बदलता अफगाणिस्तान (जतीन देसाई)

जतीन देसाई jatindesai123@gmail.com
रविवार, 8 जानेवारी 2017

अफगाणिस्तानात आयोजित एका परिसंवादाच्या निमित्तानं मुक्त पत्रकार जतीन देसाई यांनी नुकतीच त्या देशाला भेट दिली. अफगाणिस्तानात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. लोक हळूहळू मोकळा श्‍वास घेऊ लागले आहेत. दहशत, दहशतवाद आहेच; पण तरीही नागरिक त्यातून बाहेर यायला लागले आहेत, वेगळा विचार करायला लागले आहेत. या अफगाणिस्तानबाबतची ही निरीक्षणं...

अफगाणिस्तानात आयोजित एका परिसंवादाच्या निमित्तानं मुक्त पत्रकार जतीन देसाई यांनी नुकतीच त्या देशाला भेट दिली. अफगाणिस्तानात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. लोक हळूहळू मोकळा श्‍वास घेऊ लागले आहेत. दहशत, दहशतवाद आहेच; पण तरीही नागरिक त्यातून बाहेर यायला लागले आहेत, वेगळा विचार करायला लागले आहेत. या अफगाणिस्तानबाबतची ही निरीक्षणं...

अफगाणिस्तानात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. बदलाचे वारे आहेत नवीन अफगाणिस्तानचे. आजचा अशांत आणि स्फोटक अफगाणिस्तान इतिहासजमा व्हावा, असं असंख्य लोकांना वाटत आहे. राजधानी काबूलचा विचार केल्यास लोक त्यांच्या व्यवसायात व्यग्र असतात. रस्त्यावर लोकांची वर्दळ सतत चालू असते. वाहनांच्या प्रचंड संख्येमुळं ट्रॅफिक जाम ही सामान्य बाब झाली आहे. लग्नाचे मोठमोठे हॉल लाइटनी सजवलेले दिसतात. दुसऱ्या कुठल्याही राजधानीच्या शहरासारखंच काबूल जाणवतं. मात्र, प्रत्येकाला त्याच्या घरी पोचण्याची घाई असते. जगातली जी काही निवडक असुरक्षित शहरं आहेत, त्यांत काबूलचा क्रमांक बराच वर आहे.

काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो आणि समोर आकाशात पाहिलं, तर बलूनसारखी वस्तू आकाशात दिसली. पुढं कारनं हॉटेलात पोचेपर्यंत इतरत्रदेखील आकाशात असे बलून दिसत होते. त्याबद्दल विचारल्यावर कळलं, की त्यातून लोकांवर पाळत ठेवली जाते. काबूल शहरात कुठंही फिरा, आपल्याला असे बलून सतत दिसतात. संशयितांवर यातून पाळत ठेवली जाते, तरी कुठं बाँबस्फोट होईल, हे सांगता येत नाही. अशा शहरात पाळत ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. खरं तर अशा प्रकारे पाळत ठेवणं हे मानवी हक्कांच्या विरुद्ध आहे; पण काबूलसारख्या असुरक्षित शहरात त्याची आवश्‍यकता असते. ‘तालिबान’, ‘अल्‌ कायदा’ आणि इतर अनेक दहशतवादी संघटनांशी आज अफगाणिस्तान निर्णायक लढत देत आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तानात तैनात केलेल्या बहुसंख्य जवानांना परत बोलावून घेतलं आहे. स्थानिक अफगाण जवान आता दहशतवाद्यांना तोंड देत आहेत.

भारतीयांबद्दल अफगाण जनतेत प्रचंड प्रेम आहे आणि ते सर्वत्र आढळतं. पोलिस किंवा जवानांना आपण भारतीय आहोत, हे कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. त्यांच्या या भावनांमागं कारणंही आहेत. भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध खूप जुने आहेत. एकेकाळी भारतात मोठ्या प्रमाणात अफगाण राहायचे. आजही बऱ्यापैकी अफगाणी नागरिक भारतात राहतात. गेल्या काही वर्षांत अफगाण विद्यार्थी मोठ्या संख्येनं भारतात शिक्षणासाठी यायला लागले आहेत. पुणे शहरातच जवळपास दीड हजार अफगाण मुलं शिकत आहेत. दिल्ली, हैदराबाद, बेंगळूर इथंही मोठ्या संख्येनं अफगाण मुलं शिक्षण घेत आहेत. साऊथ एशियन असोसिएशन फॉर को-ऑपरेशनअंतर्गत (सार्क) दिल्लीत सुरू झालेल्या साऊथ एशियन युनिव्हर्सिटीतसुद्धा अफगाण मुलं शिक्षण घेत आहेत. शिक्षणासाठी तरुण अफगाण मोठ्या संख्येनं देशाच्या बाहेर पडताना दिसतात. बाहेर शिक्षण घेणाऱ्यांत मुलींचं प्रमाणदेखील मोठं आहे. शिक्षणाला पर्याय नाही, याची जाणीव लोकांना आहे. २००१मध्ये ‘तालिबान’ आणि ‘अल्‌ कायदा’चा पराभव झाला, तेव्हापासून विशेषतः मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले.

