कोळीवाड्यात काही परंपरा कायम...

मुंबईत इंग्रजपूर्व काळात दोनशे कोळीवाडे होते आणि आता ही संख्या जेमतेम ३०-४० पर्यंत आली आहे.
Koliwada Narali Pournima
Koliwada Narali Pournimasakal
Summary

मुंबईत इंग्रजपूर्व काळात दोनशे कोळीवाडे होते आणि आता ही संख्या जेमतेम ३०-४० पर्यंत आली आहे.

एकेकाळी छत्रपती शिवरायांच्या आरमारात स्थान असलेला कोळीराजा आज आपल्याच घरात उपरा झाला आहे. वाढत्या जलप्रदूषणामुळे समुद्रातील मासळी कमी झाली. किनाऱ्यावर परंपरागत मासेमारी करावी तर बेबंद बांधकामांमुळे नद्या-खाड्यांचा श्वासच कोंडला आहे. उत्पन्नाचे साधन बुडाले, गरिबीमुळे शिक्षण नाही, त्यामुळे चांगल्या नोकऱ्या नाहीत, आरक्षणाचे फार फायदे मिळत नाहीत, सरकार दखल घेत नाही, मतपेढी नसल्याने राजकीय वर्चस्व नाही... एकीकडे मुंबईत २०११ पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत दर्जा मिळाला; पण शेकडो वर्षं असलेल्या कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचं घोंगडं भिजत पडलं आहे. तरी हा दर्याचा राजा हरलेला नाही, आपल्या हिमतीवर मुलांना शिक्षण देत उद्याचा दिवस चांगला असेल, या ठाम आशेवर तो आहे.

मुंबईत इंग्रजपूर्व काळात दोनशे कोळीवाडे होते आणि आता ही संख्या जेमतेम ३०-४० पर्यंत आली आहे. माझगाव डॉकचा विस्तार होताना माझगाव कोळीवाडा गेला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या स्थानकाच्या विस्तारात मांडवी कोळीवाडा गेला, सायन, धारावी, माहीम कोळीवाड्यांच्या वहिवाटीच्या जागांवर बीकेसी उभे राहिले. वर्सोव्यातील मच्छीमारांच्या जागेवर लोखंडवाला संकुल आलं. मालाडचं चिंचोली बंदर फक्त नावाला उरलं आहे, तिथं आता मोठं व्यापारी केंद्र झालं आहे.

गोरेगावच्या ओशिवरा नदीवर स्वामी विवेकानंद मार्गावरील पुलाजवळ झावळी बंदर होतं, तिथं तीस फुटी गलबतं येत असत. आता तिथं फक्त नाल्याचं गटार उरलं आहे. हाच नाला पुढे मढजवळ समुद्राला मिळतो, तेथील भाग प्रचंड प्रदूषित झाला असून, तो गाळाने भरला आहे. त्याचा फटका अर्थातच तेथील मच्छीमारांना बसला आहे.

अधिकृतपणे पुनर्विकास होत नाही म्हणून वर्सोवा कोळीवाड्यासारखी अनेकांनी आपली घरं दोन-तीन मजली वाढवली व तिथं अन्य समाजाचे भाडेकरू ठेवले. कालांतराने त्या भाडेकरूंनीच ती घरं विकत घेतली. गावठाण की झोपडपट्टी, पुनर्विकास की एसआरए या गोंधळात त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. आता त्यांना एसआरए लागू होणार नाही, असा निर्णय झाला असला, तरी पुनर्वसनाचा गोंधळ कायम आहे. शहरातील सांडपाणी, औद्योगिक प्रकल्पांचं रासायनिक पाणी नाल्यातून तसंच प्रक्रिया न करता समुद्रात सोडल्याने मासळीचं उत्पादन घटलं. शिक्षणाचं प्रमाण कमी असल्याने चांगल्या नोकऱ्याही मिळत नाहीत, अशीही अवस्था अनेकांची झाली. आता मच्छीमारांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अनेक तरुण शिकून खासगी नोकऱ्या मिळवू लागले आहेत.

