बुद्धिबळाच्या पटावर भारत ‘राजा’

मिखेल बोटविनिक, बॉबी फिशर, गॅरी कॉस्पारोव, ॲनातली कारपोव, विश्‍वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसन हे बुद्धिबळातील ६४ घरांच्या पटावरील अनभिषिक्त सम्राट.
D Gukesh
D Gukesh sakal
Updated on

- जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com

मिखेल बोटविनिक, बॉबी फिशर, गॅरी कॉस्पारोव, ॲनातली कारपोव, विश्‍वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसन हे बुद्धिबळातील ६४ घरांच्या पटावरील अनभिषिक्त सम्राट. अर्थात यामध्ये आणखी काही मंडळींचा समावेश होऊ शकेल. जगज्जेतेपद सर्वाधिक वेळा पटकावणारे व आपल्या खेळाने इतरांना प्रभावित करणारे असे खेळाडू मोजकेच आहेत.

जर्मनीचे इमानुएल लास्कर यांनी सहा वेळा जगज्जेतेपदाचा मान संपादन केला आहे; पण त्यांची कारकीर्द ही पहिल्या महायुद्धापर्यंतची. आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकल्यास रशियन खेळाडूंचेच या खेळावर वर्चस्व प्रकर्षाने दिसून आले आहे. विश्‍वनाथन आनंद यांनी २०००मध्ये पहिल्यांदाच विश्‍वविजेतेपदावर मोहोर उमटवली आणि तिथून २०१२-१३पर्यंत तब्बल पाच वेळा जगज्जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. आनंद यांच्या अद्‌भुत कामगिरीकडे पाहून भारतातील असंख्य युवा बुद्धिबळाकडे वळू लागले.

डी. गुकेश, अर्जुन एरीगेसी व आर. प्रज्ञानंद या युवा खेळाडूंचा जन्मही याच दरम्यानचा. हे खेळाडू लहानाचे मोठे होत असतानाच आनंद यांचा प्रभाव त्यांच्यावर पडणे साहजिकच होते; मात्र बुद्धीची कसोटी लागणाऱ्या या खेळामध्ये लहानपणापासून प्रचंड मेहनत घ्यावी लागते. एकाग्रता, चाणाक्षपणा, खेळातील सातत्य या बाबी महत्त्वाच्या ठरतात. सध्या तरी भारतातील युवा खेळाडूंनी या सर्व बाबींमध्ये बाजी मारली आहे.

एक काळ असा होता, की भारतातील बुद्धिबळ हे विश्‍वनाथन आनंद यांच्यापुरते मर्यादित होते. इतर खेळाडूही हा खेळ खेळत असत; पण आनंद यांच्याएवढी उत्तुंग कामगिरी कोणालाही करता आली नव्हती. त्यामुळे आनंद यांच्याभोवती वलय निर्माण झाले; मात्र काळ बदलला अन्‌ भारतामध्ये अव्वल दर्जाचे बुद्धिबळपटू निर्माण झाले. सध्याच्या घडीला आनंद यांची प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे बुद्धिबळाचे पट गाजवण्यासाठी एक पिढी तयार होताना दिसत आहे. विश्‍वविजेता डी. गुकेश १८ वर्षांचा आहे. महान खेळाडू मॅग्नस कार्लसनला विश्‍वकरंडकात टक्कर देणारा आर. प्रज्ञानंद १९ वर्षांचा आहे अन्‌ फिडेची २८०१ रेटिंग मिळवणारा अर्जुन एरीगेसी हा जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे.

भारताचे अर्जुन पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर व फिडे वरिष्ठ ट्रेनर प्रवीण ठिपसे यांनी गुकेशच्या शैलीबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, गुकेशची बुद्धिबळ खेळण्याची शैली स्वाभाविक आहे. त्याने या खेळासाठी संगणकाचा उपयोग केलेला नाही. जागतिक अजिंक्यपद लढतीआधी त्याने थोड्या प्रमाणात संगणकाचे सहाय्य घेतले असावे. मी २०१८मध्ये त्याला पहिल्यांदा भेटलो. तेव्हा त्याची महत्त्वाकांक्षा व त्याच्यामध्ये असलेला आत्मविश्‍वास प्रकर्षाने दिसून आला. तो मला म्हणाला, ‘‘मला नुसता विश्‍वविजेता व्हायचे नाही, तर जागतिक स्तरावरील सर्वात तरुण विश्‍वविजेता व्हायचे आहे.’’ त्यानंतर आता सात वर्षानंतर गुकेशने डिंग लिरेनला पराभूत करीत आपले स्वप्न साकारले.

