प्रेम आणि आकर्षण

पांडुरंग माने
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

सध्याच्या मॉडर्न जगामध्ये प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भागच बनत चालला आहे. कोणाला एका क्षणामध्ये प्रेम होते तर कोणाचे पूर्ण आयुष्य निघून गेले तरी प्रेम झालेले समजत नाही, प्रेमाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो तो व्यक्तीभिन्नतेवर अवलंबवून असतो.

शालेय पातळीवर समुपदेशन करत असताना निरिक्षण करताना नेहमी मुला-मुलींमध्ये वारंवार समस्या जाणवत होती ती प्रेम व आकर्षणाची. सध्याच्या इंटरनेटच्या युगामुळे लहान वयोगटातील (इयत्ता सातवीच्या) विद्यार्थीदेखील प्रेमाला खूप महत्त्व देताना दिसतात. मग त्यांच्यामध्ये व्हॅलेंटाईन दिवशी एकमेकांना विश करण्याची क्रेझ दिसते. प्रेम हे फक्त 'व्हॅलेंटाईन डे'ला व्यक्त करायचे नसते, तर प्रेम व्यक्त करायला कोणत्याही खास दिवसाची गरज लागत नाही. एकमेकांनी अनुभवणे, समजून घेणे, आदर करणे, आनंद घेणे यामधून प्रेम समजून येतं.

मुळात आकर्षण म्हणजेच मनाला भावेल असे काही दिसले की आपले पूर्ण लक्ष त्याकडेच केंद्रित होते. दुसऱ्या वेळेस पहिल्यापेक्षा चांगले दिसले की आपोआपच त्याकडे लक्ष खेचले जाते. आकर्षण हे जास्त काळ राहतच नाही. साधारणपणे बालपण आणि तरुणपण यामधील काळ म्हणजेच किशोरवयात मोठ्या प्रमाणात आकर्षण वाढत असते. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटत असते. मुलांच्या वेगळ्या व मुलींच्या यामागच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. किशोरवयात प्रेम झालं असं वाटलं तर ते फक्त आकर्षणाच्याच जोरावर झालेलं असतं. ते फक्त आकर्षणच असतं.

किशोरांना हे आकर्षण नाही, तर खरं प्रेम आहे असंच वाटत असतं, कारण त्यांची प्रेमाची संकल्पना वेगळी असते. प्रेम करण्यासाठी वयाची अट नाही असे म्हटले जाते. पण प्रेम होण्यासाठी योग्य वय व वेळ असणे खूपच गरजेचे ठरते. मानसशास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या विकृती आहेत. प्रत्येक विकृतीची वेगवेगळी लक्षणे आहेत. तसेच येथे प्रेम हे योग्यरीत्या समजून, जाणून, मर्यादा समजून, नाही घेतल्या तर प्रेमातून कधीकधी वर्तनासंबंधीच्या समस्या निर्माण होतात. आकर्षणाच्या जोरावर झालेल्या प्रेमात काही दिवसांनंतर मतभेद तयार होतात. या मतभेदातून कधीकधी आपल्या पार्टनरला मारणे, इजा करणे, धमकी देणे, आत्महत्या करणे अशी वाईट कृत्य होतात. त्यामुळेच प्रेमाचे कधीकधी विकृतीत रुपांतर झाल्याचे दिसते असे म्हणता येईल.

किशोरवयीन विद्यार्थ्यांना प्रेम व आकर्षणाकडे जाण्याची काही कारणे :

1) आई-वडील मुलां-मुलींशी मनमोकळेपणे बोलत नाहीत,

2) मुला-मुलींमध्ये भेदभाव,

3) मित्र-मैत्रीणींची एकमेकांशी तुलना करण्याचे वर्तन

4) मुलां-मुलींवर चीडचीड करणे किंवा मारणे,

5) सोशल-मीडियाचे जास्त आकर्षण

6) मुलां-मुलींना एकटे राहण्याचा कंटाळा येत असतो,

7) किशोरांना फिरायला, मस्ती करायला खूप आवडतं त्यासाठी जवळचं कोणतरी पाहिजे असतं.

बरेच लोक प्रेम करतात. एकाच अनेक वर्षे करत असतात, पण लग्न करायला तयार नसतात. परिवारातील सदस्यांचा त्यांच्यावरही असा अविश्‍वास असतो.., की प्रेमविवाह जास्त काळ टिकत नाही वगैरे. त्यामुळे प्रेम एकाशी, लग्न दुसऱ्याशी असे आपल्याला पाहायला मिळते. लग्न टिकवणे हे व प्रेम निभावणे हे जोडप्यांच्या हातात असतं. मग तो कोणत्याही प्रकारचा विवाह असो- प्रेम टिकविण्यासाठी एकमेकांचा संवाद अतिशय महत्वाचा आहे. सगळ्या गोष्टी, भांडणे बोलण्यातूनच निर्माण होत असतात. कोणतेही नाते टिकवण्यासाठी संवादाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरू शकते.

Web Title: love and attraction: valentine's day