गावठाण विस्तार योजना गावाच्या विस्तारासाठी असते; पण मुंबईच्या कोळीवाड्यांच्या जागा विस्तारातून बाद केल्या, वाढीव घरं अवैध ठरवली. म्हणून कोळीवाड्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचं सीमांकन करावं, असं कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके सांगतात. सीआरझेड कायदा करताना तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी कोळीवाडा विकास योजना करण्यास राज्यांना सांगितलं होतं. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी शासनाच्या काळात याचं घोडं अडलं. मुंबईत २०११ च्या झोपड्या अधिकृत होत असताना कोळीवाड्यांना मात्र वीज, पाणी देण्यासाठी १९६१ पूर्वीच्या वास्तव्याचा पुरावा मागितला जातो, ही आमची शोकांतिका आहे. नवी मुंबई वसवताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना साडेबारा टक्के जागा दिली. मग मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रकल्पांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कोळीवाड्यांनाही हाच न्याय का लावला जात नाही, हा आमचा प्रश्न आहे. ईशान्य भारतातील स्वायत्त जिल्ह्यांप्रमाणे सागरी स्वायत्त परिषद तयार करा, सागरी जिल्ह्यांना निर्णयप्रक्रियेत म्हणणं मांडू द्या, असंही टपके म्हणाले.

कोळीवाड्यात सण, उत्सव टिकून आहेत; पण स्वरूप बदललं. पारंपरिक वाद्यांऐवजी डीजे आले, ऋण काढून सण साजरे होऊ लागले. खंडोबा हे आमचं कुलदैवत, त्याचं लगीन लागल्यावर कोळीवाड्यात विवाहमोसम सुरू होतो. गेली बावीस वर्षं डोंगरीकर तरुण मंडळ, सन्मान सामाजिक संस्था इथं सामुदायिक विवाह सोहळे करतात. वर्सोव्यात शिमगा हा दिवाळीसारखा साजरा होतो, होडीची पूजा होते, तिला हार-फुलांनी सजवलं जातं, माशांचा नैवेद्य दाखवला जातो. एकमेकांना शुभेच्छा देऊन, घरी मिठाई करून ती वाटली जाते. पूर्वी हा शिमगा, होळी पंधरा दिवस चालत असे, आता ती दोन दिवसांवर आली आहे, असंही टपके म्हणाले.

अजूनही ४० टक्के मच्छीमार पुरुष आपला परंपरागत व्यवसाय करतात, तर ६० टक्के महिला मासळीविक्री करतात. माशांचं जेवण लोकप्रिय करणारा सी फूड फेस्टिव्हल, परंपरागत मच्छीमार वेशभूषा लोकांसमोर आणणारा कोळी फेस्टिव्हल असे प्रयत्न सन २००५ पासून सुरू झाले. प्रत्येक मच्छीमार घरात सी फूड रेस्टॉरंट व्हावं अशी मूळ कल्पना आहे, ती पुढे नेणे जरुरी असल्याचं टपके म्हणाले.

आज मुंबईत कुलाबा-कफ परेड कोळीवाडा, वरळी कोळीवाडा, खार कोळीवाडा आणि वर्सोवा कोळीवाडा हे मोठे कोळीवाडे मच्छीमार परंपरा टिकवून आहेत. अनेक छोटे कोळीवाडे आहेतच. वरळीत अजूनही नऊ पाटील जमात (कुटुंब) व त्यांची परंपरागत कुळं असून, मच्छीमारांचे छोटे-मोठे वाद, तक्रारी प्रथम पाटलाकडे व त्यानंतर नऊ पाटलांच्या गावकीत जातात. तिथंही निराकरण झालं नाही, तरच ती तक्रार कोर्टात किंवा पोलिसांकडे जाते. येथील नऊ पाटील जमात आणि गावकरी इस्टेट कमिटी ही धर्मादाय आयुक्तांकडील नोंदणीकृत संस्था आहे. २०१४ च्या निवडणुकांपर्यंत येथील विकासकामांसाठी लोकप्रतिनिधीदेखील गावकीकडून संमती घेत असत. इतर कोळीवाड्यांतही अजून पाटीलकी आहेच. लग्नातही पाटलांना मान दिला जातो. कालानुरूप या प्रथा कमी होत आहेत, मात्र अजूनही कोळ्यांच्या विवाहात हुंडा घेतला जात नाही, असं वरळी कोळीवाड्याचे पाटील आणि नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅनचे उपाध्यक्ष असलेले विजय वरळीकर यांनी सांगितलं.

