कान्हाचा 'मुन्ना'

‘मी अनेक वेळा त्याला बघितले आहे. अतिशय बोल्ड असा हा वाघ होता. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रातच त्याचा अधिकाधिक वावर असल्याने साहजिकच माझ्यासारख्या छायाचित्रकाराला त्याचे सतत आकर्षण होते. अधे-मधे एक-दोन महिने तो गायब राहायचा. मात्र, बहुतांश वेळा ‘कान्हा’ आणि ‘किसली’ क्षेत्रात त्याचे दर्शन व्हायचे. गाड्यांची रांग लागायची.
कान्हाचा 'मुन्ना'
कान्हाचा 'मुन्ना'sakal

‘मी अनेक वेळा त्याला बघितले आहे. अतिशय बोल्ड असा हा वाघ होता. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रातच त्याचा अधिकाधिक वावर असल्याने साहजिकच माझ्यासारख्या छायाचित्रकाराला त्याचे सतत आकर्षण होते. अधे-मधे एक-दोन महिने तो गायब राहायचा. मात्र, बहुतांश वेळा ‘कान्हा’ आणि ‘किसली’ क्षेत्रात त्याचे दर्शन व्हायचे. गाड्यांची रांग लागायची. मात्र, हा बिनधास्त वाघ या गाड्यांना वळसा घालत, कधी रस्त्याच्या डाव्या बाजूने, कधी उजव्या बाजूने; तर कधी बिनधास्त रस्त्यावरून चालत जायचा. जणू एक मोठी वरातच त्यावेळेस बघायला मिळत असे. सोबतचा जो फोटो आहे तो २०१५च्या सुमारास मी या व्याघ्र प्रकल्पात टिपला... या आठवणी सांगत आहे, नागपुरातील प्रसिद्ध छायाचित्रकार वरुण ठक्कर. आज मी ज्या वाघाची गोष्ट सांगणार आहे तो आहे कान्हा व्याघ्र प्रकल्पातील ‘मुन्ना’.

मी मागे एकदा म्हटले होते, की वाघांना जी नावे दिली जातात ती त्याच्या अंगावरील, चेहऱ्यावरील काही खुणांमुळे. कधी कधी ही नावे त्याच्या शरीरावरील व्यंगांमुळेही पडतात. काही नावे वाघ ज्या परिसरात सर्वप्रथम दिसला त्यावरून दिली जातात. कधी वाघाचा स्वभाव बघून त्याला नाव प्राप्त होते. मात्र, ‘मुन्ना’ हे नाव एखाद्या वाघाला कसे पडले असावे, याचे कोडेच होते. ‘मुन्ना’ नाव ऐकताच आल्यावर एखादा लहान चणीचा, गोंडस वाघ कदाचित आपल्या नजरेसमोर येतो. मात्र, येथे आपण पूर्णपणे फसतो. बलदंड शरीराचा, पीळदार स्नायूंचा व भलामोठा दांडगा असा हा वाघ ‘मुन्ना’ या नावाने ओळखला जात होता. याच्या नावाबाबत एक कथा सांगितली जाते. ज्या वेळेस तारुण्यात हा वाघ जंगलात पर्यटकांसोबत फिरणाऱ्या गाईडना दिसला, त्यावेळी तो मागच्या पायाने लंगडत होता. दोन वाघांच्या लढाईत तो जखमी झाला होता. हा लंगडणारा वाघ बघून काही गाईडनी त्यांच्यातील पायाने अधू असलेल्या मुन्ना नावाच्या एका गाईडशी त्याची तुलना केली. एका अर्थाने या पायाने अधू असलेल्या गाईडचे नाव बलदंड वाघाला मिळाले.

