पाठीवरचे वळ

पाठीवरचे वळ

दहावीत असणारा माझा मुलगा एकेदिवशी घरी आला तो अंगावर छडीने मारल्याचे काळे-निळे वळ घेऊनच. वर्गशिक्षिकेचा संताप त्याच्या पाठीवर उमटला होता. अपमानाने अस्वस्थ झालेला मुलगा शाळेत जाण्याचे टाळू लागला. बदला घेण्याची भावना त्याच्या मनात जोर धरू लागली. त्याचे आतल्या आत धुमसणे मलाही असह्य झाले. ते क्षण त्याच्या इतकीच माझीही परीक्षा पाहणारे होते...

तुम्ही तर नाही ना मारकुटे?

एके दिवशी माझा दहावीतील मुलगा शाळेतून घरी रडतच आला. काहीही न बोलता त्याने अंगातील शर्ट काढला, पॅंट काढली आणि मला अंगावर छडीने मारल्याचे वळ दाखविले. ते काळे-निळे मोठे वळ पाहून माझे हृदय गलबलले. डोळ्यांत पाणी आले. मी दोन मिनिटे स्तब्ध उभीच राहिले. काहीच सुचेना. स्वतःला सावरून मी त्याला काय झाले, असे विचारले. त्याने सांगितले, की ""मला एक गणित अडलेलं होतं, ते सुटत नव्हतं म्हणून बाईंना मी विचारावयास गेलो तर बाई उठल्या आणि त्यांनी मला सपासप त्यांच्या हातातील छडीने मारलं.'' त्यावर माझा विश्‍वासच बसेना. म्हणून मीच त्याला विचारलं, ""अरे, तू बाईंना चिडवलंस का? वर्गात दंगामस्ती केलीस करा? मुलांबरोबर तुझी भांडणं झाली का?'' माझ्या सर्व प्रश्‍नांना त्याचं "नाही' हेच उत्तर होतं. मग माझा संताप अनावर झाला. शाळा जवळच असल्यामुळे मी तडक शाळेत गेले, परंतु तोपर्यंत शाळा सुटलेली होती.

वर्गात 60-65 मुलांच्या समोर काहीही चूक नसताना बाईंनी आपल्याला मारलं म्हणून मुलगा प्रचंड अपमानित व अस्वस्थ झाला होता. दुसऱ्या दिवशी तो शाळेत गेला नाही, परंतु मी शाळेत गेले. त्याच्या मित्राला विचारले, ""काय रे, वर्गात काल काय झालं? बाईंनी याला का मारलं?' त्यावर त्यानं मला सांगितलं, ""वर्गातील काही मुलं "10 वी फ' हा सिनेमा पाहून आलेली होती. परीक्षेपूर्वीचे शेवटचे दिवस म्हणून मुलं वर्गात दंगामस्ती घालत होती. गणिताचा तास होता. आमच्या बाई वर्गात आल्या, त्यांनी मुलांना शांत बसण्यास सांगितलं, परंतु मुलं ऐकत नव्हती. त्यामुळे बाई चिडल्या होत्या. तेवढ्यात हा अडलेलं गणित विचारावयास गेला होता. त्यांनी तो राग याच्यावर काढला.'' हे उत्तर मला पटेना. म्हणून मी तडक वर्गात गेले. वर्गातील मुलांचं वरीलप्रमाणे एकच उत्तर आलं. ते ऐकून मला खूप चीड आली. त्या बाई भेटल्या तर मारावं की काय, असा विचार मनात आला. मी तडक टीचर रूममध्ये गेले, तर कळलं, मॅडम रजेवर आहेत. मुख्याध्यापकही रजेवर होते. म्हणून उपमुख्याध्यापिकांकडे जाऊन तक्रार केली. हा प्रसंग त्यांना सांगत होते, तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहत होते आणि माझे अश्रू पाहून त्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. मी त्यांना सांगितलं, की माझ्या मुलानं वर्गात चोरी केली असती, तास चालू असताना वर्गात दंगामस्ती केली असती, मॅडमला चिडवलं असतं किंवा इतर काही गोष्टी केल्या असत्या आणि त्याला मारलं तर ते मी ते योग्यच समजते. परंतु काहीही दोष नसताना वर्गातील इतर मुलांचा राग त्याच्यावर काढणं कितपत योग्य आहे?'' त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. मी मॅडमबद्दल लेखी तक्रार नेली होती, पण तो अर्ज मी दिला नाही.

