नात्यास नाव आपुल्या...

कुसुमाग्रजांनी ‘नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही’, हे कुठल्या अर्थाने लिहिलं ठाऊक नाही.
kusumagraj Natyas Naav Apulya relationship
kusumagraj Natyas Naav Apulya relationship sakal

- विशाखा विश्वनाथ

कुसुमाग्रजांनी ‘नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही’, हे कुठल्या अर्थाने लिहिलं ठाऊक नाही. मला या ओळीचा एक अर्थ कायम खुणावत आलाय तो म्हणजे, लेबल न मिरवणारी शुद्द्ध मैत्रभाव आणि प्रेमापोटी जोडली गेलेली नाती.

त्यात मानलेपणापेक्षा जोडलेपण शोधणं अधिक संयुक्तिक ठरावं, असं वाटत राहतं. अशा कितीतरी नात्यांनी आपण सगळे समृद्ध होत असतो. प्रत्येकदा नात्याला नाव देता येतंच असं नाही. रक्षण करणं, पाठराखण करणं, खऱ्याची बाजू घेणं, हे सगळं लिंगभावापलीकडे माणूसपण जपण्यासाठी गरजेचं आहे.

रक्षाबंधन जवळ येऊ लागतं तशा नव्या-जुन्या आठवणी ताज्या होऊ लागतात. या आठवणी किती नव्या आहेत किंवा जुन्या आहेत यावरून त्यांचं मोल करणं अवघड. सख्खा वा सख्खा चुलत भाऊ नसल्याने अगदी लहान असतानाच्या या सणाच्या आठवणी फारशा नाहीत, असं म्हटलं तरी चालेल.

लहान असताना हे नात्याचे सण नसते कॉम्प्लेक्स मनाला देत राहतात. त्यात हा रक्षाबंधनसारखा सण सगळ्यात वरच्या क्रमांकाचा. रक्षाबंधन हा सण साजरा व्हावा म्हणून की मुलाला चांगली संगत लागावी म्हणून हे स्पष्ट सांगता येणार नाही; पण यातलं काहीतरी एक आलटून पालटून सोयीने मनाशी धरून मी पुढचा प्रसंग लिहिते आहे.

त्यातल्या दोन्ही शक्यता प्रत्येकाने सोयीने तपासून पाहाव्यात. मी लहान असताना हुशार आणि चुणचुणीत होते की नाही, हे ठरवण्याचा आणि आता ठामपणे दावा करण्याचा मला हक्क नाही. तसा तो कुणालाच नसतो; पण तरीही आपण इतरांनी आपल्या सांगितलेल्या आठवणी आणि स्वतःचं स्वतःला आठवणारं बालपण या जोरावर स्वतःला टॉप रेटिंग टाकतोच देऊन.

तसं काहीसं गृहीत धरूया; तर मी लहान असताना हुशार होते, चुणचुणीत होते, गणितात तल्लख होते त्यामुळे वर्गातल्या बऱ्याचशा मुलांचे माता पालक माझ्या आईकडे माझी कौतुकं आणि त्यांच्या मुलांच्या कमी-अधिक हुशारीविषयी खंत व्यक्त करायच्या. तुम्ही कसा अभ्यास घेता वगैरे वगैरेही चौकशा व्हायच्याच.

अशातल्याच एकाच्या आईने शाळेतल्या रक्षाबंधनवेळी स्वतःच्या मुलाला आणि शिक्षकांना सांगून ठेवलं होतं की माझ्याचकडून त्याने राखी बांधून घ्यावी. आणि मी हो, नाही, हवं नको हे काही ठरावायच्या आत मी त्याची मानलेली बहीण होऊन गेले होते. आणि रक्ताचा नसला तरी एक भाऊ अचानक या जगात माझ्यासाठी निर्माण केला गेला होता.

परिणामी एक मित्र वजा. खरंतर ही घटना माझ्या आयुष्यातल्या मानलेल्या नात्यांची नांदीच म्हणायला हवी म्हणा; पण पुढे कैकदा मला या नात्याचं दडपणच अधिक आलं. त्याला सख्खी मोठी बहीण होती, तरी मानलेली बहीण म्हणून माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात काय फरक पडला होता, पडणार होता? हे मला आजतागायत समजलं नाही आणि शुद्ध मैत्रभावाच्या किलर म्हणून मुलांच्या आईकडे पाहण्याचा एक संकुचित, एकांगी किंवा अतिस्पष्टपणा हळूहळू मनात भरून राहिला.