मध्य प्रदेशातील मंडला आणि बालाघाट जिल्ह्यात सुप्रसिद्ध कान्हा व्याघ्र प्रकल्प आहे. तो अतिशय जुना असल्याने वन्यप्राणी संरक्षण आणि संवर्धनाचे अनेक प्रयोग तिथे सर्वप्रथम केले गेले. साहजिकच हा व्याघ्र प्रकल्प सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे. १९६४च्या सुमारास अमेरिकेचे सुप्रसिद्ध वन्यजीव शास्त्रज्ञ जॉर्ज शेल्लर १४ महिने या जंगलात राहिले होते. या जंगलात राहून त्यांनी वाघाबरोबरच येथील तृणभक्षींचाही अत्यंत बारकाईने अभ्यास त्या वेळेस केला. त्या आधारावर त्यांनी शास्त्रीय शोधनिबंध लिहिला. मात्र, सर्वसामान्य वन्यप्रेमींना समजण्याच्या भाषेत त्यांनी अतिशय सुरेख असे ‘द डियर ॲण्ड टायगर’ हे पुस्तक लिहिले आहे. शेल्लर यांनी या पुस्तकात प्रत्येक प्राण्यांवर स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे.

मध्य प्रदेशात जंगलाचे प्रमाण चांगले आहे. वाघांच्या संवर्धनासाठी अग्रेसर राहिलेल्या या राज्यात कान्हा म्हणजे परमोच्च बिंदू गाठलेले जंगल, असे समजले जाते. या व्याघ्र प्रकल्पात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून येथे राबवलेले विविध संवर्धनाचे धडे संपूर्ण देशभरात उचलले जातात. वाघांच्या संख्येतही मध्य प्रदेश हे राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याने साहजिकच कान्हाचे अत्यंत रमणीय जंगल निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण आहे. उंच वाढणारे साल वृक्ष, जंगलातील गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर तयार झालेली गवती कुरणे, या कुरणांच्या सोबतीने असलेले लहान-मोठे तलाव, नाले आणि सपाट मैदानाच्या काठाला असलेले बांबू वन कान्हाच्या सौंदर्यात चार चांद लावतात.

या जंगलात २००२च्या सुमारास ‘मुन्ना’ वाघाचा जन्म झाला. या जंगलातील उमरपानी परिसरात दिसणाऱ्या मादीपासून ‘मुन्ना’चा जन्म झाला. त्याचीही आई आकाराने अन्य वाघांपेक्षा मोठी होती. अनेक वेळा तिला बघितल्यानंतर नर वाघ बघितल्याचे भासत असल्याचे त्या वेळेस बोलले जाई. ‘मुन्ना’चा पिताही आकाराने बलदंड होता. या दोघांचेही जबरदस्त जीन्स घेऊन ‘मुन्ना’चा जन्म झाला होता. साहजिकच वयाच्या दुसऱ्या वर्षीच तो चांगलाच बलदंड झाला होता. दोन वर्षांचा झाल्यानंतर ‘कान्हा’ आणि ‘किसली’ या पर्यटन क्षेत्रात त्याचे दर्शन व्हायला सुरुवात झाली. या जंगलात ‘कान्हा’, ‘किसली’ आणि ‘मुक्की’ अशी वाघाच्या कपाळावर असलेले जे काळ्या पट्ट्याचे डिझाईन होते ते इंग्रजी ‘CAT’ असे लिहिल्याचे दिसत होते.

प्रमुख पर्यटन क्षेत्रे असून तिन्ही ठिकाणी पर्यटक सातत्याने फिरत असतात. असे म्हटले जाते, की २००५ पासून ‘मुन्ना’ या पर्यटन क्षेत्रात प्रसिद्ध झाला. अंगाने दांडगा असणारा हा वाघ पर्यटकांच्या गाड्यांच्या घोळक्यातून सहजतेने जाऊ लागल्याने वन्यप्रेमी तसेच छायाचित्रकारांना मोठी पर्वणीच मिळाली. यापूर्वी कान्हा व्याघ्र प्रकल्पात वाघ दिसायचे, त्यांची प्रसिद्धी होती. मात्र, अशा तऱ्हेने बिनधास्तपणे पर्यटकांना सामोरे जाणारा ‘मुन्ना’ प्रसिद्धीच्या झोतात आला नाही तर नवलच. या सुमारास आणखी एक महत्त्वाची बाब या व्याघ्र प्रकल्पातील निसर्गप्रेमींनी समोर आणली. या

