आनंद जंगलसफारीचा

२०२४ हे वर्ष पर्यटनाचं ठरणार असं दिसत आहे. थायलंड आणि श्रीलंकेनं नुकतंच व्हिसा-फ्री पर्यटन भारतीयांसाठी खुलं केलंय.
indian tourist thailand and sri lanka visa free tourism travel jungle safari
indian tourist thailand and sri lanka visa free tourism travel jungle safariSakal

- मालोजीराव जगदाळे

भारतीय पर्यटकांसाठी दर आठवड्यात आनंदाच्या नवनवीन बातम्या येत आहेत. २०२४ हे वर्ष पर्यटनाचं ठरणार असं दिसत आहे. थायलंड आणि श्रीलंकेनं नुकतंच व्हिसा-फ्री पर्यटन भारतीयांसाठी खुलं केलंय.

त्यांच्या मागोमाग मलेशिया, इराण आणि आता केनियानं सुद्धा त्यांच्या देशाचे दरवाजे भारतीयांसाठी खुले केले. म्हणजेच या देशांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्हिसा घेण्याची आता गरज नाही. केनियाचे राष्ट्राध्यक्षांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

जगातील सर्वांत प्रसिद्ध जंगल सफारी ज्याला गेम सफारी असं सुद्धा म्हटलं जातं, अशा ईस्ट आफ्रिकन सफारीमध्ये टांझानिया आणि मुख्यत्वे केनिया या दोन देशांचा समावेश होतो. यातील केनियासाठी आता व्हिसासाठी अर्ज करायची गरज नाही, पूर्वी यासाठी ५० अमेरिकन डॉलर्स खर्च येत असे.

टांझानियासाठी मात्र ई-व्हिसा घ्यावा, साधारणतः तीन ते चार दिवसांत हा व्हिसा आपल्याला मिळतो. टांझानियामध्ये जंगल सफारीचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक उत्तर भाग आणि दुसरा दक्षिण भाग.

उत्तरेकडं असणारं सरेंगेटी राष्ट्रीय उद्यान, अरुषा राष्ट्रीय उद्यान आणि बाजूचा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आधी केनिया करून मग टांझानिया किंवा उलट अशा दोन्ही प्रकारे भटकंती करता येते. तसं बघायला गेलं तर भारतातून केनियाला पोहोचण्यासाठी कनेक्टिव्हिटी जास्त चांगली आहे.

मुंबई ते नैरोबी अशी इंडिगो एअर लाइनची तर दिल्ली ते नैरोबी अशी एअर इंडियाची थेट विमानसेवा आहे. केनिया, टांझानिया दोन्ही देशांत स्वाहिली भाषा बोलली जाते पण केनियामध्ये शिक्षणात इंग्लिश सर्वत्र समाविष्ट असल्यानं जवळपास सर्वांना समजते. भारतातून जाताना अमेरिकन डॉलर्स नेऊन नंतर येथे स्थानिक करन्सीसोबत एक्स्चेंज करता येतात.

नैरोबी येथे पोहोचल्यावर पहिले दोन दिवस मस्तपैकी सेटल होऊन आसपासच्या भागात भटकंती करता येते. इथलं हत्तींचं अनाथालय आणि जिराफ सेंटर बघण्यासारखे आहे. नैरोबीसह एकंदर संपूर्ण केनियामध्ये भारतीयांची लोकसंख्या मोठी असून ठिकठिकाणी फिरताना ही गोष्ट जाणवते. चांगली गोष्ट अशी, की नैरोबी शहरांमध्ये सगळीकडं उत्तम अशी भारतीय रेस्टॉरंट आहेत. त्यामुळे भारतीय जेवणासाठी आग्रही असणाऱ्या पर्यटकांचा महत्त्वाचा प्रश्न सुटतो.

केनियामध्ये ४२ पेक्षा जास्त प्रकारच्या जमाती असून त्यांच्या स्वतःच्या मातृभाषा वेगळ्या आहेत, केनियामध्ये विविध भागात प्रवास करताना तुम्हालाही हे जाणवेल. आफ्रिकन सफारीमध्ये पर्यटक खास करून दोन गोष्टी आवर्जून बघण्यासाठी येतात.

एक म्हणजे बिग फाइव्ह आणि दुसरं म्हणजे द ग्रेट मायग्रेशन. बिग फाइव्ह म्हणजे या गेम सफारी करताना सिंह, गेंडा, हत्ती, गवा आणि बिबट्या या प्राण्यांचं दर्शन व्हायलाच हवं नाहीतर सफारी अपूर्ण राहिली असा समज असतो.

दुसरं म्हणजे द ग्रेट मायग्रेशन, विल्डबिस्ट या प्राण्याचे लाखोंचे कळप सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास टांझानिया ते केनिया आणि केनिया ते टांझानिया असा करतात. हा प्रवास करताना अतिशय खडतर अशा समुद्र,

डोंगर आणि नद्या हे कळप पार करतात. विशेषतः यातील मारा नदी पार करताना त्यांना नदीतील पाणघोडे आणि विशाल मगरी यांचा सामना करत हा भाग पार करावा लागतो. हे दृश्य अतिशय विस्मयजनक असून ही मायग्रेशन पाहण्यासाठी या काळात लाखो पर्यटक येतात.

बारा लाखांपेक्षा जास्त विल्डबिस्ट आणि तीन लाखांपेक्षा जास्त झेब्रा या मायग्रेशनमध्ये भाग घेतात. जानेवारी महिन्यातून मोजायचं झाल्यास टांझानिया येथील गोरोंगोरो राष्ट्रीय उद्यानातील जंगलांमधून ताज्या गवताच्या शोधात हा प्रवास सुरू होऊन तिथून सरेंगेटी येथे पोहोचण्यास मे उजाडतो आणि पुन्हा ही जनावरे सुरुवातीला केनियातील मसाईमारामध्ये प्रवेश करतात आणि ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान ते मारा नदी ओलांडतात.

