पुनर्शोधाची गोष्ट

देशात खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण येऊन तीन दशकं उलटून गेली आहेत. त्याची फळं चाखलेल्या आणि परिणाम भोगावा लागलेल्या अशा दोन्ही पिढ्या सध्या अस्तित्वात आहेत.
Book Dastavej
Book Dastavejsakal
Summary

देशात खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण येऊन तीन दशकं उलटून गेली आहेत. त्याची फळं चाखलेल्या आणि परिणाम भोगावा लागलेल्या अशा दोन्ही पिढ्या सध्या अस्तित्वात आहेत.

- कौस्तुभ पटाईत, kaustubh.patait@esakal.com

देशात खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण येऊन तीन दशकं उलटून गेली आहेत. त्याची फळं चाखलेल्या आणि परिणाम भोगावा लागलेल्या अशा दोन्ही पिढ्या सध्या अस्तित्वात आहेत. आज धर्माधारित राष्ट्रवादाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्याला असलेला विरोध मोडून काढला जात आहे. माणसं समूहापासून तुटून अधिक एकेकटी झाली आहेत. तंत्रज्ञानाने प्रचंड विकास केला आहे. या सगळ्या गोष्टींना जिथून सुरुवात झाली त्याची गोष्ट म्हणजे आनंद विंगकर लिखित ‘दस्तावेज’ ही कादंबरी.

कवी व लेखक आनंद विंगकरांची ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही ग्रामीण भागाचं आणि विशेषतः शेतकरी जीवनाचं चित्रण करणारी कादंबरी काही वर्षांपूर्वी आली होती. आता जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या सावटाखाली ग्रामीण व नागरी समाजात घडणाऱ्या बदलांची, प्रक्रियेची, प्रतिक्रियेची आणि प्रतिकाराची नोंद विंगकरांनी ‘दस्तावेज’मधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. १९८० ते १९९४ असा १२-१४ वर्षांतील घडामोडींचा राजकीय व सामाजिक पट ते वाचकांसमोर ठेवतात.

अशोक कांबळे हा मध्यमवर्गीय दलित तरुण या कादंबरीतील मुख्य पात्र आहे. नैसर्गिकपणे त्याच्यावर आंबेडकरांचा प्रभाव आहेच; पण डाव्या विचारांवर त्याची डोळस निष्ठा आहे. राजकीय विचारांची स्पष्टता असल्याने समाजातील विषमतेची आणि येऊ घातलेल्या जागतिकीकरणामुळे त्यात आणखीनच भर पडणार आहे, याची त्याला जाणीव आहे. कुठलाही विचारी माणूस असतो तसा तोही अस्वस्थ आहे. आजूबाजूला घडणाऱ्या प्रतिकूल बदलांना प्रतिक्रिया देण्यासाठी त्याचा राजकीयदृष्ट्या जागृत मेंदू त्याला उद्युक्त करतो. आणि तो त्याच्या भागातील सर्व जातींच्या, धर्माच्या लोकांना परिवर्तनाच्या चळवळीसाठी एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. अशी याची थोडक्यात गोष्ट आहे.

ही कादंबरी स्पष्ट राजकीय भूमिका घेते. समाजातील परस्पर संबंधांचा, समस्यांचा अर्थ लावते. भविष्याविषयी अंदाज वर्तवते. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पर्याय समोर ठेवते. श्रमिक आणि वंचित समूहाचं जीवन आणि त्यांचं राजकारण मांडणं हा या कादंबरीचा मुख्य हेतू आहे.

बंदरावर तैनात असणारा गार्ड दूर समुद्रात एखादं संकट दिसलं की सावधानतेचा इशारा देतो. अगदी तसंच संकटाची चाहूल लागलेला राजकीय कार्यकर्ता आपल्या समाजाला सावध करणं हे आपलं कर्तव्य समजतो. जागल्याची भूमिका बजावतो. समाजात घडणाऱ्या घडामोडी बघून तो स्वस्थ राहू शकत नाही. अशोक हा अशा कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी आहे.