मच्छीमारांची आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती सांगताना वरळीकर म्हणतात की, विविध राजकीय पक्षांमध्ये मच्छीमार समाजाचे लोकप्रतिनिधी असले तरी ते पक्षाची मतं लोकांवर लादतात, त्यामुळे त्यांचा समाजाला फार उपयोग होत नाही. खासगी उद्योगांमध्ये मच्छीमारांना आपल्या गुणवत्तेनुसार लहान-मोठ्या नोकऱ्या मिळतात, अनेकजण शिकून अगदी डॉक्टर, आर्किटेक्टही झालेत; पण समुद्रावर होणाऱ्या प्रकल्पांमध्येही मच्छीमार भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळत नाहीत. मच्छीमारांवर परिणाम करणाऱ्या प्रकल्पांवर आम्हालाही स्थान मिळालं पाहिजे. वांद्रे-वरळी सी लिंकच्या कमिटीवर मी होतो, तेव्हा मच्छीमार बोटींना समुद्रात जाण्यास जागा असावी म्हणून दोन खांब हलवले होते. आता कोस्टल रोडच्या कमिटीवर मच्छीमार प्रतिनिधीच नाही.

सामाजिक आरक्षणाचाही फार फायदा होत नाही. राज्यात आम्हाला स्पेशल बीसी दर्जा आहे, तर केंद्राने ओबीसी दर्जा दिला आहे; मात्र त्यासाठी प्रमाणपत्र मिळण्यात असंख्य अडचणी आहेत. हे आरक्षणही फक्त नियुक्तीसाठी आहे, बढतीसाठी नाही. तसंच महत्त्वाचं म्हणजे, मच्छीमारांची अवस्था सुधारण्यासाठी कोळीवाड्यांना सन २०१३ चा पुनर्वसन कायदा लागू करण्यात यावा, अशी आग्रही मागणीही वरळीकर यांनी केली. गावाशेजारच्या वहिवाटीच्या जागेवरील हक्क मिळवण्यासाठी डॉ. वासुदेवराव वरळीकर आदींनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागून महापालिकेला पराभूत केलं, तसे प्रयत्न झाले पाहिजेत, यावरही त्यांनी भर दिला. कोळ्यांचे सण-देवता या निसर्गपूरक असतात. शाकंभरी पौर्णिमेला वरळीतून जत्रा सुरू होते व नंतर अन्यत्र जत्रांचा हंगाम सुरू होतो. ही शाकंभरी देवी म्हणजे झाडांची देवता आहे.

नारळी पौर्णिमेला परंपरागत मद्यपानाची प्रथा बंद करून आता सरबत, अल्पोपाहार दिला जातो. खालुचा बाजा, टिमकी, सनईसारखी सुंदेरी या वाद्यांसह मिरवणुकीने समुद्राची पूजा करून नारळ अर्पण केला जातो. पूर्वीच्या पाटलांची कुळं असत, अजूनही परंपरेनुसार होळीत कुळांना बोलावून मानसन्मान केला जातो. आदल्यादिवशी पहाटे कोंबडहावली पेटवली जाते. होळीला देवतेसारखं पातळ नेसवणं, खणा-नारळाने ओटी भरणं हे विधी अजूनही पाळले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com