मशागतीची 'प्रयोग'शाळा (किरण यज्ञोपवीत, प्रदीप वैद्य)

kiran yadnyopavit, pradip vaidya
kiran yadnyopavit, pradip vaidya

महाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत "मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात "सेतू' तयार करणारी "रंगभान' नावाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान यांनी, एक्‍स्प्रेशन लॅब्ज आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सहकार्यानं घेतलेली ही कार्यशाला जवळजवळ दीड वर्ष चालली. या कार्यशाळेत अनेक नव्या दमाच्या नाट्यलेखकांना दिशा मिळाली, अनेक प्रकारचं मंथन झालं, विचारांचं आदानप्रदान झालं, सर्जनाची बीजं रुजली. नाट्यलेखनाच्या क्षेत्रात नव्हाळीची झुळूक निर्माण करणाऱ्या या कार्यशाळेविषयी...

"काय करता येईल नाट्यक्षेत्रातलं? म्हणजे "दत्तक' घेता येईल असं एखादं चांगलं नाटक आहे का? नाटकातलं असं काही चांगलं दिसत असेल तर सांगा...'' आमचा एक धडपड्या आणि सर्जनशील मित्र सुनील भोंडगे आमच्याशी हे बोलत होता. समोर अश्विनी राणे- त्यांना आम्ही प्रथमच भेटत होतो. त्यांचे दिवंगत पती निखिल राणे यांना नाटकाची फार आवड. त्या क्षेत्रात त्यांना काही करायचं होतं. ही इच्छा त्यापूर्वी केव्हातरी त्यांनी अश्विनी आणि सुनीलला बोलून दाखवली होती. आता त्यांच्या स्मरणार्थ निखिल राणे फाउंडेशन अनेक क्षेत्रात काम करत आहे; पण नाटकाच्या क्षेत्रात नेमकं काय करता येईल, याचा शोध घेण्यासाठी ही मीटिंग! आम्ही दोघं विचार करू लागलो.

अनेक स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम करताना, अनेक शिबिरं घेताना, नव्या दमाच्या लेखकांची सादर झालेली नवी नाटकं पाहाताना, त्यांच्यासोबत गप्पा मारताना मराठी नाट्यक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांबाबतची परिस्थिती आम्हाला खूप जवळून पाहात येत होतीच. या सर्वांत असं जाणवत होतं, की एकीकडे जुन्या, जाणत्या कोणाचं मार्गदर्शन मिळेल याची या नव्या लेखकाला शाश्वती वाटत नाही. कोणाकडे गेल्यास खच्चीकरणच जास्त होईल की काय ही भीती त्याला आहे. विलक्षण भीड असते. जुने, जाणते इतके व्यग्र आहेत, की त्यांच्याकडे वेळ नाही. दुसरीकडे, नवा दिग्दर्शक नाटकाची नवी समीकरणं मांडू पाहत आहे- ज्यातून तो हळूहळू लेखकाला मोडीत काढत जाणार आहे, अशी स्थितीही आम्हाला जाणवत होतीच. या सर्वांतून आमच्या मनात काही उपक्रम आकार घेऊ पाहत होता. सुनील आणि अश्विनीसोबत झालेल्या चर्चेनं आम्हाला ऊर्जा आणि गती दिली. आमच्या पुढल्या भेटीपूर्वी आम्ही या दिशेनं काही ठोस विचार करता येतो का हे पाहत गेलो.

आम्ही पाहत होतो. पुणे-मुंबईमधले ठराविक संच सोडता महाराष्ट्रातला बहुतांश नवा लेखक काय करतो आहे? तर तो विविध स्पर्धांमध्ये आपला शब्द उचलून धरणाऱ्या संचासोबत नाटक करतो. स्पर्धांमधून आपल्या यशाची गृहितकं, गणितं बांधून बक्षिसं मिळवतो. याची सवय झाली, की हा लेखक त्या पलीकडे कशाचाही शोध घेतो का, हा प्रश्नच असतो. "स्पर्धेत अमुक तारखेचा प्रयोग' हा दाब इतका मोठा, की निर्मितीप्रक्रिया खुजी होते. केवळ काहीतरी दणका निर्माण करण्याच्या रेट्यापुढं सर्व काही दुय्यम होत जातं. नाटकाच्या लेखनात चातुर्याचा, कार्य-कौशल्याचा भाग उत्तम; पण भवतालच्या मानवी जीवनाच्या आकलनाचा आविष्कार किती प्रभावीपणे साकारतो हा प्रश्न लटकतच राहातो.

