

Montek Singh Ahluwalia Memoir
esakal
मधुबन पिंगळे- Madhuban.pingle@esakal.com
भारतासाठी गेल्या चार दशकांचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. प्रचंड आव्हानात्मक अशा या कालखंडामध्ये अतिशय धाडसी निर्णय घेण्यात आले आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये उतरताना देशाची अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. आणि या निर्णयांमधून सुरू झाली भारताची घोडदौड. पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंग यांच्यापासून अनेक राजकीय नेते आणि तज्ज्ञांनी या निर्णयप्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे माँटेकसिंग अहलुवालिया. अहलुवालिया १९८०च्या दशकामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि व्ही. पी. सिंह यांचे विशेष सचिव होते. तर, १९९०च्या दशकामध्ये त्यांनी वाणिज्य सचिव व वित्त सचिव म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्येही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. तेथून पुन्हा भारतामध्ये परत आल्यानंतर ‘यूपीए’ सरकारच्या काळामध्ये ते दहा वर्षे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. या महत्त्वाच्या काळांमध्ये देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये त्यांची मध्यवर्ती भूमिका राहिली आहे. त्यामुळेच, त्यांचे ‘बॅकस्टेज’ हे आत्मचरित्र केवळ त्यांच्या वैयक्तिक जीवनाची कहाणी उरत नाही, तर गेल्या चार दशकांमधील भारतीय घोडदौडीचा एक भाग असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने सांगितलेला वृत्तांत ठरतो.
राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली. मात्र, १९९१मध्ये परकी चलन तुटवड्याचे संकट भारतासमोरील निर्णायक घडामोडींपैकी एक आहे. नेमक्या याच काळामध्ये अहलुवालिया वाणिज्य वित्त विभागांचे सचिव होते. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णयांचा मागोवा हा ऐतिहासिक धोरण निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव सांगतो. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले, त्यावेळी देशातूनही त्याला प्रचंड विरोध होता. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांनी या धोरणांतील सातत्य ठेवण्याचेच धोरण स्वीकारले. त्यामुळेही भारतीय घोडदौड कायम राहिली. म्हणजे पूर्वी ज्या धोरणावर टीका करण्यात येत होती, त्या धोरणांना कसे स्वीकारण्यात आले, याकडेही अहलुवालिया या पुस्तकामध्ये लक्ष वेधतात.