‘तुमचं गाणं ऐकत ऐकत प्राण सोडायचाय...’

बांगलादेशाच्या युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांसाठी लता मंगेशकर यांनी अत्यंत तळमळीनं कार्यक्रम सादर केले होते. या कार्यक्रमांत त्यांना साथ दिली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
hridaynath mangeshkar over lata mangeshkar event of bangladesh war soldier
hridaynath mangeshkar over lata mangeshkar event of bangladesh war soldierSakal

- हृदयनाथ मंगेशकर

बांगलादेशाच्या युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांसाठी लता मंगेशकर यांनी अत्यंत तळमळीनं कार्यक्रम सादर केले होते. या कार्यक्रमांत त्यांना साथ दिली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. तो रोमांचकारी, तसंच हृदयद्रावक अनुभव पंडितजींनी खास ‘सप्तरंग’च्या वाचकांसाठी शब्दबद्ध केला...

‘‘सन्माननीय! आपल्याला सूचना देण्याचं काम माझ्याकडं देण्यात आलं आहे...या विमानात आसनं नाहीत, फक्त लोखंडी पट्ट्या आहेत...त्यांवर आपल्याला बसावं लागेल...आधारासाठी एक लोखंडी साखळी आहे...तिला धरून बसावं...खिडक्या उघड्या आहेत...बाहेर डोकावू नये...प्रवास फक्त अर्ध्या तासाचा आहे...आत कोकाकोला मिळेल...’’

एवढं बोलून तो जवान बाजूला झाला. कलाकार विमानात बसू लागले. सुनील दत्त, नर्गिस, माला सिन्हा, दीपक शोधन, दीदी, मी, नारायण नायडू असे एकेक कलाकार त्या लोखंडी बारवर बसले. समोर लटकलेली साखळी घट्ट धरून मी एका जवानाला विचारलं : ‘‘या खिडक्या उघड्या का?’’

‘‘गोळ्या झाडण्यासाठी.’’

‘‘थंडी वाजत नाही?’’

‘‘जीव वाचवण्यात थंडी लागत नाही,’’ निर्विकार उत्तर. मी गप्प.

विमान एका मैदानात उतरलं. छोटासा रंगमंच...पडदा नाही. समोर पाच ते सात हजार जवान. एक कर्कश माईक. बस्स. ‘कार्यक्रम सुरू करा’

कार्यक्रम सुरू झाला. सुनील दत्त यांनी निवेदन केलं. नर्गिस यांनी जवानांचे आभार मानले. माला सिन्हा यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या. पुढं काय? मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे नायक-नायिकांनी रंगमंचावर येणं, जवानांना नमस्कार करणं, शुभेच्छा देणं...बस्स. असा मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. जवानांमध्ये चुळबुळ सुरू होण्याआधीच सुनील दत्त यांनी दीदीचं नाव घोषित केलं. दीदी रंगमंचावर आली. पाहिलं आणि जिंकलं. जवानांमध्ये नवा जोश आला.

‘भारतमाता की जय...’ ‘लतादीदी झिंदाबाद...’

आणि टाळ्यांचा कडकडाट...

कोई सिख, कोई जाट-मराठा

कोई गुरखा, कोई मदरासी

असे वेगवेगळ्या जातींचे-प्रांतांचे-भाषांचे ते जवान आपापल्या भाषेत दीदीचा जयजयकार करू लागले. कुणी दीदीच्या पाया पडतंय...कुणी रडतंय...कुणी शुभेच्छा देतंय...कुणी फर्माईश करतंय...संगीताच्या अमोघ शक्तीचा साक्षात्कार घडत होता. दीदीवर रसिक किती निरपेक्ष प्रेम करतात याचा प्रत्यय येत होता. कुठलाही देश, कुठलेही रसिक, कुठलीही परिस्थिती असो; पण संगीताशिवाय कार्यक्रम होऊच शकत नाही. कारण, संगीत ही प्रत्यक्ष संवेदना आहे. दीदीनं गायला सुरुवात केली.

