‘आयपीएस’ ऐवजी वॉचमन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

‘आयपीएस’ ऐवजी वॉचमन!

आमच्या ‘यिन’चा वर्धापनदिन होता. सर्वांची इच्छा होती, की रात्रीच केक कापायचा! सर्वांचं काम सुरू होतं, मी केक आणायला गेलो. शिवाजीनगर भागात केकचं एक दुकान उघडं होतं. केक घेतला. ‘गुगल पे’ करायला गेलो तर दुकानाचे मालक म्हणाले, ‘‘‘गुगल पे’ बंद आहे, रोख पैसे द्यावे लागतील.’’ माझ्याकडे पैसे नव्हते. आता काय करावं, हा विचार मी करत होतो. त्या दुकानदाराने मला सांगितलं, ‘‘बाजूच्या गल्लीमध्ये एटीएम आहे, तिथून पैसे आणा.’’ मी त्या एटीएमच्या दिशेने निघालो. मी एटीएमजवळ पोहचलो. वॉचमन असलेला एक तरुण मुलगा मोठं ठोकळा असलेलं इंग्रजी पुस्तक वाचत एका खुर्चीवर बसला होता. मी दोनदा, तीनदा माझं कार्ड टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत होतो; पण पैसे निघत नव्हते.

वाचण्यात तल्लीन असणाऱ्या त्या वॉचमन तरुणाला मी आवाज दिला. तो एकदम भानावर येऊन मला म्हणाला, ‘‘काय झालं, निघत नाहीत का पैसे?’’ मी म्हणालो ‘‘हो, बराच वेळ झाला प्रयत्न करतोय, पण पैसे निघत नाहीत.’’ तो माझ्या जवळ आला, त्याने मशिन चेक केलं. मशिनमध्ये नंबर टाकायची किट काढली. ती किट पुन्हा बसवली. त्याने माझं कार्ड घेऊन पैसे काढले.

मी म्हणालो, ‘‘तुम्हाला मशिनची बरीच माहिती दिसते.’’ तो म्हणाला, ‘‘हो, मी पॉलिटेक्निक केलंय ना!’’ मी म्हणालो, ‘‘बापरे, पॉलिटेक्निक करूनही तुम्ही वॉचमन?’’ तो काहीच बोलला नाही. तो शांतपणे जाऊन आपल्या खुर्चीवर बसला. तरुण मुलगा, इंग्रजी पुस्तकाचं वाचन, पॉलिटेक्निकचं शिक्षण... असे एक नाही अनेक विषय मला त्या मुलाशी बोलण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्या तरुणाच्या कपाळावरचा कुंकवाचा टिळा बघून मी म्हणालो, ‘‘तुम्ही परभणीचे आहात का?’’ तो म्हणाला, ‘‘परभणीचा नाही, हिंगोलीचा आहे.’’ मी पुन्हा म्हणालो, ‘‘मग आता पुणेकरच झाले वाटतं.’’ त्याने होकाराची मान हलवली. पाणी आहे का प्यायला?’’ पुण्यात येऊनही त्याचा ‘मराठवाडी सेवाभावी बाणा’ कायम आहे का, हे मला तपासायचं होतं. तो आतमध्ये गेला आणि पाण्याची बाटली आणून माझ्यासमोर ठेवली. मी पाणी प्यायलो. माझं गाव, त्याचं गाव, त्याचं शिक्षण, माझं शिक्षण असं करता करता आमचं बोलणं सुरू झालं.

मी ज्या तरुणाशी बोलत होतो, त्याचं नाव ज्ञानेश्वर भागजी जाधव! हिंगोली येथील ज्ञानेश्वर डिग्री मिळवल्यावर एमपीएससी, यूपीएससी करण्यासाठी पुण्यामध्ये आला. घरची परिस्थिती मध्यम, त्यामुळे घरच्यांनी दर महिन्याला ठरल्याप्रमाणे लागतील तसे पैसेही पाठवले. पण सहा वर्षं झाली तरीही ज्ञानेश्वर काही एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षांमध्ये यशस्वी होईना. तिकडे गावाकडे घरच्यांना काळजी वाटायला लागली. पोराचं वय वाढतंय, पोराचं लग्न करायचंय, तो ना शेतात काम करू शकत, ना कुठे नोकरी करू शकत, ना त्याच्याकडे कुठल्या उद्योगाचं स्किल आहे. हे सगळं घरच्यांना माहिती होतं. घरच्यांना वाटलं, मुलाचं लग्न करावं, म्हणजे तो किमान काहीतरी काम सुरू करेल. मुलगा पुण्यात चांगल्या नोकरीला आहे, असं मुलीच्या घरच्यांना खोटंच सांगून ज्ञानेश्वरचं लग्न झालं. जेमतेम चार महिने चांगले गेले. ज्ञानेश्वरच्या पत्नीला जेव्हा समजलं, की आपला नवरा काहीच काम करत नाही, तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिने तिच्या आई-वडिलांना हे सांगितलं. ज्ञानेश्वरच्या सासू-सासऱ्‍यांनी तुम्ही आम्हाला फसवलं असं म्हणत, त्यांच्या मुलीला, म्हणजे ज्ञानेश्वरच्या पत्नीला परत गावी आणलं.

