विचारांना नैसर्गिक वळण देण्याची गरज

दुःखाच्या निराकरणाच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ‘डोंट बिलिव्ह एव्हरीथिंग यू थिंक’ या पुस्तकात विचार केलेला आहे.
dont believe everything you think book
dont believe everything you think booksakal

- कौस्तुभ पटाईत

दुःखाच्या निराकरणाच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ‘डोंट बिलिव्ह एव्हरीथिंग यू थिंक’ या पुस्तकात विचार केलेला आहे.

कोण आहे? मला काय हवे आहे? दुःख म्हणजे काय? या प्रश्नांची उत्तरे माणूस हजारो वर्षांपासून शोधत आहे. मानवी समाजाने इतकी स्थित्यंतरे पाहिली, भौतिक आणि बौद्धिक प्रगती साधली तरी या प्रश्नांबाबतचे माणसाचे कुतूहल शमले नाही. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रज्ञावान व्यक्ती या प्रश्नांशी भिडल्या.

त्याच्या मुळाशी गेल्या आणि आपापले निष्कर्ष मानवी समाजासमोर ठेवले, पण तरीही माणसाचे समाधान होत नाही. माणसाचा या प्रश्नांचा शोध सुरूच आहे. ‘डोंट बिलिव्ह एव्हरीथिंग यू थिंक’ या पुस्तकातून जोसेफ न्गुयेन या तरुण लेखकाने अशाच प्रकारे दुःख किंवा त्रासाच्या कारणाचा शोध घेतला आहे.

पुस्तकाच्या शीर्षकापासूनच लेखक त्याचे म्हणणे मांडायला सुरुवात करतो. तुम्ही विचार करता त्या साऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असा सूचनावजा इशारा लेखक सुरुवातीलाच देतो. लेखकाने असा इशारा का दिला असेल याचा उलगडा पुस्तक वाचायला सुरुवात करताच काही वेळातच होतो. माणसाला सतावणाऱ्या मुख्य प्रश्नालाच लेखक थेट हात घालतो.

तो प्रश्न म्हणजे ‘माणसाला होणाऱ्या दु:खाचे कारण काय?’ लेखक सांगतो की ‘विचार करणे’ हेच माणसाला होणाऱ्या दु:खाचे कारण आहे आणि मग आपले हे मत पटवून देण्यासाठी अनेक तर्क लेखक देतो. अनेक तत्त्वज्ञांची वचने, लोककथा यांचे दाखले देत आपली मांडणी करतो.

विचारांची निर्वात पोकळी किंवा ‘शून्य विचार’ (non thinking) या संकल्पनेपर्यंत लेखक आपल्याला घेऊन जातो. जोसेफ यांची ही मांडणी मन आणि बुद्धीला प्रभावित करते, विचार प्रक्रियेला चालना देते.

त्रास किंवा दुःख याच्या निराकरणाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या पुस्तकात विचार केलेला आहे. माणसाला दुःख कधी होते किंवा त्रास कधी होतो? नकोसा अनुभव येतो तेव्हा त्रास होतो असे याचे सरळसोपे उत्तर देता येईल. मग या त्रासाचे मूळ उपटून काढायचे तर तो ‘नकोसा अनुभव’ देणारी गोष्ट, घटना बदलावी लागेल.

ती गोष्ट जर संस्थागत, व्यवस्थागत असेल तर त्या व्यवस्थेत बदल घडवून आणावा लागेल, पण व्यवस्थेतील बदल ही सामाजिक, राजकीय प्रक्रिया आहे. ती एका व्यक्तीच्या हातातील गोष्ट नाही. आपल्याला तर दु:खाचे निराकरण आजच हवे आहे किंवा त्यापासून दिलासा हवा आहे. तेव्हा या प्रश्नाचा विचार व्यक्तिगत पातळीवर केला जातो आणि मग दुःख किंवा त्रासाची उकल मानसशास्त्रीय पद्धतीने केली जाते. हीच गोष्ट लेखक या पुस्तकात करतो.

आयुष्य जगताना माणसाला वेगवेगळ्या कारणांनी दुःखाला सामोरे जावे लागते. माणसाला दुःखी करणाऱ्या घटना, परिस्थिती माणसाच्या हातात असत नाही. त्यावर माणसाचे नियंत्रण असत नाही, पण त्या स्थितीला प्रतिक्रिया कशी द्यायची हे माणसाच्या हातात नक्की असते. त्यावरून आपण दुःखी होणार की नाही हे ठरणार असते असे लेखक सांगतो.