मुक्त बाजाराचं वारं वाहू लागलं. समृद्धीचं स्वप्न दाखवून राज्यकर्त्यांनी जनतेला खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण या तीन जादुई शब्दांची भेट दिली. हा ‘खाउजा’ धोरणाचा सुरुवातीचा काळ होता. पण, याचे परिणाम काय होतील हे अशोकसारख्या अनेकांना कळत होतं. आपल्या समूहाचं जगणं कठीण होणार आहेच, पण कृषक समाज आणि सर्व श्रमिकांचंच जगणं कष्टप्रद होण्याचा धोका अशोकला समजत होता. आत्मसन्मान आणि भाकरी मिळवण्यासाठी मुंबईसारख्या महानगरात दाखल झालेले दलित रोजच्या जगण्याशी संघर्ष करत होते. शेतीच्या विपन्नतेला सुरुवात झाली होती. म्हणून सर्व लोकांना सोबत घेऊन प्रतिकार करण्याची धडपड अशोक करत राहतो. अर्थात अशोकसारख्या अनेकांनी प्रयत्न करूनही खासगीकरण-उदारीकरण थोपवता आलं नाहीच. ते अटळ होतं. तीन दशकांनंतर त्याचं फळ आपल्यासमोर आहे.

या कादंबरीतील अशोकसह इतर अनेक पात्रांना राजकीय जाणिवा आहेत. ती राजकारणात सहभागी होतात. संघटना बांधतात, मोर्चे काढतात. आपली राजकीय मतं मांडतात. राजकारण हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. यात वेगवेगळ्या जातीधर्माची जिवंत माणसं आहेत. परिस्थिती आणि संस्कारांतून प्राप्त झालेलं त्यांना त्यांचं त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. यात सरंजामशाहीचा भार वाहणारे आप्पा आहेत; तर आधुनिक विचारांशी जवळिक करू बघणारा त्यांचाच पुतण्या सागर आहे. ज्याला करकचून आवळलेल्या परंपरेचं काचणं जाणवत आहे. अशोकच्याच वयाचा पुढारलेल्या विचारांचा भीमराव तात्या आहे. सामाजिक रुढींना न जुमानता आपल्या वर्गमित्रासोबत घरोबा करणारी विधवा इंदू आहे. सुशिक्षित असूनही सोन्याच्या पिंजऱ्यात राहावं तसं आयुष्यभर उंबऱ्याच्या बाहेर पाऊलही न ठेवणारी आप्पांची पत्नी ‘माय’ आहे. धर्माची बंधनं झुगारून एकत्र राहणारं रघु आणि रुक्सत हे जोडपं आहे.

जन्माआधीपासूनच नाकारलेपण वाट्याला आलेला भारत आहे. गौरी, जया, सतीश, मेघना, विकास अशी अनेक वेगवेगळ्या रंगांची माणसं आहेत. ज्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी, स्वभाव, समज परस्परांपासून भिन्न आहे. ही माणसं एकमेकांपासून अनेक बाबतीत भिन्न असली, तरी ती समाज नावाच्या एका सूत्रात बांधलेली आहेत. एकसमान सामाजिक आणि राजकीय व्यवस्था त्यांच्या आयुष्याचे नियमन करत आहे. याच व्यवस्थेचे अनेक जण कधी लाभधारक, तर कधी पीडित आहेत. अनेक जण कायमचे वंचित आहेत. एकमेकांच्या सोबत असूनही ते अनेकदा एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. एकाच विचारांचे असूनही भिन्न दृष्टिकोन बाळगतात. शत्रूभाव बाळगतात, मैत्री करतात. सामाजिक नियमांचे वाहक म्हणून वावरतात, तर कधी नियम तोडून पुढे जातात.

ही कादंबरी गावगाड्यातील विषमता मुलायम शब्दांच्या चादरीखाली झाकण्याचा प्रयत्न करत नाही, तर ही विषमता उघडी करून दाखवते; पण त्यामागे कुठला अभिनिवेश नाही, तिरस्कार नाही. तक्रार करणंही याचा हेतू नाही; तर सामाजिक वास्तवाकडे तटस्थपणे बघणं आणि त्याचं आकलन करून घेणं हा यामागील हेतू दिसतो.

