Independence Day : स्वातंत्र्य आणि आपण...

Independence-Day
Independence-Day

स्वातंत्र्यदिन : ‘अरे रम्या, तुला काय गरज होती आता पुढच्या शिक्षणाची?
घरी वडिलांचा मस्त बिझनेस आहे आणि तू तर त्यांचा एकुलता एक मुलगा! अगदी थाटात शेठ बनून राहायचं ना.’

‘मला माझ्या मताप्रमाणे जगायचंय रे! कसलंही बंधन नकोय मला, म्हणूनच मी आलोय इकडे शिकायला.

‘बंधन? कसलं रे बंधन! तुला गावी राहायला एवढं मोठं घर आहे. सर्व सुखसोई, नोकर चाकर आहेत. ते सगळं सोडून या खोलीत राहतोस आमच्यासोबत. हे काही पटत नाही राव!’

‘अरे यार अज्या, तुला आता कसं सांगू.... घरी असलो ना की माझ्यामागे सतत भुणभुण सुरू असते आईबाबांची... तू आता आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालायला हवं. दोन- तीन वर्षांत तुझ्या लग्नाचंही बघावं लागणार ..!’
‘असं होय, म्हणजे थोडक्‍यात तुला स्वातंत्र्य हवंय असंच ना?’ अजय मिश्‍किलपणे बोलला.

‘करेक्‍ट! आता कसं माझ्या मनातलं बोललास!’ रमेश त्याला टाळी देत म्हणाला.

वरील प्रसंगावरून आपल्याला असं लक्षात येईल, आजकाल बहुतेकांना जीवन जगताना स्वातंत्र्य हवं असतं. मात्र, स्वातंत्र्य ही कुणाकडून घेण्याची एखादी वस्तू नाही, तर ती प्रत्येकाच्या मनाची एक अवस्था आहे याची आपल्याला जाणीव असायला हवी. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्याला हवं तसं बोलण्याचा, विचार करण्याचा किंवा वागण्याचा असाही होऊ शकतो. याचाच अर्थ दुसऱ्याच्या नियंत्रणातून मुक्ती मिळविणे म्हणजे स्वातंत्र्य किंवा इतरांच्या ताब्यातून आपली सुटका करून घेणे, यालाही स्वातंत्र्य म्हणता येईल. आपल्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक रणसंग्राम लढले गेलेत. निरनिराळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या, सत्याग्रह झाले. अनेक लढवय्ये क्रांतिकारक हसत-हसत फासावर लटकले! कित्येक ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांनी तसेच स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य महापुरुषांनी कठोर कारावास भोगला, हाल अपेष्टा सहन केल्या. इंग्रजांची जुलमीसत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वसामान्य लोकांनीही लाखोंच्या संख्येने स्वातंत्र्य चळवळीत हिरिरीने भाग घेतला. प्रसंगी गोऱ्या सैनिकांच्या लाठ्यांचा सामना केला.

आपल्या छातीवर निडरपणे गोळ्या झेलल्या! अशाप्रकारे अनेक महापुरुषांच्या, क्रांतिवीरांच्या आणि स्वातंत्र्यप्रेमी देशवासीयांच्या कठोर त्यागातून अन्‌ परिश्रमानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला!

ब्रिटिश सरकारचे भारतीयांवरचे नियंत्रण अधिकृतपणे संपुष्टात येऊन आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो. त्यानंतर आपल्या देशात स्वतःची राज्यघटना तयार करण्यात आली. त्यानुसार सर्व देशवासीयांना बरीचशी मूलभूत स्वातंत्र्य बहाल करण्यात आली. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्माशी निगडित असलेले स्वातंत्र्य, वागणुकीचे स्वातंत्र्य असे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने भारतीय नागरिकांना स्वतःचा विकास स्वतंत्रपणे साधण्यासाठी मुभा मिळाली. त्यामुळे आपण आज आपल्या मतानुसार, आपल्या मनाप्रमाणे आपले विचार अगदी निर्भीडपणे व्यक्त करू शकतो. तसेच कुणाच्याही बंधनात किंवा गुलामगिरीत न राहता स्वतंत्रपणे राहू शकतो, वागू शकतो.

