सुदृढ गावांमुळेच शहरे टिकतील

Sunita-Narayan
Sunita-Narayan

भारतातील वातावरण बदलाबाबत राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या परिषदेदरम्यान वातावरणातील बदल व त्याच्या गंभीर परिणामांबाबत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायण यांनी ‘सकाळ’साठी दिलेली खास मुलाखत.

प्रश्न - क्लायमेट चेंज (वातावरणातील बदल) हेच आगामी दशकात सर्वांत गंभीर आव्हान आहे, असे आपणास का वाटते?
उत्तर -
 जागतिकीकरणानंतरच्या गेल्या तीन दशकांत विकासदरवृद्धीसाठी विविध देशांत झालेल्या स्पर्धेचा पर्यावरण व गरिबांवर विपरीत परिणाम झाला. १९९० ते २०१९ या ३० वर्षांत या विकासाने पर्यावरणाचा बळी घेतला. याचे परिणाम आता वेगाने जाणवत आहेत. प्रदूषण वाढत आहे, ऋतुमान बदलत आहे. यात गरीब, शेतकरी भरडला जात आहे. गावाकडून शहरांकडे वेगाने स्थलांतर होत आहे. यावर वेळीच लक्ष न दिल्यास गरिबांप्रमाणेच श्रीमंताचेही जगणे कठीण होणार आहे.  

सर्वसामान्यांवर याचे नेमके काय परिणाम होत आहेत?
- प्रदूषणाचे चटके आता सर्वांना बसत आहेत. राजधानी दिल्लीची हवा कमालीची घातक बनली आहे. प्रत्येक श्वास जणू विष बनला आहे. ही परिस्थिती केवळ दिल्लीतच नसून बहुतांश शहरांत हेच चित्र आहे. दिल्लीत प्रदूषण मापनयंत्रणा उच्च दर्जाची असल्याने येथील स्थिती समोर येते. सर्वत्र दुचाकी, मोटारींची संख्या वाढतेय, कमी दर्जाच्या इंधनाचा, डिझेलचा बेसुमार वापर होत आहे. ऊर्जा निर्मिती प्रकल्प कोळशावर चालतात. त्यामुळेही प्रदूषण होते. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे.

या साऱ्यात शेतकरी सर्वाधिक भरडला जात आहे असे आपणास वाटते का?
- हवामान बदलाचा परिणाम शहरांपेक्षा ग्रामीण भागातील शेतकऱ्याला सोसावा लागत आहे. हवामानाचा पॅटर्न वेगाने बदलत आहे. अवेळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. कधी कमी तर कधी एकदम जास्त पाऊस पडत आहे. कोठे अचानक थंडी तर कोठे दुष्काळ. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षात केवळ आशिया खंडात दहा चक्रीवादळे झाली. आपल्याला ऑस्ट्रेलियातील भीषण वणवा माहिती आहे; पण राजस्थान, गुजरातची स्थिती माहिती नाही. चक्रीवादळे तसेच वारे व  पावसाच्या बदलत्या पॅटर्नमुळे या राज्यात लोकोटस नावाच्या किड्यांनी हैदोस घातला. शेती फस्त केली. बदलत्या हवामानाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही यंदा फार प्रचंड प्रमाणात बसला. एकाच वेळी त्यांना दुष्काळ, महापूर, ओला दुष्काळ अशा विचित्र तिहेरी संकटाला तोंड द्यावे लागले. यात शेतकरी देशोधडीला लागत आहे. शिवाय त्याच्या उत्पादनांना रास्त भावही मिळत नाही. त्यामुळे तो दोन्हीकडून चेपला जात आहे. यामुळे शहरांकडे स्थलांतर करण्यास तो उद्युक्त होत आहे. शहरात मोलमजुरी करण्यासाठी तो शेती, गाव सोडत आहे.

पर्यावरणतज्ज्ञ म्हणून तुम्ही यावर काय उपाय सुचवाल?
- हवामानबदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते त्याला आम्ही काय करणार? असे सांगत राजकीय नेत्यांना जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. त्यामुळे आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याशिवाय पर्याय नाही. अर्थात यातही नवी परिभाषा आणावी लागेल. अर्थव्यवस्था मजबुतीसाठी पैसा गुंतवून उत्पादन वाढवायची असे अर्थतज्ज्ञ सांगतात. पण यामुळे कर्जाचा बोजा वाढतो. पीक वाया गेले तर शेतकरी पुन्हा अडचणीत येतो. त्यामुळे उत्पादन तर वाढले पाहिजे पण धोका कमी असावा अशी पद्धत विकसीत करावी लागेल. ग्रामीण भागावर आपण आत्ताच लक्ष दिले नाही तर शहरातील जगणे मुश्कील बनेल. शहरे आणखी बकाल होतील. शहरांतील औद्योगिक विकास हा मजुरांचे श्रम, आरोग्य व पर्यावरणाचा बळी यावर आधारित आहे. ते थांबले पाहिजे.

शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी काय करावे?   
- १९७२ मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. त्या वेळी वि. स. पागे यांनी दूरदृष्टीने रोजगार हमी योजना आणली. तिच मनरेगा म्हणून पुढे देशभर आली. पागे यांचा विचार हाच होता की विपरीत परिस्थितीतही लोकांनी स्थलांतर करू नये. आहे तेथेच रहावे, गावातच त्यांच्या हाताला काम मिळावे त्यातून पैसे मिळावेत. त्यांचा हाच विचार आपण योग्य प्रकारे पुढे न्यायला हवा होता. म्हणजे पैशांच्या बदलल्यात लोकांना जंगल, पर्यावरण सुरक्षा, पाणी व्यवस्थापन, जमिनीची उत्पादकता वाढीसाठी रोजगार दिला असता तर आज ग्रामीण भागातील लोक तेथेच राहिले असते. त्यांना पैसेही मिळाले असते. पागे यांचा त्यावेळचा विचार आजही महत्वाचा आहे. ते म्हणत, शहरांतील लोकांनी दिलेला कररूपी पैसा ग्रामीण भागात रोजगार हमीच्या रूपाने गुंतवा. तरच शहर व गावे यांचे संतुलन राखले जाईल. स्थलांतराचा मुद्दा सध्या जगभर कळीचा बनला आहे. त्यामुळे देशातील शहरे वाचवायची असतील तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याशिवाय गत्यंतर नाही. याचा फायदा ग्रामीण व शहरी दोन्ही भागांना झाल्याशिवाय राहणार नाही. पर्यावरण संतुलन, शाश्वत विकासासाठी हेच आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com