esakal | वाटे निर्धनता मला खचित हें साध्वें महापातक ।।
sakal

बोलून बातमी शोधा

sanskrit shloka

वाटे निर्धनता मला खचित हें साध्वें महापातक ।।

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

वाटे निर्धनता मला खचित हें साध्वें महापातक ।

रसिका, मराठी काव्याचे मंथन करून त्याचे नवनीत काढण्याचे अमूल्य काम प्रथमतः परशुरामपंत तात्या गोडबोले (१७९९-१८७४) यांनी केले. ‘नवनीत’ याच नावाने ते १८५४ मध्ये प्रसिद्ध केले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. परशुरामपंतांनी अनेक संस्कृत नाटकांची मराठी भाषांतरे केली. त्यात शूद्रकाच्या मृच्छकटिकाचाही (१८६२) समावेश आहे. या नाटकांतील निर्धनता व दारिद्र्य या विषयीचे चारुदत्ताचे बोल पंतांनी सुडौलपणे मराठीत आणले. केवळ काव्यच नव्हे, तर व्यावहारिकदृष्ट्याही ते वेधक आहेत.

दारिद्र्य मरण यांतुनि मरण बरें बा दरिद्रता खोटी।
मरणांत दुःख थोडे दारिद्र्यांत व्यथा असे मोठी।।


कवी एक फार मोठे व्यावहारिक सत्य या पहिल्याच श्लोकात सांगतो. दारिद्र्याची तुलना करताना तो थेट मृत्यूला गाठतो. दारिद्र्य व मरण यातून तो मरणाला वरतो. तो म्हणतो मरणांत दुःख असते तर दारिद्र्यांत व्यथा असते. त्याचे हे शब्द फार लक्षणीय आहेत. आपण जसे सुख भोगतो तसेच दुःखही भोगत असतो. भोगलेल्या दुःखांत आनंद मिळतो, पण व्यथेत? व्यथा सतत टोचणी लावते, तिच्यात एकप्रकारची रिक्तता असते.
येथे दारिद्र्याची मरणाशी तुलना करण्यामागे कवीचे दोन-तीन हेतू असावेत. पहिला- मरण सर्वानाच येते तसे दारिद्र्याचे नसते. दुसरे मरण सर्वच गोष्टींचे हरण करते, म्हटलेलेच आहे ना ‘मृत्युसर्वहरश्चाऽहम्’ मग ते दारिद्र्याचेही हरण करील, याचा त्याला विश्वास वाटतो. तिसरे, दारिद्र्यानंतर सधनतेची शक्यता फारच धूसर असते; पण मृत्यूनंतर जन्म ठरलेलाच असतो. चवथे कारण हे असावे, की मरणात हेवेदावे बाजूला ठेवून सारेजण जमतात. म्हणतात ना ‘मरणांतानि वैराणि।’ पण दारिद्र्यांत एकटेपणा असतो, कोणाचीही साथसंगत नसते. दारिद्र्यातील ही व्यथा व्यक्तविताना कवी म्हणतो,

हेही वाचा: कालिदासाचा अनोखा राम...

