मोत्यांची माळ! (जयश्री नायडू)

jayshree naidu write article in saptarang
jayshree naidu write article in saptarang

वाडीत माझ्या खूप मैत्रिणी होत्या. कमळी, किशी, यमी, सुमी. माझी सगळ्यात आवडती मैत्रीण होती सुमी. ती नेहमी हसत असायची. एकदा माझ्या गळ्यातली मोत्यांची माळ पाहून ती मला म्हणाली ः  ‘‘पुढच्या खेपेला अशीच मोत्यांची माळ माझ्यासाठी आण.’’ - मी ते कबूल केलं.

का  लच माझा वाढदिवस माझ्या मुलांनी साजरा केला. वयाची सत्तर वर्षं निघून गेली. बालपण आजी-आजोबा-काका-मामा यांच्या अंगाखांद्यावर खेळत लाडात गेलं. लग्नानंतर नागपूरमध्ये तब्बल पन्नास वर्षं वास्तव्य, संसारातली सुख-दुःखं सांभाळत, कर्तव्यं पार पाडत वर्षं कशी गेली हे कळलंच नाही.

आता मात्र उगाचच एकटं एकटं वाटायला लागतं. काही करायला जावं तर संधिवातानं आखडलेल्या गुडघ्यामुळं काही करता येत नाही. बिछान्यावर पडल्या पडल्या जुन्या आठवणींसोबत मी पुण्यात फेरफटका मारून येते. तुळशीबाग, लक्ष्मी रोड, चतुःशृंगी...आठवणींच्या महापुराला किनारा नसतो! समोर लावलेल्या बालाजीच्या फोटोवर नजर जाते. त्याला घातलेली मोत्यांची माळ मला खुणावू लागते. पुण्याच्या तुळशीबागेतून मी ती आणली होती. अशीच एक माळ मी चतुःशृंगीच्या जत्रेत घेतली होती. बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग आजही माझ्या मनात घर करून आहे. संगमवाडी. मुळा-मुठेच्या संगमावर वसलेलं एक छोटंसं गाव. माझ्या आईचे काका तिथले सरपंच. मोठी हवेली, गावात वजन, त्यांच्या हवेलीशेजारीच माझ्या आजोबांचं दोनमजली घर होतं. मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहावं लागल्यामुळं ते घर भाड्यानं देण्यात आलं होतं. भाडं आणायला दर महिन्यात कुणाला तरी जावं लागे. बहुतेक वेळा मी आणि मामी जात असू. संगमवाडीत जाणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असे. बाबाजी म्हणून होते, त्यांची एक नाव होती. त्या नावेत बसून जावं लागे. खाली पाणी, वर आकाश आणि नीरव शांतता. सगळ्याचच कुतूहल वाटायचं मला नेहमीच. निसर्गाचं वेड. नदीच्या थंडगार पाण्यात हात सोडून बसायला खूप मजा वाटायची. पिटुकले मासे इकडून तिकडं सुळ्‌कन्‌ जायचे.
नदी पार केल्यावर शेताच्या बाजूनं वाडीत जायला पायवाट होती. उजव्या हाताला कवठ, बोर, बाभूळ यांची झाडं आणि डाव्या अंगाला हिरवीगार शेतं, भाज्यांचे मळे. मळ्यात काम करणाऱ्या बायका ‘हे कुणाकडचे पाहुणे?’ म्हणून आमच्याकडं कुतूहलानं पाहायच्या. वाडीत माझ्या खूप मैत्रिणी होत्या. कमळी, किशी, यमी, सुमी. माझी सगळ्यात आवडती मैत्रीण होती सुमी. नेहमी हसत असायची. एकदा माझ्या गळ्यातली मोत्यांची माळ पाहून ती मला म्हणाली ः
‘‘पुढच्या खेपेला अशीच मोत्यांची माळ माझ्यासाठी आण.’’ मी ते कबूल केलं.
***