दलित आणि कृषक जाती हे तसे परस्परविरोधी हितसंबंध असणारे दोन समूह आहेत. ते केवळ उपदेशाने एकत्र येणार नाहीत. पण, बदलत्या आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेत या दोन्ही समूहांचं श्रमिक म्हणून होणारं शोषण ही दोघांना एकत्र आणणारी अपरिहार्यता आहे. इथं शोषक हा प्रचंड शक्तिशाली तर आहेच, पण जगद्व्याळ आहे. मार्केट नावाच्या नव्या देवाचा त्याला आशीर्वाद आहे. अशा श्रमिकांची एकजूट त्यांचं माणूस म्हणून असणारं अस्तित्व टिकवण्यासाठीची मुख्य अटच आहे. पण, यासाठी आपसांत वरवरचं ऐक्य करण्याची गरज नाही. सामाजिक न्यायाचा लढा वंचित समूहांना लढावाच लागणार आहे. म्हणजे संघर्ष आणि सहकार्य असा या दोन समूहातील संबंध ही कादंबरी दाखवते. आणि श्रमिक समूहांना तसे आवाहन करते.

सामाजिक संबंधांचं वास्तववादी चित्रण, राजकारण हे या कादंबरीचं वैशिष्ट्य असलं तरी आदर्शवादी वाटावेत, असे काही प्रसंग यात आलेले आहेत. जसे की गावातील जुन्या पिढीचे पुढारी आप्पा यांनी या तरुण पोरांच्या संघटनेच्या व्यासपीठावर येणं, एकप्रकारे त्यांच्या चळवळीचा व्यापक अर्थाने स्वीकार करणं. कारण जातीय समाजातील सरंजामी मूल्यांचा पगडा असणारे आप्पा अशोकच्या नेतृत्वाखालील संघटनेचे मुख्य विरोधक असणं हे जास्त साहजिक वाटलं असतं. तसा प्रयत्न ते सुरुवातीला करतातही. पण, एका दलित तरुणाच्या नेतृत्वाखालील संघटनेला आप्पांनी एकप्रकारे स्वीकारणं यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. यात आप्पा प्रेमळ आहेत, उमदे आहेत हे महत्त्वाचं नाही. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय स्थानाचं रक्षण करण्याला ते महत्त्व देणार हेच जास्त स्वाभाविक आहे. पण, तसं न होता ते या संघटनेला अनेकदा पाठिंबा देतात. असं करून लेखकाने गावात एकही प्रमुख विरोधक ठेवला नाही. सर्वात प्रमुख अप्पाच अनुकूल असल्यामुळे विरोधकाचा प्रश्नच उरत नाही. हे आदर्शवादी वाटतं.

एका प्रसंगात आप्पांच्या ठेवलेल्या बाईपासून झालेला मुलगा - भारत अचानक गावात येतो. मूळात आप्पांपासून जीव वाचवून भारतची आई चोवीस वर्षांपूर्वी गावातून पळून गेलेली आहे. तिनं आपल्या मुलाला जन्म दिला असेल, याची आप्पांना कल्पनाही नाही. आणि असा चोवीस वर्षांचा तरुण भारत आप्पांच्या गावात येतो. आणि आपलाच तोंडवळा घेऊन आलेल्या या मुलाला आप्पा घरी घेऊन येतात. रक्ताच्या नात्याने बाप-लेक असणाऱ्या दोघांची भेट लेखकाने अशी घडवून आणली आहे.

या गोष्टी आदर्शवादी म्हणता येतील. पण, म्हणून त्या कादंबरीला कमीपणा आणतात असं म्हणता येणार नाही. यासाठी हरिश्चंद्र थोरात यांच्या ‘कादंबरीविषयी’ याच पुस्तकातील एका अवतरणातून ही बाब समजून घेता येईल.

थोरात लिहितात, ‘‘प्रस्थापित समाजाने आणि राजकारणाने ‘आदर्श समाज’ प्रत्यक्षात येण्याच्या सर्व शक्यता नष्ट केलेल्या असतात. त्यामुळे दिवास्वप्ने, कल्पना व युटोपिया या क्षेत्रांतील व्यवहारच शिल्लक राहतो. मात्र, युटोपियन वळण घेऊन कादंबरीने निर्माण केलेला ‘आदर्श समाज’ प्रस्थापिताचे प्रभुत्व नाकारण्याच्या प्रवृत्तीमधून निर्माण झालेला असतो. राजकारण जसजसे अधिक सर्वंकष, अधिक सूक्ष्म, अधिक प्रभुत्ववादी होत जाते, तसतसे युटोपियन वळण अधिक महत्त्वाचे ठरण्याची शक्यता असते.’’