एकदा माझ्याकडं बघून मिष्किलपणे हसली. नायडूला खूण केली आणि तिनं गायला सुरवात केली. युद्धभूमीवर अत्याचार, किंचाळ्या, विव्हळणं, गोळीबाराचे आवाज यापेक्षा एक ईश्वरी सूर त्या हिंसाचारी भूमीवर घुमू लागला.

तृषार्त भूमीवर ‘बरखा ऋतू’ रिमझिम बरसू लागली. ते जवान, ती रणभूमी पावन झाली. दीदी जीव लावून प्रत्येक रसाची गाणी गात होती. न थकता, न दमता. आणि, शेवटच्या गाण्याची तिनं सुरुवात केली...

ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी

जो शहीद हुए है उन की जरा याद करो कुरबानी

जब देश में थी दीवाली वो खेल रहे थे होली

जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली

थे धन्य जवान वो अपने थी धन्य वो उन की जवानी

जो शहीद हुए है उन की जरा याद करो कुरबानी...

कार्यक्रम संपला. आम्ही मेसमध्ये आलो. दुसऱ्या दिवशीही कार्यक्रम होता. सर्वजण थकले होते. आराम करत होते. तोच एक अधिकारी दीदीला भेटायला आले. त्यांनी दीदीचे खूप आभार मानले आणि शेवटी म्हणाले : ‘‘इथं खूप मराठी जवान आहेत. त्यांच्यासाठी एक तरी मराठी गाणं गा...’’

दीदी म्हणाली : ‘‘अगदी आनंदानं...उद्याच्या कार्यक्रमाची सांगता मी मराठी गाण्यानं करणार.’’

अधिकारी आनंदानं दीदीचे आभार मानून गेले.

दुसऱ्या दिवशी एका शेतात रंगमंच लावून कार्यक्रम सुरू झाला. जे काल घडलं होतं तसंच आजही घडत होतं.

मध्येच मी दीदीला म्हणालो : ‘‘काल तू ‘मराठी गाण्यानं कार्यक्रमाची सांगता करणार’ असं म्हणालीस; पण पसायदानसारख्या प्रार्थनेनं सांगता करू नकोस. ही समरभूमी आहे.’’

‘‘मला हे शिकवण्याची आवश्यकता नाही. कुठं काय गावं हे मला बाबांनी शिकवलं आहे. ऐक, मी काय गाते ते!’’ दीदी म्हणाली.

कार्यक्रमाच्या शेवटाला दीदीनं जवानांना मनोगत सांगितलं : ‘ ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ या गाण्यानं मी आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार नाही. ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ हे फार लोकप्रिय आहे. फार हृद्य आहे...पण ते पराभवानंतर केलेलं सांत्वनगीत आहे.

मी ज्या गाण्यानं सांगता करणार आहे ते गाणं तुम्ही ऐकलेलं नसेलही. तुम्हाला ते कळणारही नाही; पण तुम्हाला त्या गाण्यातून जयध्वनी ऐकू येईल. पराजयाचा डाग पुसून तुम्हाला त्यात जयाची छबी दिसेल. विजयाचा जयजयकार ऐकू येईल...’’

सारे जवान, कलाकार अधिकारी शांत झाले. प्रत्येकाच्या मनात एक पाल चुकचुकत होती...‘ऐ मेरे वतन के लोगो...’सारखं हुकमी गाणं सोडून लतादीदी हे अनामगीत का गात आहेत...सगळे कुतूहलानं ऐकत होते. दीदीनं गायला सुरुवात केली :

हे हिंदुशक्तिसंभूत दिप्तितम तेजा

हे हिंदुतपस्यापूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्रीसौभाग्यभूतीच्या साजा

हे हिंदुनृसिहा प्रभो शिवाजी राजा

प्रभो शिवाजी राजा...

