वारसा मंदिरांचा, चक्रधरांचा

रामटेकच्या वैभवशाली इतिहासाची सुरुवात वाकाटक काळापासून झाल्याचं मागील भागात आपण वाचलंच आहे.
Historic Karpurwavi in Ramtek
Historic Karpurwavi in Ramteksakal

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

रामटेकच्या वैभवशाली इतिहासाची सुरुवात वाकाटक काळापासून झाल्याचं मागील भागात आपण वाचलंच आहे. रामटेकपासून जवळच असणारं नगरधन (आधीचे नंदीवर्धन) वाकाटकांच्या राजधानीचं ठिकाण होतं. बाजूलाच असणारं मनसर सुद्धा वाकाटकांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा जपत आहे.

पुढं यादव काळात सुद्धा इथं अनेक धार्मिक वास्तू तयार झाल्या. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांच्या वास्तव्यानं ही भूमी पावन झाली. भोगराम मंदिरात त्यांनी वास्तव्य केलं. शेंदूरवावी व कर्पूरवावी नामक दोन बारवांचा आणि भोगाराम व गुप्तराम मंदिरांचा उल्लेख आपल्याला स्थानपोथीमध्ये वाचायला मिळतो. भोगराम मंदिराचा इतिहास वाकाटक तसेच यादव काळातही आढळतो.

भोगराम मंदिरासमोरच वराह मंदिर आहे. महाराष्ट्रातील सुरुवातीच्या वराह प्रतिमांपैकी एक म्हणून याकडं पाहायला हवं. म्हणजेच वाकाटक काळ ते यादव काळात हा परिसर महत्त्वाचं धार्मिक क्षेत्र म्हणून उदयास येत असल्याचा अंदाज आपण बांधू शकतो.

नागपूरकर भोसले यांनी इथं फार मोठी तटबंदी उभी केली. अनेक दरवाजांची निर्मिती केली. लष्करीदृष्ट्या सुद्धा हा भाग मजबूत व्हावा, हा त्यामागं त्यांचा उद्देश होता. सिंगणापूर दरवाजा आणि भैरव दरवाजाच्या मध्यभागी भोसले यांनी भरपूर दारूगोळा आणि तोफा ठेवल्याची नोंद आपल्याला इतिहासात वाचायला मिळते. गोकुळ दरवाजा आणि परिसरात सेवकवर्गाला राहण्याची व्यवस्था केलेली होती. रामचंद्र मंदिराच्या मागील बाजूस सज्जा असून त्याला रामझरोका म्हणून ओळखले जातं. इथून संपूर्ण टेकडीचं विहंगम दृश्य नजरेस पडतं.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री रामचंद्र मंदिराच्या शिखरावर पितांबर जाळण्यात येतं. रामचंद्र मंदिर हे रामटेकवरील प्रमुख आकर्षण असलेलं मंदिर आहे. यादव काळात निर्माण झालेल्या या मंदिरातील मूर्ती मात्र रघुजी भोसले यांच्या काळात स्थापित करण्यात आल्या.

देवगड स्वारीत मिळालेल्या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रघुजींनी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती जयपूरवरून घडवून घेतल्या. एका रात्री त्यांना स्वप्न पडलं, ज्यामध्ये रामाच्या मूळ प्रतिमांचं स्थान समजलं. रघुजींनी नदीमध्ये शोध घेतला असता त्यांना खरोखरच मूर्ती मिळाली. तीच प्रतिमा त्यांनी रामटेकच्या मंदिरात इ. स. १७५३ मध्ये स्थापन केली.

