टाळू बाष्कळ गप्पा (डॉ. वैशाली देशमुख)

टाळू बाष्कळ गप्पा (डॉ. वैशाली देशमुख)

अनेकदा देश, शिक्षणपद्धती, समाज या विषयांवर बोलताना मोठ्या माणसांना नकारात्मक शेरे मारण्याची सवय असते. पालकच अशा गप्पा मारत बसले, तर मुलांवर त्याचे परिणाम होणारच. कळत-नकळतपणे चघळल्या जाणाऱ्या विषयांमधून मुलांच्या मनात आशेची ज्योत पेटतेय, की निराशेच्या अंधारानं त्यांचं मन काळकुट्ट होतंय; त्यांच्या अपरिपक्व विचारांना, नव्यानं बनणाऱ्या मतांना पूर्वग्रहाचं खतपाणी घातलं जातंय का, आपल्याही नकळत आपण त्यांचं खच्चीकरण तर करत नाही आहोत ना, सतत मान हलवत निराशेचे सुस्कारे तर टाकत नाही ना अशा सगळ्या प्रश्‍नांचा विचार पालकांनी करायलाच हवा.

‘‘काय हे, किती उशीर?’’ समीर म्हणाला.
‘‘अरे काय करणार? ट्रॅफिक इतकं जीवघेणं होतं! छे, आपल्याकडची रहदारी म्हणजे काही खरं नव्हे. शिस्त नाही अजिबात,’ राघवचं वैतागलेलं उत्तर.
‘‘हो ना, साधा सिव्हिक सेन्स नाही लोकांना. घाण आणि कचरा बघ ना किती करतात,’’ गौरवनं दुजोरा दिला.

‘‘सगळी सिस्टिमच खराब आहे रे. सरकारी ऑफिसांमध्ये जाऊन बघ एकदा. एक फाइल हलत नाही जागची,’’ समीरनं आपलं मत मांडलं.

‘‘अरे, माणुसकी तर रिटायर झालीये की काय असं वाटतं. कुणाला कुणाशी काही देणं-घेणं नसतं,’’ इति राघव.

गौरवनं यावर त्याचा उपाय काढला होता ः ‘‘मी तर माझ्या मुलांना सांगितलंय- जिथं तुमची, तुमच्या ज्ञानाची कदर नाही तिथं अजिबात राहू नका. इथं शिकून घ्या आणि सरळ परदेशी जा. मस्त सुखात आयुष्य जगा. ठेवलंय काय इथं!’’

हा आहे एक दोस्त मंडळींचा कौटुंबिक गप्पांचा अड्डा. जोरजोरात हसणं, खिदळणं, जोक्‍स, तावातावानं घातलेले वाद असं सगळं साग्रसंगीत. जोडीला भरपूर खाणं-पिणं; पण गप्पांचे आणि वादविवादांचे विषय मात्र तेच-  आपल्या देशातल्या अडचणी, भ्रष्टाचार, घाण...! कधी मुलांच्या शाळांचा विषय निघतो. मग सुरू होते शिक्षणपद्धतीवर टीका. ‘शिक्षणसंस्था म्हणजे कसा व्यवसाय झालाय, शिक्षक कसे पाट्या टाकतात, आजची शिक्षणपद्धती कशी युजलेस आणि चुकीची आहे’... असं कायकाय. एका आई-बाबांनी सांगितलेलं आठवतंय ः ‘कशाला उगाच नोकरीबिकरी सोडून मुलांचा अभ्यास घेत घरी बसायचं? त्यापेक्षा पैसे कमावून ठेवू, प्रवेश घ्यायला जास्त उपयोगी पडतील.’’ 

आपल्या आई-बाबांचा, त्यांच्या मित्र-मैत्रिणींचा हा सात्त्विक संताप ऐकून मुलांना काय वाटत असेल? काय विचार येत असतील त्यांच्या मनात?- ‘काय हा देश, कधी एकदा तो सोडून इथून निघून जातोय आणि मग सगळं स्वर्गसुखच!’ किंवा ‘काय उपयोग शिकून, नाहीतरी अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांनी सगळा घोळच घातलाय आणि आपण शिक्षकांना एकेरी हाक मारतो ते बरोबरच आहे, आई-बाबासुद्धा त्यांना नावं ठेवतायत.’

काही वेळा राखीव जागांबद्दल तावातावानं मतं मांडली जातात. तेव्हा स्वत:च्याही नकळत बोलणारी व्यक्ती द्वेषाला खतपाणी घालत असते. आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती होऊन जो भेद नष्ट व्हावा, किंवा निदान कमी तरी व्हावा अशी अपेक्षा, तो उलट आपल्या पुढच्या पिढीच्या मनात खदखदत ठेवण्यात हे लोक यशस्वी होत असतात असा नाईलाजानं निष्कर्ष निघतो यातून. 

