आईमुळं नाटकाचा संस्कार!

आईमुळं नाटकाचा संस्कार!

माझ्यावर नाटकाचा संस्कार झाला तो आईमुळं. महाविद्यालयीन जीवनात माझ्या नाट्यप्रेमाला आकार आला. सुरवातीला स्वतः दिग्दर्शित केलेल्या नाटकातच मी काम करत असे. पुढं आत्माराम भेंडे यांच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं. त्यांच्यासारखा गुरू मिळणं हे माझं भाग्यच. काम करण्याचा खरा आनंद मला मिळाला तो मराठी व इंग्लिश रंगभूमीवरच. माझ्या विनोदी भूमिकांनी मला खूप आनंद दिला.

मराठी रंगभूमीबरोबरच दूरचित्रवाणीचा छोटा आणि चित्रपटांचा मोठा पडदा असा माझा प्रवास झाला आहे. गेली चार दशकं मी विविध माध्यमांमध्ये काम करीत आहे. या संपूर्ण प्रवासात माझ्यावर विनोदी कलावंत असा शिक्का बसला खरा; पण त्याची मला कधी खंत वाटली नाही. उलट मी लोकांचं सतत मनोरंजन करीत गेलो. त्यांना सतत हसवत ठेवलं याचा मला आनंद वाटतो आणि तेच माझं मोठं बक्षीस आहे असं मी मानतो. माझ्या करिअरची सुरवात नागपुरातून झाली. माझी आई नाटकांत काम करीत होती. तो काळ होता १९४६-४७ चा. खरं तर त्या काळी नाटकांमध्ये स्त्रिया काम करीत नव्हत्या. त्यांच्यासाठी हे क्षेत्र नव्हतंच मुळी. तेव्हा माझी आई नाटक बसवीत होती आणि कामही करीत होती. त्या वेळी नाटकाच्या तालमी आमच्या इथं होत असत. त्यामुळं ते पाहत पाहतच मी लहानाचा मोठा झालो. माझ्यावर नाटकाचे संस्कार तेव्हाच झाले. तेव्हा नागपुरात आकाशवाणी केंद्र नुकतंच सुरू झालं होतं. आकाशवाणी केंद्रासाठी ‘भुतावळ’ नावाचे नाटक मी पहिल्यांदा केला. त्यानंतर विद्यापीठाच्या  आंतरविद्यापीठ युवा महोत्सवासाठी माझी दिग्दर्शक म्हणून निवड झाली. त्या वेळी सगळ्या विद्यापीठांचा तो युवक महोत्सव असायचा. या महोत्सवात ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक केलं. म्हैसूरमध्ये झालेल्या या महोत्सवात हे नाटक चांगलंच गाजलं. भुताटकीवर आधारित असं हे नाटक होतं. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी ते लिहिलेलं होते. या नाटकामध्ये मी प्राध्यापकाची भूमिका साकारली. ही भूमिका खूप उत्तम होती आणि कलाकार म्हणून मला खूप काही शिकविणारी होती. माझी पत्नी शोभा आणि मी या नाटकात एकत्र काम केलं. त्यानंतर हेच नाटक आम्ही दूरदर्शनकरिता केलं. तेव्हा दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. तेव्हा नाटकांमध्ये काम करीत असतानाच मला मालिकांच्या ऑफर्स येत होत्या.

‘काका किशाचा’ या नाटकातलं एक दृश्‍य.

