esakal | 'व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा'; अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला फंडा!
sakal

बोलून बातमी शोधा

Mask

'व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा'; अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला फंडा!

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

काहीशी स्थिती पूर्वपदावर आली असतानाच कोरोना पुन्हा उग्र रूपाने थैमान घालत आहे. त्याच्याशी प्रशासन आणि सरकार दोन हात करत असताना,अमरावती आणि जळगाव येथे बिकट स्थितीवर मात करताना अवलंबलेल्या मार्गांविषयी. अर्थात, प्रत्येक ठिकाणी मात करण्यासाठी अनेकविध मार्ग अवलंबलेले आहेत, तेही अनुकरणीय असे आहेतच.

वर्षभरापासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करताना दररोज नवनवी आव्हाने पुढे येत होती, आजही येताहेत. या आव्हानांवर मात करण्याबरोबरच नवनव्या उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारी यंत्रणेतील हजारो अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या मदतीने लढा दिला जात आहे. मात्र, धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे व्हेंटिलेटर लागण्यापेक्षा मास्क लावा, असा आमचा सल्ला आहे.

अगदी सुरवातीला कोरोना आला, तेव्हा फेब्रुवारी महिन्यापर्यंत अमरावती जिल्ह्यात कुठेही कोरोना रुग्ण नव्हता. मात्र, एप्रिलमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सुरवातीला कोरोनाबाबत केवळ सर्वसामान्यच नव्हे तर अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण होते. उपचाराबाबत संदिग्धता होती. जिल्हा प्रशासनाने सुपर स्पेशालिटीमध्ये १००बेड्‌स उपलब्ध करून दिले, हीच खरी कोरोना विरोधातील लढ्याची सुरवात म्हणता येईल. आधी सारेच घाबरत. नंतर काहींनी तयारी दर्शविली; सुपर स्पेशालिटीमध्ये कोविड रुग्णालय सुरू झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला, तसा लॉकडाउनचा प्रयोग करावा लागला. हा काळ आव्हानात्मक होता. संकटही गहिरे होते. परप्रांतीय मजुरांची आपल्या गावी जाण्याची घाई, वाहन नसल्याने पायीच आपल्या राज्यात निघालेल्या मजुरांना सुविधा देणे जिकरीचे काम होते. ते गरजेचेही होते. परिणामी परप्रांतीय मजुरांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था केली. विशेष म्हणजे बस तसेच रेल्वेद्वारे मजुरांना रवाना करताना त्यांच्या भोजन व पाण्याच्या व्यवस्थेतही कमतरता राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न केले.

हेही वाचा: सिंग इज किंग! कोरोना संकटात भज्जीचा पुणेकरांना मदतीचा हात

कर्मचाऱ्यांसाठीही उपक्रम

कंटेन्मेंट झोन, मायक्रो कंटेन्मेंट झोनकडे सुरवातीपासूनच गांभीर्यपूर्वक लक्ष दिले. शहर तसेच ग्रामीण भागातसुद्धा उपाययोजना अमलात आणल्या. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाझर या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले. कोरोना प्रतिबंधासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता अविरत झटणाऱ्या डॉक्‍टर, पारिचारिका, पोलिस या फ्रंटलाइन वर्कर्सचे मनोबल उंचावण्यासाठी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने मेडिटेशन कार्यक्रम राबविण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडूनही शहरातील विविध परिसरांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले.

हेही वाचा: रेकॉर्डब्रेक वाढ! 24 तासांत 2.71 लाख नवे रुग्ण, मृतांची संख्याही वाढली

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ते लशीकरण

लॉकडाउनच्या काळात नुकसान होणाऱया व्यापाऱ्यांच्या संघटनेसोबत नेहमीच समन्वय साधण्यात आला. राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन वेळोवेळी घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास सुरू राहणारा कोरोना कक्ष स्थापून त्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध बेड्‌स, ऑक्‍सिजन, रेमेडेसिव्हिर, दवाखान्यांतील सुविधा याबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संवाद साधून नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, सरकारच्या निर्देशाप्रमाणे अमरावती जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविले. त्या माध्यमातून कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करून अनेक नवे रुग्ण शोधून काढण्याला प्राधान्य दिले. त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसून आले. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १०ते १५कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग सुरवातीच्या काळात तसेच अगदी आतापर्यंत करण्यात आले. आता सर्वांत जास्त भर दिला जातो तो लशीकरणावर. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांवर नागरिकांचे लशीकरण पूर्ण झाले आहे. अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. सध्याच्या स्थितीतही आम्ही स्वयंपूर्ण झालो आहोत, असे म्हणता येणार नाही. आज प्रशासनाकडे १० रुग्णवाहिका आहेत. सुरवातीला त्यासुद्धा नव्हत्या.

हेही वाचा: कोरोनावर भारतीय औषध! AAYUDH Advance ठरतंय प्रभावी; ट्रायल यशस्वी

मोठ्या कार्यक्रमांवर नियंत्रण

विशेष बाब म्हणजे, कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही कोरोना नसलेल्या रुग्णांची हेळसांड होऊ नये, याची दक्षता सुरवातीपासूनच घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालयातील बिगर कोरोना रुग्णसेवा जराही बाधित होता कामा नये, याकडे आमचे लक्ष होते. अमरावती जिल्ह्यात पूर्वी तसेच आताही ऑक्‍सिजन, रेमेडेसिव्हिरची कमतरता जाणवली नाही. काही प्रमाणात ओढाताण जरूर झाली. प्रशासनाकडून मंगल कार्यालये, लग्नसमारंभ, सार्वजनिक मेळावे, कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याचा सुरवातीपासूनच प्रयत्न केला. जिल्ह्यातील १० ते १५ मंगल कार्यालयांना मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची कार्यवाही करण्यात आली. समारंभातील उपस्थितीवरसुद्धा निर्बंध लादले. त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या सर्व आतापर्यंतच्या लढ्यात मोलाची साथ मिळाली ती आरोग्य कर्मचारी, पोलिस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी, महापालिका, जिल्हा परिषद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध सरकारी कार्यालयांतील कोविड योद्ध्यांची.

Shailesh Nawal, District Collector, Amravati

Shailesh Nawal, District Collector, Amravati

अमरावती शहरातील काही मंगल कार्यालयांमध्ये कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहेत. ई-संवाद पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न झाले आहेत. आघाडीवरील कोरोना योद्ध्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिटेशन कार्यक्रम राबविला. अशा काही नव्या उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती.