मधुघट (ललिता यार्दी)

ललिता यार्दी
रविवार, 27 मे 2018

"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...""खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट पाहत होते...लवकर लवकर येत जा गं...'' ताईच्या स्वरात अगतिकता होती....
"अगं या संसाराच्या धबडग्यात फुरसतच मिळत नाही. सगळ्याचं करता करता दिवस संपतो कधी हेच कळत नाही,'' मी म्हणाले.

"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...""खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट पाहत होते...लवकर लवकर येत जा गं...'' ताईच्या स्वरात अगतिकता होती....
"अगं या संसाराच्या धबडग्यात फुरसतच मिळत नाही. सगळ्याचं करता करता दिवस संपतो कधी हेच कळत नाही,'' मी म्हणाले.

-मी "मधुघट' बंगल्याच्या गेटपाशी आले आणि चकितच झाले. बंगल्याच्या रंग-रूपात ओळखू न येण्याइतका बदल झाला होता. पायरीवर ताई उभी होती. गेटला साखळीत अडकवलेलं कुलूप खळकन्‌ उघडताना तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूच घरंगळलं.
""तुझा फोन आल्यापासून केव्हाची वाट पाहत होते,'' तिनं शब्दांना वाट करून दिली.
गेट बंद करून आम्ही घराच्या हॉलमध्ये प्रवेश केला.
""वा! अप्रतिम...'' घराचं अंतरंग पाहून माझ्या तोंडातून अगदी सहजपणे दाद बाहेर पडली.
""अनू, हा सोफासेट आम्ही गेल्या आठवड्यात घेतला. फ्रेंच फर्निचरचं ते नवीन दुकान निघालय्‌ ना तिथून घेतला! लॅम्पशेड्‌स, वॉर्डरोब हेही तिथलंच! ही नटराजाची ब्रॉंझची मूर्ती खास चेन्नईवरून मागवली बरं का! "ह्यां'च्या एक पक्षकारानं दिली. खिडक्‍यांचे पडदे फॅशन डिझायनरकडून बेतून शिवून घेतले आहेत. "ह्यां'ची कायद्याची पुस्तकं धूळ खात पडलेली असायची. त्यांना आता काचेच्या "महाला'त प्रवेश मिळालाय्‌. भिंतींच्या रंगाची ही शेड खास माझ्या आवडीची आहे...''
ताई बोलत होती. काय सांगू नि किती सांगू असं तिला झालं होतं. माझ्या नजरेसमोरून तिचं जुनं घर तरळून गेलं. चाळीतल्या दोन खोल्या...ताई स्वतः सरकारी नोकरीत व मेहुणे व्यवसायानं वकील. पै पै जमवून हा बंगला बांधला; पण मुलींचं शिक्षण, लग्नकार्यं सगळं करता करता साधा रंग द्यायलासुद्धा जमलं नव्हतं. कितीतरी वर्षांनी बंगल्याचा कायापालट झाला होता. प्रायोजक होते ः गोरेपान, उंच... माझे मेहुणे! सोफ्यावर बसून ते पुस्तक वाचत होते. सत्तरीच्या वयातही त्यांच्या चेहऱ्यावरची चमक जराही कमी झालेली नव्हती. विद्वत्ता चेहऱ्यावर विलसत होती. डोळ्यांपुढचं पुस्तक किंचित तिरकं करून त्यांनी हलकेच स्मित केलं.
हॉलमधून आम्ही किचनमध्ये आलो.
""छानच गं!'' मी म्हटलं.
ग्रॅनाइट किचन ओटा, स्टीलचं सिंक, किचन ट्रॉलीज्‌... कुठं काही पसारा नाही...सर्व काही चकाचक...
""अनू, हा फ्रिजही नवीनच. फ्रॉस्ट-फ्री. सगळे पदार्थ अगदी ताजेतवाने राहतात,'' ताईनं फ्रिज उघडून दाखवला. भाज्या, फळांनी तो ओतप्रोत भरलेला होता. जॅम, जेली, लोणची, मुरंबे, अगदी रवा, मैदा, खोबरंसुद्धा त्यात विराजमान झालेलं होतं. चॉकलेट, लॉलिपॉप यांचीही भाऊगर्दी होती.