ठिपसे यांनी गुकेशच्या प्रशिक्षकांबाबतही आपले मत व्यक्त केले. ते सांगतात, की ‘‘विष्णू प्रसन्ना यांच्या मार्गदर्शनात गुकेशचा खेळ बहरला. त्यानंतर पॅडी अपटन यांना त्याने मानसिक क्षमतेसाठी आपल्या सोबत जोडले. अपटन यांच्या मोलाच्या टीप्समुळे भारतीय क्रिकेट संघाने २०११मध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडक पटकावला. त्यानंतर त्यांचे मार्गदर्शन भारतीय पुरुष हॉकी संघालाही लाभले. या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत देदीप्यमान कामगिरी केली. गुकेशनेही लिरेनला पराभूत करीत विश्‍वविजेता होण्याचा मान संपादन केला; मात्र ज्याप्रकारे त्याचा खेळ व्हायला हवा होता, तशाप्रकारे तो खेळला नाही. त्याआधी गुकेशकडून अव्वल दर्जाचा खेळ झाला होता.

आव्हानवीरांच्या (कँडीडेट) स्पर्धेत तो अजिंक्य ठरला होता. बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये त्याच्या व अर्जुन एरीगेसीच्या प्रभावी खेळामुळे भारतीय पुरुष संघ विजेता ठरला होता. अर्थात भारतीय महिला बुद्धिबळ संघानेही या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्यामुळे मला असे म्हणावेसे वाटते, की अपटन यांचे मार्गदर्शन लाभले असले तरी गुकेशला त्याच्या जुन्या प्रशिक्षकांच्या सानिध्यात छान कामगिरी करता आलेली आहे. यापुढेही त्याने विष्णू प्रसन्ना यांच्या मार्गदर्शनात आपला खेळ पुढे सुरू ठेवायला हवा.’’

ठिपसे यांनी प्रज्ञानंद याच्या खेळाबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हटले, की ‘‘प्रज्ञानंद याने सुरुवातीपासून इतर खेळाडूंपेक्षा वेगळी योजना अवलंबवली. लहान वयामध्येच आपला सामना भारतीय बुद्धिबळपटूंशी होऊ नये, यासाठी त्याने परदेशातील स्पर्धांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्याची बहीण आर. वैशाली हिनेही त्याच पद्धतीने पुढे जाण्यासाठी पावले उचलली. दोघांनाही याचा फायदा झाला. परदेशातील स्पर्धांमध्ये खेळण्याचे आमंत्रणही त्यांना मिळत होते, ही लक्षणीय बाब. प्रज्ञानंद राष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी झाला नाही. त्यामुळे त्याची तुलना भारतातील खेळाडूंशी झाली नाही. त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागले नाही; पण गेल्या काही महिन्यांमध्ये प्रज्ञानंदला बुद्धिबळाच्या पटावर ठसा उमटवता आला नाही.

२०२३मध्ये मॅग्नस कार्लसन याच्याकडून त्याला विश्‍वकरंडकात पराभूत व्हावे लागले. आव्हानवीरांच्या स्पर्धेतही त्याला चमक दाखवता आली नाही. बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्येही गुकेश व अर्जुन यांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रज्ञानंदला मोठी कामगिरी बजावता आली नाही. फिडे रेटिंग आपली कमी होणार तर नाही ना, असा प्रश्‍न त्याच्यामध्ये निर्माण होऊ लागल्यामुळे कदाचित त्याच्या खेळामध्ये घसरण दिसून आली.’’

