book aapula thavo n sandita
book aapula thavo n sanditasakal

नातेसंबंधांची जाणीव

प्रा. डॉ. सुरेंद्र दरेकर यांची कथा आजच्या मराठी साहित्यात सर्वस्वी वेगळी वाट चोखाळणारी, आपली खास वैशिष्ट्ये घेऊन आलेली आहे. ती पूर्वसूरींपैकी कोणाचाही कित्ता गिरवत नाही.
Summary

प्रा. डॉ. सुरेंद्र दरेकर यांची कथा आजच्या मराठी साहित्यात सर्वस्वी वेगळी वाट चोखाळणारी, आपली खास वैशिष्ट्ये घेऊन आलेली आहे. ती पूर्वसूरींपैकी कोणाचाही कित्ता गिरवत नाही.

- लीना पाटणकर

प्रा. डॉ. सुरेंद्र दरेकर यांची कथा आजच्या मराठी साहित्यात सर्वस्वी वेगळी वाट चोखाळणारी, आपली खास वैशिष्ट्ये घेऊन आलेली आहे. ती पूर्वसूरींपैकी कोणाचाही कित्ता गिरवत नाही. ‘आपुला ठावो न‌ सांडिता’ या तीन दीर्घकथांच्या संग्रहात त्यांच्या बहुश्रुत, समृद्ध व्यक्तिमत्त्वाची साक्ष आहे. तत्त्वचर्चांच्या-सूक्ष्म संवेदनांच्या आणि अशाच कुठल्या कुठल्या वाटांनी मानवी मनाचा खोल‌ वेध घेण्याची त्यांच्या कथेची क्षमता असाधारण आहे.

प्रा. डॉ. सुरेंद्र दरेकर यांचा ‘आपुला ठावो न‌ सांडिता’ हा तीन दीर्घकथांचा नुकताच आलेला संग्रह. लौकिक आणि अलौकिक अर्थाने वेगळाच अनुभव देणारा. आशयदृष्ट्या साधीच कथानकं, पण अतूट नातेसंबंधांच्या आणि बांधिलकीच्या जाणिवेचा प्रत्यय देणारी.

या संग्रहातील पहिल्या शीर्षकाच्या कथेला नव्वदच्या दशकातील आर्थिक उदारीकरण - वैश्वीकरणाचे संदर्भ आहेत. आयटीचे शिक्षण घेऊन थेट सिलिकॉन व्हॅली गाठणाऱ्या तरुणाईची गर्दी इथे दिसते. हे या शतकात नोकरीच्या कारणाने मोठ्या संख्येने झालेले भिन्नवंशीय स्थलांतर. याचे जसे फायदे, तशाच व्यथा-वेदनाही. त्यामुळे या कथेत वातावरणाचा अपरिहार्य भाग म्हणून संगणकीय विश्वाचे तांत्रिक संदर्भ जागोजागी येतात.

नानू नावाचा चाळिशीचा प्रौढ पुरुष, कोवळ्या वयात दूर परदेशी नशिबाच्या वाटा धुंडाळत गेलेला, मागे पाश न ठेवलेला, आताच अचानक काही कारणाने जाग्या झालेल्या ओढीने कोकणात परतला आहे. मूळ गावापासून काही अंतरावरच्या आत्याच्या गावी. ती भेटते, पण वाचा आणि बऱ्याचशा जाणिवा हरवलेल्या स्थितीत. तिच्या त्या गावची खूप जिव्हाळ्याची, मदत आणि सहकार्य करणारी माणसे, मूळ गावच्या दुरावलेल्या माणसांशी परत जोडले जाणे, प्रयत्नांती आत्याला बरे करण्यात यश येणे, निष्कारण लांबलेले लग्न आता विनासायास होणे- असा कथानकाचा बराच गुंता आणि विस्तार इथे आहे. पण शेवटी कायमचे परदेशी जाण्याचा पर्याय समाप्त. एक पाय इथेच राहणारच आता कायमचा.

शीर्षकाची अन्वर्थकता उलगडू. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात ओवी आली आहे.

कां आपुला ठावो न सांडितां। आलिंगिजे चंद्रु प्रकटतां।

हा अनुरागु भोगितां। कुमुदिनी जाणे।।

आकाशात चंद्र उगवतो तेव्हा आपले स्थान न सोडता, आहे तिथेच स्थिर राहून कुमुदिनी त्याला आलिंगन देऊन अनुराग अनुभवते. (त्या प्रकारे रसिकाने काव्याचा आस्वाद घ्यावा.) या ओवीचा कथेशी धागा जुळतो तो तिच्यातल्या पात्रांच्या जगण्याच्या शैलीच्या अनुषंगाने. कथेतील हा भाग जगून दाखवणाऱ्या आत्या, मिशेल, दिनू, सुप्रिया अशा बहुसंख्य पात्रांमुळे कथा परिणामकारक झाली आहे.

‘अवचिता परिमळू’ ही दरेकरांची ‘२०२२ च्या दिवाळी अंकांतील सर्वोत्कृष्ट कथा’ म्हणून निवडली गेलेली पुण्यभूषण पुरस्कार विजेती कथा. ती त्यांच्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘बुडता आवरी मज’ या संग्रहातल्या कथांचाच तोंडवळा घेऊन आलीय. त्यातल्या कथा जशा, कथानकाच्या ओघात तत्त्वज्ञानातल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चेची बेमालूम गुंफण केलेल्या होत्या, तशीच ही आहे. (‘आपुला ठावो’मध्येही नानू-मिशेलच्या अशा सर्वव्यापी चर्चा आहेतच.) शिवाय, माणसाच्या अबोध, सुप्त मनातल्या काही संवेदना-जाणिवांचे चित्रण परत परत भेटत राहते.

