भूकंपासारख्या घटना नेहमीच घडतात हे आपण जाणतो. अशाच काही घटनांमध्ये नद्यांचे प्रवाह बदलून यमुनेचा प्रवाह पूर्वेला गंगेकडे, तर सतलजचा प्रवाह पश्चिमेला सिंधूकडे जाऊन मिळाला.

यामुळे सरस्वतीचा प्रवाह दुर्बल होऊन अखंड राहिला नाही. महाभारतात असलेल्या उल्लेखानुसार, ती काही ठिकाणी लुप्त होऊन टप्प्याटप्प्यात वाहू लागली. तरीही इसवीसनपूर्व २५०० पर्यंत परमोच्च पातळीवर पोहोचलेल्या सिंधू-सरस्वती संस्कृतीची अनेक केंद्रं सरस्वतीच्या किनाऱ्यावर वसलेली होती.

इसवीसनपूर्व २२०० ते १९०० यादरम्यान संपूर्ण जगात भीषण दुष्काळ पडला, त्यामुळे आधीच कमजोर झालेली सरस्वती पूर्णतः नाहीशी झाली व मोठ्या भूप्रदेशाचं वैराण वाळवंटात रूपांतर झालं. यामुळे सिंधू-सरस्वती संस्कृतीवर मोठा आघात झाला व ती लयाला गेली.

या संशोधनामुळे आक्रमण/स्थलांतर-समर्थकांची मोठीच पंचाईत झाली. एकतर सिंधू-सरस्वती संस्कृतीचा अंत सरस्वतीच्या विलयामुळे झाला; आर्यांच्या आक्रमण/स्थलांतरामुळे नव्हे, हे सिद्ध झालं.

शिवाय, ‘ज्या वेदांमध्ये सरस्वतीचं वर्णन ‘हिमालयापासून सागरापर्यंत वाहणारी महाशक्तिशाली नदी’ असं केलं गेलं आहे, त्यांची निर्मिती सरस्वतीच्या इसवीसनपूर्व १९०० मध्ये झालेल्या विलयानंतर सातशे वर्षांनी - इसवीसनपूर्व १२०० मध्ये - झाली,’ हे आक्रमण/स्थलांतर- समर्थकांचं प्रतिपादन हास्यास्पद ठरलं (त्यांच्या या सिद्धान्तानुसार, ‘आर्यांनी इसवीसनपूर्व १५०० मध्ये आक्रमण करून इसवीसनपूर्व १२०० मध्ये ऋग्वेदाची निर्मिती केली.’ या सिद्धान्ताविषयीची चर्चा याआधी आपण केलेलीच आहे).

म्हणूनच ‘सरस्वती ही मिथिकल नदी आहे’ याला काहीही करून चिकटून राहण्याचा आक्रमण/स्थलांतर-समर्थकांचा अट्टहास आहे, त्यासाठी त्यांनी थक्क करून सोडणाऱ्या कोलांट-उड्या मारल्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे ‘सरस्वती अशी कुठली एक नदी नव्हती, तर वैदिक आर्य कुठल्याही नदीचा उल्लेख सरस्वती असा करत असत.’

मात्र, ऋग्वेदात गंगा, यमुना, शतुद्री, पुरुष्णी, सिंधू अशा अनेक नद्यांचे स्वतंत्र उल्लेख आहेत आणि एकाच नदीला सरस्वती म्हटलं गेलं आहे हे स्पष्ट आहे, त्यामुळे हा आक्षेप टिकत नाही. दुसरी कोलांट-उडी म्हणजे, ‘अफगाणिस्तानातील ‘हेलमंड’ या नदीचा उल्लेख ऋग्वेदात ‘सरस्वती’ असा केला गेला आहे.’

