लोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी !

कृपादान आवळे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला आपली जागा कायम राखण्यात यश आले नाही. या राज्यातील लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवला.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि भाजपचे 'कमळ' फुलले. या निवडणुकीत काँग्रेसच्या संख्याबळात घट होऊन ही संख्या 44 वर आली. तर मोदींचा करिष्मा कामी आल्यामुळे भाजपने बहुमताचा आकडा पार करत 282 संख्या गाठली. भाजपचे लोकसभेतील हे संख्याबळ कायम राहील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या कालावधीत झालेल्या 
पोटनिवडणुकीत भाजपचे संख्याबळ 282 वरून 272 वर येऊन ठेपले. पण काँग्रेसच्या 'हाता'ला या पोटनिवडणुकीत उभारी मिळाली असून, काँग्रेसचे संख्याबळ 44 वरून 48 वर गेले.

नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला आपली जागा कायम राखण्यात यश आले नाही. या राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवला. बळ्ळारी आणि शिमोगा हे लोकसभा मतदारसंघ यापूर्वी भाजपच्या ताब्यात होते. तर मंड्या मतदारसंघ धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) ताब्यात होता. मात्र, या पोटनिवडणुकीत भाजपला केवळ शिमोगा लोकसभा मतदारसंघ कायम राखता आला आहे. तर बळ्ळारीच्या बहुचर्चित जागेवर काँग्रेसने विजय खेचून आणला. पोटनिवडणुकीत झालेल्या या 
पराभवाने भाजपला चांगलाच धक्का बसला. या पोटनिवडणुकांपूर्वी भाजपकडून प्रचारसभाही घेण्यात आल्या होत्या. मात्र, शेवटी भाजपचा पराभव झाला.

पोटनिवडणुकीत होणाऱ्या सलगच्या पराभवामुळे भाजपचे संख्याबळ 272 झाले आहे. ही बाब भाजपने गांभीर्याने घेतली 
आहे. पक्षाचे लोकसभेतील संख्याबळ तब्बल 10 ने घटल्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर मोदी-शहा (अमित शहा) या जोडगोळीकडून मोठी रणनीति आखली जाण्याची दाट शक्यता आहे.    

दरम्यान, लोकसभेतील 543 जागांपैकी बहुमतासाठी लागणारी 272 ही 'मॅजिक फिगर' भाजपकडे असली तरीदेखील घटते संख्याबळ ही बाब भाजपसाठी डोकेदुखीची ठरणार आहे. कारण लोकसभेच्या या पोटनिवडणुकांकडे आगामी लोकसभा 2019 ची 'सेमिफायनल' म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव या जोडगोळीला मोठा विचार करायला लावणार आहे. अन् काँग्रेसचा झालेला हा विजय पक्षासाठी नवी उमेद घेऊन आला आहे. लोकसभेतील खासदारांच्या संख्येत 4 ने वाढ झाल्याने काँग्रेसला 2019 मध्ये 
होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उभारी मिळेल, अशी आशा लागली आहे.

Web Title: In the Lok Sabha Congress seats are Increasing