त्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही वाडीत जायला निघालो होतो. दसरा नुकताच झाला होता. दिवाळीचे वेध लागले होते. सुमीसाठी मी चतुःशृंगीच्या जत्रेतून मोत्यांची सुंदर माळ विकत घेतली होती. नावेतून उतरून आम्ही रस्त्याला लागलो. रस्त्यात आई-मामीच्या ओळखीच्या बायका भेटल्या. त्या बोलत उभ्या होत्या. मी पुढं निघाले. हातातल्या काठीनं गवतावर उगाचच मारत चालले होते. नदीवरून वाहत येणारं थंडगार वारं आणि वर हवंहवंसं वाटणारं ऊन्ह. या सगळ्याचा आनंद घेत मी स्वतःशीच गुणगुणत चालत होते. विचार करत होते... आज रविवार. सगळ्या मैत्रिणींना सुटी असेल...खूप खेळायचं... सुमीला तर खूप आनंद होईल...कारण, तिला हवी असणारी मोत्यांची माळ मी आणली होती. मी भराभर पावलं उचलत होते. एके ठिकाणी थांबले. पिकलेली बोरं मला खुणावत होती. मोह आवरेना; पण तोडायची कशी? इतक्‍या उंचावर काट्यांच्या पहाऱ्यातून बोरांपर्यंत हात पोचणं केवळ अशक्‍य होतं. हे सगळं घडत असताना अचानक एक हळुवार झुळूक आली आणि माझ्या खांद्याला स्पर्श झाला. मागं वळून पाहिलं तर सुमी. माझी इच्छाशक्ती दांडगी असावी. मी तिचाच विचार करत होते. नेहमीप्रमाणे हसत, तोंडावर भुरभुरणारे केस दोन्ही हातांनी मागं सारत तिनं मला विचारलं ः ‘‘माझी मोत्यांची माळ?’’
मी पटकन्‌ स्कर्टच्या खिशात हात घातला. मोत्यांची माळ काढली आणि तिच्या गळ्यात घातली. खूप खूश झाली ती. हसतच म्हणाली ः ‘‘तू हो पुढं. मी आलेच.’’
उड्या मारत जाणाऱ्या सुमीच्या पाठमोऱ्या आकृतीकडं मी पाहतच राहिले. मागून आई व मामी येऊन पोचल्या. आम्ही गावात पोचलो तेव्हा सूर्य बराच वर आला होता. गावात आम्ही प्रथम येसूआत्याकडं जात असू. येसूआत्या म्हणजे माझ्या आजोबांची मानलेली बहीण. ती बालविधवा होती. तिला आई होती; पण लवकरच ती तिला पोरकी करून गेली. पन्नाशीकडं झुकलेली येसूआत्या स्वाभिमानी होती. मातीचंच पण स्वतःचं तीन खोल्यांचं घर होतं. एक खोली भाड्यानं दिलेली होती. तिचं भाडं यायचं. शिवाय कोंबड्या पाळलेल्या होत्या. घरात हातमशिन होती. आसपासच्या बायकांच्या चोळ्या ती तिच्यावर शिवून देत असे. गावात तिला मान होता. सगळ्यांच्या अडीअडचणीत ती मदत करायची. आम्हाला पाहून तिला खूप आनंद झाला. ती लगेच स्वयंपाकाला लागली. माझ्या पायात बाभळीचा काटा गेला होता. तो मला स्वस्थ बसू देईना. काढायचा खूप प्रयत्न केला; पण तांडव करण्यापलीकडं मला काही जमलं नाही. मामीनं मात्र बोलता बोलता तो काटा काढला. आईनं पटकन्‌ त्यावर गुळाचा चटका दिला.

