असामान्य प्रजातींची गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kishor Rithe writes about wildlife story of unusual species animal forest

निसर्गात ‘सामान्यपणे’ आढळणारे अनेक वन्यजीव हळूहळू दिसेनासे झाले. ‘असामान्य’ होऊन दुर्मिळ झाले आहेत.

असामान्य प्रजातींची गोष्ट

- किशोर रिठे

निसर्गात ‘सामान्यपणे’ आढळणारे अनेक वन्यजीव हळूहळू दिसेनासे झाले. ‘असामान्य’ होऊन दुर्मिळ झाले आहेत. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक प्रजाती कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात असे अनेक वन्यजीव या स्थितीला जाऊन पोहोचले आहेत. या धोक्याचे गांभीर्य ओळखून आता खडबडून जागे होण्याची गरज आहे.

बुक बंदर म्हणजेच इंग्रजीत स्लेंडर लॉरिस किंवा लाजवंती बंदर! मूलतः भारत आणि श्रीलंकेतील पर्जन्यहारी तसेच शुष्क पानगळीच्या जंगलात आढळणारे आणि पुरातन वृक्षांच्या ढोलीत राहणारे हे गोंडस माकड. ते रात्रींचर असल्याने व वृक्षांच्या पर्णसांभाराच्या वरून हळुवार चालणारे असल्याने फारसे आपल्याला परिचित नसते; परंतु महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जंगलांमध्ये याची नोंद झाली आहे.

अर्थात त्याला हव्या असणाऱ्या प्राचीन वृक्षांचीही आता जंगलात वानवा असते. वन खात्याच्या आणि वन विकास मंडळाच्या महसुली कटाईमुळे आता असे प्राचीन वृक्ष अभावानेच पाहायला मिळतात. त्यामुळे बुकबंदर आता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही एवढ्यात कुणी पाहिल्याची नोंद नाही. त्याला वाचविण्यासाठी वन विभागाने एखादा विशेष प्रकल्प घेतल्याशिवाय तो महाराष्ट्रातील जंगलांमध्ये पुन्हा दिसेल असे वाटत नाही.

शशकर्ण म्हणजेच कॅराकल हा तसाच एक अनोखा वन्यप्राणी! कॅराकल मुख्यत्वे आफ्रिका, मध्य आशिया पाकिस्तान आणि भारताच्या मध्य व पश्चिमेकडील राजस्थान व गुजरातसारख्या राज्यांमध्ये आढळणारा मार्जार कुळातील प्राणी; पण तो महाराष्ट्राच्या उत्तरेकडील मेळघाटसारख्या जंगलात आढळून यायचा. सशासारख्या टोकदार कानांमुळे त्याला शशकर्ण हे नाव मिळाले असावे. कमी उंचीवर उडणाऱ्या पक्ष्यांना लक्ष करून उडी मारत आपले भक्ष्य बनविण्याचे याचे कसब वाखाणण्याजोगे असते. मागील एक दशकात एक-दोन नोंदी सोडल्या, तर त्याचे महाराष्ट्रातील अस्तित्व संपल्यात जमा आहे.

खवल्या मांजर हा खवल्यांची ढाल पांघरून घेतलेला सस्तन प्राणी! वारुळे फोडून मुंग्या व उधळीवर जगणारा हा सुंदर प्राणी आज त्याच्या शरीरावरील खवल्यांमुळेच धोक्यात आला आहे. त्याच्या शरीरावरील खवले मिळविण्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अवैध बाजारात त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जंगलांमध्ये आणि अगदी ग्रामीण भागातही तो आजही सहज आढळून येतो; परंतु त्याची ज्या प्रमाणात शिकार होत असल्याचे दिसून आले आहे त्यावरून तो लवकरच ‘असामान्य’ प्राण्यांच्या यादीत स्थान मिळवेल, असे दिसते.

