बचपन के दिन भुला न देना

सिनेमातील बऱ्याच गाण्यांच्या चालीमध्ये कधीही एक राग आढळत नाही. वेगवेगळ्या जवळच्या रागांच्या छटा गाण्याच्या चालीमध्ये लपलेल्या असतात.
Didar Movie
Didar Moviesakal

- किरण फाटक, Kiranphatak55@gmail.com

लम्बे हैं जीवन के रस्ते

आओ चले हम गाते हँसते

दूर देस एक महल बनाये

प्यार का जिस में दीप जलाए

दीप जलाकर बुझा ना देना,

बचपन के दिन भुला ना देना।।

हे गाणं ‘दीदार’ (१९५१) या चित्रपटातील असून शकील बदायुनी यांनी ते लिहिलेले आहे तर संगीत दिलंय नौशादअली यांनी. यात अशोक कुमार, दिलीप कुमार, नर्गिस, निम्मी यांनी भूमिका केल्या आहेत. गाणं लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांनी ते गायले आहे.

गाण्याच्या सुरुवातीला माउथ ऑर्गनचा अतिशय सुंदर असा उपयोग केला आहे. आणि सुरुवातीला अत्यंत सूचक पद्धतीने हंसाची जोडी आणि कमळाची जोडी दाखवलेली आहे. हे गाणे, तबस्सुम आणि परीक्षीत साहनी यांच्यावर चित्रित झालेले आहे. तबस्सुम यांना लता मंगेशकर यांचा आवाज तर परीक्षित सहानी यांना शमशाद बेगम चा आवाज दिलेला आहे.लहान मुलांपासून ते मोठ्या नायिकांपर्यंत लता मंगेशकर यांचा आवाज शोभून दिसतो.

'ओ, मां ,ओ, मां तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है"(राजा और रंक) या गाण्यामध्ये सुद्धा एक लहान मुलाने आईला उद्देशून म्हटलेलं गाणं ऐकल्यावर डोळ्यांची कडा ओलावल्याशिवाय रहात नाही. हे गाणे सुद्धा लता मंगेशकर यांनी अत्यंत भावपूर्ण अशा आवाजात गायलेले आहे.

लंबे है जीवन के रस्ते, आओ चलें हम गाते हसते’ ही दीदार (१९५१) चित्रपटातल्या ‘बचपन के दिन भुला न देना’ या गाण्यातील एक ओळ. या गाण्यात विचारांची एक मालिका लिहिलेली आहे. परंतु हे विचार एवढी लहान मुले करू शकतील का ?, हा गाणे ऐकणाऱ्याला प्रश्नच पडतो. परंतु गाणे इतके सुंदर बेतलेले आहे, की हे प्रश्न त्या गाण्याच्या चालीत विरघळून जातात.

सिनेमातील बऱ्याच गाण्यांच्या चालीमध्ये कधीही एक राग आढळत नाही. वेगवेगळ्या जवळच्या रागांच्या छटा गाण्याच्या चालीमध्ये लपलेल्या असतात. प्रस्तुत गाण्यात खमाज, मांड, तिलंग अशा रागांच्या छटा आपणास दिसून येतात. हे सर्व राग उपशास्त्रीय आणि सुगम संगीतासाठी वापरले जावेत असा एक संकेत आहे. या रागांचे स्वभाव हे चंचल असतात.

हे पूर्ण गाणे घोड्यावर बसून गायले असल्याने याला घोड्याच्या टापांचा ठेका दिलेला आहे. गाण्याला एक विशिष्ट गती आहे. गाणे मध्यलयीत बांधलेले आहे. प्रस्तुत गाण्यात घोड्यांच्या टापांवर स्वार झालेले संगीत आपणास ऐकण्यास मिळते.

'बालपणीचा काळ सुखाचा किती मजेचा हा आमचा" असे एका कवितेत म्हटलेले आहे. "बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा" असं सुद्धा मराठीत म्हणतात. बालपण म्हणजे अत्यंत सुखाचा असा काळ असतो. यावेळी आपल्यावर कुठलीही जबाबदारी नसते किंवा जबाबदारी कळतही नसते. आई-वडिलांचे छत्र डोक्यावर असते. ते लहान मुलांचे लाड पुरवत असतात. मन आट्यापाट्या हुतूतू खो-खो अशा खेळांमध्ये रमून गेलेले असते.

