

Indian Textile History
esakal
शेफाली वैद्य
पुण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली परदेशी कापडाची सार्वजनिक होळी केली गेली. स्वतः लोकमान्य टिळक तिथे उपस्थित होते. कोणते कापड विकत घ्यायचे आणि कोणते नाही, हा त्यापूर्वी सर्वस्वी व्यक्तिगत असलेला निर्णय तेव्हापासून सार्वजनिक झाला. विषय केवळ कापड खरेदीचा न राहता राजकीय भूमिकेचा झाला.
भारतीय वस्त्रकलेच्या इतिहासावरचं हे सदर सुरू केल्यापासून वाचकांचे जे अभिप्राय येतात त्या सर्वांमध्ये एक मुद्दा सहसा समान असतो, ‘आतापर्यंत आम्ही कपड्याकडे कपडा म्हणूनच बघत होतो, भारतीय वस्त्रकलेचे धागे इतके प्राचीन, इतके एकमेकात गुंतलेले आहेत हे तुमचे लेख वाचल्यावर कळलं.’ खरे तर मी जेव्हा दोन दशकांपूर्वी ह्या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा मलाही माहिती नव्हतं, की भारतीय वस्त्रकलेचा पट इतका विस्तीर्ण असेल. धर्म, इतिहास, संस्कृती, समाजकारण, अर्थकारण, राजकारण ह्या सगळ्या विषयांना जोडणारा असा हा भारतीय वस्त्रकलेचा धागा आहे. आतापर्यंत आपण ह्या सदरात पार सिंधू सरस्वती संस्कृतीपासून सुरू होऊन ब्रिटिश राजवटीच्या काळापर्यंतचा भारतीय वस्त्रकलेचा प्रवास जाणून घेतला. ह्या विषयाचा अभ्यास करताना मला सतत जाणवत राहिलेली गोष्ट म्हणजे गेल्या साडेसात हजार वर्षांमध्ये भारतात इतकी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे घडली, ज्याचा प्रत्यक्ष परिणाम भारताच्या वस्त्रकलेवरती झाला, तरीही ही कला टिकून, तगून तर राहिलीच, पण त्याचबरोबर सतत नवनवे प्रभाव आत्मसात करत राहिली. ही लवचीकताच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, जे आपल्याला सर्वच क्षेत्रांत दिसते. ढोबळ मानाने पाहिले तर भारतीय वस्त्रकलेचे तीन वेगळे टप्पे आपल्याला दिसतात. प्राचीन भारतात विणकराकडे पैसाही होता आणि प्रतिष्ठाही होती. चाणक्याच्या अर्थशास्त्रात विणकरांच्या स्वायत्ततेचा स्पष्ट उल्लेख आहे. ही परंपरा जवळजवळ हजार वर्षे भारतात जिवंत होती. दहाव्या शतकातल्या तमिळनाडू मधल्या उत्तम चोल ह्या राजाच्या ताम्रपटांवरून स्पष्ट दिसते, की कांचीपुरममधल्या एका विष्णू मंदिराच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी चोल राजदरबारासाठी वस्त्रे विणणाऱ्या काही विणकरांकडे सोपवण्यात आली होती. अगदी दहाव्या शतकापर्यंत भारतीय विणकर केवळ वस्त्रे विणत नव्हते तर राज्याच्या संस्थात्मक जीवनात सहभागी होते.