

Indian football analysis
esakal
केतकी उत्पात
भारतातील लाखो तरुण रात्री दोन वाजता प्रीमियर लीगचे सामने पाहतात. बार्सिलोना, रिअल माद्रिद, मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल या क्लब्जच्या कामगिरीबाबत समाज माध्यमांवर युद्धे रंगतात. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या प्रत्येक गोलावर लाखो रिल्स तयार होतात. अशा या फुटबॉलप्रेमी देशात फुटबॉल खेळण्याबाबत मात्र अनास्था दिसून येते. हीच भारतीय फुटबॉलची शोकांतिका आहे. भारत फुटबॉलप्रेमी देश असला, तरी अजूनही आपल्या देशात ‘फुटबॉल संस्कृती’ रुजलेली नाही असेच म्हणावेसे वाटते.
फुटबॉलची खरी संस्कृती केवळ फक्त युरोपीय क्लब्जचे सामने पाहण्यात नसते. ती तयार होते शाळांच्या मैदानांवर, ग्रासरूट अकादमींमध्ये; प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या माध्यमातून आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेले प्रशासन व समाजाच्या सकारात्मक मानसिकतेतून! भारताच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच अंजू तुरंबेकर यांच्या मते, भारतात प्रतिभेची कमतरता नाही; पण विश्वकरंडकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिभेपेक्षा जास्त गरज असते ती दीर्घकालीन दृष्टिकोन, मजबूत व्यवस्था आणि फुटबॉलला खरंच गंभीरपणे घेणाऱ्या क्रीडा संस्कृतीची.
फुटबॉल संघटक मंदार ताम्हाणे म्हणतात, भारतीय फुटबॉलची मुख्य समस्या प्रतिभा नसून व्यवस्थापन ही आहे. सध्याचा भारतीय संघ विश्वकरंडक जिंकणे तर दूरच, पण आशियामध्ये सातत्याने सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करायलाही सज्ज नाही. कारण आधुनिक फुटबॉल हा फक्त आवडीवर चालणारा खेळ राहिलेला नाही; तो आता नियोजन, रचना आणि व्यावसायिकतेवर चालणारी स्वतंत्र व्यवस्था ठरतो आहे. आज जपान, दक्षिण कोरिया किंवा ऑस्ट्रेलियासारखे देश आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये चमकताना दिसतात, ते त्यांचा संघ मजबूत आहे म्हणून नाही, तर त्यांची संपूर्ण फुटबॉल व्यवस्थाच मजबूत आहे म्हणून. भारतात मात्र अनेकदा उलट चित्र दिसते.