स्वयंपाक करता करता तिघी काहीतरी कुजबुजत होत्या. माझं सगळं लक्ष त्या ठसठसणाऱ्या पायाकडं होतं. भूकही सपाटून लागली होती. भराभर जेवले. काहीतरी आठवलं म्हणून हात धुऊन तशीच बाहेर पळाले. आई हाका मारत राहिली...
***

आज कोणतीच मैत्रीण दिसत नव्हती. चार-पाच घरं सोडून सुमीचं घर होतं. दार बंद होतं. मी धाडकन्‌ दरवाजा ढकलला. समोरच्या पडवीत सुमीचे वडील राऊतकाका बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. भयाण शांतता होती घरात. काहीतरी भयंकर घडलं असावं असं वाटत होतं.  मी माजघरात गेले. तिथं सुमीचे सगळे नातेवाईक बसलेले होते. ते माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहत होते. मला काहीच समजत नव्हतं. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. मी स्वयंपाकघरात डोकावलं. चुलीजवळ सुमीची आई, म्हणजे काकू दोन्ही गुडघ्यांत डोकं घालून बसल्या होत्या. माझी चाहूल लागताच त्यांनी मान वर करून माझ्याकडं पाहिलं. विस्कटलेले केस, भकास चेहरा आणि केविलवाणी नजर. त्यांची ती अवस्था पाहून मी विचारलं ः
‘‘सुमी कुठाय?’’
त्याबरोबर काकू ताडकन्‌ उठल्या आणि माझे दोन्ही खांदे पकडून गदागदा हलवून मला म्हणाल्या ः ‘‘अगं रमे! मी पण या सगळ्यांना गेल्या तीन दिवसांपासून हेच विचारतेय. माझी सुमी कुठाय? पण मला कुणीच काही सांगत नाही.’’ त्यांनी माझं बखोट पकडलं. मला ओढत तरातरा देवघरात नेलं आणि म्हणाल्या ः ‘‘ही बघ आपली सुमी.’’

भिंतीशी एका पाटावर सुमीचा फोटो ठेवलेला होता. त्याला हार घालण्यात आला होता. समोर उदबत्ती लावलेली होती. मी नुसती वेंधळ्यासारखी पाहत होते. दहा-बारा वर्षांचं माझं वय. काय कळणार या वयात? सुमीच्या मामीनं आम्हा दोघींना धरून बाहेर पडवीत आणलं. घरात बरेच जण जमले होते. माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या. शेजारपाजारचे लोकही त्यात दिसत होते. सुमीचा मामा हळूहळू सांगू लागला ः ‘‘आठ दिवसांपूर्वी सुमी चांगली होती. पाच-सहा दिवसांपूर्वी तिला थोडा ताप आला. घरचेच उपाय केले. ताप उतरेना म्हणून दवाखान्यात नेलं. उपचार सुरू होते; पण डॉक्‍टरांना काही कळायच्या आत सगळं संपलं. ताप डोक्‍यात चढला आणि हसती-खेळती सुमी आपल्याला सोडून गेली.’’

काकूंची अवस्था बघवत नव्हता. सुमीचा भाऊ नंदू उदासपणे बसला होता. माझ्यामागून आई आणि मामीही तिथं पोचल्या होत्या. त्या दोघी काकूंजवळ बसल्या व त्यांना समजावत राहिल्या. येसूआत्या नंदूच्या डोक्‍यावरून हात फिरवत राहिली. सगळं वातावरण उदास, दुःखी होतं. माझेही डोळे भरून आले होते. माझ्या डोक्‍यात विचारांचं काहूर माजलं होतं. काका मात्र दगडासारखे निश्‍चल बसून होते. ते रडतही नव्हते नि काही बोलतही नव्हते. भयाण शांतता होती. मी सगळ्यांवर नजर फिरवली. मग शेवटी न राहवून मी विचारलं ः ‘‘मग रस्त्यात मला सुमी कशी भेटली? आम्ही बोरीजवळ भेटलो, बोललो. मी तिला मोत्यांची माळ दिली. तुम्ही म्हणताय, ती आता आपल्यात नाही...तर मग मला भेटलेली ती कोण होती?’’
मी रडत होते. माझं मलाच काही कळत नव्हतं. सगळे एकमेकांकडं पाहू लागले. काकू तर धाय मोकलून रडायला लागल्या. मला जवळ घेऊन म्हणाल्या ः ‘‘तुझ्यात जीव अडकला होता गं तिचा, माझे बाय.’’ बायका आपापसात कुजबुजत होत्या. जड मनानं आम्ही निघालो. इतक्‍या वेळानं काका प्रथमच बोलले ः ‘‘येत जा मधूनमधून.’’ आता कुणासाठी यायचं? बाहेर आभाळ भरून आलं होतं. सकाळी स्वच्छ ऊन्ह होतं, तर आता ढग भरून आले होते...
***

