हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा!

आपल्या आयुष्यात संकटं येतच राहणार आहेत. संकटात काही माणसं निर्विकार होतात, तर काही काहीही करून त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतात.
life
lifesakal

- विशाखा विश्वनाथ

आपल्या आयुष्यात संकटं येतच राहणार आहेत. संकटात काही माणसं निर्विकार होतात, तर काही काहीही करून त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतात. महत्त्वाचं म्हणजे चॅलेंजिंग परिस्थितीत एकमेकांची मदत घ्या. एकट्याशी खेळ खेळत बसू नका. संकटांशी दोन हात करताना हतबल होऊ नका...

या जगात दोन पद्धतीची माणसं असतात. पहिली म्हणजे, चारही बाजूंनी संकट आल्यावर एकदम निर्विकार होणारी. काहीच रिॲक्ट न करणारी. इतकी निर्विकार, की समोरच्याला त्यांच्या शांत असण्याची चीड यावी. ...आणि दुसरी म्हणजे, संकट आल्यावर काहीही करून त्यातून बाहेर पडायचं म्हणून फार जिकीरीने हात-पाय मारत राहणारी. रांगणं सरून नुकतंच उभं राहू लागणारं लहान मूल जसा आधार शोधतं तसं दिसेल ती व्यक्ती, परिस्थिती, सुचेल तो मार्ग, वाटेल ती वाट त्यांना या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत करील, असं वाटत असतं.

ते चालणारं मूल पुढे उंच अशा पलंग आणि खुर्चीवर चढण्यासाठी जशी धडपड करतात अगदी तशीच ही माणसं संकटातून बाहेर

निघण्यासाठी प्रयत्न करतात. त्या लहान मुलांमध्ये जी चिकाटी, धैर्य आणि जिद्द असते तशीच या माणसांमध्ये फार बिकट परिस्थितीत आल्यावर येते. ते मूल होतात. पहिल्या प्रकारच्या माणसांना आता काहीही होणार नाही, असंच कायम वाटत राहतं किंवा सगळ्यावर वेळ हाच एकमेव उपाय आहे, यावर ते ठाम असतात. दुसऱ्या प्रकारातली माणसं वेळ बदलण्याची धडपड करत राहतात. त्यांचा प्रयत्नवादी असण्यावर विश्वास असतो आणि म्हणून ते सतत काहीना काही खटपट करत राहतात.

संकटाचा खो मिळाल्यावर संधीच्या शोधात धावणारी माणसं कमालीची धैर्यवान असतात. कित्येकदा तर ते संधी शोधतही नाहीत. समोर आहे तीच गोष्ट अधिक तन्मयतेने करतात आणि काहीतरी भारी करून दाखवतात. आजूबाजूच्या माणसांना वाटतं, हे कसं शक्य आहे? पण त्या मागे फार मोठी उलथापालथ घडलेली असते. मोठा अपघात, फार मोठं नुकसान या सगळ्याला आपल्यातला प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असतो.

फार अटीतटीच्या सामन्यात दणादण फोर-सिक्स मारणारा क्रिकेटपटू आणि ही माणसं यांच्यात मुळीच फरक नसतो. सुनील गावसकर यांचं एक गाणं आहे, ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला.’ हे या संकटात, दुःखात सतत प्रयत्नशील राहणाऱ्या माणसांना पुरतं उमगलेलं असतं. हे उमगणं येतं कुठून? का येतं? याला काय म्हणतात आणि माणसं नेमकी त्या ठराविक पद्धतीनेच का वागतात या सगळ्याला ‘ट्रॉमा रिस्पॉन्स’ असं म्हणतात.

आता ‘ट्रॉमा’ म्हणजे काय तर धक्का किंवा धसका. आता हे ट्रॉमा फक्त मोठ्या माणसांमध्येच दिसतात का? किंवा मोठं झाल्यावर धक्के बसतात का? तर मुळीच नाही. आता मोठ्या झालेल्या सगळ्या माणसांना लहान असतानाच असा कुठला ना कुठला धक्का बसलेला असतो. त्यांनी कुठल्या तरी गोष्टीचा धसका घेतलेला असतो. अशा पद्धतीच्या धक्क्याला ‘चाईल्डहूड ट्रॉमा’ म्हणतात.