""किचन सिंकवर बॉयलर बसवून घेतला. कूकिंग रेंज इम्पोर्टेड आहे. शोकेस पाहिलीस का? कडधान्यं, डाळी ठेवण्यासाठी वेगळा कप्पा आहे. वरच्या कप्प्यात डिनरसेट, डिशेस, बाउल्स, टी-सेट... बाजूचं हे देवघर मार्बलचं आहे. चांदीची गणेशाची मूर्ती गेल्या चतुर्थीला नवीन आणली. रोज सकाळी तासभर पूजा चालते. मायक्रोवेव्हची मजा तर औरच! अधिक किमतीचा, अधिक फायदेशीर. मिक्‍सर-ज्यूसरसुद्धा नवाच आहे...'' ताईचं मोठ्या उत्साहात माहिती देणं सुरूच होतं.
किचनमधून आम्ही बेडरूममध्ये आलो.... ऐसपैस, आलिशान डबलबेड. एसी. शेजारी म्युझिक सिस्टिम.
""तुला माहीतच आहे...पूर्वी आमची किती भांडणं व्हायची...आपापलं करिअर सांभाळताना एकमेकांवर प्रेम करायला आम्ही विसरलो होतो. माझ्या आजारपणात "ह्यां'नी माझी खूप सेवा केली. मला बरं वाटावं...नैराश्‍य येऊ नये यासाठी जे जे करता येईल, ते ते सगळं काही "हे' करत असतात...'' ताई एकेक शब्द अंतराअंतरानं सांगत होती. तिनं म्युझिक सिस्टिम ऑन केली..."मधू मागसि माझ्या सख्या परी....' सुरेल स्वरांनी वातावरण भारून गेलं...
ताईबरोबर मी दुसऱ्या बेडरूममध्ये आले. पाहुण्यांसाठी खास आकर्षक रूम.
""बसू या का जरा...?'' ताईच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. माझ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...""खूप दिवसांनी आलीस गं. मी रोजच वाट पाहत होते...'' ताईच्या स्वरात अगतिकता होती....
""अगं, या संसाराच्या धबडग्यात फुरसतच मिळत नाही. सगळ्यांचं करता करता दिवस संपतो कधी हेच कळत नाही,'' मी सांगितलं.
""मला मात्र आता वेळच वेळ आहे. "हे' कोर्टात जातात. जावई, मुली, नातवंडं कधी येतात...कधी नुसताच फोन...! या पाहिल्यास का? मी सोन्याच्या नवीन बांगड्या केल्या. पाटल्यासुद्धा नवीन आहेत...'' थकलेली असूनही ताई पुन्हा सांगू लागली.
माझं लक्ष ताईच्या सुरकुतलेल्या, काळवंडलेल्या हातांवरून कलाकुसर असलेल्या चकचकीत पाटल्या- बांगड्यांकडं गेलं.
""मी तुला गंमत दाखवते... डोळे मीट...''
मी डोळे मिटल्यावर ताई कुठंतरी जाऊन आली.
""हं...आता डोळे उघड...'' ताई
मी डोळे उघडले. समोर ताईच्या हातात लखलखणारं नेकलेस!
""अनू, अगं पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे ना, म्हणून "ह्यां'नी हे हिऱ्यांचं नेकलेस आत्ताच आणून ठेवलं आहे. एका पक्षकाराकडून पैसे आले होते. "त्या पैशांना दुसरीकडं वाट फुटण्यापूर्वीच घेऊन टाकू', असं म्हणाले. मी मात्र हे नेकलेस वाढदिवशीच घालणार आहे,'' ताई पुन्हा उत्साहात सांगू लागली.
हिऱ्यांच्या तेजाचं प्रतिबिंब ताईच्या डोळ्यांत परिवर्तित झालं. नेकलेस हातातून पेटीत विराजमान होताच वलयांकित झालं.
""आणि हे पाहा...माझे केस पाहिलेस का? अगं, नवीन येताहेत ना ते केस चक्क काळे आहेत,''
ताईच्या आवाजात जादूभरी उमेद होती. मी तिच्या विरळ पांढऱ्या केसांच्या बटा उलगडून पाहिल्या. काळ्या केसांचे तंतू चक्क डोकं वर काढू लागले होते.
