परी आणि भूत (जयनीत दीक्षित)

जयनीत दीक्षित jayneetdixit@gmail.com
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

परीला भुताचा काहीसा रागच आला. घुश्‍शातच ती म्हणाली ः ‘‘मग तो तुझ्या तरी राज्यात येईल होय रे? सांग ना? तो जर मला विसरून गेलेला असेल, तर मग तो तुलाही विसरून गेलेला असणारच ना? तो तुझ्यावर तरी काय म्हणून विश्वास ठेवेल?’’
परीला कसं काही म्हणता काहीच कळत नाही, असा भाव नजरेत आणून भूत तिला म्हणालं ः ‘‘तसं होत नसतं कधीच! तो मला नक्कीच ओळखेल. तो मला विसरणार नाही कधीच...’’

परीला भुताचा काहीसा रागच आला. घुश्‍शातच ती म्हणाली ः ‘‘मग तो तुझ्या तरी राज्यात येईल होय रे? सांग ना? तो जर मला विसरून गेलेला असेल, तर मग तो तुलाही विसरून गेलेला असणारच ना? तो तुझ्यावर तरी काय म्हणून विश्वास ठेवेल?’’
परीला कसं काही म्हणता काहीच कळत नाही, असा भाव नजरेत आणून भूत तिला म्हणालं ः ‘‘तसं होत नसतं कधीच! तो मला नक्कीच ओळखेल. तो मला विसरणार नाही कधीच...’’

एकदा एक माणूस अरण्यात वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आतल्या भागात पोचला. अरण्याचा हा भाग अतिशय निर्जन होता. तिथं परीचं एक अन्‌ भुताचं एक अशी दोन वेगवेगळी राज्यं एकमेकांना अगदी लागून होती.
त्या दिवशी परी आणि भूत आपापल्या राज्याच्या वेशीवर बसून
शिळोप्याच्या गप्पा मारत होते. दोघांना तो वाट चुकलेला कावराबावरा, भांबावलेला माणूस दिसला.

त्या माणसाला पाहून परी भुताला म्हणाली ः ‘‘अरे, मी ओळखते याला! याच्या लहानपणी मी अनेकदा जायची याच्या स्वप्नात. हा खूप आनंदून जायचा मला बघून. आम्ही खूप खेळायचो, नाचायचो, खूप खूप भटकायचो, मजा करायचो...हा तर अगदी हट्टच करायचा ‘तू परत जाऊ नकोस म्हणून.’’
मागचं सगळं जुनं जुनं आठवून
परीला काहीही सुचेनासंच झालं.
ती बोलणं पुढं सुरू ठेवत म्हणाली ः ‘‘माझ्याच शोधात आलाय वाटतंय हा इथं...आता मी त्याला माझ्या राज्यात नेईन. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. आम्ही पुन्हा एकदा खूप खूप मजा करू ’’
परीच्या उत्साहाला उधाण आलं होतं अगदी.
भूत म्हणालं ः ‘‘मीसुद्धा ओळखतो या माणसाला. मीही जायचो याच्या लहानपणी
याच्या स्वप्नात. तेव्हा हा खूप घाबरायचा मला...अगदी थरथर कापायचा... मला बघून याला भर थंडीतही दरदरून घाम फुटायचा... कधीकधी झोपेतून दचकून
उठायचा... आई-बाबांनी जवळ घेऊन त्याची भीती घालवली, की मग
पांघरूण ओढून गुडूप झोपून जायचा प्रयत्न करायचा... ’’
‘‘तुझं असंच रे... तुला सगळेच घाबरतात. तो आत्तासुद्धा काही केल्या तुझ्याजवळ यायचा
नाही,’’ परी म्हणाली.
‘‘नाही! तसं होणारच नाही. तो माझ्या राज्यातून पुढं जाऊच शकणार नाही,’’ भूत अगदी ठामपणे म्हणालं.
परीही मग सरसावून बसत म्हणाली ः ‘‘नाही... असं होणारच नाही. तो नक्कीच येईल माझ्या राज्यात, तू बघच. त्याला खूप खूप आवडायची रे मी!’’
‘‘ती फार जुनी गोष्ट झाली ! तेव्हा तो फार लहान होता. आता तर त्याला तू आठवणारदेखील नाहीस’’ भूत म्हणालं.
परी म्हणाली ः ‘‘आठवेल, आठवेल त्याला सगळं. किती किती गोड असतं रे ते सगळं! ते रम्य बालपण! तो छान छान आठवणींचा ठेवा! त्या गोष्टी विसरतं काय कधीही कुणी?’’
भूत परीकडं करुणेच्या दृष्टीनं पाहत म्हणालं ः ‘‘तुला वाईट वाटेल; पण आता तो तुला विसरला असणार हे मात्र नक्की! आता तर
तो तुझ्यावर विश्वाससुद्धा ठेवणार नाही... ’’
परीला भुताचा काहीसा रागच आला. घुश्‍शातच ती म्हणाली ः ‘‘मग तो तुझ्यातरी राज्यात येईल होय रे? सांग ना? तो जर मला विसरून गेलेला असेल, तर मग तो तुलाही विसरून गेलेला असणारच ना? तो तुझ्यावर तरी काय म्हणून विश्वास ठेवेल?’’
परीला कसं काही म्हणता काहीच कळत नाही, असा भाव नजरेत आणून भूत तिला म्हणालं ः ‘‘तसं होत नसतं कधीच! तो मला नक्कीच ओळखेल. तो मला विसरणार नाही कधीच...’’
परीही आता मागं हटणार नव्हती. ती अतिशय ठाम स्वरात भुताला म्हणाली ः ‘‘तो मलासुद्धा विसरणारच नाही... आत्ता कशी आठवण करून देते त्याला, तू बघच. माझा निर्माता आहे विश्वास! विश्वास कधीच खोटा ठरायचा नाही! तो माणूस नक्कीच ओळखेल मला...लावतोस पैज? ’’
भुतानं चेहऱ्यावर मंद स्मित आणत काहीशा छद्मीपणानंच परीला म्हटलं ः ‘‘पैज? नको लावूस तू पैज...! मला माहीत आहे तू नक्कीच हरशील.’’
‘‘नाही... माझा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही. तूच घाबरतो आहेस पराभवाला! म्हणूनच पैज लावणं टाळतो आहेस ना?’’ जणू काही आपण आत्ताच पैज जिंकली असल्याच्या थाटात परीनं भुताला विचारलं.
‘‘ठीक आहे. बघ प्रयत्न करून...’’ दोन्ही खांदे उडवत भूत म्हणालं.
आता परी काही भुताचं म्हणणं सहजासहजी ऐकणार नव्हती. तिनं भुताला अट घालायचं ठरवलं. ती म्हणाली ः ‘‘सांग, मी जिंकले तर काय देशील तू मला?’’
भूत हसलं आणि परी हरणारच असल्याची खात्री असल्याप्रमाणे ते तिला अगदी बिनधास्तपणे म्हणालं ः ‘‘जर तू जिंकलीस ना, तर मी तुला माझं सगळं राज्य देऊन टाकीन अन्‌ या जगातून कायमचा निघून जाईन मी...’’
परीचे डोळे चमकले. ती म्हणाली ः ‘‘बघ हं! शब्द फिरवायचा नाही ऐनवेळी...’’
‘‘नाही फिरवणार,’’ भूत म्हणालं.