शाळेमध्ये अभ्यास करण्याशिवाय डोक्यावर कोणतीही जबाबदारी नसते. चिंचा बोरे आणि नवनवीन पदार्थ चाखण्यात जीभ रमून गेलेली असते. मामा मावशी काका काकू यांचे भरभरून प्रेम मिळत असते. मित्र मैत्रिणींबरोबर खेळता खेळता, अभ्यास करता करता बालपणीची वर्षे कशी सुखात आणि आरामात निघून जातात हे कळत देखील नाही. पण आज परिस्थिती बदलली आहे लहान लहान चिमुकल्यांना प्रेम, वात्सल्य हे मिळेनासे झाले आहे.

कारण आज आई आणि वडील हे दोघेही नोकरीवर सकाळीच निघून जातात. संध्याकाळी उशिरापर्यंत घरी येतात. तोपर्यंत ही लहान लहान मुले आई-वडिलांची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतात. बऱ्याच वेळा या मुलांना पाळणाघरात ठेवलं जातं. पाळणा घरात राहून ही मुलं आजी-आजोबा, आई-वडील, मामा-मामी यांच्या मायेला पारखी होतात. आज-काल आजी आजोबा सुद्धा या चिमुकल्यांच्या नशिबी नसतात. बऱ्याच वेळा आजी आजोबांचं म्हातारपण सहन करणारे घरात कोणीच नसल्यामुळे, आजी आजोबांना वृद्धाश्रमात ठेवलं जात. त्यामुळे मोठमोठ्या घरांमधून दिवसभर कोणीच नसतं. संध्याकाळी हे चिमुकले आपल्या आई-वडिलांना बिलगतात.

परंतु ज्या मुलांना कोणीच नाही, त्यांचे मात्र या जगात हाल होताना दिसतात. ‘बालमजूरी प्रतिबंधक कायदा’ अस्तित्वात येऊन सुद्धा आज समाजामध्ये अनेक ठिकाणी लहान लहान मुले कामे करताना दिसतात. जर आपण देवळाबाहेर भिकाऱ्यांची संख्या बघितली तर त्यात लहान मुले बरीच आढळून येतात. या मुलांना आधार देणारे, त्यांची देखभाल करणारे किंवा त्यांना समजावून घेणारे कोणीच नसते. त्यांच्या आयुष्याची फरपट होत असते. पुढे जाऊन त्यांचे आयुष्य त्यांना एक बोजा वाटू लागते.त्यांचे आयुष्य दिशाहीन होते. काही वेळा ही मुले जर गुन्हेगारी जगातील माणसांच्या हाती सापडली, तर ती माणसे या मुलांना गुन्हेगार बनविण्यास मागेपुढे पाहत नाहीत. चोऱ्यामाऱ्या, दरोडे यातही आज-काल अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून येतो.

बालपणीचे वय हे खेळण्याचे, बागडण्याचे असते. परंतु आज मोकळी मैदाने राहीली नाहीत. बऱ्याचशा शाळांनाही मैदाने उपलब्ध नसतात. अभ्यासाचा ताण इतका वाढला आहे की १२ ते १४ तास अभ्यास करून सुद्धा मुलांना हवी तशी श्रेणी मिळताना दिसत नाही. जर मुलांना हवे तसे गुण मिळाले नाही तर आई वडील संतापतात आणि मुलांचे चेहरे हिरमुसले होतात. हल्ली मुलांना खाजगी क्लासेस मध्ये घालण्याचे प्रमाण खूपच वाढलेले दिसते. मला वाटते की या लहान मुलांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे अत्यंत जरुरीचे आहे. कारण हीच मुलं पुढं देशाचा आधारस्तंभ म्हणून काम करणार आहेत. जर पायाच दुबळा राहिला तर आपला देश कशी बरे प्रगती करेल ? म्हणून लहान मुलांच्या मनावरचे सर्व ताणतणाव दूर करून त्यांना एक चांगले आयुष्य जगण्याची संधी, आपण प्राप्त करून देणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते.

(लेखक संगीत अलंकार असून संगीत क्षेत्रात चार दशकं कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com