असे सांगून हा प्रकार मराठी कादंबरीत फारसा वापरला गेला नाही असे थोरात सांगतात. पण, ‘दस्तावेज’मध्ये तो आदर्शवाद दिसत असेल, तर तो प्रस्थापितांचे प्रभुत्व नाकारण्याच्या प्रवृत्तीमधून आला आहे, असेच म्हणावे लागेल. प्रस्थापित मूल्ये, राजकारण यांना आव्हान देऊन पर्यायी मूल्ये आणि राजकारण शक्य आहे हे ‘दस्तावेज’ सांगते. हे तिचं बलस्थान आहे.

ही समूहाची गोष्ट आहे. दलित असणं ही जशी त्याची सामाजिक ओळख आहे, तशी मध्यमवर्गीय ही ओळख तो स्वीकारू लागला आहे. यासोबतच तो राजकारणाची एक विशिष्ट समज असणारा डाव्या विचारांचा कार्यकर्ता आहे. आपल्या या दोन्ही-तिन्ही ओळखींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत तो परिस्थितीला प्रतिसाद देत आहे. यात त्याची ओढाताण होत आहे. समाजाने दिलेल्या नाकारलेपणातून आलेल्या कटुतेवर विजय मिळवण्याचा तो प्रयत्न करत आहे. दारिद्र्यातून मध्यमवर्गात गेल्यामुळे आयुष्यातील ही स्थिरता त्याला हवीहवीशीही वाटत आहे. दारिद्र्य त्याने अनुभवलेलं आहे.

पुन्हा तीच स्थिती येईल, अशी कोणतीही गोष्ट त्याला करायची नाही. पूर्णवेळ कार्यकर्ता होणं हे त्याचं स्वप्न आहे. पण, हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, हे त्याला कळून चुकलंय. आणि हा निर्णय त्याने स्वतःच घेतलाय. मध्यमवर्गीय बचावात्मक पवित्र्यात तो गेला आहे. सक्रिय चळवळीपासून बाजूला होण्याचे संकेतही तो देतो आहे. आणि याच्या अपराधभावाने तो ग्रस्त आहे. सर्व गोष्टी समजणारा त्याच्यातील कार्यकर्ता या अपराधभावात जास्तच भर टाकत आहे. त्यामुळे आपल्याच लोकांच्या दुःखापासून तो स्वतःला वेगळं काढू शकत नाही. त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देणं त्याला पटत नाही. एकीकडे आपण आपला सुरक्षित कोपरा सोडू शकत नाही, ही जाणीव अधिक घट्ट होत आहे.

पण, आपण यापासून पूर्णतः अलिप्त राहू शकत नाही, हेही त्याला जाणवत आहे. आणि म्हणून तो ‘‘आपल्या सुखवस्तू कोपऱ्यांतून मिळेल तेवढा वेळ काढून बाहेर या’’, असे मध्यममार्गी आवाहन करत आहे. हे आवाहन जसे इतरांना आहे, तसे ते स्वतःलाही आहे. खरंतर तो आणि इतर वेगळे नाहीतच. तो समूहाचा भाग आहे. ही कादंबरी परिवर्तनवादी कार्यकर्त्याची आणि मध्यमवर्गीय विशेषतः दलित मध्यमवर्गीयाच्या पुनर्शोधाची गोष्ट आहे.

कादंबरीतला काळ आणि आजचा काळ यात तीस वर्षांचं अंतर आहे. म्हणजे हा अत्यंत नजीकचा भूतकाळ आहे. आज आपण जगत असलेल्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा पाया ज्या काळात घातला जात होता, त्या काळाचा हा दस्तावेज आहे. आजची स्थिती समजून घेण्यासाठी मागच्या काळात डोकावून बघणं महत्त्वाचं असतं, त्यासाठी दस्तावेज नक्की उपयोगी पडेल.

कादंबरी : दस्तावेज

लेखक : आनंद विंगकर

प्रकाशक : लोकवाङ्‍मय गृह

पृष्ठसंख्या : ५०४

मूल्य : ६५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com