खरं तर सुरवातीच्या काळात मीच दिग्दर्शित केलेल्या नाटकामध्ये मी काम करीत होतो. त्यापैकी मला चांगलं नाव मिळवून देणारं नाटक म्हणजे ‘काका किशाचा’. साधारणतः १९७८ मध्ये हे नाटक आलं. ठाण्याच्या श्‍याम फडके यांनी हे नाटक लिहिलं होतं. किशा, बाळ्या आणि मध्या अशा तीन मित्रांची ती कहाणी. हे तिघेही हॉस्टेलवर राहत असतात आणि तिथं कुठल्याही तरुणीला आणण्याची परवानगी नसते. हॉस्टेलचा तसा नियमच असतो. अशा वेळी मी माझ्या प्रेयसीला तिथं आणतो आणि मग काय...एकच गडबड आणि गोंधळ उडतो. यातील किशाची भूमिका मी साकारली. ही भूमिका विनोदी होती. हा किशा धडपड्या होताच शिवाय थापा मारण्यात पटाईत होता. जवळपास या नाटकाचे दोनशे प्रयोग केले. त्यानंतर लेखक दत्ता केशव यांचं ‘रात्र थोडी सोंगे फार’ हे नाटक मी दिग्दर्शित केलं होतं आणि त्यामध्ये भरत नावाच्या उचापती तरुणाची भूमिका साकारली. हा भरतही असाच थापा मारणारा आणि कुठंही अडकला तरी खोटंनाटं सांगून स्वतःची सुटका करून घेणारा. खरे तर त्या वेळी नोकरी आणि नाटक अशी तारेवरची कसरत मी करीत होतो. सुरवातीला मी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये काम केल्यानंतर दत्ता केशव यांनी लिहिलेल्या आणि आत्माराम भेंडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लागेबांधे’ या नाटकात एका पीएची भूमिका साकारली.

एक महिला मंत्री आणि तिचा मी पीए. हा पीए चतुर आणि हुशार असतो. मंत्रीणबाई सांगेल तीच कामे तो करीत असतो. ही मंत्रीणबाई कमालीची महत्त्वाकांक्षी असते. तिचा बाहेर मोठा रुबाब असतो. मात्र घरी तिचं काहीही चालत नसतं. अशा वेळी पीए तिला काही सुचवितो. या पीएच्या भूमिकेत मला काही तरी वेगळं करायला मिळालं...काही तरी शिकायला मिळाले. या भूमिकेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच मी दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करीत होतो. त्यांना अर्थात आत्माराम भेंडे यांना मी माझे गुरू मानतो. कारण त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. त्यांना विनोदाची उत्तम जाण होती. अगदी बारीकसारीक गोष्टींकडं ते लक्ष देत होते. मराठी रंगभूमीवर त्यांच्यासारखा विनोदी अभिनेता मी पाहिलेला नाही. मी त्यांच्याबरोबर पाच ते सहा नाटकांत काम केले. ‘हॅट खाली डोके असतेच असे नाही’, ‘हनिमून झालाच पाहिजे’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ अशा काही नाटकात त्यांच्याबरोबर काम केलं. सुदैवाने चांगल्या भूमिका मिळाल्या आणि त्या लोकप्रिय झाल्या. आत्माराम भेंडे, बबन प्रभू, मुकुंद कोठारे अशा मातब्बर मंडळींबरोबर काम करायची संधी मिळाली ही मोठी गोष्ट आहे. मी माझं हे भाग्यच समजतो.

