का अडकली शहरं पुरात?

Hundreds of villages including major cities under water
Hundreds of villages including major cities under water

कोल्हापूर, सांगली या राज्यातील मोठ्या शहरांसह शेकडो गावे एक-दोन दिवस नाही, तर तब्बल पाच-पाच दिवस अक्षरशः पाण्याखाली जातात; मुंबई-बंगळूर हा दळण-वळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) अनेकानेक दिवस ठप्प होतो, या सर्वामागे एकच कारण म्हणजे कृष्णा, पंचगंगा आणि त्यांच्या उपनद्यांना आलेला महापूर! पण, हा महापूर नियंत्रित करता आला असता का, धरणातून सोडावयाच्या पाण्याचे अधिक चांगले नियोजन करणे शक्‍य होते का, या आपल्या मनातील प्रश्‍नांची उकल ‘साउथ आशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ने (एसएएनडीआरपी) केली आहे.

कृष्णा खोऱ्यातील धरणं यंदा वरदान ठरण्याऐवजी शाप ठरली आहेत की काय, असं वाटावं इतपत पूरस्थिती हाताबाहेर गेल्याचं आपण बघतोय. बरोबर चौदा वर्षांपूर्वी, म्हणजे २००५ मध्ये कोल्हापूर, सांगली शहरे पुराच्या पाण्याखाली गेली होती. कोल्हापूरचा संपर्क तुटला होता. पण, या वर्षी २००५ पेक्षा जास्त भयंकर स्थिती निर्माण झाली. पंचगंगा, कृष्णेसह त्यांच्या उपनद्यांच्या प्रवाहाची उंची अविश्वसनीयरीत्या वाढली. या मागे कृष्णा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडला हे मुख्य नैसर्गिक कारण आहेच.

अभूतपूर्व पाऊस 
कृष्णा खोऱ्याच्या वरच्या भागात, म्हणजे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये १ ते ८ ऑगस्टदरम्यान खूप पाऊस कोसळला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कोल्हापूर येथे २,०६८.५ मिलिमीटर म्हणजे सरासरीपेक्षा ७० टक्के जास्त पाऊस पडला. सांगलीमध्ये ४८०.७ मिलिमीटर (६० टक्के जास्त) तर, साताऱ्यात १,०२८.१ मिलिमीटर (७८ टक्के जास्त) पावसाची नोंद झाली.

कृष्णा खोऱ्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडला. एकाच वेळी नदीने बऱ्याच ठिकाणी धोक्‍याची पूररेषा ओलांडली असल्याचे आपल्याला गेल्या चौदा वर्षांमध्ये फारसे बघायला मिळाले नव्हते. सर्वसाधारणतः धोक्‍याची पूररेषा ओलांडली तरीही ती काही सेंटिमीटरने पुढे जाते. पण या वर्षी तब्बल ५०० सेंटिमीटरने (५ मीटर) पूररेषेने उसळी मारली. ही स्थिती एखाद्या दुसरी ठिकाणी नाही, तर बहुतांश भागात आहे. त्यामुळे यंदाचा कृष्णा आणि पंचगंगेला आलेला महापूर वेगळा असल्याचे स्पष्ट होते.

धरणांचे कार्य 
कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना, या जिल्ह्यांतील धरणांमधून पाण्याची पातळी वेगाने वाढत होती. कोयना, राधानगरी आणि वारणा ही धरणे ५ ऑगस्ट रोजी जवळपास १०० टक्के भरली होती. अजून अर्धा पावसाळा शिल्लक असतानाच शंभर टक्के धरणे आताच भरायची खरंच गरज होती का, असा पहिला प्रश्‍न उपस्थित होतो. पाऊस पडत असल्याने २५ जुलै रोजी या धरणांमधून पाणी का सोडले नाही, त्या वेळी कोयना आणि वारणा ५० टक्के भरले होते, असा दुसरा प्रश्‍न आपल्यासमोर येतो.
कृष्णा खोऱ्यातील वरच्या भागात कोयना हे सर्वांत मोठे धरण आहे. त्याची साठवण क्षमता २,६५२ दशलक्ष घनमीटर आहे. महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कोयना धरणात त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे २,७४२ दशलक्ष घनमीटर पाणी साठवले होते. त्याच वेळी कृष्णा खोऱ्यातील उजनी (८९.८ टक्के), खडकवासला (९५.७३ टक्के), धोम (८८.४३ टक्के), दूधगंगा (८९.२८ टक्के) ६ ऑगस्ट रोजी जवळपास काठोकाठ भरले होते.

कोणताच धडा घेतला नाही का?
महाराष्ट्रात २००५ मध्ये आलेल्या महापुराचा सविस्तर अभ्यास करून स्वतंत्र समितीतर्फे त्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. पण, तो अहवाल आजही राज्याच्या सचिवांकडे पडून आहे. त्यामुळे पाण्याच्या नियोजनाबाबत राज्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज असल्याचे अधोरेखित होते.

पावसाळ्याच्या काही आठवड्यांपूर्वीपर्यंत महाराष्ट्र दुष्काळात होरपळत होते. त्याची तीव्रता १९७२ च्या भीषण दुष्काळापेक्षा जास्त होती. मग, काही दिवसांमध्येच राज्यात महापुराची स्थिती का निर्माण झाली? हवामान बदल, हे त्यामागचे एक कारण आहे. त्यामुळे पावसाचा ‘पॅटर्न’ बदलला आहे, असेही ‘एसएएनडीआरपी’च्या अभ्यासात हिमांशू ठक्कर आणि परिणिता दांडेकर यांनी अधोरेखित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com