डॉ. अब्दुल कलाम... सर, प्लीज रिटर्न..!

APJ Abdul Kalam
APJ Abdul Kalam

प्रिय,
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम,

आपण म्हणालात "As a Child of God, I am grater than anything that can happen to me.' या वाक्‍याने आम्हाला इतकी शक्ती दिलीत, की कोणत्याही संकटांची भीती वाटतच नव्हती. त्यामुळे कधीतरी आम्हाला तुमच्याशिवाय जगावं लागेल, असा विचारही मनात आला नव्हता; पण आपण आम्हाला सोडून गेला आहात. या कटू वस्तुस्थितीवर विश्‍वासच बसत नाही. आता आपले ते प्रोत्साहित करणारे शब्द, स्वप्न पाहायला शिकवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आम्हाला "याचि देही, याचि डोळा' पाहता येणार नाही, ही वेदना खरंच फार क्‍लेशदायक आहे.

कोलकत्यात इंडियन सायन्स कॉलेजच्या शताब्दी अधिवेशनात निव्वळ आपल्याला भेटण्यासाठी मी सहभागी झालो. तेव्हा तुम्हाला अगदी पाच फुटांवरून पाहण्याची संधी आली. मात्र, दुर्दैवाने आपल्याशी दोन शब्दही बोलता आले नाहीत. त्या आपल्या पहिल्याच प्रत्यक्ष दर्शनाने खूप काही मिळालं असलं, तरी संधी येऊनही संवाद साधता आला नाही, हे कुठंतरी मनाला लागलं होतं आणि अवघ्या आठ महिन्यांच्या अवधीतच नियतीने संधीलाच माझ्या दारात आणून उभे केले!

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्यासाठी रयत शिक्षण संस्थेने 2013 मध्ये आपल्याला आमंत्रित केलं होते. तेव्हा रयतचे तत्कालीन सचिव डॉ. अरविंद बुरुंगले, तत्कालीन पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना व पोलिस निरीक्षक राजेंद्र जोशी यांनी मला व माझे मित्र सुमीत, रूपाली आम्हा तिघांना आपली फक्त भेट नव्हे, तर चक्क मुलाखत घेण्याची संधी दिली. 22 सप्टेंबर 2013 चा सोनियाचा दिवस उजाडला. कर्मवीर जयंती! आपण पाहिलंतच सर, की आपलं स्वागत करण्यासाठी आमची सातारानगरी किती सजली होती, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तर ओसंडून वाहत होता. विश्‍वविख्यात वैज्ञानिक, भारताचे अकरावे राष्ट्रपती, शांतिदूत, भारतरत्न डॉ. ए. जी. जे. अब्दुल कलाम, विद्यार्थ्यांचे लाडके "दिल की धडकन' कलाम सर त्या वेळी आमच्या शाहूनगरीला आपल्या पदस्पर्शाने पावन करणार होते.

भाषणानंतर विश्रामगृहात जेव्हा आपण विश्रांती घेत होतात. तेव्हा अचानक आम्हा तिघांना कळालं, की कार्यक्रम लांबल्याने आमची मुलाखत रद्द करण्यात आली आहे. फक्त आम्हाला आपली Autograph घेता येईल. आमचे चेहरे पडले. आम्ही खूप निराश झालो; पण ठीक आहे दोन शब्द बोलायला मिळतायतना! त्यावर आम्ही समाधान मानायचे ठरवलं!

इतक्‍यात, आपल्या कक्षाची कडी उघडल्याचा आवाज झाला. आमच्यासोबत काही राजकीय परिवारातील व्यक्ती होत्या. ते आम्हाला आपल्या पुढे येऊ देतील की नाही अशी भीती होती आणि अशातूनही आम्ही पुढे घुसलो, तर आपले सुरक्षारक्षक आम्हाला दूर हटवतील असे वाटले, तरीपण आम्ही पुढे घुसण्याची तयारी केली होती. इतक्‍यात दरवाजा उघडला, आम्हाला वाटलं आधी आपले सुरक्षारक्षक बाहेर येतील; पण दारात उभे होते दोन्ही हातात आपल्या दोन बॅगा घेऊन स्वतः आमचे "कलाम सर'!

"My Dear Children, come here` आपण चक्क त्या राजवलयांकित व्यक्तींना बाजूला सारून स्वतः आम्हाला जवळ बोलावलं होत. मी आपणासमोर डायरी पुढे केली. "सर, Autograph Please... आपण तीन स्वाक्षऱ्या करू लागलात. एक झाली, की मी पान उलटू लागल्यावर आपण म्हणालात, ""पाठोपाठ स्वाक्षरी कशी करणार? तू त्या दोघांना पान फाडून देणार नाहीस का?' सर, एवढ्या गोंधळातही एवढ्या बारीक गोष्टींकडेही आपलं किती लक्ष असतं हो! जेव्हा आम्ही आपली मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आपण म्हणालात, ""माझ्याकडे अजून दहा मिनिटे वेळ आहे, तोपर्यंत होऊ द्या मुलाखत...'

"भगवान जब देता है, तो छप्पर फाड के देता है।' भगवान आमच्यावर आज भलताच खूष होता. आम्हाला अनुभव येत होता आणि उभ्याउभ्याच आम्ही आपली मुलाखत घ्यायला सुरवात केली. आपली निघण्याची वेळ झाली आणि इतक्‍यात रूपालीने आपल्याला शेवटचा प्रश्‍न विचारला, "अवकाशात झेप घेण्याची कुवत असणाऱ्या डॉ. राकेश शर्मा, डॉ. कल्पना चावला, डॉ. सुनीता विल्यम्स यांसारख्या भारतीय व्यक्तींना भारत सोडून "नासा' का जॉईन करावं लागतं? ""उद्या आम्हालाही यासाठी आमचं प्रिय राष्ट्र सोडावे लागेल काय?'

त्या वेळी रूपालीच्या केसांवरून हात फिरवत आपण म्हणाला होतात, की ""त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे.'' आपण आम्हाला अंतरिक्ष संशोधन, अवकाशभ्रमणाच्या भारतात निर्माण होणाऱ्या कितीतरी संधींची ओळख करून दिलीत! इतकेच काय? आपण आमचे ई-मेल आयडी घेऊन आम्हाला संबंधित वेबसाइट पाठविण्याचे आश्‍वासनही दिलेत आणि ज्ञानामृतासोबतच भरपूर शुभेच्छा तथा शुभाशीर्वाद देऊन आपण आमचा तेव्हा निरोप घेतलात! आम्ही खरंच धन्य झालो..!!!

आपला कृपाभिलाषी,
स्वप्नील माने, सातारा

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर 'मुक्तपीठ'मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत. (सकाळ अर्काईव्हमधून)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com