मी ज्ञानेश्वरला विचारलं, ‘‘तू स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा अभ्यास करण्याऐवजी हे कुठलं पुस्तक वाचत बसला आहेस?’’ ज्ञानेश्वर म्हणाला, ‘‘मला वाचनाची प्रचंड आवड; पण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळे कथा, कादंबरी, अवांतर वाचन मी विसरून गेलो. पण आता ठरवलंय, स्पर्धा परीक्षेचा नाद सोडायचा, आपल्याला जे आवडतं ते करायचं. गेल्या वर्षभरापासून आता मला जे आवडतं ते मी करायला हाती घेतलं.’’

मी ज्ञानेश्वरला म्हणालो, ‘‘तुमचं नेमकं चुकलं कुठे?’’ ज्ञानेश्वर म्हणाला, ‘‘मी माझ्यातली कुवत वेळीच ओळखायला हवी होती. जेमतेम काठावर पास असताना, स्पर्धा परीक्षेच्या त्या कसोटीच्या स्पर्धेमध्ये आपला निभाव लागणार नाही, हे मी सुरुवातीलाच ओळखायला पाहिजे होतं. स्पर्धा परीक्षेत दोन वर्षांत निभाव लागला नाही, तर पुढचा पर्याय काय, हेही मी तयार ठेवायला पाहिजे होतं.

मी ज्ञानेश्वरला म्हणालो, ‘‘मग वॉचमनचीच नोकरी का स्वीकारली?’’ ज्ञानेश्वर म्हणाला, ‘‘मागची चार-सहा वर्षं बसून बसून शरीर अवघड काम करायला तयार होत नाही. बाकी ठिकाणी काम करण्यापेक्षा इथं चार पैसे कमी मिळतील, पण बसून राहायचं, कुठलंही काम करायचं नाही, अशी ही नोकरी. माझ्या सोबतचे अनेक मित्र हा जॉब करतात, म्हणून मग मीही त्यांच्यासोबत कामाला लागलो.’’ ज्ञानेश्वर मागच्या सहा वर्षांमधला सगळा प्रवास मला सांगत होता. दोन तास मी ज्ञानेश्वरसोबत बोलत बसलो होतो. खूप गप्पांमधून ज्ञानेश्वरने सांगितलं, ‘‘ज्यांना स्पर्धा परीक्षेत अपयश आलं, असे त्याचे अनेक मित्र आसपासच्या एटीएममध्ये काम करतात.’’ मी ज्ञानेश्वर असणाऱ्या त्या एटीएममधून बाहेर पडलो. ज्ञानेश्वरच्या भेटीनंतर मी ठरवलं होतं, त्याच रात्री पंधरा वॉचमनच्या भेटी घ्यायच्या; ते कुठून आलेत, कसे आले, त्यांची आताची स्थिती काय आहे, हे त्यांच्याकडून समजून घ्यायचं. ‘केक कुठेही मिळत नाही, मी येणार नाही,’ असा मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना निरोप दिला.

पुण्याच्या शिवाजीनगर, बुधवार पेठ भागामधल्या वॉचमनचं काम करणाऱ्या पंधरा जणांना मी भेटलो. पंधरापैकी अकरा जण मराठवाड्यामधले होते, उर्वरित चार बाहेरच्या राज्यांमधले होते. त्या अकरांपैकी सात जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अपयश आलेले होते, उर्वरित रोजीरोटीच्या शोधामध्ये पुण्यामध्ये आलेले होते. त्या सगळ्यांना भेटल्यावर मी विचार करत होतो, किती धक्कादायक आहे हे? सगळ्यांच्या व्यथा सेम ज्ञानेश्वरसारख्याच होत्या.

रात्र संपण्याच्या तयारीला लागली होती. मी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. माझ्या मनात विचार येत होते, ‘एमपीएससी, यूपीएससीच्या नावाखाली पुण्यामध्ये जमलेली गर्दी किती आभासी आहे. त्यांना दिशा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण दोन वर्षं एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करायचा आणि पुन्हा नव्याने काहीतरी करायचं, असा बेत त्यांनी आखला असं नाही. उत्तम शेती करता येते, उत्तम उद्योजक होता येतं, चांगल्या ठिकाणी जॉब मिळू शकतो, ज्यातून तुम्हाला समाधान मिळेल आणि समाजाचं चांगलं होईल, हे त्यांना कोणी शिकवलं नाही. पॉवर असल्याशिवाय काही मिळत नाही, लाल दिव्याची गाडी पाहिजेच, असं त्यांच्या मनावर सातत्याने बिंबवलं गेलं. लाल दिव्याची गाडी हेच खरं जग आहे, असं ते समजू लागलेत. जेव्हा आयुष्याची वेळ निघून जाते, तेव्हा हाती काही लागत नाही. मग सगळ्या दिशा बंद होतात. स्वाभिमानाने कोणतंही काम करणे, ही देशसेवाच आहे, त्यासाठी लाल दिवा कशाला पाहिजे?

Web Title: Ips Watchman Instead Yin Anniversary Everyone Wanted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..