काव्याचा एक शब्दही कुणालाच कळला नाही. कळलं एकच की, ही शिवस्तुती आहे. ‘प्रभो शिवाजी राजा’ हा शब्द आला आणि श्रोत्यांमध्ये ‘छत्रपती’ अशी आरोळी उठली. सारं वातावरण शिवमय झालं. हिंदुपदपादशाही...शिवाजीमहाराज छत्रपती...सारं वातावरण भगवं झालं. गर्जा जयजयकार क्रांतीचा...गर्जा जयजयकार...

छत्रपती शिवाजीमहाराज, राणा प्रताप, भगतसिंग, मदनलल धिंग्रा, सुखदेव, सावरकर या साऱ्या क्रांतिवीरांच्या जयघोषानं सारं वातावरण भरलं-भारलं. ‘‘दीदी! काय गाणं शोधून काढलंस तू! सारं वातावरणच बदलून गेलं.’’ ‘‘काय आहे बाळ...माझं सारं बालपण क्रांतिकारकांबरोबर गेलं. का कुणास ठाऊक; पण नेमस्तांपेक्षा मला क्रांतिकारक जवळचे वाटतात...’’

दीदी! आम्ही तुमचं मुंबईमध्ये स्वागत करतो. बांगलादेशात जवानांसाठी तुम्ही वीस दिवसांत बावीस कार्यक्रम केले. आम्ही जवानांतर्फे आपले आभार मानतो. एक विनंती आहे, ‘सारे जखमी जवान इथं ‘अश्विनी हॅास्पिटल’मध्ये आहेत. त्यात एक जाधव नावाचा जवान खूप गंभीर अवस्थेत आहे. तो सारखी तुमची आठवण काढतो. तुम्हाला भेटण्यासाठी त्याचे प्राण अडकले आहेत. मी आपल्याला विनंती करतो की, आपण ‘अश्विनी हॅास्पिटल’ला भेट द्यावी.’

दुसऱ्या दिवशी दीदी हॅास्पिटलमध्ये गेली. अतिशय उदास होती. घाबरली होती.

‘‘बाळ, तो जवान माझ्यासमोर मृत्यू पावला तर? माझ्या मनाला फार लागेल ते...’’

प्रत्येक जखमी जवानाशी बोलत, सांत्वन करत, कधी धीर देत दीदी त्या जाधव नावाच्या जवानापाशी पोहोचली. जवान अगदी खरोखरच जवान होता. पांढऱ्या कापडानं त्याचं शरीर झाकलेलं होतं. दीदीला बघून तो मनमोकळं हसला.

‘‘दीदी, माझं काही खरं नाही, माझी एकच इच्छा आहे, ‘आपलं गाणं ऐकत ऐकत प्राण सोडावा...आपण माझ्यासाठी गाणं गाल ना?’’

मला वाटलं, दीदी आता तणावानं कोसळणार; पण दीदी स्तिथप्रज्ञासारखं म्हणाली : ‘‘कोणतं गाणं आपल्याला ऐकायचं आहे...?’’

तो हसला : ‘‘आ जा रे परदेसी...’’

दीदीनं गायला सुरुवात केली. ती इतकी सहज गात होती की, जणू तालीमच चालली आहे.

मैं तो कब से खडी उस पार

के अखियाँ थक गई पंथ निहार

आ जा रे ऽऽ परदेसीऽऽ

आणि आश्चर्य...दीदी आणि ऐकणारे सगळे जण प्रसंग काय हे विसरून गाण्याशी एकाकार होऊ लागले. तेवढ्यात डॅाक्टरांनी दीदीला थांबवलं.

सारं संपलं होतं. जखमी जवान साऱ्या यातनांमधून मुक्त होऊन ‘उस पार’ गेला होता. दीदी शांत होती; पण हात धरून चालत होती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com