या सर्वांतून नव्या लेखनासाठी आपण काही करायला हवं असं जे वाटत होतं त्याला आकार मिळू लागला. साधारणपणे अशा कार्यशाळांतून काय घडतं, याचा अभ्यासही झाला. भारतभरातल्या अनेक नामवंत लोकांशी चर्चा केली. सल्ले ऐकले. मग काय काय लागेल, काय पाहिजे, या सोबत काय नको याचीही यादी बनली. आम्हाला जाणवणाऱ्या प्रकल्पाला सहा-आठ महिने तरी लागतीलच असं दिसत होतं. आपण "बाहुबली' नाही याची पूर्ण जाणीव होतीच. शिवाय केवळ आर्थिक पाठबळामुळे असा उपक्रम होत नसतो हे आम्ही समजून होतो. आम्ही दोघांनीही अनेक संस्थांच्या गाठी घालत अनेक उपक्रम केले आहेत. अशी माणसं जोडत काम करायला आम्हाला आवडतं; पण या सगळ्यासोबत आमच्या दृष्टीला अधिक सघनता आणि कार्यपद्धतीला एक विशिष्ट प्रणाली असायला हवी तरच हे सर्व करता येईल हे दिसत होतं. त्या दृष्टीनं बांधाबांध सुरू झाली. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे अशोक कुलकर्णी, सतीश आळेकर यांच्याशी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले, प्रमोद काळे यांच्याशी बोलणं झालं. अनेक अनुभवी मंडळींकडून फक्त सर्जनात्मकच नव्हे, तर सावधगिरीच्या सूचनाही येत होत्या. मनातला आराखडा कागदावर उतरू लागला; पण अनेक अनुत्तरीत प्रश्न होतेच.

पुढं काही दिवसांतच हा आराखडा घेऊन सगळे एकत्र बसलो. एक चमकदार नाटक करायला, "दत्तक' घ्यायला जेवढा खर्च येईल, त्यापेक्षा थोडा जास्त खर्चाचा अंदाज कागदांवर होता; पण मग एखादं यशस्वी नाटक करण्यापेक्षा नव्या काळात नाटकासाठी काही मुळात काम होऊ दे असा विचार करत अश्विनी राणे यांनी होकार दिला. यात जोखीम होती आणि ती घ्यायला त्या तयार होत्या. आता सर्वच हालचालींना वेग आला. आतापर्यंत साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान पाठीशी उभं होतं. आता शुभांगी दामले आणि प्रमोद काळे यांनी "रंगभान'च्या प्रक्रियेत सक्रिय सहभागाला सुरवातच केली. त्यामुळे आम्हाला हुरूप आला.

आमच्या एकंदर अभ्यासातून हे ठरलं होतं, की आम्ही लेखनात प्रत्यक्ष सहभाग न घेणारे कायमस्वरूपी मार्गदर्शक असू. आम्ही काय काय करू याची चौकट कठोर नव्हती. काळाप्रमाणं गरज निर्माण झाली, तेव्हा आम्ही त्यात बदल घडवले. मुळात आम्ही संप्रेरकाच्या भूमिकेत राहायचं ठरवलं होतं. प्रयोगशाळेचा भाग आम्हीही होतो; पण आमचं काम होतं प्रक्रियेच्या बाहेर राहून अभिक्रिया जास्त प्रभावी किंवा वेगवान करणं. लेखकांची एकंदर परिस्थिती, त्यांच्या मनात उठणारे प्रश्न, नाटक म्हणून ते प्रश्न मांडताना उभे राहणारे नवे प्रश्न, नाटक या सामूहिक कलेबाबतचं भान, भवतालाचं आणि मानवी मूल्यांचं भान, या सर्जनाच्या अभिक्रिया लेखकांच्या मनात सतत खदखदत राखणं हे आमचं प्राथमिक काम होतं. रेखा इनामदार, आशुतोष पोतदार आणि सागर देशमुख यांच्या समितीनं निवडलेले लेखक प्रयोगशाळेच्या पहिल्या दिवशी समोर दिसले म्हणून आता यातून अमुक इतक्‍या संहिता मिळवू असं कोणतंही संख्यात्मक उद्दिष्ट घेतलं नाही ते अगदी शेवटपर्यंत. सहा-आठ महिने प्रकल्प चालेल असं आधी वाटलं होतं. काळानुरूप लेखकांच्या त्या त्या वेळच्या हाकेला ओ देत हा कालावधी दीड वर्षाचा झाला.