माझें मलाच गृह तापद फार झालें।
क्षीणार्थ जाणुनि जनी गृह वर्ज्य केले।।


रसिका! ही व्यथा नीट बघ, घराची ओढ प्रत्येकालाच वाटते पण दारिद्र्याने पोळलेला जीव थकून भागून जेव्हा घरी येतो तेव्हा ‘हे नाही, ते नाही’च्या पालुपदाने पीडित होतो. घरांत सारख्या व क्षुल्लक कारणामुळे होणाऱ्या वादाने घराचा ‘घरपणा’ हरवून गेलेला असतो. त्याचे घरच त्याला खायला उठत असते.
असे सांगतात, की एक गरीब राजाजवळ जाऊन त्याच्याजवळ कैफियत मांडू लागला ‘अंबां न तुष्यति मया न स्नुषया।साऽपि नाम्बया न मया । अहमपि न तया न तया । वद राजन् कस्य दोषोऽयम् ।’ अर्थात् ‘हे राजा, माझी आई माझ्यापासून वा सूनेपासून समाधानी नाही. सूनसुद्धा माझ्यापासून वा सासूपासून समाधानी नाही व मी पण त्या दोघींपासून संतुष्ट नाही. राजा, सांग बरे यात कोणाचा दोष आहे?’ असे सांगतात, की त्याच्या या प्रश्नावर राजा विचारात पडला. याचे समाधान कसे करावे? त्याला कळेना. तेव्हा दरबारातील हुशार प्रधानाने मृदुंग वाजवायला सांगितला त्यातून आवाज उमटला धनम् । धनम् । धनम् । अर्थात् घरातील दारिद्र्य, धनाचा अभाव हेच त्यांच्या त्या असंतुष्टीचे कारण होय, हे त्याने ध्वनित केले.
सामान्यपणे पै पाहुणे आले तर घरांत आनंद निर्माण होत असतो, पण दारिद्र्यात खितपत पडलेल्या घरांकडे घेणेकऱ्याशिवाय कोणीही वाट वाकडी करत नाही अन् चुकून एखादा पै पाहुणा आलाच तर ‘दुष्काळात तेरावा महिना’ वाटायला लागतो. त्यामुळे अशा घरांत रहाणे त्याला तापदायक वाटते, त्याचे घर त्यालाच खायला उठते. त्याच्यासाठी चिंता हे एकच घर उरते.
खरेतर दारिद्र्य अनेक प्रकारचे असते. कल्पना दारिद्र्य, कर्म दारिद्र्य, भाव दारिद्र्य, विचार दारिद्र्य... पण कवी वित्त दारिद्र्यावरच अधिक भर देतो. त्याला हेही ठाऊक आहे, की

हेही वाचा: यतीची गोष्ट!

दैवानुसार मिळतें धन आणि जातें।

मोठा विद्वान, सत्शील व सुयोग्य व्यक्ती दारिद्र्यांत खितपत पडलेला तर अगदी अयोग्य मनुष्याकडे लक्ष्मी पाणी भरताना आपण पहातो. याचे कारण दैवच । पूर्वदत्तेषु यत्धनम् । त्यामुळे दारिद्रयाविषयी कविची तक्रारच नाही. त्याची तक्रार आहे ती मित्रांविषयी जे दारिद्र्य येताच पाठमोरे झाले. नातेवाईक, भाऊबंद त्याला टाळू लागले. एखाद्या वित्तवानाच्या घरी तो गेला तर हा काही मागायलाच आला, असे वाटून त्याच्या कपाळावर आढ्या पडू लागल्या, त्याच्यातील सर्वगुण विसरून त्याची उपेक्षा केली जाते. याचेच वैषम्य त्याला जास्त वाटते. कालिदास म्हणतो त्याप्रमाणे दारिद्र्य हा एकच अवगुण साऱ्या गुणांची राखरांगोळी करतो. त्यामुळे एक सुभाषितकार उपहासपूर्वक म्हणतो, ‘हे दारिद्र्या । तुझा प्रताप पहा तुझ्यामुळे मला अदृश्य व्हायची सिद्धी प्राप्त झाली. अरे मी सगळ्यांना पाहू शकतो; पण मला कोणीही पाहत नाही, कोणाला मी दिसत नाही, माझे कोणीही ऐकत नाही’ ही जाणीव असल्यानेच कवी म्हणतो,

वाटे निर्धनता मला खचित हें साध्वें महापातक ।

याचा अर्थ सधनता पुण्य आहे असा मुळीच नाही. मात्र धनाचे उचित मूल्य कवी ओळखतो. केवळ कल्पनेच्या वा आदर्शवादाच्या भराऱ्या मारत बसत नाही, तर वास्तवाची जाणीव यातून व्यक्तवितो, असेच म्हणायला हवे आणि हो, ही जाणीव व्यक्तविताना ही सधनतेची पराधीनता सूचित करायला विसरत नाही. रसिका, संसारयज्ञाची धग ज्या ज्यावेळी तुला जाणवेल त्या त्या वेळी अमृताते पैजा जिंकणाऱ्या या पहिल्या लेण्याचे स्मरण तुला खासच होईल व त्याच वेळी या काव्याची रेंगाळणारी चव त्या दाहक समयीसुद्धा तुला सुखावेल, असा विश्वास मला वाटतो.

- डॉ. नीरज देव

loading image