मराठी वेलीला कन्नड फुले; सोलापुरात आजपासून कन्नड साहित्य संमेलन

रजनीश जोशी
शनिवार, 8 जुलै 2017

फ. म. शहाजिंदे यांची "आदम' ही कादंबरी, वीरभद्र चन्नमल यांचे "खोट्या कल्पना' ही पुस्तके त्यांनी कन्नड व मराठीत आणली. वृत्तीने नम्र आणि अभ्यस्त जमादार हे सोलापूरचे भूषणच आहे. डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या शब्दांत सांगायचं तर मराठी वेलीवर उगवलेली ही कन्नड फुलेच आहेत!

सोलापुरात आजपासून कन्नड साहित्य संमेलन होत आहे. सोलापुरातील अनेक साहित्यिकांनी कन्नड भाषेत आपले मोठे योगदान दिले आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांपासून ही परंपरा सुरू होते. मराठी आणि कन्नड भाषांवरून राजकीय लोक तंडत असताना या भाषाभगिनींमधील सौहार्दाचं उत्तम दर्शन या संमेलनातून सोलापुरात घडत आहे.

सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्‍वरांच्या काव्याची पारायणे नित्य होत असतात. छोट्या छोट्या पदांमधून त्यांनी जगण्याचे नीतिनियम सांगितले आहेत. माणसाचं उन्नयन व्हावं, हीच आंतरिक ओढ त्यांच्या रचनांमधून आहे. मराठी आणि कन्नड भाषांच्या समतेचा पुरावा म्हणून सोलापूरचा उल्लेख करावा लागेल. साने गुरुजींच्या आंतरभारती कल्पनेची खरीखुरी अंमलबजावणीच जणू या शहरात वर्षानुवर्षे गाजावाजा न करता सुरू आहे. महाकवी द. रा. बेंद्रे हे मूळचे धारवाडचे असले तरी त्यांची मातृभाषा मराठी होती. कन्नडप्रमाणेच त्यांनी मराठीतूनही कविता लिहिल्या आहेत. त्यांचे पुत्र वामनराव बेंद्रे आणि व्यंकटेश जोशी (बेळगाव) यांनी त्याचे संपादन प्रसिद्ध केले आहे. सोलापुरातील नीलानगरात त्यांचे निवासस्थान होते. दयानंद महाविद्यालयात ते अध्यापन करीत होते.

बेंद्रे यांचे सख्यत्व अनेकांना लाभले. त्यातही वसंतराव दिवाणजी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. किंबहुना बेंद्रे यांच्या कविता आणि विचारांनी वसंतरावांना झपाटून टाकले होते. बागलकोटमधील देवरगेण्णूर हे त्यांचे मूळ गाव. तिथून ते सोलापुरात आले ते बेंद्रे यांचा शोध घेतच. बेंद्रे आणि त्यांची पहिली भेट झाली तेव्हा वसंतराव त्यांच्या कन्नड कविता एकापाठोपाठ एक म्हणून दाखवू लागले. बेंद्रे त्यामुळं स्तिमित झाले. मात्र वसंतरावांनी बेंद्रे यांचे अनुकरण केले नाही. त्यांनी कादंबरी लेखनाची स्वतःची स्वतंत्र वाट चोखाळली. "घरट्याच्या शोधात',"निरिंद्रिय' या त्यांच्या कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्या आहेत. त्याला कर्नाटक साहित्य अकादमीचे पुरस्कारही मिळाले आहेत. वसंतरावांची समीक्षेची स्वतःची शैली होती. बेंद्रे यांच्या साहित्याचे त्यांनी केलेले विश्‍लेषण पाहून कर्नाटकातील अनेक विद्वान थक्क झाले.

जयदेवीताई लिगाडे या प्रकांड पंडित, विदुषी सोलापुरात होत्या हे सोलापूरकरांचं भाग्य म्हणावं लागेल. सिद्धेश्‍वर महाराजांच्या वचनांचं मराठीत भाषांतर त्यांनी केलं, त्याचं "सिद्धवाणी' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पण "शून्यसंपादन' या जयदेवीताईंच्या ग्रंथाने मोठा लौकिक मिळवला. याखेरीज "अरविंद कल्याणक', "जयगीता',"तारक तंबुरी',"साविरद पदगळू',"बंदेऊ कल्याणक' अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. कन्नड साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं आहे. कन्नडमधून मराठीत त्यांनी अनेक अनुवाद केले आहेत.

मराठी आणि कन्नड भाषाभगिनींची सेवा करणाऱ्यांमध्ये आणखी एक नाव घ्यायला हवे ते म्हणजे बी. ए. जमादार यांचे. त्यांनी पाच वर्षे अखंड परिश्रम घेऊन "ज्ञानेश्‍वरी' कन्नडमध्ये अनुवादित केली. संत तुकडोजींची "ग्रामगीता' त्यांनी कन्नडमध्ये नेली. स्वतः कवी असलेल्या श्री. जमादार यांनी मुंदरगी जगद्‌गुरूंचा "मानवधर्म' हा ग्रंथ मराठीत अनुवादित केला. फ. म. शहाजिंदे यांची "आदम' ही कादंबरी, वीरभद्र चन्नमल यांचे "खोट्या कल्पना' ही पुस्तके त्यांनी कन्नड व मराठीत आणली. वृत्तीने नम्र आणि अभ्यस्त जमादार हे सोलापूरचे भूषणच आहे. डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या शब्दांत सांगायचं तर मराठी वेलीवर उगवलेली ही कन्नड फुलेच आहेत!

Web Title: kannad sahitya sammelan marathi news solapur news literature festival