नाटकांमध्ये काम करीत असतानाच दूरदर्शनवरील मालिकांच्या ऑफर्स येत होत्या. ‘गजरा’ हा कार्यक्रम आम्ही दोघांनी अर्थात शोभानं आणि मी केला. तोदेखील अनुभव वेगळा होता. या कार्यक्रमामुळं मला अमाप लोकप्रियता मिळाली. मुंबई दूरदर्शननं मला खूप प्रसिद्धी दिली. मी आयुष्यात कधीही स्ट्रगल केला नाही. कुणाकडं काम मागायला गेलो नाही. कारण मी एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करीत होतो. त्यामुळं एखादं नाटक नाकारायची हिंमत माझ्यात होती. इंग्लिश नाटकांमध्ये मी कामं केलं आहेत. अठरा इंग्लिश नाटकांत काम केलं. त्यातलं माझं आवडतं नाटक ‘बॉटम्स अप.’ या नाटकाचे २५० प्रयोग केले आहेत. या नाटकात कधी हवालदार; तर कधी डॉक्‍टर....अशा सात ते आठ प्रकारच्या भूमिका एकाच प्रयोगात करण्याची संधी मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी मोठा होता. या नाटकात काम केल्यानंतर एक कलाकार म्हणून मला खूप समाधान लाभले. रंगभूमी आणि मालिका करत असताना चित्रपटांमध्येही काम करीत होतो. दत्ता माने यांच्या ‘मामा भाचे’ या चित्रपटात यशवंत दत्तबरोबर काम केलं. त्यामध्ये मी मामा होतो, तर यशवंत दत्त माझा भाचा बनलेले होते. हा मामा संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतो. अनिल कालेलकरलिखित ‘डॉक्‍टर डॉक्‍टर’ या चित्रपटात मी डॉक्‍टरची भूमिका केली. लक्ष्मीकांत बेर्डे या चित्रपटात माझा असिस्टंट होता. हा डॉक्‍टर अतिशय विसरभोळा असतो....सतत गोंधळलेला असतो. एक इंजेक्‍शन तो दोन दोन वेळा देत असतो. ही एक धमाल भूमिका होती.

‘लग रहो मुन्नाभाई’ या हिंदी चित्रपटात संजय दत्तबरोबर काम केले. या चित्रपटात मी प्राध्यापकाची भूमिका साकारली. ही भूमिका छोटी होती तरीही लक्षात राहणारी होती. मला काम करण्याचा खरा आनंद मला मिळाला तो मराठी व इंग्लिश रंगभूमीवर. रंगभूमीवर काम करीत असताना प्रेक्षकांची मिळणारी थेट दाद कलाकाराला काम करायला प्रेरणा व प्रोत्साहन देणारी असते. सगळे म्हणतात की, विनोदी भूमिका करणं कठीण असतं. ते खरंच आहे आणि त्याला कारण आहे एकाच वाक्‍याला प्रेक्षकांच्या येणाऱ्या निरनिराळ्या प्रतिक्रिया. समजा मी एखादं वाक्‍य बोललो आणि एका प्रसंग सादर केला. एक प्रेक्षक काय म्हणणार की अरे व्वा! छान काम केलं. दुसरा म्हणणार की ठीक आहे; काही ग्रेट नाही. तिसरा प्रेक्षक म्हणणार की काय फालतूपणा चाललेला आहे. थोडक्‍यात, सांगायचं झालं तर एकाच वाक्‍याला व प्रसंगाला प्रेक्षकांकडून अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. हे सांभाळून तुम्ही जेव्हा त्या विनोदी भूमिकेचा तोल सांभाळता तोच खरा विनोदी अभिनेता असं मला वाटतं.

आता आगामी काळात येणाऱ्या ‘स्टेपनी’ या मराठी चित्रपटात भरत जाधवबरोबर काम करीत आहे. यामध्येही डॉक्‍टरचीच भूमिका आहे.
दिग्दर्शक दास बाबू यांच्या ‘ब्रेव्ह हार्ट’ चित्रपटात आजोबांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट छान बनलेला आहे असो. विनोदी अभिनेता हा माझ्यावर शिक्का बसलेला आहे, याची मला खंत वाटत नाही. उलट त्याचा मला अभिमान वाटतो आहे कारण इतकी वर्षं सातत्यानं मी विनोदी भूमिका करतोय आणि लोकांना हसवतो आहे. त्यांचं मनोरंजन करतो आहे. तुम्ही माझ्या जीवनात आनंद निर्माण केलात असे जेव्हा लोक मला भेटल्यानंतर सांगतात तेव्हा एक अभिनेता म्हणून मला मिळालेलं ते बक्षीस आहे, असंच मी मानतो. लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं. चित्रपटसृष्टीनं मला चांगली वागणूक दिली.  

(शब्दांकन - संतोष भिंगार्डे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com