मुलाची आई आणि मुलीची आई यांचा मुला-मुलींच्या मैत्रीकडे पाहण्याचा सहजभाव मला कायम वेगवेगळा वाटत आलाय. असुरक्षितता मात्र सारखीच. जरा कळत्या वयाकडे वाटचाल होत असताना आपापसात मुला-मुलींची मजा-मस्ती, मस्करी यासंबंधी एकमेकांना नावावरून चिडवण्याचे प्रकार हमखास होतात, तेव्हा तेव्हा ए बहीण आहे ती त्याची, काहीही काय बोलतो असं खूप उपरोधाने बोललं जातं.

हे अगदी किशोरवयीन टप्पा ओलांडल्यावरही चालूच राहतं. महाविद्यालयातील काही वर्ष यातच जातात. पुढेही दोन विरुद्ध लिंगी व्यक्तींमध्ये आपुलकीचा बंध दिसू लागला की बहीण-भाऊ याच नात्याचा आधार घेतला जातो. तेव्हा तेव्हा मला प्रश्न पडतो आपल्याकडे मर्यादा राखण्यासाठी नेहेमी नात्याचं लेबल अजून किती पिढ्या लागणार आहे? नातं निर्मळ, निखळ, नितळ हवं. सतत त्याची भीती का म्हणून घालून द्यायला हवी? आणि नेहमी आधाराला, अडीअडचणीला भाऊ-बहीण हेच लेबल का नाचवलं जावं?

भाऊ नसणाऱ्या मुलींच्या आयुष्यात कळत्या वयात आधार, धीर द्यावा किंवा घरातले जुने नियम, जुन्या चौकटी विस्तारण्यासाठी एक आपल्यापेक्षा वयाने काही वर्षच लहान वा मोठा असलेला पुरुष हवा असतो हे खरंय. आपल्या समाजव्यवस्थेचा घाट तसा आहे,

त्यामुळे हा आधार शोधण्याचा अट्टहास कित्येकदा मुलींकडूनही होतो; पण एक वय येतं, गोष्टी मागे पडतात; तरीही त्याच त्याच चौकटीतून दोन माणसांमधले संबंध शोधण्याचे प्रयत्न केलेच जातात. काही वेळा कित्येकांच्या मनात जोडीदाराविषयी संशय बळावतो. आणि अंग धरू पाहाणारं एक नातं अपंग होऊन जातं.

नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, हे कुसुमाग्रजांनी कुठल्या अर्थाने लिहिलं ठाऊक नाही. मला या ओळीचा एक अर्थ कायम खुणावत आलाय तो म्हणजे, लेबल न मिरवणारी शुद्ध मैत्रभाव आणि प्रेमापोटी जोडली गेलेली नाती.

त्यात मानलेपणापेक्षा जोडलेपण शोधणं अधिक संयुक्तिक ठरावं असं वाटत राहतं. अशा कितीतरी नात्यांनी आपण सगळे समृद्ध होत असतो. तिथे ओवाळणं नसतं की ओवाळणी; पण बहीण-भावाच्या नात्यातला अगदी महाभारतात जो सांगितलाय तो साक्षीभाव मात्र असतो.

असं असलं तरी भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन द्रौपदिसी बंधु शोभे नारायण हे भाऊपण उमगण्यासाठीचे प्रसंग कुणाकुणाच्याच वाट्याला न येवो. ही शहाणीव उपजत प्रत्येक स्त्री-पुरुषांत जन्मजात येवो. कारण प्रत्येकदा नात्याला नाव देता येतंच असं नाही. रक्षण करणं, पाठराखण करणं, खऱ्याची बाजू घेणं, हे सगळं लिंगाभावापलीकडे माणूसपण जपण्यासाठी गरजेचं आहे.

असं सगळं असलं, तरी भावंड या नात्याची आपली अशी व्याप्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच. बाजू मांडायला, भांडायला म्हणून भावंड मात्र हवंच, हे काही नाकारता येणार नाही. वाढती लोकसंख्या, खर्च या सगळ्याचा विचार करता आधीची आणि आमची पिढी एकच मूल होऊ देणं पसंत करत असेल, तर अशा सगळ्या मुलांचा भवताल हा या मानलेल्या नव्हे, जोडलेल्या नात्यांचा असणार आहे. तेव्हा त्या पिढीला नात्यांना सतत लेबल करण्याची गरज पडू नये. आणि तरीही नात्याला नाव न देता त्याचा आब राखता येवो.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com