यासाठी लेखक महात्मा गौतम बुद्धांच्या एका वचनाचा आधार घेतो. बुद्ध सांगतात, की ‘‘आयुष्यात घडणारी कुठलीही दुःखद घटना दोन बाण आपल्या दिशेने सोडत असते. एक बाण असतो त्या घटनेने होणाऱ्या भौतिक त्रासाचा आणि दुसरा बाण असतो त्यामुळे होणाऱ्या भावनिक त्रासाचा.

पहिल्या बाणामुळे होणारा त्रास आपल्या नियंत्रणाबाहेर असतो, पण दुसऱ्या बाणामुळे होणाऱ्या त्रासावर आपले नियंत्रण असू शकते,’ असे सांगून लेखक आपल्याला दुःखाच्या मानसशास्त्रीय बाजूकडे घेऊन जातो. घटनेला दिलेली प्रतिक्रिया हीच त्रासाचे मूळ आहे, विचार करणे ही प्रक्रियाच त्रासाचे मूळ आहे असे लेखक सांगतो.

‘विचार करणे’ हेच त्रासाचे मूळ हे ऐकून आपल्यापैकी बरेच जण बुचकाळ्यात पडणे साहजिक आहे, पण त्यानंतर लेखक ‘विचार’ (thought) आणि ‘विचार करणे’ (thinking) या दोन गोष्टींचे भिन्न स्वरूप स्पष्ट करतो. माणसाची प्राणी म्हणून असणारी नैसर्गिकता आणि त्याच्या खास मानवी वैशिष्ट्यामुळे त्यात येणारी गुंतागुंत याची उकल करतो. माणसाची विचार प्रक्रिया अधिक नैसर्गिकतेकडे घेऊन जाण्याची गरज व्यक्त करतो. विचारांना अधिकाधिक नैसर्गिक वळण देण्याविषयी बोलतो.

माणसाच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवूनच यातील सर्व विश्लेषण केलेले आहे. त्यामुळे लेखक म्हणतो, की माणूस त्याच्या विचारांनी भोवतालचे जग निर्माण करतो. ही गोष्ट काहीशी अद्वैत वेदांताच्या तत्त्वज्ञानाची आठवण करून देते. ज्यात विचार, कल्पना यांना केंद्रस्थान आहे. ज्यात ‘ब्रह्मा’चे अस्तित्व हेच सत्य मानले आहे आणि जग मिथ्या आहे असे मानले आहे.

अर्थात, जोसेफ न्गुयेन इतक्या खोलात जात नाहीत, पण माणसाच्या दुःखाची सर्व जबाबदारी त्यांनी विचारांवरच टाकल्यामुळे या गोष्टीची आठवण होणे क्रमप्राप्त आहे. असे जरी असले, तरी माणसाला व्यक्तिगत त्रासाच्या भावनेतून सुटका करून घेण्याच्या कामी या पुस्तकातील विचार नक्कीच उपयोगी पडतील यात शंका नाही.

परिस्थितीला प्रतिक्रिया देण्याच्या बाबतीतील यातील मांडणीवरून जे. कृष्णमूर्तींच्या विचाराची आठवण होते. कृष्णमूर्तींनी ‘सावधानता’ या तत्त्वाविषयी एके ठिकाणी विवेचन केले आहे. कृष्णमूर्ती सांगतात, की समोर येणाऱ्या परिस्थितीला कुठलीही प्रतिक्रिया न देता, तिला चांगले-वाईट असे न ठरवता तिला फक्त अनुभवले पाहिजे.

समोर येणाऱ्या अनुभवाबाबत एक प्रकारच्या तटस्थतेची अपेक्षा कृष्णमूर्ती करतात. जोसेफ यांनी सांगितलेली शून्य विचारांची संकल्पना काहीशी अशीच म्हणावी लागेल.

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘सुख पाहता जवापाडे... दुःख पर्वताएवढे...! माणसाच्या आयुष्यात अनेक वाटांनी अनेक कारणांनी दुःख, त्रास, व्यथा हे येत असतातच. त्याची अनेक भौतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, मानवी स्वभावात दडलेली कारणे असतात. या सर्व कारणांचा शोध घेऊन त्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न माणूस करत आला आहे, करत राहील.

माणसाचे आयुष्य कमीत कमी दुःखाचे, त्रासाचे होणे हाच त्यामागील हेतू आहे. ती एक व्यापक प्रक्रिया आहे, पण व्यक्तिगत पातळीवर दुःखासमोर हतबल होऊन गलितगात्र होऊ नये यासाठी मानसिक क्लृप्ती शोधायला या पुस्तकातून नक्कीच मदत मिळेल. अस्थिरता, बेभरवशीपणा हे व्यवच्छेदक लक्षण असणाऱ्या या काळात हे पुस्तक छोट्याशा पणतीसारखे आहे, असे नक्कीच म्हणता येईल.

kaustubh.patait@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com