स्वतःचेच 'व्हॅलेंटाइन' होऊया...

मयूर जितकर
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

जो स्वतः:वर निकोप प्रेम करू शकतो, तोच दुसऱ्यावरही खरं प्रेम करू शकतो..नाही का? कधीतरी कातरवेळी एखाद्या टेकडीवर किंवा नदीकाठी एकांतात स्वतः:लाच भेटायला हवे. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं स्वतः:चीच आपुलकीने विचारपूस करायला हवी. भूतकाळातील चुकांबद्दल स्वतः:लाच माफ करायला हवं. स्वतः:शीच हळुवारपणे संवाद साधायला हवा. स्वतः:च स्वतःबरोबर पुन्हा जन्मायला हवं.. एकट्याच्याच सहवासात घातलेले हे काही क्षण पुढच्या वाटचालीसाठी ऊर्जा पुरवतील.

"व्हॅलेंटाइन डे' म्हणजे जगभरातल्या प्रेमीजीवांचा एकमेकांवरच प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस. जगभरातील तरुणाई या दिवशी प्रेमरंगात न्हाऊन निघते. खरंतर, प्रेम हा तारुण्याचा सर्वांत उत्कट आविष्कार. पाश्‍चात्त्य जगतातील "व्हॅलेंटाइन डे'ची संकल्पना भारतीय तरुणाईनं स्वीकारली, त्यालाही आता बराच काळ लोटला आहे. वर्षातील एक दिवसच प्रेम व्यक्त करायचे का या प्रश्‍नापासून या डेला विरोध करणाऱ्या तथाकथित संस्कृतीरक्षकांना दूर सारत 'प्रेमवेडी' तरुणाई प्रेमाच्या शोधात धावतेच आहे. "व्हॅलेंटाइन डे' दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीवर शुभेच्छापत्रे (ग्रीटिंग्ज), महागड्या भेटवस्तू, टेडी बिअरच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला जातो. अर्थात, प्रेम फक्त प्रियकर व प्रेयसीमधले नसते तर ते आई, वडील, भाऊ, बहीण, मित्रांपासून देशावरही केले जाते.

या पार्श्‍वभूमीवर नुकताचं घडलेला एक प्रसंग आठवतो. काही दिवसांपूवीची गोष्ट. "सकाळ' कार्यालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये सहजच कॉफीचा आस्वाद घेत होतो. कॅन्टीनमधील शेवटच्या लांबलचक डेस्कवर आरामशीरपणे बसून चहाकॉफी घेणं, नाश्‍ता किंवा जेवण करणं माझ्याप्रमाणेच अनेकांना प्रिय. त्यातही, खिडकीशेजारची जागा तर "मोस्ट फेव्हरेट'. मात्र, यावेळी संध्याकाळच्या वेळेस मी एकटाच या डेस्कवर बसून निवांतपणे कॉफीपान करत होतो. कधीकधी असं एकट्यानं बसायला मला हवंच असत. तितक्‍यात समोरून एक सहकारी मित्र माझ्याजवळ आला. कदाचित मला एकट्याला पाहून सोबत करण्याची त्याची इच्छा असावी. "का रे एकटाच बसलास, बाकीचे सहकारी कुठं गेले?'', त्यानं विचारलं. मी म्हणालो, ""अरे, बाकीचे आहेत, पण मी एकटाच आलो...स्वत:चीही सोबत करता यायला हवी कधीकधी. स्वतः:च स्वत:ला आवडायला हवं''. मी उत्तरलो. माझ्या या उत्तरावर तो थोडासा अंतर्मुख झाला.

माझ्या मनात विचारांचे अनेक तरंग उमटू लागले. आपण नेहमी कुठल्याही प्रसंगात सोबत शोधतो. अर्थात, ते स्वाभाविकही आहे. मात्र, दुसऱ्यावर प्रेम करता करता स्वतः:लाच विसरून तर जात नाही ना, काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला "जब वी मेट' हा चित्रपट आठवतो का, प्रचंड संपत्ती असूनही जगण्याला विटलेला नायक धावत्या रेल्वेतून उडी मारून आयुष्यच संपवून टाकण्याच्या विचारात असतो. त्याला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर स्वतः:च्या गावाकडं निघालेली व स्वत:च्याच मस्तीत जगणारी नायिका भेटते. "मै खुद कीही फेवरेट हूँ'' असं म्हणणाऱ्या व स्वत:वरच निरतिशय प्रेम करणाऱ्या या नायिकेमुळे नायकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपल्यापैकी कितीजण असं स्वत:चेच "फेव्हरेट' असतात. स्वतः:तील दोष, रंगरुपाबद्दल तक्रार करणारे अनेक जण भेटतील. स्वतः:ला आहे तसं स्वीकारून स्वत:वरच प्रेम करणारे किती?, स्वत:वरील प्रेम आटल्यामुळेच माणसं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असतील का?. घरदार सोडून निघून जात असतील का?, व्यसनाच्या पाशात स्वतः:ला अडकून घेत असतील का?, स्वतः:चाच विसर पडावा म्हणून....खरंतर, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे ज्याची त्यानेच शोधलेली बरी.

दुसऱ्यांवर समर्पित भावनेने प्रेम करणं ही अत्यंत उच्च प्रतीची गोष्ट आहे, यात शंकाच नाही. मात्र, त्यामुळे स्वतः:वर अन्याय करण्याची काहीच गरज नाही. जो स्वतः:वर निकोप प्रेम करू शकतो, तोच दुसऱ्यावरही खरं प्रेम करू शकतो..नाही का? कधीतरी कातरवेळी एखाद्या टेकडीवर किंवा नदीकाठी एकांतात स्वतः:लाच भेटायला हवे. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं स्वतः:चीच आपुलकीने विचारपूस करायला हवी. भूतकाळातील चुकांबद्दल स्वतः:लाच माफ करायला हवं. स्वतः:शीच हळुवारपणे संवाद साधायला हवा. स्वतः:च स्वतःबरोबर पुन्हा जन्मायला हवं.. एकट्याच्याच सहवासात घातलेले हे काही क्षण पुढच्या वाटचालीसाठी ऊर्जा पुरवतील. खरंतर आपण जन्मल्याबरोबरच आपल्याला अनेक नाती आपोआप मिळतात. पण, कधीतरी स्वतः:बरोबरच नातंही जन्मायला हवे. स्वतः:चाच शोध घेण्यासाठी,,,आजच्या या प्रेमाच्या दिवशी दुसऱ्यांवर प्रेम व्यक्त करताना जरा स्वतः:च्याही प्रेमात पडू या..स्वतः:च स्वतः:चे "फेवरेट' होऊया..स्वतः:च स्वतः:चे "व्हॅलेंटाइन' होऊया...त्यासाठी हार्दिक शुभेच्छा..हॅपी व्हॅलेंटाइन डे...

Web Title: Love yourself