एकीकडं मुलं शिक्षणासाठी बाहेर पडतात आणि दुसरीकडं विशेषतः श्रीमंत घरांतल्या लहान मुलांच्या शिक्षणाची वाईट अवस्था आहे. अपहरणाच्या भीतीनं श्रीमंत घरांतली लहान मुलं शाळेत जात नाहीत- किंबहुना त्यांना शाळेत पाठवलं जात नाही, त्यांना घरातच शिकवलं जातं. अफगाणिस्तानात शाळांतल्या शिक्षकांना फारसा पगार नाही. शाळेत शिकवून झाल्यानंतर बरेच शिक्षक मग श्रीमंतांच्या घरांत त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी जातात. काबूल शहरात काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत आणि संधी मिळाली, की श्रीमंतांच्या मुलांचं ते अपहरण करतात. खंडणी मिळाली, की मग ते मुलांना सोडतात; पण काही वेळेस मुलांचे वडील प्रचंड श्रीमंत असले किंवा त्यांचे काही राजकीय संबंध असले, तर त्या मुलाला या टोळ्या दहशतवाद्यांना विकतात. मग प्रचंड पैसे ओतल्यानंतर दहशतवादी मुलाला सोडतात.

नर्गिस झेबरान ही अफगाणिस्तान वुमन्स एज्युकेशन सेंटरची कार्यकर्ती. नर्गिसची मुलं शाळेत जात नाहीत; पण त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक घरी येतात. शिक्षक मग दोन-तीन तास मुलांना शिकवतात. नर्गिसचे वडील राजकीय कार्यकर्ते होते. १९७९मध्ये अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाचं लष्कर दाखल झाल्यावर नर्गिसच्या वडिलांनी पाकिस्तान गाठलं, ते कम्युनिस्टांच्या विरोधात होते. सोव्हिएत रशियानं माघार घेतल्यानंतर राजा झहीर शाहला परत बोलवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. स्वाभाविकच पाकिस्तानला ते मान्य नव्हतं. पाकिस्तान आणि अमेरिकेचा सुरवातीला मुजाहिदीन आणि नंतर तालिबानला पाठिंबा होता. एक दिवस पाकिस्तानातच नर्गिसच्या वडिलांची हत्या करण्यात आली. नर्गिसचा जन्म पाकिस्तानात झालेला. नर्गिस आज तिच्या वडिलांच्या विचारांशी सहमत नाही. डाव्या विचारसरणीला ती महत्त्व देते.

नजीबुल्ला १९८७ ते १९९२पर्यंत अफगाणिस्तानचे अध्यक्ष होते. डाव्या विचारांच्या नजीबुल्लांना जनाधार होता. सोव्हिएत रशियाची त्यांना मदतही होती. १९९२मध्ये मुजाहिदीन यांनी काबूलची सत्ता हस्तगत केली, तेव्हापासून त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या काबूल इथल्या कार्यालयात आश्रय घेतला होता. तालिबाननं १९९६मध्ये काबूलवर कब्जा केला आणि संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात घुसून नजीबुल्लांना खेचून बाहेर काढलं. अत्यंत क्रूरतेनं तालिबाननं नजीबुल्ला यांची हत्या केली.

मुजाहिदीन यांच्या काळापासून नजीबुल्ला यांनी भारतात जाण्याचा प्रयत्न केलेला; पण त्यांना त्यात यश मिळालं नव्हतं. त्यांचं कुटुंब भारतात राहत आहे. नजीबुल्ला यांनी अफगाणिस्तानात नवीन विचार आणायला सुरवात केलेली. त्यांनी लोकांना अधिकार प्राप्त करून दिले होते. आज लोकांना नजीबुल्ला यांची आठवण येते. काबूल इथल्या वास्तव्यात आमचा ड्रायव्हर नजीबुल्ला यांचा भक्त होता. नजीबुल्ला यांच्या काळात तो सैन्यात होता आणि त्यानं सोव्हिएत रशियाचा दौराही केलेला. ‘नजीबुल्ला अफगाणिस्तानला विकासाच्या दिशेनं नेत होते आणि नंतर आलेल्या मुजाहिदीन यांनी आणि तालिबाननं देशाचं वाटोळं केलं,’ असं तो सतत सांगत होता. ‘वाढत चाललेली धर्मांधता ही चिंतेची बाब आहे,’ असं तो म्हटला. हिंदी चित्रपटांमधली गाणी त्याच्या कारमध्ये सतत वाजत असत. जुन्या गाण्यांचा तो प्रेमी होता. ज्येष्ठ नागरिकांत अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र लोकप्रिय आहेत.