अनेक जाणत्या लोकांनी असं मत मांडलंय, की देश आणि शिक्षण या दोन गोष्टींना मुलांसमोर सतत दोषी ठरवणं, त्यांची निंदा-नालस्ती करणं आपण टाळलं पाहिजे. (इथं देश या शब्दाचा अर्थ फक्त भौगोलिक न घेता आपण राहतो तो परिसर, समाज, आजूबाजूचे लोक असा घेता येईल.) अनेक कारणं आहेत त्याला. मुलांची आणि एकूण समाजाचीच पायाभरणी या दोन घटकांवर अवलंबून असते. मुळात नुसती वक्तव्यं करून परिस्थिती बदलणार नसते. ‘सगळ्यांना झोडून काढलं पाहिजे, एकेकाला धरून तुरुंगात टाकलं पाहिजे, ही व्यवस्थाच मुळासकट बदलून टाकायला पाहिजे’ असं म्हणून बदल कुठं घडतात? म्हणजे त्यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाय शोधायला हवा; पण ते सोपं नसतं याची आपल्याला जाणीव असते. आपण काही त्यातले तज्ज्ञ नसतो. ‘अशी नको तर कशी हवी शिक्षणपद्धती?, तसं करणं शक्‍य आहे का?, ते प्रॅक्‍टिकल आहे का?’ या प्रश्नांना आपल्याकडे उत्तर नसतं. शिवाय ती बदलेपर्यंत तरी तिला तोंड तरी द्यायला लागणारच आहे. आजच्या शिक्षणपद्धतीत अनेक त्रुटी आहेत ही गोष्ट खरी. कितीतरी तज्ज्ञ त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करताहेत; पण ही गोष्ट एका दिवसात होणारी नव्हे. आणि जोपर्यंत मुलं चारी बाजूंनी शिक्षणपद्धतीच्या नावानं खडे फोडलेले ऐकत राहतील तसा त्यांचा त्यातला रस आटत जाणार. म्हणजे एका बाजूनं ती बदलण्याचे प्रयत्न चालू ठेवायचे (आणि ते काम तज्ज्ञ मंडळींवर सोपवायला हवं, नाहीतर आपल्यातल्या प्रत्येकाची याबाबतीत काही ना काही मतं असतात. बहुधा ती ऐकीव आणि तुटपुंज्या माहितीवर आधारित असतात.) आणि समांतररीत्या आपल्या हातात असतील ते प्रयत्न करायचे. काही वेळा हे प्रयत्न म्हणजे मुलांवरचा अतिताण आपल्याकडून कमी कसा करता येईल किंवा निदान वाढवला तरी जाणार नाही यासाठी शोधलेल्या युक्‍त्या असतील. काही वेळा आपल्याला हव्या असलेल्या प्रकारे त्यांची विचारपद्धती बदलण्यासाठी उचललेली पावलं असतील, तर काही वेळा प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी त्यांना दिलेलं बळ असेल.

तीच बाब देश सुधारण्याची. आपला देश म्हणजे आपणच आणि तो सुधारणं हे आपल्याच हातात आहे. ही गोष्ट शंभर टक्के खरी की पुराणकाळातल्या, इतिहासातल्या ज्या गोष्टी सिद्ध झालेल्या नाहीत त्यांचा वृथा दुराभिमान बाळगायला नकोय. किंवा त्या पुण्याईवर अजूनही बढाया मारण्यात काही हशील नाही; पण आपण ज्या संस्कृतीत लहानाचे मोठे झालो, जिथं आपण शिकलो, जिथं आपले पूर्वज राहिले त्या स्थानाविषयी घृणा का निर्माण करायची कोवळ्या मनांत? जेव्हा हे घडतं तेव्हा पर्यायानं आपण मुलांच्या मनात एक कमीपणाची, दुय्यमपणाची भावना रुजवत असतो असं नाही वाटत? त्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढेल की कमी होईल? आज सगळं जग जवळ आलंय. आजची मुलं ग्लोबल नागरिक असणार आहेत. त्यांनी गावाच्या, देशाच्या वेशींच्या संकुचित वर्तुळातच राहायला हवं आणि त्यातच स्वत:ला सिद्ध करायला हवं असं नाही; पण जगाच्या पाठीवर ती जिथं जातील तिथं त्यांची मान ताठ असायला हवी. पिढ्यान्‌पिढ्या रुजलेल्या संस्कृतीच्या भक्कम पायावर ती जेव्हा उभी राहतील, तेव्हाच आकाशाला गवसणी घालायची त्यांना ताकद मिळेल. 

आपण जर अशा गप्पा मारत असू, तर त्यांचे विषय बदलण्याची वेळ आलीय बहुधा. त्याबाबतीत थोडं सिंहावलोकन करायला हवंय. त्यांत कळत-नकळतपणे चघळल्या जाणाऱ्या विषयांमधून मुलांच्या मनात आशेची ज्योत पेटतेय, की निराशेच्या अंधारानं त्यांचं मन काळकुट्ट होतंय? त्यांच्या अपरिपक्व विचारांना, नव्यानं बनणाऱ्या मतांना पूर्वग्रहाचं खतपाणी घातलं जातंय का? आपल्याही नकळत आपण त्यांचं खच्चीकरण तर करत नाही आहोत ना? सतत मान हलवत निराशेचे सुस्कारे तर टाकत नाहीये ना? जीवनातला आनंद, नात्यांमधला गोडवा, कामामध्ये मिळणारं समाधान त्यांच्यापर्यंत पोचतंय ना? की फक्त आपलं फ्रस्ट्रेशन, असमाधान, अधुरेपण पोचतंय? आजूबाजूच्या परिस्थितीतल्या समस्यांबद्दल जागरूक होत असतानाच त्यातल्या सकारात्मक शक्‍यताही त्यांच्या दृष्टीकोनाला उजळवतायत ना? कारण फक्त प्रश्न पोचून चालणार नाही. त्यांची उत्तरं मिळवण्याची दिशाही उमगायला हवी. आव्हानात्मक परिस्थितीपासून पळ काढण्यापेक्षा त्याला तोंड देऊन ती परिस्थिती बदलण्याचं बळ मिळायला हवं आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेलं, तरी यशस्वी होण्यासाठी आत्मसन्मानाचा मजबूत पाया हवाच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com