चांदी अस्वल म्हणजेच रेटेल किंवा हनी बॅजेर! निसर्गाने निर्माण केलेला एक सुंदर जीव. आफ्रिकेत सर्वत्र आढळणाऱ्या या प्राण्याने आशिया खंडातील विविध प्रदेशातील अधिवासांप्रमाणे स्वतच्या खाद्याच्या सवयी बादलविल्या आहे. चांदी अस्वल महाराष्ट्रातील गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जंगलांमध्ये आजही पाहायला मिळते; परंतु यांची अत्यल्प संख्या लक्षात घेता या प्राण्याच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांमध्ये फार पूर्वी समृद्ध अशी गवती माळराने अस्तित्वात होती. या माळरानांवर तनमोर व माळढोकासारखे पक्षी आढळायचे. तनमोर पक्षी आता फक्त अकोला जिल्ह्यातील माळरानामध्ये दिसून येतो, तर माळढोक पक्षी सोलापूर व चंद्रपूर जिल्ह्यात अभावानेच दिसून येतो. संपूर्ण देशात केवळ १३५ च्या आसपास माळढोक शिल्लक राहिले आहेत. यावरून ते किती दुर्मिळ आहेत, हे लक्षात येईल. यापैकी कर्नाटक राज्यात फक्त पाच, महाराष्ट्रात दोन; तर गुजरातमध्ये २५च्या आसपास माळढोक पक्षी शिल्लक आहेत. उर्वरित शंभर माळढोक राजस्थानातील थारचे वाळवंट आणि पोखरण येथे पाहायला मिळतात. गुजरात आणि राजस्थानात तरी ते टिकावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही आदेश दिलेले आहेत; तरीही परिस्थितीत विशेष बदल दिसून येत नाही.

यासोबतच गिधाड पक्षी तसेच सारस क्रौंच हे पक्षीही नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचले आहेत. गिधाड पक्ष्यांचे कृत्रिम संवर्धन करण्याचे प्रयत्न बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारे गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे. त्यासाठी आसाममधील राणी, पश्चिम बंगालमधील भातखावा, मध्य प्रदेशातील भोपाळ व हरियानातील पिंजोर येथे विशेष प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रयत्नांना हरियानातील पिंजोरमध्ये चांगले यश मिळाले असून सुमारे ८०० गिधाडे आता मुक्त संचार करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना मुक्त केल्यावर ते निसर्गात कसे रुळतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे.

विदर्भात सारस पक्षी वाचावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच आदेश दिले आहेत. त्याद्वारे काहीतरी ठोस पावले उचलली जाऊन सारस पक्षी पुढच्या पिढीला पाहायला मिळतील, अशी अपेक्षा करूया. असेच प्रयत्न चंबल नदीपात्रात काळ्या छातीच्या नदी सुरय पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सुरू आहेत.

महाराष्ट्रात रानम्हशी संपल्या असे बोलले जायचे; परंतु २०१२ मध्ये राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात रानम्हशींच्या संवर्धनासाठी कोलमारका संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले. येथे ग्रामस्थांच्या सहभागाने जल संधारणाची कामे हाती घेण्यात आली. आज त्याची संख्या चांगली वाढली आहे. यातील काही रानम्हशी नजीकच्या इंद्रावती नदीत खेळताना अलीकडेच दिसून आल्या. प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यात यश येते, हे सांगणारा हा प्रयोग आहे.

हिरवी मनोली म्हणजेच ग्रीन आव्हडावेट किंवा ग्रीन मुनिया हा चिमणीपेक्षा लहान पक्षी पूर्वी महाराष्ट्रातील मेळघाटसह अनेक जंगलांमध्ये आढळून यायचा. त्याच्याच जातीतील लाल मनोली (मुनिया), ठिपकेदार मनोली व पांढऱ्या मानेच्या मुनिया आजही महाराष्ट्रात दिसून येतात; पण आकर्षक हिरवा रंग ल्यालेल्या हिरव्या मुनिया आता मात्र महाराष्ट्रातील जंगलांमध्ये दिसत नाहीत. नुकतेच त्यांचे कृत्रिम प्रजनन करण्याचा एक प्रकल्प राजस्थान वनविभागाने हाती घेतला. त्यात त्यांना यशही मिळाले. राजस्थानातील माऊंट आबू येथील अभयारण्यातून उदयपूर येथील गुलाब बाग येथे आणण्यात आलेल्या मनोलीच्या एका जोडीने अंडी उबवून चार पिलांना जन्म दिला. त्यामुळे हिरव्या मुनियांची संख्या आता कृत्रिमरीत्या वाढवू शकतो, हे सिद्ध झाले आहे.

असामान्य बनू पाहणाऱ्या भारतातील पक्षी व वन्यप्राणी प्रजातींची ही यादी खूप लांब आहे. वरील सर्वच प्रजाती अखेरच्या घटका मोजत आहेत; परंतु त्यांच्या संवर्धनासाठी अद्याप विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. या प्रजाती अद्यापही महाराष्ट्रातील जंगलांमध्ये दिसून येतात, ही जमेची बाब आहे.