जीवाचे माळरान!

भारतातील गवताळ प्रदेश झपाट्याने नाहीसे होत आहेत. त्याचा फटका गवती माळरान हेच घर असणाऱ्या चित्ते, काळवीट, माळढोक, तनमोर यांसारख्या प्रजातींना बसला.
Dr. Sujit Narawade
Dr. Sujit Narawadesakal
Summary

भारतातील गवताळ प्रदेश झपाट्याने नाहीसे होत आहेत. त्याचा फटका गवती माळरान हेच घर असणाऱ्या चित्ते, काळवीट, माळढोक, तनमोर यांसारख्या प्रजातींना बसला.

- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com

भारतातील गवताळ प्रदेश झपाट्याने नाहीसे होत आहेत. त्याचा फटका गवती माळरान हेच घर असणाऱ्या चित्ते, काळवीट, माळढोक, तनमोर यांसारख्या प्रजातींना बसला; पण अशा संकटकाळात या प्रजातींना जपण्यासाठी, त्यांचे घर वाचविण्यासाठी डॉ. सुजित नरवडे नावाच्या तरुणाने आपल्या ‘जीवाचे माळरान’ केले, त्याची ही गोष्ट...

माळढोक हा तब्बल साडेतीन फूट उंचीचा शहामृगासारखा धिप्पाड पक्षी. भारतीय गवताळ प्रदेशांमध्ये मोठ्या दिमाखात वावरणारा हा राजबिंडा! महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात नान्नज माळढोक अभयारण्य आहे. येथे पूर्वी हमखास माळढोक पक्षी दिसायचा. मानेवरील गळ्यासमोरची पांढरी शुभ्र पिशवी फुगवून मादीकडे बघत प्रणयाराधना करताना त्याने केलेला नाच पाहायला दूरदुरून पक्षिमित्र सोलापूर जिल्ह्यात यायचे; पण आता येथे त्यांची संख्या अगदी एक किंवा दोन एवढी उरली आहे.

त्यामुळे आता येथे कुणीही फिरकत नाही. या ठिकाणची अवस्था ‘विठ्ठलाविना पंढरपूर’ अशी झाली आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली ८,४९६ चौ.कि.चे माळरान अधिवास असणारे अभयारण्य लचके तोडत-तोडत फक्त ३५० चौ.कि.मी. करून ठेवले. त्यामुळे या माळरानावर दर वर्षी हमखास अंडी घालणारा व आपल्या हंबरड्याने संपूर्ण माळरान दणाणून टाकणारा माळढोक आता येथून जवळपास नाहीसा होऊ पाहत आहे.

पण माळढोकाची ही अपयश गाथा येथे संपत नाही. या कथेतील आशेचा किरण याच जिल्ह्यातून दिसू लागला आहे.

लहानपणी नानजच्या गवती माळरानावर बागडलेला आणि या पक्ष्याचे निरीक्षण केलेला सुजित नरवडे नावाचा एक तरुण बॉम्बे नॅचरल हिष्ट्री सोसायटीच्या संपर्कात आला. त्याने येथे नोकरी पत्करली. याच ‘माळरान पक्षी’ या विषयावर त्याने डॉक्टरेट केले आणि आज अजित त्याने या पक्ष्याला वाचविण्यासाठी आपल्या जीवाचे माळरान केले. अशा या गवती माळरानवेड्या सुजितची माळढोक, तनमोर, काळवीटसारखे गवती माळरानांवर जगणारे प्राणी आणि पक्षी वाचविण्यासाठीची धडपड थक्क करणारी आहे.

सुजितने दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूरच्या बी. एफ. दमाणी विद्या मंदिर येथे पूर्ण केले. पुढे अकरावी ते बीएस्सी सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात करून थेट कोल्हापूर गाठले. तेथे शिवाजी विद्यापीठामधून २००३ मध्ये प्राणीशास्त्र विषयात पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करून बी.एन.एच.एस. या प्रख्यात संस्थेमध्ये २००४ मध्ये त्याने नोकरी पत्करली. आता त्याने बी.एन.एच.एस.च्या माध्यमातून त्याच्या आवडीच्या गवती माळरानावरील प्रजाती या विषयावर काम सुरू केले. २०१० ते २०१६ या सहा वर्षांमध्ये त्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील गवती माळराने पिंजून काढली.

यावरच त्याने महाराष्ट्र व दख्खन प्रदेशातील पक्ष्यांची स्थिती, विचरण, अधिवास, वापर आणि संवर्धन या विषयावर बी.एन.एच.एस. व मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागांतर्गत संयुक्त विद्यमाने पीएच.डी. मिळविली. पण फक्त पीएच.डी. पदवी मिळविणे हा त्याचा उद्देश नव्हताच. त्याचे ध्येय यापेक्षा खूप मोठे होते. त्याने संपूर्ण देशातील गवती माळराने वाचविण्याचा ध्यास घेतला होता.