आपला भारत देश हा पूर्वीपासूनच विविधतेने नटलेला आहे. येथे निरनिराळ्या जातीधर्माचे लोक एकमेकांविषयी आदर बाळगत, सलोखा जपत गुण्यागोविदानं राहतात, याचे कारण म्हणजे आपल्याला मिळालेले धार्मिक स्वातंत्र्य! आपल्या देशातील प्रत्येकाला स्वतःचे धार्मिक सण निर्भयपणे साजरे करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्यामुळेच एकमेकांविषयीचे प्रेम, आदर जपण्याची उदात्त भावना आपल्याकडे बघायला मिळते. येथे जातीय सलोखासुद्धा मनापासून जपला जातो. ईद असो किंवा दिवाळी असो, बुद्धपौर्णिमा असो वा ख्रिसमस, आपल्या देशात सर्वत्र उत्साहाने साजरे केले जातात. विशेष म्हणजे बहुतेक देशबांधव एकमेकांच्या सणोत्सवात भाग घेण्यात धन्यता मानतात. आपण बघतो, आजकाल मूल जन्माला आल्यानंतर त्याचे उच्च विद्याविभूषित पालक लगेच ‘नर्सरी’मध्ये त्याला प्रवेश मिळविण्यासाठी धडपडताना दिसतात. काही दिवसांनी थोडे मोठे झाल्यावर त्याचे आईबाबा त्याला ‘हे करू नकोस, तिकडे जाऊ नकोस’, अशा प्रकारचे सतत उपदेशाचे डोस पाजत असतात. त्यामुळे कालांतराने हा मुलगा स्वतःचे स्वतंत्र निर्णय घेण्यास असमर्थ ठरतो. आणि मग महाविद्यालयात जाताना किंवा पुढील ‘करिअर’ची दिशा ठरवताना त्याची अवस्था गोंधळल्यासारखी होते. पालकांच्या दबावामुळे तो स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. अशाप्रकारे त्याचं स्वातंत्र्यच हरविल्यामुळे तो कधीकधी ‘डिप्रेशन’मध्ये जाण्याची शक्‍यता असते! त्याच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. मग अशावेळी कधीतरी त्याचं मन बंड करण्याचं धाडस करतं! प्रसंगी तो अगदी टोकाची भूमिका घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. आईबाबांच्या हस्तक्षेपाचा अतिरेक, सततचा दबाव, सतत कानावर आदळणारे उपदेशाचे डोस, या कारणांमुळे त्याचं मन पेटून उठतं. मग तो मन मानेल तसं वागणं सुरू करतो. सगळी बंधने झुगारून स्वातंत्र्याचा पुरेपूर उपभोग घ्यायला लागतो. अशाप्रकारची बरीच उदाहरणे आजघडीला समाजात आपल्या बघण्यात येतात. म्हणजेच स्वातंत्र्याचा अतिरेकसुद्धा मारक ठरू शकतो. स्वाभाविकपणे अनुभवता येणारे स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवे असते. तसेच आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली प्रगती साधण्यासाठीही स्वातंत्र्याची आवश्‍यकता भासते.

कधीकधी एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले की, त्यावेळी तो कसोटीचा क्षणही ठरू शकतो. उदाहरणार्थ स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या तरुणीने घेतलेला लग्नाचा निर्णय! आपल्या देशात अशाप्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला राज्यघटनेने बहाल केले आहे. मात्र, दुर्दैवाने लग्नाचा निर्णय चुकला तर घटस्फोट घेण्यापर्यंत वेळ येऊ शकते. अशावेळी मग मनस्तापाशिवाय पर्याय नसतो! त्यामुळे लग्नासंबंधीचे किंवा इतर महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग न करता आपल्या जीवनमूल्यांचा विचार करून, आपल्या जवळच्या आप्तस्वकीयांचा विचार करूनच जबाबदारीने पाऊल उचलणे येथे योग्य ठरते.

‘माझ्या मनाचा मीच राजा आहे किंवा माझा मी स्वतंत्र आहे’, असा एकतर्फी विचार करणाऱ्यांची आपल्या समाजात कमतरता नाही. अशा लोकांना कौटुंबिक अथवा सामाजिक बंधनात अडकण्याची इच्छा नसते. अशाप्रकारचे युवक, युवती हल्ली मुख्य प्रवाहापासून दूर जाताना दिसतात. मग त्यांना लवकरच नैराश्‍य प्राप्त होते! परिणामी, उदासीनता, अति विचार करणे, व्यसनांच्या आहारी जाणे अशाप्रकारचे मानसिक आजार होऊ शकतात. कधीकधी ही मंडळी आत्महत्येसही प्रवृत्त होतात. त्यामुळे स्वातंत्र्य हे मानसिक आरोग्याशी निगडित आहे याची प्रत्येकाला जाणीव असायला हवी. कारण स्वतंत्र व्यक्ती मानसिक दृष्टीने सक्षम असल्यास अधिक जोमाने कार्य करू शकते. सुदैवाने आज आपल्या देशात चांगले आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. त्याचा पुरेपूर आणि योग्य पद्धतीने वापर करणे आपल्याच हातात आहे. त्यामुळे इतरांवर विनाकारण टीका न करता आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा निखळ आनंद आपण घेऊ शकतो.

तसेच विचार स्वातंत्र्याचा सकारात्मक दृष्टीने उपयोग केल्यास आपल्या समाजाचे आरोग्य अबाधित राखण्यास मदतच होईल. पर्यायाने देशाचे सामाजिक आरोग्य आणि स्वातंत्र्यही नेहमीसाठी अबाधित राहणार यात शंका नाही. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते ...

‘हीच अमुची प्रार्थना अन्‌ हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com