ठिपसे यांनी पुढे आर. बी. रमेश यांच्या प्रशिक्षण शैलीचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘प्रज्ञानंद याला रमेश यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गेल्या काही काळात प्रज्ञानंद थोडासा बिथरलेला वाटला, तेव्हा रमेश त्याच्यासाठी धावून आले. रमेश यांनी त्याच्यासाठी स्पेशल सत्राचे आयोजन केले. यामध्ये प्रज्ञानंदचा आत्मविश्‍वास वाढवण्याचे काम करण्यात आले. याचा पारिपाक आपल्याला नुकत्याच पार पडलेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. प्रज्ञानंदने टायब्रेकमध्ये चक्क विश्‍वविजेता गुकेशला पराभूत केले आणि या स्पर्धेत विजेता होण्याचा मान संपादन केला. प्रज्ञानंदची शैली बोथट वाटू लागली होती; पण आता त्याने पुन्हा आक्रमक शैली अमलात आणताना यश मिळवले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.’’

अर्जुनच्या कौशल्याची स्तुती

ठिपसे यांनी अर्जुनच्या बुद्धिबळातील कौशल्याची स्तुती केली. ते म्हणाले, ‘‘अर्जुन याच्याकडेही अफाट गुणवत्ता आहे. अर्जुन बुद्धिबळाच्या पटावर आक्रमक खेळ करण्यात तरबेज आहे. संगणकासोबत खेळायला त्याला आवडते. कोणतीही स्पर्धा असो... कोणतीही फेरी असो... तो डगमगत नाही. विपरीत परिस्थितीतही त्याच्या आत्मविश्‍वासाला तडा गेलेला नसतो. उलट त्याची आक्रमक शैली पाहून प्रतिस्पर्धी खेळाडू गांगारून जातो. त्या प्रतिस्पर्धी खेळाडूला वाटते, की दबाव अर्जुनवर असताना तो आक्रमक खेळ कसाकाय करू शकतो?’’

गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन यांची सुरुवात छान झाली आहे. गुकेशने अगदी लहान वयामध्ये विश्‍वविजेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे; पण गॅरी कॉस्पारोव, ॲनातली कारपोव, विश्‍वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसन यांच्याप्रमाणे पाच ते सहा वेळा विश्‍वविजेता होणे ही काही साधी बाब नाही, हे त्यांनाही माहीत असावे. बुद्धिबळ या खेळामध्ये वय वाढले की बहुतांशी वेळा खेळामध्ये घसरण दिसून येते. त्यामुळे भारतीय बुद्धिबळपटूंनी इतक्यातच हुरळून जाण्याची गरज नाही. या खेळामध्ये वर्षानुवर्षे राजाप्रमाणे राज्य करावयाचे असल्यास प्रचंड मेहनत घेण्याची गरज आहे. काळानुसार खेळामध्ये बदल करण्याची गरज आहे.

सध्या मोबाईलमधील ॲप्स दिवसाला अपडेट होत असतात. अगदी त्याचप्रमाणे पटावरून संगणकावर ऑनलाइन पद्धतीने खेळण्यापर्यंत अपडेट झालेल्या या खेळामध्ये सध्या तरी भारताचे साम्राज्य दिसून येत आहे. आता हे टिकवून ठेवण्याची जबाबदारीही भारतीय खेळाडूंवरच आहे. गुकेश, प्रज्ञानंद व अर्जुन या तिन्ही खेळाडूंमध्ये ६४ घरांचा राजा होण्याची व आपली बादशाहत कायम ठेवण्याची कुवत आहे. भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही संघांनी मागील वर्षी बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये विजेतेपद पटकावून जागतिक स्तरावर भारताचीच सत्ता निर्माण झाल्याचे संकेत दिले आहेत.

दिव्यामध्ये जगज्जेता होण्याची क्षमता

भारतीय महिला बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे यांनी महाराष्ट्राची १९ वर्षीय महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या खेळाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘दिव्याचा खेळ दडपणाखाली आणखीन बहरतो. या खेळात दबावाखाली खेळाडूचा स्तर घसरतो; पण दिव्याकडे अशा परिस्थितीत अव्वल दर्जाचा खेळ करण्याची क्षमता आहे. दिव्या ज्युनियर विश्‍वविजेती आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरही विश्‍वविजेता म्हणून तिच्याकडे बघितले जात आहे. आर. वैशाली व वंतिका अग्रवाल यांच्या खेळातही प्रगल्भता दिसून येत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com