मग तो थेट बंगाल तनमोर (फ्लोरिकान) या गवती माळरान पक्ष्याच्या संवर्धन प्रकल्पावर काम करण्यासाठी बर्डलाइफ इंटरनॅशनल या ख्यातनाम संस्थेच्या सहकार्याने उत्तर प्रदेशमध्ये गेला. तिथे खूप भटकंती केली. हा खडतर प्रवास त्याला शेवटी राजस्थानात घेऊन गेला. तेथे जैसलमेर जिल्ह्यात बी.एन.एच.एस.ने त्याला माळढोक पक्ष्याच्या संवर्धनाची मोठी जबाबदारी दिली. सुजित राजस्थानमध्ये पोहोचला. तेव्हा तिथे विदारक परिस्थिती होती.

महाराष्ट्रात माळढोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्यास राजस्थानमध्ये ‘गोडावन’; तर गुजरातमध्ये ‘घोराड’ म्हणून ओळखले जाते. लोकवस्तीमुळे देशातील अनेक माळराने शेतीखाली आली. काही माळरान जमिनी विकास प्रकल्पांना दिल्या गेल्या; परंतु वाळवंटी प्रदेश असल्याने राजस्थानमध्ये मात्र माळरान जमिनी वाचल्या.

त्यात काही जमिनीवरील खुरटी, गवती वनांना देवराई (ओरण) म्हणून पारंपरिक पद्धतीने राखले गेले. हे सर्व माळरान पक्ष्यांच्या पथ्यावर पडले. त्यामुळे देशातील सर्वच राज्यांमधून माळरान पक्षी नामशेष होताना राजस्थानातील थारसारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र माळरानावरील पक्षी प्रजातींना चांगला आश्रय मिळाला. म्हणूनच माळढोक, गिधाड, क्रौंच आणि अनेक शिकारी पक्ष्यांसाठी राजस्थानातील हे थारचे वाळवंट अखेरचा आश्रयस्थान ठरले आहे.

राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात देगराई माता ओरण आहे. देवाचे जंगल असल्याने या गवती माळरानाबद्दल स्थानिक लोकांमध्ये प्रचंड श्रद्धा व आत्मियता आहे. सुजितने येथे बी.एन.एच.एस.चे संशोधन केंद्र उभे केले. त्याने स्थानिकांचा विश्वास संपादन केला. राजस्थानच्या वनाधिकाऱ्यांशी त्याने चांगले संबंध प्रस्थापित केले. त्याच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस काम करणारा चमू त्याने येथे उभा केला आणि एकाएकी राजस्थानमध्ये सौरऊर्जा प्रकल्पांचे पीक आले. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी या वाळवंटात वीज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी घेणे सुरू केले. या सर्व जमिनी सोलार प्लेटने व्यापून गेल्या. एवढेच नाही, तर या जमिनींवर मोठमोठे विद्युत मनोरे उभारले गेले.

त्यावर वीज वाहून नेणाऱ्या जाड तारा (केबल्स) बसविण्यात आल्या. नेमक्या याच तारांच्या उंचीवरून उडणाऱ्या माळढोकासाठी त्या जीवघेण्या ठरल्या आहेत. माळढोक पक्ष्याची समोरची दृष्टी कमजोर असते. त्यामुळे या वीज वाहिन्यांना ते धडकतात आणि त्यात त्यांचा धडकेने (वीजप्रवाहाने नाही) मृत्यू होतो.

भारतीय वन्यजीव संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार दर वर्षी साधारणतः १८ पक्ष्यांचा या वीजवाहिन्यांना धडकून मृत्यू होतो. मग सुजितने अशा जागा हेरून घेतल्या त्यावर नेमक्या कोणत्या व कोठे उपाययोजना करायच्या याचा अभ्यास केला. अशात राजस्थानातील ‘देगराई माता ओरण’मध्ये १७ ऑक्टोबर २०२२ मध्ये एका माळढोकाचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी सुजितला ही वाईट बातमी दिली. त्या वेळी तो त्याच्या सोलापूर येथील घरी कुटुंबाला भेटण्यासाठी निघाला होता; पण त्याने आपला भेटीचा दौरा रद्द केला.

कुटुंबाच्या भेटीतील आनंदापेक्षा सुजितला माळढोकाच्या मृत्यूचे दुःख जास्त महत्त्वाचे वाटले. अगदी काल-परवापर्यंत सुजितने दिवसभर या माळरानावर दोन माळढोक पक्षी स्वच्छंदी बागडत असताना पाहिले होते आणि काल सकाळी त्यातील एकाचे शव विद्युत वाहिनीखाली दिसून आले. यावरून या विद्युत वाहिनीच्या न दिसणाऱ्या तारांना धडकून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. त्यातही ती पूर्ण वाढ झालेली मादी होती. त्याने क्षणात ही बातमी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला कळविली. सोसायटीच्या ‘माळढोक संवर्धन प्रकल्पा’साठी हा खूप मोठा धक्का होता. याच ‘ओरण’मध्ये यापूर्वी १६ सप्टेंबर २०२० मध्ये आणखी एका पूर्ण वाढ झालेल्या मादी माळढोकाचा असाच विद्युत वाहिनीला धडकून मृत्यू झाला होता.