मग परीनं विश्वासाची आराधना सुरू केली. ती गोड आवाजात गाणं म्हणू लागली. पक्षीही मंजुळ स्वरांत तिला साथ देऊ लागले. परीनं मग
हळूहळू नाचू लागली-गिरक्‍या घेऊ लागली. मंद मंद शीळ घालत वाराही तिला साथ देऊ लागला. पानं सळसळू लागली. वेली अन्‌ झाडंही आनंदानं डोलू लागली. कळ्याही पाकळ्या पखरून फुलून आल्या. एकंदरीत सगळं वातावरण प्रसन्न होऊ लागलं...रमणीय होऊ लागलं. परीनं मग दुप्पट जोमानं विश्वासाची आळवणी सुरू केली. आता सूर्यानं सगळ्या वनावर किरणं पसरली. त्या किरणांत माणसाला परीचे सोनेरी केस अन्‌ तिचे सुंदर डोळे दिसू लागले...हळूहळू त्याला तिची संपूर्ण
काया दिसू लागली...परी आनंदून गेली...आता माणूस आपल्याला ओळखणार असा विचार करून तिनं त्याच्या स्वागतासाठी हात पसरले.

पण...पण त्याच वेळी माणसाला दुसरंही काहीतरी भीषण-भयानक दिसू लागलं होतं...माणसाचं लक्ष परीकडं जाण्याऐवजी त्या विरूप-विद्रूप-विक्राळतेकडंच जास्त प्रमाणात जाऊ लागलं...आणि ते सगळं पाहून एकदम घाबरून गेल्यानं माणसाची बोबडी वळू लागली...आणि त्याच्या तोंडून कसाबसा एकच शब्द बाहेर पडला ः ‘‘भू...भू...भूत!’’
आता अचानक ढग दाटून येऊ लागले...विजांचा कडकडाट सुरू झाला...सूर्य ढगाआड झाला...अंधारून येऊ लागलं...सोसाट्याचा वारा सुरू झाला...झाडं कडाकडा मोडून पडू लागली...माणूस भयानं घामाघूम झाला...त्याची दातखीळ बसली अन्‌ काही कळायच्या आतच तो कोसळला...गतप्राण झाला !
सर्व काही शांत झालं... परी धावतच माणसाजवळ गेली अन्‌ रडू लागली. ती अनावर रागानं आणि त्याच वेळी अगदी अगतिकतेनं भुताला म्हणाली ः शेवटी तूच जिंकलास! नेहमी तूच का रे जिंकतोस? मला सगळे का विसरून जातात? ’’
भूतही खिन्न झालं, त्यानं परीच्या खांद्यावर थोपटलं अन्‌ ते तिला म्हणालं ः हे असंच होतं. नेहमीच! तुझा निर्माता आहे विश्वास, माझा निर्माता आहे भय! विश्वास काय अन्‌ भय काय हे या माणसाच्याच डोक्‍यातून जन्म घेतात. हाच आपला मूळ
निर्माता आहे...आपलं वेगळं असं अस्तित्व नाही...पण! ’’
‘‘पण! पण काय?’’ आता भूत आणखी काय सांगणार, याची परीला मोठी उत्सुकता लागून राहिली.

मग भूत म्हणालं ः ‘‘...पण, आता हा माणूस काही तेव्हासारखा लहान राहिलेला नाही. तो मोठा झाला आहे, परिपक्व-प्रौढ झाला आहे अन्‌ जसजसा माणूस मोठा होत जातो ना, तसतसा त्याचा विश्वासही कमी कमी होत जातो...आणि, आणि भय मात्र वाढत जातं! म्हणूनच नेहमी जिंकतो तो मीच! पण तू उदास नको होऊस...मी तुला दिलेला माझा शब्द अजूनही कायम आहे... जेव्हा केव्हा विश्वासाचा विजय होईल ना, त्या दिवशी मी खरंच हे जग सोडून जाईन...कायमचं!’’

Web Title: jayneet dixit's article in saptarang