मात्र, त्यांच्या दुर्दैवानं ऋग्वेदातील ‘नदीस्तुती’ या सूक्तामध्ये पूर्वेकडील गंगेपासून ते पश्चिमेकडील सिंधूपर्यंत सर्व नद्यांचा क्रमानं उल्लेख आहे. त्यानुसार, पूर्वेकडे दृषद्वती व यमुना, तर पश्चिमेकडे शतुद्री म्हणजे सतलज यांच्या मध्ये सरस्वती वाहत होती, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. हे स्थान घग्गर-हाक्राच्या पात्राशी बरोबर जुळतं.

शिवाय, ‘सरस्वती ही हिमालयापासून समुद्रापर्यंत वाहणारी नदी आहे,’ असा ऋग्वेदात उल्लेख आहे, तर हेलमंड ही Landlocked नदी आहे. म्हणजेच, सरस्वतीला अफगाणिस्तानात पाठवण्याचा प्रयत्न फोल आहे, हे स्पष्ट आहे.

कुठलाही पुरावा नसताना आपलं म्हणणं रेटत राहायचं, असं ठरवलं की, सर्कशीतल्या ट्रॅपिझ-आर्टिस्टला लाजवतील अशी हास्यास्पद विधानं Eminent Historian म्हणवणाऱ्या अनेकांना करावी लागतात. असो!

याबरोबरच, हा सिद्धान्त सपशेल असत्य असल्याचंच ऋग्वेदाचा अभ्यासही सांगतो. पश्चिमेकडून आक्रमण/स्थलांतर करून भारतात आल्यानंतर जर गौरवर्णीय आर्यांनी ऋग्वेदाची निर्मिती केली असती, तर ऋग्वेदात पुढील उल्लेख सापडणं आवश्यक होतं :

भारतात आगमन होण्याआधी त्यांचं जिथं वास्तव्य होतं, त्या प्रदेशाचे उल्लेख. इथं ओघानं येणारा एक प्रश्न असा की, भारतापर्यंत येताना आर्यांनी मध्य आशिया, इराण असं जिथं जिथं वास्तव्य केलं, तिथं तिथं त्यांनी वैदिक संस्कृतीसारखी संस्कृती आणि संस्कृतसारखी भाषा का निर्माण केली नाही?

पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेल्या स्थलांतराचे उल्लेख. भारतात आगमन झाल्यानंतर स्थानिक भूगोल, भाषा, वातावरण हे सगळं नवं, अपरिचित असल्याचे उल्लेख. यापैकी एकही उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही.

ऋग्वेदात फक्त आणि फक्त भारतातील प्राणी, पक्षी, झाडं, नद्या, भूप्रदेश यांचेच उल्लेख आढळतात. आणखी एक निर्विवाद पुरावा मिळतो तो अनुवंशशास्त्राच्या (Genetics) अभ्यासातून. यानुसार इंडो-युरोपीय भाषा बोलणाऱ्या मानवसमूहांची ओळख असलेला R१a हा हॅपलो ग्रुप व M १७ हा मार्कर यांचं मूळ हे भारतात असल्याचं आता सिद्ध झालं आहे.

म्हणजेच, भाषेचा व संस्कृतीचा प्रवाह भारतातून पश्चिमेकडे गेला आहे. ब्रिटिशांनी आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या आणि ज्यांना भारत नेहमीच विभाजित आणि कमजोर राहावा असं वाटत होतं, त्यांनी जोपासलेल्या या सिद्धान्तामुळे भारताचं कमालीचं नुकसान झालं आहे.

कारण, भारतात फूट पाडणाऱ्या ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’, ‘हिंदी विरुद्ध तमीळ’, ‘आदिवासी विरुद्ध इतर’ यांसारख्या सर्व वादांचा आधार हा काल्पनिक सिद्धान्तच आहे. स्वामी विवेकानंदांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक विद्वानांनी, तसंच अनेक भारतीय व पाश्चात्त्य संशोधकांनीही ठोस पुराव्यांसह याचं खंडन केलेलं आहे. आपली दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेला हा सिद्धान्त आपण गाडून टाकायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com