वाडीत अजून वीज पोचलेली नव्हती. नावेतून जायचं होतं. येसूआत्या थांबायचा आग्रह करत होती. ‘मुक्काम करा’ म्हणत होती; पण मी थांबायला तयार नव्हते. नावेपर्यंत काका पोचवायला निघाले. येताना किती आनंदात होते मी. आणि आता हे काय होऊन बसलं! रस्त्यात कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. पायात गेलेला काटा तर निघाला होता. ठसठस कायम होती. तीही कमी होईल; पण सुमीनं अचानक दिलेल्या या यातना कशा विसरणार? कधीही न भरून येणारी जखम देऊन सुमी निघून गेली होती... मी चालत होते; पण मन मागंच रेंगाळत होतं. सुमीबरोबर घालवलेले क्षण आठवत होते. एकदा आम्ही सगळ्या जणी विठोबा-रुखमाईच्या देवळात लपाछपी खेळत होतो. पळताना कसं कोण जाणे समोरच्या खांबावर माझं डोकं दाणकन्‌ आपटलं. थोडा वेळ काहीच दिसेना. मी मटकन्‌ खालीच बसले आणि जोरानं रडायला लागले. सगळ्या जणी घाबरल्या. सुमीही रडायला लागली. तिनं माझं डोकं दाबून धरलं. मोठ्ठं टेंगूळ आलं होतं. तिनंच मला हात धरून घरी नेलं होतं...पण आत्ता या क्षणी मला कोण आधार देणार? माझे डोळे सतत वाहत होते. सुमी डोळ्यांपुढून हलत नव्हती. आई-मामी मला समजावत होत्या. काहीतरी हरवलं होतं. मी मधून मधून मागं पाहत होते. वाटत होतं, आत्ता मागून धावत येईल सुमी!

माझे पाय अचानक थांबले. इथंच याच बोरीजवळ सुमी मला भेटली होती. मी वळून पाहिलं. काकाही तिकडंच पाहत होते. त्यांची नजर पानांत दडलेल्या मोत्यांच्या माळेवर गेली. एका फांदीवर ती हेलकावे खात होती. मी काकांकडं पाहिलं. आई आणि मामीही आश्‍चर्यानं पाहत होत्या. मी उडी मारण्यासाठी पुढं झाले; पण काकांनी मला अडवलं. त्यांनी स्वतःहून ती माळ काढली. क्षणभर माझ्याकडं पाहिलं व ती माळ त्यांनी अलगद स्वतःच्या खिशात घातली. मला म्हणाले ः ‘‘तुझी हरकत नसेल तर ही माळ मी माझ्याजवळ ठेवतो.’’ माझी कशाला हरकत असेल? मी नजरेनंच ‘हूं’ म्हटलं. नाव तयार होती. आज नाव बाबाजी स्वतः चालवणार होते. ते आईला म्हणाले ः ‘‘बायडे, पोरीला जप हो!’’ नावेनं किनारा सोडला. काका निरोपाचा हात हलवत राहिले. हळूहळू मी वाडीपासून दूर जात होते. वातावरण ढगाळलेलं होतं. मनात आठवणींचं वादळ घोंघावत होतं. डोळ्यांबरोबर आता मनही रडत होतं...
***

आज इतक्‍या वर्षांनंतरही मधूनमधून सगळं आठवतं. अशी घुसमटून टाकणारी संध्याकाळ...अशी कातरवेळ असली की आठवते ती मोत्यांची माळ...आठवते ती सुमी. मग मनात उठते एक अनामिक कळ आणि संध्याकाळ गूढ वाटायला लागते...उगाचच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com