रामचंद्र मंदिराच्या माध्यमातून मराठ्यांच्या काळातील धार्मिक, सांस्कृतिक खाणाखुणाचा मागोवा आपण सहजपणे घेऊ शकतो. गडावरील बऱ्याच वास्तूंची निर्मिती आणि संवर्धनाचं काम मराठा काळात झालंय. रघुजी भोसले अतिशय पराक्रमी सरदार होते. नागपूरकर भोसल्यांनी दक्षिणेत कर्नाटक, तामीळनाडू तर पूर्वेस ओडिशा, बंगालपर्यंत मराठ्यांच्या सीमांचा विस्तार केला होता. भोसल्यांच्या भीतीनं कोलकात्याच्या बाजूनं इंग्रजांनी मोठा खंदक खोदला होता. आजही तो भाग ‘मराठा डीच’ म्हणून ओळखला जातो.

रामचंद्र मंदिरापासून अवघ्या दहाएक फुटांवर लक्ष्मण मंदिर आहे. गर्भगृहात असलेली मूर्ती यादवकाळातील असून वनवासाच्या वेशातील असल्याचं पाहायला मिळतं. या मंदिराच्या सभागृहात यादव राजा रामचंद्रदेव यांच्या काळातील शिलालेख आहे. या लेखात रामचंद्रदेवाच्या वंशावळीसोबतच परिसरातील काही स्थानांचा उल्लेख आहे.

ज्यामध्ये रामेश्वर, घंटेश्वर, सुधेश्वर, केदारेश, आंजनेय, शंखतीर्थ, अग्नितीर्थ, अंबतीर्थ, वरुणतीर्थ, शुक्लतीर्थ, नृसिंहतीर्थ, कुरुक्षेत्र, लक्ष्मीतीर्थ, हंसतीर्थ, चक्रतीर्थ, धनुतीर्थ, पितृतीर्थ, याजिमेध, कलिपा नदी, सूर नदी, मणिकालकुंड, मोक्षकुंड, रामतीर्थ, सिंदूरवापी, कर्पूरवावी, गजेंद्रवदन, धर्मेश्वर, धूम्राक्ष, मुक्तिश्वर, गोपाल, आदिकोल, दशरथ, कुशलव, महाभैरव, चंद्रमौलि, भोगराम, गुप्तराम, शंखराम या ठिकाणांची स्थलनिश्चिती करण्याचा प्रयत्न वा. वि. मिराशी यांनी त्यांच्या रामटेकवरील पुस्तकात केला आहे.

रामटेक येथे शैव, वैष्णव, सौर, गाणपत्य, शाक्त या संप्रदायाची मंदिरं आढळतात. अगदी त्याचप्रमाणं इथं जैन मंदिरंसुद्धा आहेत. ही मंदिरं गावाच्या पूर्वेस टेकडीच्या पायथ्याशी आहेत. रेल्वे स्टेशनपासून साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर आणि बस स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर पूर्वेस ही मंदिरे आहेत.

शांतिनाथ, पार्श्वनाथ, अजितनाथ, सुपार्श्वनाथ, आदिनाथ, नेमीनाथ, चंद्रप्रभू आदी तीर्थंकरांची मंदिरं या परिसरात आहेत. रामटेक अतिशय सुंदर आहे. इथल्या अंबाला तलावाचा परिसर अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. तेहतीसपेक्षा जास्त स्मृतिमंदिरं आणि वास्तू या तलावाच्या बाजूनं उभारल्या आहेत.

या तलावाच्या बाजूनं दगडी तटाचं बांधकाम रघुजी भोसल्यांनी केलं. रामटेकच्या मुख्य वास्तूपासून हा परिसर काहीसा आडोशाला असला, तरीही हे आवर्जून पाहावं असं ठिकाण आहे. या सर्व वास्तूसोबतच सूर्य मंदिर, धूम्रेश्वर मंदिर, शिव मंदिर, अंबाला दरवाजा याही गोष्टी आवर्जून पाहाव्यात.

(लेखक हे सध्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्व या विषयांवर पीएच.डी करत असून, पुरातत्त्वीय पर्यटनाच्या माध्यमातून मंदिर, शिल्प, लोकसंस्कृती, तसेच प्राचीन मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com