मंजुश्री ही संतसाहित्यावर एम.फिल. करणारी मुलगी कथेची नायिका आहे. तिच्या घरातली, जवळ-दूरच्या संबंधांतली, कामानिमित्त ती जिथे वावरते त्या जगातली कमीअधिक महत्त्वाची माणसे बरीच भेटतात कथेत. पण सगळ्यांची सांधेजोड मंजूच्या वैचारिक-भावनिक घडामोडींशी असल्यामुळे आगंतुक कोणीच नाहीय. मानवी नातेसंबंध-भावनांच्या घडामोडी समजावून घ्यायला तिला या सर्वांच्या सहवासातून दिशा मिळत जाते. एक धागा सतत तिच्या चालू अभ्यासाशी, तात्त्विक सिद्धान्त - कूटप्रश्न- त्यांची संभाव्य उत्तरं, यांच्याशी जोडलेला राहतो. घडणाऱ्या घटनांतून तिच्या जिज्ञासू मनाला प्रश्न पडत जातात आणि वेळोवेळी त्यांची उत्तरेही मिळत जातात.

कथेचे शीर्षक सरळच, ज्ञानेश्वर माउलींच्या ‘अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू’वरून प्रेरित आहे. मंजूची गंधसंवेदना मोठी अद्भुत, तीव्र आहे. तिच्या अबोध जाणिवांमध्ये फुलांचे, पानांचे, गवताचे, खाद्यपदार्थांचे आणि न जाणो कसले कसले अगणित गंध ठाण मांडून बसलेले आहेत. कधी कधी तर तिला त्यांचा संदर्भही लागत नाही; पण ओळख मात्र पटते. त्या गंधांशी जोडलेल्या माणसांच्या-घटनांच्या आठवणी असतात. तिच्या या विलक्षण गंधसंवेदनेचं चित्रण लेखकाने कमालीच्या कौशल्याने केले. कथेचे शेवटचे वाक्यही तिच्या याच तीव्र गंधसंवेदनेशी सुंदर रीतीने जोडले गेलेय.

‘विकल्पाचिया वाटा’ ही तिसरी कथा आधीच्या दोन कथांच्या मानाने साधी, सरळमार्गी. एरवी, दरेकरांच्या कथा अगदी सर्वसामान्य वाचकांसाठी नसतातच. त्यांची कथा ऐंशी टक्के वाचकांना न उलगडणारी, ‘मनोरंजक’ नसलेलीच. ही तशी साधीच, पण दरेकरांच्या तात्त्विक दृष्टिकोनाचा स्पर्श तिला आहेच.

रूपानं जेमतेम-कुरूप नाही एवढंच, पण सामान्य असूनही आयुष्याने समोर ठेवलेल्या आव्हानांचा खंबीरपणे मुकाबला करणाऱ्या, ठाम निर्णयक्षमता असणाऱ्या, काही बाबतीत असामान्य अशा शुभाची ही कथा.

काही माणसांना दैव बरेच विकल्प- ऑप्शन्स- देते. होय-नाही करत ती त्यातले काही तरी निवडतात. कधी कधी- ‘चुकलेच, ती अमुक वाट निवडायला हवी होती’- म्हणत पस्तावतात, पण खरे म्हणजे, ते विकल्प फसवेच असतात. व्हायचे ते होणारच असते, प्रत्येकाचे दैव ठरलेलेच असते. (जी.एं.च्या ‘विदूषक’ आणि ‘इस्किलार’ या दीर्घकथा, खरे म्हणजे सगळ्याच कथा, अनिलांची ‘हीच माझी वाट होती’ ही दशपदी आठवणं केवळ अपरिहार्य.) काही थोड्या माणसांच्या अखेर ते लक्षात येते. बाकीची मात्र ‘मी ठरवले, ते चुकीचे ठरले, म्हणून असे झाले’- म्हणत तडफडत राहतात. काही भाग्यवानांना ‘आपण योग्य विकल्प निवडला, कल्याण झाले’- असेही वाटते.

पण हे खरे नसतेच! शुभाने ते वेगळ्या संदर्भात, पण लहानपणीच जाणलेय. ‘कुठल्याही वैकल्पिक रीतीने गणित सोडवले तरी उत्तर तेच येणार असते.’ आणि म्हणूनच वास्तवाचा तो ठाम स्वीकार.

दरेकरांची कथा आजच्या मराठी साहित्यात सर्वस्वी वेगळी वाट चोखाळणारी, आपली खास वैशिष्ट्ये घेऊन आलेली आहे. ती पूर्वसूरींपैकी कोणाचाही कित्ता गिरवत नाही. त्यांच्या बहुश्रुत, समृद्ध व्यक्तिमत्त्वाची ती साक्ष आहे; आणि तत्त्वचर्चांच्या- सूक्ष्म संवेदनांच्या आणि अशाच कुठल्या कुठल्या वाटांनी मानवी मनाचा खोल‌ वेध घेण्याची तिची क्षमता असाधारण आहे. मनाचे सूक्ष्म व्यापार उलगडून, त्यांचे ताणेबाणे गुंफून त्यातून घट्ट, बांधीव कथा साकारण्याचं कौशल्यही त्यांच्याकडे आहेच, अर्थात!

कथासंग्रह : आपुला ठावो न‌ सांडिता

कथाकार : प्रा. डॉ. सुरेंद्र दरेकर

प्रकाशक : वर्णमुद्रा प्रकाशन, शेगाव

पृष्ठसंख्या : २३०

किंमत : ४०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com