खरंतर वर्षभरात केव्हाही हे मायग्रेशन दोन्ही देशांच्या विविध भागात जाऊन बघता येतं. परंतु द ग्रेट मायग्रेशन ज्याला म्हणतात, तो अतिशय लहानसा भूभाग केनियामधील असून, या ठिकाणहून दिसणारा नजारा जास्त अप्रतिम आहे.

नैरोबीतून मसाईमारा येथे पोहोचण्यासाठी अनेक पर्याय आहेत. संपूर्ण सफारीसाठी नैरोबी येथूनच सफारी कंपनी सोबत बुकिंग करून नैरोबी-मसाईमारा-नैरोबी असा प्रवास आखता येतो किंवा टॅक्सीने नारोक येथे जाऊन तिथून पुढे मारा येथे जाता येते व पुढे मसाईमाराला भेट देता येते.

येथे राहण्याचे दोन पर्याय उपलब्ध असून मसाईमारा राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर राहता येते, तसेच आतमध्ये सुद्धा राहता येते. मसाईमाराच्या बाहेर वास्तव्य करायचे असेल, तर हॉटेलच्या किमती थोड्या कमी आहेत, राष्ट्रीय उद्यानाच्या आतमध्ये जंगलात गेम कॅम्पमध्ये राहायचे असेल, तर ते तुलनेने दर जास्त आहेत.

परंतु बाहेरच्या बाजूला राहून पुन्हा सफारीसाठी आत येणे वेळखाऊ असल्याने जंगलातच गेम कॅम्प मध्ये राहावे. एक जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ पर्यंत प्रवेश फी शंभऱ अमेरिकन डॉलर असणार आहे तर तिथून पुढे वर्ष संपेपर्यंत ही प्रवेश फी दुप्पट होऊन दोनशे डॉलर प्रतिदिन असेल.

साधारणतः दोन दिवसांत सफारी पूर्ण होते. सफारी पूर्ण करून तुम्ही पुन्हा नैरोबीमध्ये येऊ शकता आणि तिथून पुढे इथल्या प्रसिद्ध बीच टाउन असणाऱ्या मोंबासा, मलिंदी, लामु यांना सुद्धा भेट देऊ शकता. भारताच्या शोधात लिस्बन येथून प्रवास करणाऱ्या वास्को-द-गामा यानं मलिंदी येथे इसवी सन १४९९ साली उभारलेले स्मारक सुद्धा आवर्जून बघावं.

नैरोबीतून टांझानियाला सरेंगेटीच्या सफरीला पोचण्यासाठी अरुषा येथे जावे. उत्तर टांझानिया येथील सर्व सफारींची सुरुवात अरुषा येथून होते. भारतातून येतानाच जर सफारी कंपनीची जुळवाजवळ केली नसेल, तर अरुषामध्ये असणाऱ्या अनेक सफारी कंपन्यांमधून बजेट प्रमाणे तुम्ही सफारी बुक करू शकता.

सफारीसाठी प्रवेश शुल्क ७० अमेरिकन डॉलर आहे. तसेच परदेशी पर्यटकांसाठी काही इतर शुल्क आकारले जातात, जे तुम्ही कोणत्या सिझन मध्ये जात आहे त्यावर अवलंबून असते. जंगल सफारीसाठी गाइड आणि कंपनी निवडताना व्यवस्थित अभ्यास करूनच निर्णय घ्यावा,

कारण अनुभवी गाइडवरच तुमची सफारी किती यशस्वी आणि चांगली होईल हे अवलंबून असते. केनिया आणि टांझानिया येथील प्रवेश शुल्कांमध्येच जंगल सफारीच्या शुल्कासह असते त्यामुळे वेगळे पैसे पुन्हा द्यावे लागत नाहीत.

बलून राइड सारख्या अतिरिक्त सुविधा वेगळे शुल्क देऊन घेता येतात. हा सुद्धा अतिशय सुंदर अनुभव आहे. मायग्रेशन चालू असताना आकाशातून दिसणारा हा नजारा अफलातून असतो. बहुतांश पर्यटक फक्त सरेंगेटी बघण्याला प्राधान्य देतात परंतु त्या सोबतच गोरोंगोरो राष्ट्रीय उद्यान आणि नैसर्गिक आश्चर्य असणारे रिफ्ट व्हॅली सुद्धा आवर्जून भेट देण्यासारखे आहेत.

अरुषा येथून आफ्रिकेतील किलीमांजारो इथल्या सर्वांत उंच शिखरावर अनेक ट्रेकिंग कंपन्यांची ऑफिस आहे. ज्यांच्या मार्फत तुम्हाला हा ट्रेक काही दिवसांत सर्व साधने आणि गाइड सह करता येतो.

या संपूर्ण सफारी संपवून वेळ मिळाल्यास एखादा दिवस दार-ए-सलाम या राजधानीच्या शहरासाठी राखीव ठेवावा व आणखी दोन दिवस झांझिबार बेटावर घालवावेत. जगाच्या मानवी इतिहासासाठी काळा अध्याय असणाऱ्या प्राचीन आणि मध्ययुगीन मानवी गुलामांच्या व्यापाराची मुख्य राजधानी असणारे झांझिबारमधील स्टोन टाउन आणि तेथील संग्रहालय बघताना मन व्यथित होते.

झांझिबारला अतिशय सुंदर समुद्रकिनारे लाभले असून, संपूर्ण आफ्रिका खंडातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये याचा समावेश होतो. नवीन वर्षात भटकंती आखत असाल, तर आवर्जून केनिया आणि टांझानियाचा विचार करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com