चलो, दिलदार चलो...

प्रियकर-प्रेयसी अथवा पती-पत्नी या दोघांमध्ये प्रेम फुलू लागतं तेव्हा व्यावहारिक जगाची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसते.
pakeezah movie
pakeezah moviesakal

चलो, दिलदार चलो...

चाँद के पार चलो

हम है तैयार, चलो

प्रियकर-प्रेयसी अथवा पती-पत्नी या दोघांमध्ये प्रेम फुलू लागतं तेव्हा व्यावहारिक जगाची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसते; किंबहुना फक्त जगातल्या व्यवहाराचं भान ठेवून जे प्रेम जुळवलं जातं त्यात कोणतीही सच्चाई असू शकत नाही. मात्र, बेभानपणाने मन त्याच्या किंवा तिच्या मनात गुंतत जातं तेव्हा मात्र एकमेकांविषयी गाढ विश्वास वाटू लागतो.

या विश्वासातून समर्पणाची भावना निर्माण होते. ‘तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो किंवा काहीही करीन... अगदी जिवाचा त्यागसुद्धा करीन’ असंही वाटण्यापर्यंत ही समर्पणाची मनःस्थिती पोहोचलेली असते. अशा प्रेमात शारीरिक प्रणयाचा संभव कदाचित नसेलही. ‘देवदास’सारख्या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांमधून अशरीरी प्रेमातलं हे समर्पण आपण पाहत आलो आहोत...

समर्पण ही प्रेमाच्या अतिशय उत्कट आविष्काराची परिणती असल्याचं अनुभवाला येतं. ‘पाकीज़ा’मधल्या ‘चलो, दिलदार चलो...’ या गीतातून हेच समर्पण व्यक्त झालं आहे.

चहूबाजूंनी अंगावर येणारी रात्रीची गूढ, नीरव शांतता. टिपूर चांदणं सगळ्या आसमंतात विखरून अवनीला न्हाऊ घालत आहे. आकाशात ढगांशी लपाछपी खेळणारा पुनवेचा चंद्रमा सरोवरातल्या संथ जलाशयात पडलेल्या प्रतिबिंबात आपलंच देखणं रूपडं जणू न्याहाळत आहे. लुकलुकत्या तारकांची रांगोळी रात्रीच्या काळ्यामिट्ट अंधाऱ्या नभांगणात चमचमते आहे.

सारे तारे डोळे मिचकावून जणू एकमेकांना काही इशारे करत आहेत...अशा रम्य वातावरणात एकच एकटी होडी शिडातल्या हवेवर स्वार होत संथ गतीनं एका प्रणयी जोडप्याला घेऊन जलविहार करत आहे. अंधाऱ्या नभातलं चंद्राचं रूप प्रेमिकांना कायमच स्फूर्ती देत आलं आहे.

ते रूप पाहून प्रेमाचं थुईथुई कारंजं प्रेमिकांच्या मनात नर्तन करायला लागतं. ‘उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दर्या उसळला प्रीतिचा’ असं लिहून आचार्य अत्रे यांनीसुद्धा चंद्र आणि प्रीती यांच नातं कथन करत ‘प्रणयरस हा चहुकडे, वितळला स्वर्गीचा’ या वाक्यातून ते नातं अधोरेखित केलं आहे.

चांदु वो चांदणे। चांपे वो चंदने।

देवकीनंदनेवीण। नावडे वो।।

अशी भक्ताच्या मनातली विराणी लिहून भक्त आणि ईश्वर यांच्या भेटीची आस यांतलं अद्वैत लिहिताना संत ज्ञानेश्वरमहाराजांनीही चंद्राची साक्ष काढली आहे...तद्वतच प्रियकर आणि प्रेयसी यांच्या अद्वैतालाही चंद्राची साक्ष आहे.

चांदण्यातल्या अशा रम्य वातावरणात सतारीचा हलकासा झंकार आणि बासरीची तितकीच हलकीशी धून यांसह दूरवरून कुठून तरी अलगदपणे हवेवर विहार करत प्रेमिकाचा स्वर लहरत लहरत कानांवर येतो. ‘चलो, दिलदार चलो, चाँद के पार चलो’... त्याची साद ऐकताच, प्रियकरावर सच्चा विश्वास असल्यानं तीही प्रतिसाद देते : ‘हम है तय्यार, चलो’

आओ खो जाए सितारों में कहीं

छोड दे आज ये दुनिया, ये जमीं

या रम्य चांदण्यात आपणही लुप्त व्हावं...ही भोवतालची दुनियाच नव्हे तर या भौतिक जगापासून मुक्त व्हावं असं वाटणं...हे आहे समर्पण.

जिंदगी खत्म भी हो जाए अगर

ना कभी खत्म हो उल्फत का सफर

प्रणयाच्या धुंदीत जीवनाची अखेर व्हावी आणि सुखाच्या क्षणांची अशी अनुभूती जीवनापलीकडंही अशीच सुरू राहावी...हे आहे समर्पण.

