ind vs eng test cricket match big game requires patience by sunandan lele
ind vs eng test cricket match big game requires patience by sunandan leleSakal

मोठ्या खेळीसाठी संयम हवा

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दोन सामने संपले आणि मालिकेत बरोबरी झाली आहे. दुसरीकडं दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या १९ वर्षांखालच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं जबरदस्त खेळ करताना अंतिम फेरी गाठली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दोन सामने संपले आणि मालिकेत बरोबरी झाली आहे. दुसरीकडं दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या १९ वर्षांखालच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं जबरदस्त खेळ करताना अंतिम फेरी गाठली आहे.

सचिन धस, अर्षीन कुलकर्णी आणि मुशीर खान हे तीन तगडे फलंदाज मैदान गाजवत आहेत. इकडं भारतात चालू असलेले दोन्ही कसोटी सामने बघताना दिसून आलं, की फलंदाजीच्या कलेला थोडा का होईना धक्का लागला आहे.

हा भाग फक्त भारतीय संघापुरता मर्यादित नाही. ज्यो रूट सारखा दर्जेदार फलंदाज कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरतो आणि पहिलाच फटका रिव्हर्स स्वीपचा मारतो. पाठोपाठ दुसरा फटकाही रिव्हर्स स्वीपचा मारताना त्याचा झेल उडतो आणि मागं पडतो.

बाद होता होता तो वाचतो. त्यातून काहीही बोध न घेता रूट जेव्हा पुढच्या दोन मिनिटांत परत भयानक मोठा फटका मारायचा प्रयत्न करून बाद होतो, तेव्हा मात्र ते बघताना त्रास थोडा जास्त झाला.

आक्रमक आणि आकर्षक क्रिकेट खेळायचा विचार चुकीचा नाही फक्त तसं करताना मूळ कसोटी सामन्यातील चिवट, खडूस फलंदाजीच्या कलेला धक्का लागल्याचं बघताना माझ्यासारख्या क्रिकेटच्या खऱ्या चाहत्याला वेदना होतात इतकाच भाग आहे.

पण नंतर विचार करता लगेच समजून चुकतं, की बदल स्वीकारा नाहीतर त्रास होणारच. मला हे सुद्धा समजतं आहे, की हा विचार फक्त काही वयोमर्यादेतल्या लोकांनाच त्रास देणार आहे, ज्यांनी कसोटी क्रिकेटचा सुवर्णकाळ अनुभवलेला आहे. तरुण पिढीला त्याचा त्रास होणार नाही कारण खेळाडूंप्रमाणंच तरुण प्रेक्षकांची जीवनशैली पूर्णपणानं बदलली आहे.

मला १९९८ मधील मायकेल आथरटनची प्रदीर्घ खेळी आठवते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळताना इंग्लंडचा संघ पराभवाच्या छायेत होता. आथरटननं दक्षिण आफ्रिकन माऱ्यातल्या इतर चांगल्या गोलंदाजांसोबत अ‍ॅलन डोनल्डसारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजाचा सामना तब्बल ६४३ मिनिटं करताना नाबाद १८५ धावा करून सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवलं होतं. आथरटननं दाखवलेली संयमी खेळीची ताकद त्या वेळी दिसून आली होती.

सामना अनिर्णीत राखणं हे इंग्लंड संघासाठी सामना जिंकण्याइतकंच मौल्यवान ठरलं होतं, इतकी त्या खेळीची ताकद होती. कसोटी सामन्यात फलंदाजानं संयमाचा वापर करत कमाल करून दाखवल्याचा चांगला अनुभव स्मरतो तसेच अत्यंत बेकार खेळपट्टीमुळं सामना निरर्थक अनिर्णीत झाल्याचा वाईट प्रकारही आठवल्याशिवाय राहत नाही.

सध्या अशा निरर्थक फलंदाजीला पोषक खेळपट्ट्या बनवल्या जात नाहीत ही बाब चांगलीच आहे. गोलंदाजांना थोडी का होईना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या तयार केल्या जात असल्यानं आणि एकंदरीतच फलंदाजी करताना सतत आक्रमक धोरण स्वीकारायच्या विचारांमुळं बहुतांशी कसोटी सामने निर्णय देत आहेत.

