भेद नाकारून समतेच्या वाटेनं

मी मीटिंगसाठी निघालो. वाशीच्या टोल नाक्यावर पोहोचल्यावर पाहतो तर काय ? वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. टोल नाक्यावर चार-पाच तृतीयपंथी टाळ्या वाजवत पैसे मागत होते. माझ्यासमोर असलेल्या गाडीभोवती अचानक ते चारपाच तृतीयपंथी धावत आले.
inspiring story of vicky shinde transgender
inspiring story of vicky shinde transgenderSakal

- संदीप काळे

मी मीटिंगसाठी निघालो. वाशीच्या टोल नाक्यावर पोहोचल्यावर पाहतो तर काय ? वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. टोल नाक्यावर चार-पाच तृतीयपंथी टाळ्या वाजवत पैसे मागत होते. माझ्यासमोर असलेल्या गाडीभोवती अचानक ते चारपाच तृतीयपंथी धावत आले.

त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला. त्या गाडीतून एक तृतीयपंथी बाहेर आला. त्या चारपाच जणांनी गुरू नमस्ते, गुरू नमस्ते म्हणत त्या गाडीमधल्या तृतीयपंथीचे पाय धरले. त्या गाडीमध्ये बसलेल्या तृतीयपंथीनं सर्वांना जवळ घेत आपुलकीने विचारपूस केली.

अजून वाहनांची रांग खूप लांब होती. ते सर्व जण गप्पा मारत पुढं निघाले. मी माझ्या चालकाला म्हणालो, तू ये गाडी घेऊन, मी पुढे पायी जातो. ते सर्व तृतीयपंथी त्या गाडीतून उतरलेल्या तृतीयपंथीशी नेमके काय बोलत होते, त्यांची काय चर्चा चालली होती यावर माझं लक्ष होतं. मी त्यांच्या मागं चाललो होतो आणि ते पुढं चालत होते.

वाशीच्या पुलावर ते सगळे जण आले. तो गाडीतून उतरलेला तृतीयपंथी पुढं निघाला, आणि त्याला भेटायला आलेले सगळे तृतीयपंथी परत माघारी त्या टोल नाक्यावर आले. त्या तृतीयपंथींच्या मागं मी चालत होतो.

थोडं पुढं गेल्यावर मी त्या व्यक्तीला आवाज दिला आणि म्हणालो, काय कमाल आहे, ते सगळे तुमच्या पाया पडत होते, असं चित्र मी पहिल्यांदाच पाहिलं. ते तुमचे भक्त आहेत काय ? किंचित हसून ती व्यक्ती मला म्हणाली, होय, ते माझे चेले आहेत. माझ्याकडेच शिकलेत. मी त्यांना मदत केली आहे. आता थोडाबहुत काम-धंदा करत ते या टोल नाक्यावर मागत असतात.

मी त्या तृतीयपंथी व्यक्तीकडं नजर टाकली, खादीची साडी, हातभर बांगड्या, कपाळावर मोठं कुंकू, गुडघ्यापर्यंत लांबच्या लांब केस आणि कमालीचा साधेपणा. मी पुन्हा त्यांना म्हणालो, ते त्यांच्या त्रासाबद्दल तुम्हाला काहीतरी बोलत होते. ते म्हणाले, काय सांगायचं, हल्ली तृतीयपंथी आहे असं सांगून काही परराज्यांमधले पुरुष मिशा काढून दिवसभर साड्यांमध्ये टोल नाक्यावर पैसे मागतात. यामुळं खऱ्या तृतीयपंथींना त्याचा त्रास वाढलाय.

आम्ही दोघांनी बोलत बोलत वाशीचा पूल ओलांडला. तरी आमच्या गाड्या काही अजून आल्या नव्हत्या. ते तृतीयपंथी कोण होते. ती मुले ‘त्या’ तृतीयपंथी यांच्या पाया का पडत होती, इथपासून तर ते कुठे राहतात. त्यांचा दिनक्रम कसा आहे. हे सगळं बोलत बोलत आम्ही दोन किलोमीटरचा रस्ता पायी कधी कापला हे कळलं नाही.

गाडी आली, आम्ही माझ्या गाडीत बसलो. पुन्हा आमच्या गप्पा सुरू होत्या. त्या गप्पांमध्ये तृतीयपंथी, त्यांचं जग, सामाजिक मानसिकतेचा फास, सतत नाही म्हणणारं जग. हे सगळे ऐकताना अंगावर काटा येत होता.