अशा निवांत समयी प्रणयोत्सुकांच्या समर्पित मनातल्या हळुवार भावना गीतकार कैफ भोपाली यांनी काव्यात्मतेनं टिपल्या आहेत. अतिशय साध्या-सोप्या शब्दांतलं हे काव्य मनाला भावतं. रोमॅंटिक शब्दरचना आणि शब्दरचनेला साजेशी नयनमनोहर दृश्यं यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करून संगीतकार गुलाम महंमद यांनी गाण्याला दिलेली अतिशय अनुरूप अशी चाल काही वेगळ्याच गोडव्याची अनुभूती कानांना देते. ‘पहाडी’ या रागाचं सौंदर्य काय असतं ते हे गाणं ऐकून जाणवतं.

इंटरल्यूडला येणारी बासरीची दीर्घ सुरावट अतिशय कर्णमधुर आहे. सतार, बासरी, तबला यांसारख्या भारतीय वाद्यांचा मेळ साधून दिलेलं संगीत श्रवणीय. संपूर्ण गाण्यात वाद्यांच्या जोडीनं येणारी टिकटिक तितकीच श्रवणीय. कळस चढवला आहे तो महंमद रफी आणि लता मंगेशकर यांनी. एको इफेक्ट दिलेला त्यांचा स्वर दूरवर अंधारातून येत झिरपत झिरपत कानात गुंजारव करतो. दुसऱ्या कडव्यापूर्वी दोघांनी घेतलेली तान गाण्याला एका उंचीवर नेते..

गीताच्या तालाबरोबर नावेचा अर्धा भाग हळूहळू हेलकावे खात सरकत जातो. नायक-नायिका नव्हे तर, आपणच नावेवर स्वार होऊन ते सारं अनुभवतो आहोत असा आभास होतो! नायिकेचं मुखदर्शन गाण्यात अजिबात होत नाही. नायकसुद्धा दिसतो तो काही सेकंदांपुरता. असं असूनही गाण्याचं टेकिंग फारच सुंदर झालं आहे. चित्रीकरणही सुंदर. विशेषतः चंद्रप्रकाशाचं झुळझुळत्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब लक्ष वेधून घेतं.

सिनेमाचा नायक आहे राजकुमार. गाण्यात काही सेकंदांच्या दर्शनातसुद्धा तो हळुवार प्रणयप्रसंग साकारतो. नायिका आहे मीनाकुमारी; पण तिचं मुखदर्शन अजिबात होत नाही. सिनेमाचं चित्रीकरण काही वर्षं लांबल्यानं दरम्यानच्या काळात तिला आजारानं गाठलं. साहजिकच तिचा चेहरा झाकून चित्रीकरण केलं गेलं.

तरीही नायकाची देहबोली, मुद्राभिनय, संवादफेक किंवा त्याच्या विशिष्ट लकबी, तसंच नायिकेचं सौंदर्य, सौष्ठव असं काहीही नसलं तरीही गीताचा रोमँटिक आशय श्रोत्यांपर्यंत-प्रेक्षकांपर्यत परिणामकारकरीत्या पोहोचवता येऊ शकतो. प्रत्येक वेळी काश्मीर अथवा स्वित्झर्लंड हीच ठिकाणं असायला पाहिजेत असं नव्हे तर, सामान्य निसर्गाच्या सुंदर पार्श्वभूमीवरसुद्धा साधेपणानं गाण्याचं उत्तम चित्रीकरण केलं जाऊ शकतं.

भव्यतेचा ध्यास असूनही हे असं कमाल अमरोही यांच्यासारखा दिग्दर्शकच करू जाणे. त्यादृष्टीनं हे गीत वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल. केवळ भारतीय संगीतावर आधारित गाण्याचा गोडवा हेदेखील वैशिष्ट्यच.

‘पाकीज़ा’ हा हिंदी सिनेमांच्या इतिहासातला अजरामर चित्रपट. सन १९७१ मधला. त्याच वर्षी ‘दम मारो दम, मिट जाए गम’ यासारखं आधुनिक युगातलं गाणं धुमाकूळ घालत असताना निव्वळ भारतीय साज ल्यायलेल्या संगीतानं ‘पाकीज़ा’मधल्या सर्वच गाण्यांची लोकप्रियता कमालीच्या उंचीवर पोहोचली होती हे आवर्जून नमूद करायला हवं.

चित्रीकरणादरम्यान संगीतकार गुलाम महंमद यांचं निधन झाल्यानं संगीताचा उर्वरित थोडासा भाग संगीतकार नौशाद यांनी हाताळला होता. पवित्र स्त्रीचं (पाकीज़ा) प्रेम कसं पवित्र असतं, म्हणूनच ते आपल्या मनावर गारूड करतं.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com