यानंतर सुजितने एक सखोल अभ्यास अहवाल तयार केला होता. या माळरानावर मागील काही वर्षांमध्ये उभे राहिलेले वीजवाहिन्यांचे भव्य मनोरे आणि त्यावरून जाणाऱ्या वीजतारा या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण बनले आहे, हे आता येथील स्थानिक नागरिकांनाही माहीत झाले आहे. सुजितने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीअंतर्गत केलेल्या अभ्यासानुसार सप्टेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या साधारणता एका वर्षात येथे इजिप्शिअन गिधाड, टोनी गरुड, सिनेरस गिधाड आणि दमॉइजल क्रौच अशा धोकाग्रस्त प्रजातींच्या तब्बल ४९ पक्ष्यांचा वीजवाहिन्यांना धडकून किंवा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे, हे लक्षात आले. यामध्ये धडक लागून मृत्यू होण्याचे प्रमाण ८१ टक्के, तर विजेचा शॉक लागून मृत्यू होण्याचे प्रमाण १९ टक्के आहे.

ढिम्म, उदासीन लोकप्रतिनिधी आणि असंवेदनशील उद्योजक यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रश्नसुद्धा देशाच्या सर्वोच्च न्यायालयात गेला. एप्रिल २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान व गुजरात राज्यातील माळढोक क्षेत्रातील सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे निर्देश दिलेत. यावर भारत सरकारने या निर्णयामुळे भारतातील वीजनिर्मिती प्रकल्पास खीळ बसण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी एप्रिल महिन्यात या उपाययोजनांच्या शक्यतेवर अभ्यास करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली. या समितीपुढे वीजवाहिन्यांना पक्ष्यांचे उड्डाण वळविणारे यंत्र म्हणजेच ‘बर्ड डायव्हर्टर’ बसवावे, असा अनोखा पर्याय सौर कंपन्यांच्या एजंटाकडून सुचविण्यात आला आहे.

यात अद्याप ठोस काही होताना दिसत नाही. हा प्रश्न सुटण्यासाठी कुठलीही कालमर्यादा निश्चित केली नसल्याने मोजक्याच संख्येत उरलेल्या माळढोकांचे मरणसत्र सुरूच आहे. या सर्व लढ्यामध्ये सुजितचा अभ्यास, संशोधन महत्त्वाचे ठरते आहे.

दुसरीकडे नष्टप्राय झालेल्या माळढोक पक्ष्याला वाचविण्यासाठी भारत सरकारने २०१९ मध्ये बंदिस्त प्रजनन प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत जैसलमेर जिल्ह्यातील डेझर्ट राष्ट्रीय उद्यान व पोखरण येथील माळरानावरील घरट्यातून माळढोकाची सुमारे ३१ अंडी काढून कृत्रिमरीत्या उबविण्यात आली. यासाठी साम व रामदेवरा येथे विशेष प्रजनन केंद्र उभारण्यात आली आहेत.

त्यातून सुमारे २६ माळढोक पक्षी तयार झाले आहेत. असे असले, तरी अखेर बंदिस्त वाढविण्यात आलेल्या या माळढोक पक्ष्यांना अखेर निसर्गात मुक्त करावेच लागेल आणि त्यांना पुन्हा या वीज वाहिन्यांचा सामना करावाच लागेल. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पांच्या वीज वाहिन्यांचे आकाशातील जाळे कधी निघणार, यावरच आता भारतातील माळढोकांचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.

एकीकडे मादीचे दर वर्षी केवळ एकच अंडे देणे आणि त्यातही तिच्या घरट्यांना असणारे अनेक धोके, यामुळे माळढोकाची संख्यावाढ वेगाने होणे तसे कठीणच असते. भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने संसदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात सध्या फक्त दीडशेच्या आसपास माळढोक पक्षी शिल्लक राहिले आहेत.

त्यातील १२८ केवळ राजस्थानमध्ये, १० च्या आसपास गुजरात (देवभूमी द्वारका आणि कच्छ जिल्हा) मध्ये आणि इतर १० महाराष्ट्र (सोलापूर, अहमदनगर आणि चंद्रपूर), आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आढळून येतात. नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचल्याने या राज्यांसाठी तसेच भारत सरकारसाठी आता एक-एक माळढोक वाचविणे आवश्यक झाले आहे.

एकीकडे देशातील चित्ते नामशेष झाल्याने परदेशातून आफ्रिकन चित्ते आणण्यासाठी खुद्द पंतप्रधान पुढे आले आहेत. त्यामुळे आता गवती माळराने वाचविण्यासाठी सरकारकडून चांगले सहकार्य मिळेल, अशी डॉ. सुजित आशा बाळगून आहे. महाराष्ट्राच्या या ध्येयवेड्या सुजितच्या कार्याला सलाम!

(लेखक गेल्या तीन दशकांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहे. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com