मी ज्या तृतीयपंथी व्यक्तीशी बोलत होतो, त्यांचं नाव विक्रम ऊर्फ विकी शिंदे (९००४३७१०६६). विकी मूळचा कराडचा. विकीचे आजोबा तायप्पा शिंदे नोकरीनिमित्त मुंबईमध्ये आले आणि मुंबईकर झाले. विनोद आणि सुप्रिया हे विकीचे बहीण-भाऊ. बहीण, भाऊ त्यांचं लग्न करून त्यांच्या त्यांच्या घरी आहेत. विकीची आई सुरेखा आणि वडील रमेश विकीबरोबर राहतात.

भावा-बहिणीचं लग्न, शिक्षण, आई-वडिलांची काळजी घेणं, त्यांचं आजारपण हे सगळं विकी करतो. वयाच्या तेरा वर्षांनंतर विकी सर्वसामान्य मुलांसारखा नाही, हे जेव्हा त्यांच्या घरी लक्षात आले, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांमध्ये प्रचंड भांडण व्हायला लागली. अनेक वेळा विकीला घरातून हाकलून देण्यात आलं. विकीची आजी ताणूबाई हिचा विकीमध्ये फार जीव होता. आपली आजी जशी राहायची तसं राहायला विकीलाही फार आवडायचं.

शालू नेसणं, मोठं कुंकू लावणं हे विकीलाही आवडायला लागलं. विकीचे वडील अधिकारी होते, काही कारणांमुळं ते नोकरी अर्ध्यावर सोडून मुंबईला माघारी आले. ते कायमस्वरूपी कुटुंबात राहू लागल्यामुळं विकीवरून अजून भांडण वाढू लागलं.

आपल्यामुळं रोज भांडण होत आहेत हे लक्षात आल्यावर विकीनं घर सोडलं. पवईमध्ये तुंगा या गावात परशुराम आणि सुमन जाधव या त्यांच्या मामा-मामीकडं विकी राहू लागला. आपल्या जगण्याला काही अर्थ नाही, असं विकीला वाटायचं.

नैराश्यातून विकीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून वाचल्यावर विकीला लक्षात आलं, आपलं आयुष्य हे लोकांच्या कामी येण्यासाठी आहे. त्यानंतर मिळेल तिथं काम, धुणी-भांडी, नोकरी करत विकी लहानाचा मोठा झाला. आज वयाची चाळिशी संपल्यावर विकी जेव्हा मागच्या साऱ्या आयुष्याकडे पाहतो, तेव्हा अंगावर काटा उभा राहतो.

मला अनेक धक्कादायक प्रसंग सांगताना ते रडत होते.,तृतीयपंथींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तसंच त्यांच्या रोजगार, प्रशिक्षणासंदर्भामध्ये विकीनं पुढाकार घेतला. त्यासाठी `शिवशक्ती’ फाउंडेशन सुरू केलं. वरळीमध्ये पोहोचल्यावर विकी मला म्हणाले, मला काही ठिकाणी भेटी द्यायच्या आहेत, मी निघतो.

मी म्हणालो, मी पण तुमच्याबरोबर येतो, तुमचं काम पाहत तुमच्या आई-वडिलांना भेटायचं आहे. आम्ही निघालो, वरळीमधल्या चारपाच ठिकाणी जिथं तृतीयपंथी वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण घेत होते. शिलाई, बचत गटाचं प्रशिक्षण, धान्यवाटप, ड्रायव्हिंग क्लासेस, हे सारं काही विकीच्या कल्पनेमधून सुरू होतं.

आम्ही वरळी येथील बीडीडी चाळ येथे विकीच्या घरी गेलो. विकीचे आई-वडील विकीची वाट पाहत होते. मी आई-वडिलांशी बोलत होतो. विकीच्या आई-वडिलांनी विकीनं केलेली अनेक कामे मला अभिमानानं सांगितली. पुढं विकीचं कसं होईल, या काळजीनं आईनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

त्या घरात ‘ते’ तिघे जण राहतात. तृतीयपंथी, सेक्स वर्कर आणि या सर्वांची शिकार झालेले अनेक जण यांना उभं करण्यामध्ये विकी यांचा खूप मोठा वाटा आहे. विकी यांची कहाणी एका लेखात, एका कादंबरीमध्ये बसण्यासारखी अजिबात नाही. या निमित्तानं एक जाणवतं होतं, समाजानं नाकारलेला एक मोठा वर्ग अतिशय निष्ठेनं,

हिमतीनं जगतोय, विषमतेची वाट दूर ढकलून समतेच्या वाटेने जातोय. हे खूप आनंदाचं आहे. विकीच्या आई-बाबांना नमस्कार करून मी विकीच्या घरून निघालो. मी विचार करत होतो, खिशात एक रुपया नसताना विकी शेकडो जणांची आस बनला होता. त्याचं आयुष्यच वेगळं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com