लहान असतानाच्या परिस्थितीतलं जे अनुभवलेलं असतं; पण व्यक्त करता आलेलं नसतं ते आतून जोरात धक्का मारतं आणि आपण नेहमीपेक्षा वेगळे वागतो. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असे अनेक धक्के आपल्याला बसतात आणि संकटांच्या वेळी आपण त्यानुसार वागतो, बोलतो... आपण त्या त्या वेळी जे वागतो तसेच मूळचे असतो का? तर नाही... त्या चॅलेंजिंग परिस्थितीपुरते आपण तसे होतो. ...आणि जेव्हा केव्हा पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते तेव्हा कमी-अधिक तुलनेने तसेच वागू लागतो. मी वर लिहिलं तसं, ही पहिल्या आणि दुसऱ्या पद्धतीतली माणसं अशाच प्रकारे संकटांना रिस्पॉण्ड करतात.

दहावी, बारावी किंवा स्पर्धा परीक्षांचे निकाल लागल्यावर मोठ्या मथळ्याखाली येणाऱ्या सक्सेस स्टोरीज आठवून पाहिल्या तर ही गोष्ट अधिक सुस्पष्टपणे आपल्याला कळू शकते. अशा महत्त्वाच्या परीक्षांआधीचे अपघात, आजारपण आणि त्या नंतरचं देदीप्यमान यश इथे ‘ट्रॉमा रिस्पॉन्स’ हीच गोष्ट काम करत असते. ही तीच माणसं आहेत जे आयुष्याच्या टी-२० सामन्यात ‘आर या पार’ अशा परिस्थितीत आश्चर्यकारकरीत्या उत्तम खेळून जातात. पण मग इतरांचं काय, हा प्रश्न मागे उरतोच ना? मला या इतर आणि सगळ्याच माणसांसाठी ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा’ गाणं महत्त्वाचं वाटतं.

संकटाचा सामना करताना, ट्रॉमाला रिस्पॉण्ड करताना माणसाने इतकंही हायपर ॲक्टिव्ह होऊ नये की पाहणाऱ्याला या माणसावर संकट परिणाम करत नाही, असं वाटावं आणि जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडाव्यात तसं वेळोवेळी संकटांनी आपल्या अंगावर येऊन पडावं किंवा आलेलं संकट माझ्यावर आलंय, हे दुःख माझं आहे... इतरांना थोडीच समजणार याची किंमत, मी ही वेळ मारून नेईन, असा विचार करून तुमची काळजी करणारे, तुमच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारे सगळे हात झिडकारून टाकावेत. एकटं एकटं खोल गर्तेत जात असताना मागून कितीही कुणीही हाका मारल्या तरी कुठल्याच हाकेला ‘ओ’ देऊ नये.

अशाने माणसं तुटतात, दुरावतात. कारण या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाकडेच नाही. तुमच्याकडे मदतीचा हात घेऊन येणारी माणसं फार काळ त्यांनाच मदत करण्याची फार खुमखुमी आहे, गरज आहे असं म्हणून हात उंचावून सदा सर्वकाळ थांबू शकत नाहीत. म्हणून चॅलेंजिंग परिस्थितीत मदत घ्या. एकट्याशी खेळ खेळत बसू नका. त्याने जेवढा त्रास तुम्हाला होतो तितकाच तुमच्या जवळच्या माणसांना.

थोडक्यात काय, संकटांशी दोन हात करताना हतबल होऊ नये आणि हुकूही नये. कारण इथे काळ सतत संकटांचे चेंडू फेकत राहणार आहे आणि आपली विकेट पडू न देता आपल्याला उत्तम खेळी

खेळायची आहे.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com