अफगाणिस्तानात जाण्याचा योग आला तो ‘साऊथ एशियन्स फॉर ह्युमन राइट्‌स’ आणि ‘अफगाणिस्तान वुमन्स एज्युकेशन सेंटर’नं आयोजित केलेल्या अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तानच्या कार्यकर्त्यांच्या एका परिसंवादाच्या निमित्तानं. या परिसंवादात अफगाणी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. मारी अकामी नावाच्या महिला कार्यकर्तीची ओळख इथं झाली. अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी ती आधार केंद्र चालवते. तिनं नुकत्याच सुरू केलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला जेवायला बोलावलं. रेस्टॉरंटच्या दरवाजावरच ‘बंदुकीला परवानगी नाही’ असा बोर्ड दिसला. अफगाणिस्तानात मध्यमवर्गीयांत कुटुंबासह रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण्याची अनेक कारणांनी लोकांना सवय नाही. श्रीमंत लोक मोठ्या हॉटेलात कुटुंबासह जातात.

मध्यमवर्गीयांमध्ये कुटुंबासह बाहेर फिरण्याची, जेवायला जाण्याची संस्कृती निर्माण करण्याचा मारीचा प्रयत्न. मात्र, पुरुषांना ते रेस्टॉरंटमध्ये येण्यास प्रोत्साहन देत नाहीत. इथं काम करणाऱ्या मुलीसुद्धा मारीच्या आधार केंद्राच्या आहेत. रेस्टॉरंटच्या एका भिंतीवर अफगाणिस्तानच्या आतापर्यंतच्या अध्यक्षांच्या पत्नींचे (first lady) आहेत. त्यातल्या काही आधुनिक ड्रेसमध्ये दिसतात. मात्र, एकीच्या चेहऱ्यावर बुरखा होता. ही कोणाची पत्नी, असं कुतुहलानं मारीला विचारता, मुल्ला ओमरची ती पत्नी, असं तिनं सांगितलं. मग अफगाणिस्तानात महिला अध्यक्ष कधी होणार, अशी चर्चा सुरू झाली. दुसऱ्या भिंतींवर तालिबाननं हत्या केलेल्या महिलांचे फोटो दिसतात. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता मारी आणि तिचा पती त्यांच्या कामात व्यग्र असतात. नुकतंच रेस्टॉरंट सुरू झाल्यामुळं अद्याप फार लोकांना त्याबद्दल माहिती नाही; पण त्यांना आशा आहे, की महिला हळूहळू रेस्टॉरंटमध्ये यायला सुरवात करतील.

रुला घनी या अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या पत्नी. त्या मूळच्या लेबॅनॉनच्या. त्यांची भेट झाली. सर्वसामान्य लोकांच्या आणि त्यांतही महिलांच्या प्रश्‍नांवर त्या सक्रिय आहेत. त्यांच्या कार्यालयात काही कर्मचारीदेखील आहेत. लोक त्यांना येऊन भेटतात आणि रुला घनी त्यांच्या प्रश्‍नांचा पाठपुरावा करतात. अफगाणिस्तानची आता वाटचाल योग्य दिशेनं होत असल्याचं त्या म्हणाल्या. उद्याचा अफगाणिस्तान सुंदर, शांत असणार यावर त्यांचा विश्‍वास आहे.