या प्रकारामुळे मुलगा अस्वस्थ झाला होता. परीक्षा जवळ आलेली होती. अभ्यासाचं टेन्शन, क्‍लासचं टेन्शन, त्याच्यात भर म्हणून वर्गात झालेला अपमान... तो शाळेतच जायला तयार नव्हता. त्याच्याकडे पाहून मलाही गलबलून यायचं. त्याच दरम्यान पेपरमध्ये काही बातम्या माझ्या वाचनात आल्या, की वर्गात सर बोलले, रागावले म्हणून अपमान वाटून एका मुलाने आत्महत्या केली.

मी त्याला धीर देत होते, समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. तो घरात एकटाच बसून राहू लागला. कोणाशीही बोलेना. त्याच्या मनात बदला घेण्याचे विचार घोळू लागले. त्याला काही मित्र सल्ला देत होते, ""चल, आपण शाळेत जाऊन मॅडमकडे पाहू, अमुक करू, तमुक करू.'' मित्रांनी दिलेले सल्ले त्यानं मला सांगितले. मी खूप विचार केला. मी त्याच्यावर झालेल्या अन्यायाच्या जखमा पाहू शकत होते, पण "गुन्हेगार' म्हणून शिक्का बसला असला तर सहन करू शकले नसते. कदाचित प्रत्येक वेळी त्याने त्याच मार्गाचा अवलंब केला असता. अन्यायामुळे तो चिडून बोलत होता, हे मी समजू शकत होते. कारण तो तापट स्वभावाचा असूनही त्याने स्वतःवर संयम ठेवला होता. शेवटी मी त्याला सांगितलं, की "मुलांवर संस्कार करणारे, त्यांना प्रगतीचा मार्ग दाखविणारे आई, वडील आणि शाळेतील शिक्षक हेच असतात. बाईंच्या ठिकाणी तुझी आई उभी होती असं तू समज. आणि आईनं मारलं तर तू आईशी असा बदला घेण्याच्या भावनेनं वागशील का? झाला प्रकार विसर आणि अभ्यासाला लाग. टेन्शन घेऊ नकोस.' मी त्याला सल्ला देत असले तरी त्याच्या हृदयावर झालेल्या जखमा भरत नव्हत्या. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते; परंतु एकांतात त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल अश्रू ढाळत होते. मला त्रास होताना पाहून तो अधिकच दुःखी झाला असता.

त्याचं मानसिक टेन्शन थोडं कमी झालं. शाळेचे शेवटचे चारच दिवस राहिले होते. मी त्याला शाळेत जाण्यास सांगितलं. तो शाळेत गेला. त्याला ज्या बाईंनी मारलं होतं त्या अचानक वर्गात आल्या. दुसऱ्याच विषयाचा तास चालू असताना. सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला उभं केलं. "सॉरी' म्हणून त्याची वर्गात माफी मागितली. त्या वेळी त्याच्या मनावरचा ताण थोडासा कमी झाला. झालेला प्रकार त्यानं घरी आल्यावर मला सांगितला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की मी उपमुख्याध्यापिका यांच्याकडे तोंडी तक्रार केलेली होती. त्याची दखल घेण्यात आली होती.

अनेकांनी मला सल्ले दिले, की शाळेत लेखी तक्रार करा, पोलिस कंप्लेट करा, बाईंना निलंबित करा..., परंतु या सर्व प्रकारातून काहीही साध्य झालं नसतं. शिवाय समाजापुढे गुरू-शिष्य, शिक्षक-विद्यार्थी या नात्यात मलिनता मलाही येऊ द्यायची नव्हती.

मी त्याला धीर देत होते. त्याचं मानसिक संतुलन बिघडू नये याची काळजी घेत होते. माझ्या प्रयत्नांना तोही थोडा थोडा साथ देऊ लागला. अभ्यास करू लागला. दहावी बोर्डाची परीक्षा देऊन वर्ष वाया न घालवता कमी गुणांनी का होईना, तो पास झाला आणि मला माझ्या केलेल्या प्रयत्नांची किंमत मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com