गेल्या दीड वर्षात नव्या लेखकांना एक हक्काची जागा मिळाली. या जागेत ते मुक्तपणे येत होते, थोरांचं ऐकत होते, त्यांना-आम्हाला काही सांगत होते. करून पाहत होते, फसत होते. एकमेकांशी संवाद साधत होते. चिडत होते. रूसत होते, परत एकत्र येत होते. एकमेकांना आधार देत होते. फसगत होताना, प्रयोग फसताना इतरांकडे पाहून नवी ऊर्जा कमावत होते. हे सर्वजण आपापलं "म्हणणं' आपल्याच मनाच्या टेस्ट-ट्युबमध्ये घेऊन त्यावर सतत काही ना काही संस्करणाचे प्रयोग करत राहिले. आम्ही त्यांच्या प्रक्रियांमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसलो, तरीही आम्ही भावनिक गटांगळ्या खात होतोच. त्यांच्या चमकदार कल्पना ऐकून अनेकदा शिवशिवायला व्हायचं; पण आम्ही संयम पाळत होतो. हे सर्व करताना त्यांच्याकडून अनेकदा काही शिकलो आहोत. आमच्या दोघांच्याही मनाची माती आणखी सर्वसमावेशक होत गेली.
या प्रक्रियेत अनेक मान्यवर आले. त्यांच्याशी "रंगभान'विषयी बोलताना, त्यांची सत्रं सुरू असताना किंवा "रंगभान'कर त्यांच्या सत्रांनंतर आमच्याशी गप्पा मारत असताना या प्रक्रियेच्या नव्या नव्या मीती आम्हाला जाणवत गेल्या आणि त्या जाणवलेल्या गोष्टींची नोंद घेत प्रक्रियेत आवश्‍यक ते फेरफार आम्ही वेळोवेळी करत गेलो.
अमोल पालेकर, सदानंद मेनन, सदानंद मोरे, सतीश आळेकर यांच्यासह झालेल्या सुरवातीच्या संवादमालेनंतर सुरू झाली ती मशागत सत्रं. नावाप्रमाणं लेखकांच्या मनांची मशागत करणारी सत्रं. यासाठी फक्त नाटकच नव्हे, तर इतरही कला शाखा आणि विधांमध्ये मोठं काम करणारी पंचवीस एक तज्ज्ञ माणसं आली आणि या आलेल्या सर्व थोर जाणत्यांनी जे काही दिलं तो स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. यातून लेखकांना आपलं काही म्हणणं आहे हे जाणवणं, त्याचा नाट्यबीजापर्यंत विकसनाचा प्रवास होणं या सत्रांमुळे सुकर होणं अपेक्षित होतं. ते तसं झालंही. प्रचंड ऊर्जा सुरवातीला जाणवत होती. वीस-पंचवीस विलक्षण नाट्यबीजं समोर उभी ठाकली. मग बीजांतून संहिता साकारत जाण्याचा प्रवास सुरु झाला. काही फुलली, काही तितकी विकास पावली नाहीत. काहींनी अनपेक्षित भरारी घेतली. हा सर्व अनुभव विलक्षण होता. हे रंगभान आता एका टप्प्यावर येऊन थांबतं आहे.

जगण्याची आधुनिक रीत, नवीन तंत्रज्ञान, अफाट माहिती, खरं-खोटं यांचं बेमालूम मिश्रण, व्यामिश्रतेचा कळस गाठत जाणाऱ्या भविष्यात आपल्याला आलेलं भानच आपल्या लिखाणाला हात देईल, असा विश्वास या सर्व प्रक्रियेत बळावला आहे हे मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com