वाघाच्या कपाळावर असलेले जे काळ्या पट्ट्याचे डिझाईन होते ते इंग्रजी ‘CAT’ असे लिहिल्याचे दिसत होते. याच्या खालच्या बाजूला लहान डिझाईन ‘PM’ असे होते. साहजिकच ‘मुन्ना’च्या या डिझाईनची चर्चा सर्वत्र पसरली. ‘PM’चा अर्थ प्राईम मेल किंवा प्राईम मिनिस्टर असे गाईड बोलू लागले. परिणामी, जंगलाचा हा राजा अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘मुन्ना’ने साधारण २०१६ पर्यंत म्हणजेच ११ ते १२ वर्षे आपले सर्वोच्च पद कायम राखले. या काळात त्याने अनेक लढाया केल्या. अनेक नरांना मारले. मात्र, त्याच्याच उत्तराधिकारी असणाऱ्या ‘छोटा मुन्ना’ने तसेच अन्य वाघांनी उतारवयाकडे झुकू लागलेल्या ‘मुन्ना’ला धक्का दिला. परिणामी, हा वाघ आपले मुख्य क्षेत्र सोडून सरी तसेच बफर क्षेत्राकडे गेला.

उतारवयाकडे झुकलेल्या वाघांचे जीवन या काळात मोठे बिकट होऊन जाते. सहजतेने नैसर्गिक शिकार मिळत नाही. शरीराच्या हालचाली तेवढ्या गतीने होत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगलाच्या काठाला राहणारे गावकरी, पशुपालक आणि गुरे सातत्याने आसपास दिसतात. फिरू लागतात. मग या वयातील वाघ या सहजतेने मिळणाऱ्या पाळीव जनावरांकडे वळल्याचे दिसते. ‘मुन्ना’च्या बाबतीत असेच घडले. २०१६ ते २०१८ पर्यंत जंगलाच्या काठाला आणि गावाच्या आसपास वावरणाऱ्या ‘मुन्ना’ने पाळीव जनावरे मारण्याचा सपाटा लावला. या वेळी ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष बघायला मिळाला.

२०१८च्या सुमारास एका गावकऱ्याला जखमी करण्याचे प्रकरण घडले. त्यापाठोपाठ एका १४ वर्षीय मुलीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यावर मात्र व्याघ्र प्रकल्पावरील रोष अधिकच तीव्र झाला. या परिसरात राहणारे स्थानिक बैगा आदिवासींनी या वेळी तांत्रिक आणून ‘मुन्ना’चा बंदोबस्त करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पावर दबाव टाकला होता. पुन्हा एकदा जंगलामध्ये निर्विवाद आणि बिनधास्त वावरणाऱ्या या वाघाला बेशुद्ध करून भोपाळच्या प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात आले. काही जणांच्या मते ‘मुन्ना’कडून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने त्यास इन्कार केला होता. राजस्थानातील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील सुप्रसिद्ध ‘उस्ताद’ वाघाप्रमाणेच ‘मुन्ना’चीही रवानगी प्राणिसंग्रहालयात झाली. प्राणिसंग्रहालयात दोन वर्षे या वाघाने काढली. २०२१ मध्ये त्याचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला.

कान्हा व्याघ्र प्रकल्पात तसेच मध्य भारतातील सर्वात बलदंड आणि आकाराने मोठा असलेला वाघ म्हणून अनेकांनी ‘मुन्ना’च्या गळ्यात माळ घातली. याच व्याघ्र प्रकल्पातील ‘उमरपानी’ जो ‘मुन्ना’चा उत्तराधिकारी होता की ‘छोटा मुन्ना’ आकाराने मोठा होता. याबाबत व्याघ्रप्रेमी आपापल्या परीने दावा करत होते. ‘मुन्ना’चे डोके लहान होते, त्याची छाती भरदार होती. दुसऱ्या वाघाचे डोके मोठे होते; परंतु आकाराने तो छोटा होता, असे दावे हे छायाचित्रकार करत असतात. संपूर्ण जगात अगोदरच सुप्रसिद्ध असलेल्या कान्हा व्याघ्र प्रकल्पाला आणखी उंचावर नेण्याचा मान मात्र या वाघाला मिळाला.

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com