
राज्य ‘पांढऱ्या चिप्पी’चं!
राज्य ‘पांढऱ्या चिप्पी’चं!
- डॉ. शीतल पाचपांडे
राज्याला ७२० कि.मी. लांबीची समृद्ध किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीची ढाल म्हणजे कांदळवनाचे जंगल. समुद्रातून येणाऱ्या लाटांना ते अभेद्यपणे रोखतात. जमिनीवर तसेच सागरी परिक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या जीवांना आसरा देतात. निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करतात. जमिनीची धूप होण्यापासून वाचवतात. कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि प्राणवायू देतात. याच कांदळवनातील आपले राज्य कांदळवन वृक्ष म्हणजे ‘पांढरी चिप्पी’...
आंजर्ले गावात उपजीविका प्रकल्पांच्या प्रशिक्षणादरम्यान सहज चहा पीत करण्यात आलेली चर्चासुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल घडवू शकते, याची प्रचिती आली. चर्चेचा विषय होता, महाराष्ट्राने आजवर राज्य वृक्ष, राज्य प्राणी, राज्य पक्षी आणि राज्य फुलपाखरू घोषित केले. महाराष्ट्राकडे एवढा समृद्ध सागरीकिनारा असताना राज्य कांदळवन वृक्ष का नसावा? त्यानंतर या विषयाकडे वाटचाल सुरू झाली. ‘कांदळवन कक्षा’ने २०१८ मध्ये राज्य सरकारकडे ‘पांढरी चिप्पी’ला राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. काही दिवसांतच महाराष्ट्राने २२ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य कांदळवन वृक्ष घोषित केले.
जगभरात कांदळवनांच्या ६० प्रजाती असून, महाराष्ट्रात २० प्रजाती आढळतात. त्यामध्ये अव्हिसेनिआ मरिना (तीवर) आणि ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा’ (कांदळ) या प्रजाती आपल्याला प्रामुख्याने महाराष्ट्राच्या किनारी भागात दिसतात. किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना ‘कांदळवन’ म्हटल्यावर या प्रजाती सहज ओळखता येतात. या दोन प्रजातींनंतर सर्वसाधारणपणे दिसणारी प्रजाती म्हणजे ‘चिप्पी’.
लाल, पांढरी व पिवळी (सोन) चिप्पी अशा तीन चिप्पीच्या प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. यामधील लाल चिप्पी ही दुर्मिळ आहे. सोनचिप्पी जमिनीलगत साधारण गोड्या पाण्याच्या ठिकाणी वाढते, तर पांढरी चिप्पी समुद्राच्या दिशेने खाऱ्यापाण्यात दिसून येते. पांढरी चिप्पी जरी कांदळवन प्रजाती असली, तरी अनेक लोकांना या प्रजातीची तितकीशी ओळख नाही, असे दिसून आले. शिवाय महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीवर ही प्रजाती लोकांना पाहायलाही मिळेल. त्यामुळे राज्य कांदळवन वृक्ष म्हणून ‘पांढऱ्या चिप्पी’ची निवड करण्याचे ठरवले गेले. त्यातून कांदळवनाचे महत्त्व कळेल, संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती होईल, अशी अपेक्षा आहे.
पांढरी चिप्पी सदाहरित, गडद हिरव्या रंगाची पाने असलेली, रुबाबदार वृक्षासारखी आहे. फुले मोठी पांढऱ्या रंगाची असतात. फळे गोलसर हिरव्या रंगाची असून, ती खाण्यायोग्य असतात. त्यामुळे काही भागांमध्ये या फळांना मॅन्ग्रोव्ह ॲपल किंवा ग्रीन मॅन्ग्रोव्ह ॲपल असे म्हणतात. मूळे जमिनीखाली नसून, ती जमिनीवर एखाद्या काटेरी गालिच्यासारखी पसरलेली असतात. भरतीचे पाणी काही कालावधीसाठी या मुळाशी येत असल्याने ही मुळे गाजरासारखी जमिनीवर येतात. या माध्यमातून पाण्याच्या वर राहून ती श्वासोछ्च्छवास करतात. म्हणून त्यांना श्वसनमुळे असेही म्हटले जाते. पाांढऱ्या चिप्पीची फुले मधमाशाांना आकर्षित करतात. त्यामुळे मधमाशाांना पोळे तयार करण्यासाठी जागा उपलब्ध होते. किनारपट्टीवर राहणारे, मासेमारी करणारे कोळीबाांधव या फळांचा वापर लोणचे करण्यासाठी करतात. शिवाय ही फळे शिजवून किंवा कच्ची दोन्ही स्वरूपात खाल्ली जातात. पांढऱ्या चिप्पीच्या पानांचा आणि फळाचा उपयोग कृमी, जखम, खोकला अशा आजारांवर केला जातो.
पांढऱ्या चिप्पीचे शास्त्रीय नाव सोनोरेशिया अल्बा (Sonneratia alba) असे असून, ते फ्रेंच वनस्पती शास्त्रज्ञ पेरी सोनोरेट (Pierre Sonnerat) यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. या झाडाची फुले पांढऱ्या रंगाची असतात. त्यामुळे अल्बा असे म्हटले गेले आणि अल्बा म्हणजे पांढरा रंग. खोडाचे व फाद्यांचे साल पांढरट, फिकट चॉकलेटी रंगाचे आणि गुळगुळीत असते. पाने साधी, थोडीशी जाडसर, समोरासमोर रचलेली आणि गोलाकार असतात. पाने दोन्ही बाजूने गडद हिरवीगार दिसतात.
साधारण जून-जुलै महिन्यापासून या झाडाला फुले येतात. साधारण चार-पाच फुले फांद्यांच्या टोकाला येतात. एक फूल साधारण पाच-सात से.मी. आकाराचे असते. या फुलांमध्ये असंख्य पुंकेसर असतात, जे लहान मुलांना पावडर लावायला वापरतात. ते सफेद केसाळ गोंड्यासारखे दिसतात, त्यामुळे या झाडाला इंग्रजीमध्ये पावडरपफ असेदेखील म्हंटले जाते. हे फूल पूर्ण उमलल्यावर पाच-सहा सेंमी व्यासाचे होते. असंख्य केसाळ पांढऱ्या पुंकेसरामुळे फुल मोठे असले, तरी नाजूक दिसतात. या फुलांचे परागीकरण रात्रीच्या वेळी वटवाघळांच्या मदतीने होते. हे पुंकेसर परागीकरण झाल्यावर गळून पडतात. पुंकेसर गळून पडल्यावर फुलाच्या देठावर असलेली लालसर रिंग स्पष्ट दिसून येते. ही फुले दिसायला सुरेख दिसतात. साधारण ऑगस्ट महिन्यापासून फळधारणा सुरू होते आणि डिसेंबरपर्यंत फळे तयार होतात.
‘पांढऱ्या चिप्पी’ची कच्ची आणि पिकलेली फळे खाण्यायोग्य असतात. या फळांपासून काही भागांमध्ये व्हिनेगर बनवले जाते. याची फळे पोटातील जंत किंवा खोकल्यासारख्या आजारांसाठी वापरली जातात.
(लेखिका कांदळवन प्रतिष्ठानमध्ये प्रकल्प उपसंचालकपदावर कार्यरत आहेत.)
ad.projects.mfn@gmail.com
Web Title: Kandalvan Forest Bay View Beach In Maharashtra Anjarle Village Kandalvan Plants
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..