""खरंच! हे तर फारच छान...!'' मी म्हणाले. ताईचा चेहरा हरखून गेला.
""आता मला खूप बरं वाटत आहे,'' ताई
""संजूच्या लग्नाची पत्रिका आणली आहे. तू आणि दाजींनी आदल्या दिवशीपासूनच यायचं आहे,'' तिच्या हातात लग्नपत्रिका ठेवत मी म्हणाले.
""येणार तर...अगदी नटून-थटून!'' ताईनं आश्‍वासन दिलं.
""तुझ्यासाठी काय करू? काय घेशील?'' ताईनं मला विचारलं.
""केळवणाला गेले होते. तिथं बरंच खाणं झालंय. संजूचं लग्न महिन्यावर आलंय्‌... धांदल सुरू आहे नुसती...'' मी.
ताई ग्लासमध्ये पाणी घेऊन आली...साखर-मीठ ढवळून तिनं लिंबू पिळायला मलाच सांगितलं...
""तूच पिळून घेतेस का? माझ्या हातात जोर नाही गं अजून...'' ताई
ग्लासमधल्या पाण्यात लिंबाची फोड पिळून मी एका दमात सरबताचा ग्लास रिकामा केला.
""अजून माझे हात दुखतात; पण डॉक्‍टर म्हणालेत की "आता काळजी करण्याचं काही कारण नाही,' '' ताई म्हणाली.
""काळजी करायचीच नाही. बिलकूल,'' मी म्हणाले...
पण माझ्या मनात चिंतेचे ढग जमा झाले.
""ताई, मी निघू आता?' माझा स्वर नकळत कातर झाला.
""अनू, लवकर लवकर येत जा गं. मला तुझी फार आठवण येते,'' ताई म्हणाली. मला गलबलून आलं.
मणामणांच्या बेड्या अडकल्याप्रमाणे माझे पाय जड झाले. आम्ही हॉलमध्ये आलो. मेहुणे अजूनही पुस्तकच वाचत बसलेले होते. माझ्याकडं बघून त्यांनी पुन्हा स्मितहास्य केलं.
""आपल्याला डब्यात भाकरीच सांगायची ना?'' मेहुण्यांनी ताईला विचारलं.
""हो. भाजीत तिखट कमी घालायला सांगा,'' ही ताईची रात्रीच्या जेवण्याची तयारी!
हॉलमधून आम्ही गेटजवळ पोचलो.
""अजून डबाच मागवतो आम्ही सध्या...पण एवढ्या महिनाभरच! नंतर मी स्वतःच स्वयंपाक करत जाणार आहे...पंजाबी...चायनीज सर्व काही...'' ताई सांगू लागली.
बंगल्याच्या आवारात कार पार्किंगच्या जागेत फरश्‍या बसवलेल्या होत्या. भरभक्कम अशी कम्पाउंड-वॉल होती. गेटच्या दोन्ही बाजूंना वरती मर्क्‍युरी लॅम्प्स होते. कम्पाउंडच्या आतल्या बाजूला झाडं लावण्यासाठी मोकळी जागा होती.
""छान बाग करणार आहे मी. नवीन माती आणून ओतणार आहे. सर्व प्रकारची फुलझाडं लावणार आहे. अगं, एवढ्यातच कुंडीत लावलेलं गुलाबाचं हे रोप...तिथंही फूल उमललं आहे बघ. गेटचे दरवाजे जरा उंचच झाले आहेत. खालून रस्त्यावरची भटकी कुत्री आत येऊन बसतात...रस्त्यावरच्या कुत्र्यांना हाकलून देणं सोपं आहे गं...पण माझ्या शरीरात ठाण मांडून बसलेला हा कॅन्सर...याला हाकलून हाकलून किती हाकलणार? जाईल तो पूर्णपणे? तशातच डायबेटिस...पण मी त्याच्यावर मात करणार आहे. मी जगणार आहे...मला जगायचं आहे...माझ्या घरासाठी... "ह्यां'च्यासाठी... फुलांसाठी...!'' ताईचे डोळे भरून आले.
तिनं धरलेला माझा हात मी हलकेच सोडवून घेतला. गेटची कडी सोडवून मी रस्त्याकडं वळले.
दिवेलागण झाली होती. पश्‍चिमेला आकाशात ढगांआडून चंद्रकोर डोकावत होती. जीवनाचा पैलतीर समोर दिसत असतानाही आकांक्षांचे मधुघट मनात काठोकाठ भरून सकारात्मक विचार करणारी ताई माझ्या नजरेसमोरून हलेना...!

Web Title: lalit yardi write article in saptarang