अफगाणिस्तानच्या फेरउभारणीत भारताची मदत महत्त्वाची असल्याचंही त्यांनी म्हटलं. जोहरा युसूफ ही त्यांची सल्लागार. जोहरा मुळातली पत्रकार. अनेक वर्षं ती अमेरिकेत होती. आपल्या देशासाठी काही करावं, या विचारांनी जोहरा अफगाणिस्तानला परत आली. मशाल नावाची २३-२४ वर्षांची तरुण मुलगी रुला यांची सेक्रेटरी. मीटिंग संपल्यावर ती मला म्हणाली, ‘‘उद्या मी भारतात चंद्रपूरला जाणार आहे.’’ चंद्रपूर ऐकून मला आश्‍चर्यच वाटलं. परदेशात शिकत असताना ग्रुपमध्ये चंद्रपूरचा मुलगा आणि पाकिस्तानची मुलगी होती. त्यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ती दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला रवाना झाली. काबूल एअरपोर्टवरसुद्धा ती भेटली. मशाल ही अत्यंत हुशार मुलगी. जोहराप्रमाणं तीसुद्धा काही कारणांसाठी अफगाणिस्तानला परत आली.

पलवाशा या अफगाण वुमन्स एज्युकेशन सेंटरच्या प्रमुख. अनेक वर्षांपासून त्या महिलांच्या प्रश्‍नांवर काम करतात. अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागातसुद्धा त्या सतत प्रवास करत असतात. त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. मात्र, आवश्‍यक सर्व काळजी त्या आणि इतर महिला कार्यकर्त्या घेतात. काबूल असो किंवा अफगाणिस्तानातलं इतर कुठलंही शहर असो; प्रवास करणं सोपं नाही. अत्यंत जुन्या टॅक्‍सी रस्त्यावर दिसतात. महिला कार चालवताना आढळतात; पण महिला कार्यकर्त्यांसाठी कार चालवणं सोपं नाही. महिला चळवळीतल्या कार्यकर्त्या उघडपणे ‘तालिबान’, ‘अल्‌ कायदा’ आणि इतर दहशतवादी संघटनांच्या विरोधात बोलत असतात. अतिरेक्‍यांना असे लोक आवडत नाहीत. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारी मंडळी अतिरेक्‍यांना कशी आवडतील? या महिला कार्यकर्त्या सतत दहशतीच्या वातावरणात जगतात. बऱ्याच वेळा त्यांना कामाच्या निमित्तानं रात्री उशिरा घरी जाण्याची वेळ येते आणि म्हणून या महिला स्वतः कार चालवत नाहीत. प्रत्येक जण पुरुष ड्रायव्हर ठेवतात.

अध्यक्षांच्या प्रमुख सल्लागाराला भेटण्याचीदेखील संधी मिळाली. राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय अत्यंत सुरक्षित बनवण्यात आलं आहे. लोकांची सतत वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात पोलिस आणि सैनिक दिसतात. मात्र, प्रत्येक जण इतरांशी आपुलकीने वागतो. कर्मचारीसुद्धा मदतीसाठी सतत तयार असतात. अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, काही प्रमाणात मालदीवच्या निवडणुकांसारखी. निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत अश्रफ घनी यांनी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांचा पराभव केला. अब्दुल्ला अब्दुल्ला आता पंतप्रधान (chied executive) आहेत. तालिबानच्या राजवटीत त्यांनी भारतात आश्रय घेतला होता. स्वाभाविकच निवडणुकीत भारताची सहानुभूती त्यांच्या बाजूनं होती.

काबूलच्या बाजारातसुद्धा आम्ही फिरलो. बाजारात मोठी गर्दी दिसते. थंडीचे दिवस असल्याने गरम कपड्यांना मोठी मागणी होती. अफगाणिस्तान ड्रायफ्रूटसाठी प्रसिद्ध आहे. ड्रायफ्रूट्‌सनी दुकानं भरली आहेत. काबुली चनासुद्धा तेवढाच प्रसिद्ध. प्रत्येक रस्त्यावर डॉलर, पौंड, युरोसारखी चलनं बदलून देणारे लोक असतात. दुकानांतसुद्धा डॉलर, युरो, पौंड स्वीकारले जातात.

काबूल शहरात अफगाणिस्तानच्या भविष्याबद्दल अनेकांशी बोललो. मात्र, प्रत्येकाच्या बोलण्यात आशा होती. आजचा अफगाणिस्तान इतिहासजमा होईल आणि उद्या नवीन अफगाणिस्तान अस्तित्वात येईल, ज्यात दहशतवादाला स्थान नसेल. सर्वांना समान न्याय देणाऱ्या आणि शांत अशा अफगाणिस्तानची या सर्वांना खात्री आहे. अशा नवीन अफगाणिस्तानसाठी युरोप, अमेरिका आणि इतर देशांत स्थायिक झालेले नागरिक आज त्यांच्या देशात परत येत आहेत... आजचं स्वप्न, उद्याची वस्तुस्थिती बनते, हा इतिहास आहे.

Web Title: jatin desai's article for afganistan in saptarang