नुकतंच रवी शास्त्रीला बीसीसीआयकडून सन्मानानं गौरवण्यात आले. त्या समारंभात रवी शास्त्रीला त्याच्या क्रिकेट आयुष्यातील सर्वांत आनंदाचा प्रसंग कोणता होता, असे विचारता तो म्हणाला होता, ब्रीस्बेनच्या गॅबा मैदानावर रिषभ पंतनं विजयी फटका मारून भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला, तो प्रसंग संस्मरणीय होता.

त्या मालिकेतील चार कसोटी सामन्यांत चेतेश्वर पुजारानं ९२८ चेंडू खेळले होते. त्याचा परिणाम असा झाला होता, की चार सामन्यांची संपूर्ण मालिका कमिन्स, हेझलवुड, स्टार्क आणि लायन या फक्त चार गोलंदाजांनी खेळलेला ऑस्ट्रेलियन मारा थकून गेला.

चेतेश्वर पुजाराला खेळपट्टीवर बघून ते मनातून खचून गेले होते. भारतानं कसोटी मालिका जिंकण्यात चेतेश्वर पुजाराचा सिंहाचा वाटा होता. संयमाचा महामेरू असं वर्णन त्या कामगिरीनंतर पुजाराचं करावं लागलं होतं.

वेदना या गोष्टीच्या होत आहेत, की नव्या जमान्यातील खेळाडूंच्यात तो संयम अभावानं दिसतोय. सलग दोन षटकं निर्धाव खेळणं तरुण पिढीच्या फलंदाजांना जणू अपमानाचे वाटू लागले आहे. एकीकडं तंत्रशुद्ध बचावाचं तंत्र गायब होत जाताना दिसतंय तर दुसरीकडं कौशल्य विकसित करायला विचारपूर्वक कलात्मक सरावाची जोड दिसत नाही.

परिणामी बरेचसे फलंदाज बेलगाम खेळताना दिसत आहेत. त्यातून टीव्हीवर कसोटी सामना दिसत असताना जेव्हा वारंवार ’स्ट्राइक रेट’ दाखवण्याचा प्रकार केला जातो, तेव्हा हसावं का रडावं समजत नाही.

मग प्रश्न पडतो आताच्या भारतीय संघातील फलंदाज शिकतात काय आणि राहुल द्रविड - विक्रम राठोड शिकवतात काय? मोठी खेळी रचण्यात समर्थ मानल्या गेलेल्या राहुल द्रविडनं भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारून आता बराच काळ लोटला आहे.

जेव्हा चार चेंडू निर्धाव खेळून काढल्यावर भारतीय संघातील फलंदाज घोडे उधळल्यागत क्रीज सोडून बाहेर पडून बॅट दांडपट्ट्यासारखी फिरवून सहजी विकेट बहाल करतात, ती गोष्ट राहुल द्रविडला खटकते का नाही? सर्वांत कळीचा मुद्दा हा पण आहे की विकेट बहाल करून आलेल्या फलंदाजाला त्याची मनोमन लाज वाटते का आणि त्याची झळ त्याच्या कारकीर्दीला लागणार का?

गावसकर यांच्यापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत आणि राहुल द्रविड ते चेतेश्वर पुजारापर्यंत दर्जेदार फलंदाजांनी कसोटी क्रिकेट खेळताना केलेली तयारी बघितली आहे. या महान फलंदाजांनी आपल्या विकेटवर लावलेलं किमतीचं लेबल बघितलं आहे.

केवळ म्हणून नव्या जमान्यातील खेळाडूंना संयम सोडून कसोटी सामन्यात सहजी विकेट बहाल करताना बघून मनोमन त्रास होतो. पण अखेर जमाना बदलला आहे. संयमाची ऐशीतैशी झाली आहे हे समजून घेण्यावाचून पर्याय पटकन दिसत नाही. म्हणून स्वत:लाच समजावतो आहे की बदल स्वीकारा नाहीतर त्रास होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com