सत्तर टक्के, लुच्चे पक्के ! 

माधव गाडगीळ
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

अनेक संघप्रिय पशु व्हॅम्पायर वटवाघळांप्रमाणेच रक्तबंधापलीकडे जाऊन एकमेकांना मदत करतात. विविध जातींची माकडे एकमेकांचे केस विंचरतात, त्यातल्या उवा-लिखा साफ करतात. यात नातेसंबंध महत्त्वाचे असतातच, पण त्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करत जुळलेली मैत्रीही महत्त्वाची असते.

अनेकदा, अनेक समाजांत सच्च्यांची पीछेहाट आणि लुच्च्यांची भरभराट होत राहते. 
कोणत्याही समाजात सच्चे-लुच्चे यांचे प्रमाण बदलत राहते, पण सरासरीने सच्च्यांहून लुच्चेच जास्त प्रमाणात आढळतात. या कालचक्रात आजमितीस सच्च्यांचे प्रमाण बहुधा पार रसातळाला पोचले असावे. 

भर्तृहरी नीतिशतकात सांगतो, की चार प्रकारच्या व्यक्ती असतात. स्वतःच्या स्वार्थाची पर्वा न करता परार्थ साधणारे सत्पुरुष, स्वतःचा स्वार्थ जपत दुसऱ्यांना मदत करणारे सर्वसामान्य जन, स्वार्थापायी दुसऱ्यांचा घात करणारे दुर्जन आणि केवळ आकसापोटी दुसऱ्यांना हानी पोचवणारे मनुष्यराक्षस. प्राणिजगतात सत्पुरुषांची फार थोडी, पण कामकरी मुंग्या-मधमाश्‍यांसारखी सत्स्त्रियांची अनेक उदाहरणे आहेत. या सत्स्त्रिया आपल्या गोतावळ्यासाठी झिजतात, प्रसंगी प्राणार्पण करतात. पण असे निःस्वार्थी आचरण आप्तपरिवारापुरते सीमित असते. इतर अनेक जातींचे प्राणी निव्वळ आपल्या आप्तांनाच नव्हे, तर आपल्या इष्ट मित्रांनाही मनापासून मदत करतात. अशातलीच आहेत अमेरिकेतली रक्तपिपासू व्हॅम्पायर वटवाघळे. एकेका निवाऱ्यात शेकडो वटवाघळे एकत्र राहतात. व्हॅम्पायर रक्त प्यायल्याशिवाय दोन दिवसांहून जास्त जगू शकत नाहीत; आणि रोज त्यांना रक्त प्यायला मिळतेच असे नाही. तेव्हा निवाऱ्यात परतल्यावर ते नित्यनेमाने एकमेकांना रक्त पाजतात; नात्यातल्यांना तर पाजतातच, पण पूर्वी ज्या इतरांनी पाजले त्यांनाही आठवणीने, कृतज्ञतेने पाजतात. 

अनेक संघप्रिय पशु व्हॅम्पायर वटवाघळांप्रमाणेच रक्तबंधापलीकडे जाऊन एकमेकांना मदत करतात. विविध जातींची माकडे एकमेकांचे केस विंचरतात, त्यातल्या उवा-लिखा साफ करतात. यात नातेसंबंध महत्त्वाचे असतातच, पण त्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करत जुळलेली मैत्रीही महत्त्वाची असते. अशी परस्पर सेवा नेहमीच चालू असते, पण माद्या माजावर आल्या की नरांच्या प्रेमाला भरते येते, माद्यांचे केस विंचरताना ते प्रियाराधनही साधतात. आफ्रिकेतली अशीच संघप्रिय मीरकॅट मुंगसे एकमेकांची त्वचा नेहमी साफ करतात; या मुंगसांची खासियत म्हणजे माणसांप्रमाणेच त्यांच्या कळपातले खालच्या पायरीवरचे नर पाठ खाजवत आपल्याहून बलिष्ठ नरांची मर्जी संपादतात. 

इतर सर्व पशूंहून मोठ्या प्रमाणात मनुष्यप्राणी एकमेकांशी तऱ्हतऱ्हेने हातमिळवणी करतो. "एकमेकां करू साह्य, अवघे धरू सुपंथ' या तत्त्वावरच मानवी समाज इतक्‍या प्रगत अवस्थेला पोचले आहेत. अशा मानवी संबंधांत मदतीची परतफेड तत्क्षणी केली जाईल अशी काहीच अपेक्षा नसते, ती अगदी सावकाशीनेही होऊ शकते. दशरथाने दिलेल्या वचनाची आठवण कैकेयी अनेक वर्षांनी करून देऊ शकते. शोकाकुल झाला तरी दशरथ कैकेयीच्या मोलाच्या मदतीची परतफेड करतो. पण सर्वसामान्य मानवी संबंधांत अनेकदा लुच्चे हे सच्च्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात; वेळप्रसंगी त्यांना तोंडघशी पाडतात. मग सच्च्यांना "भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा' असे म्हणत लुच्च्यांना वठणीवर आणायचा प्रसंग येतो. हे नेहमीच जमते असेही नाही, तेव्हा अनेकदा, अनेक समाजांत सच्च्यांची पीछेहाट आणि लुच्च्यांची भरभराट होत राहते. 

मार्टिन नोवाक या शास्त्रज्ञाने या विषयाचा मोठा उद्बोधक अभ्यास केला आहे. त्याने गृहीत धरले आहे की जेव्हा लुच्च्यांना सच्च्यांचा गैरफायदा घ्यायला जमतो, तेव्हा अशा व्यवहारातून लुच्च्यांचा भरपूर फायदा व सच्च्यांचा खूप तोटा होतो; उलट जेव्हा सच्च्या-सच्च्यांत व्यवहार चालतात, तेव्हा त्या दोघांनाही व्यवस्थित फायदा होतो. मात्र लुच्च्या-लुच्च्यांच्या परस्परव्यवहारात दोघांनाही अगदीच माफक फायदा होतो. मग नोवाक प्रश्न उपस्थित करतो, की अशा परिस्थितीत समाजात लुच्च्यांचे किती आणि सच्च्यांचे किती प्रमाण असेल? याचे उत्तर शोधायला नोवाक संगणकसृष्टीत गणिती सूत्ररूपात एक कथानक रचतो आणि या कथानकात कशा कशा घटना घडत राहतील, आणि सच्च्या-लुच्च्यांचे प्रमाण कसे बदलत राहील याचा मागोवा घेतो. 

नोवाकची कथानके दाखवून देतात की लुच्च्या-सच्च्यांचा अगदी स्थिर, एकच समतोल अशक्‍य आहे, त्यांचे प्रमाण सतत हेलकावे खात राहणार. जेव्हा समाजात जवळजवळ सगळेच सच्चे असतात, तेव्हा ते गैरसावध राहतात आणि जे थोडे लुच्चे घुसले आहेत ते सच्च्यांना सहजी ठकवत आपल्या पोळीवर तूप ओढून घेऊ शकतात. अशा परिस्थितीत लुच्च्यांचे प्रमाण झपाट्याने वाढायला लागते. पण असे वाढले की सच्चे जागे होतात, लुच्च्यांशी सावधपणे वागतात, शक्‍य तोवर लुच्च्यांना बाजूला सारून संघटितपणे परस्परांशी व्यवहार करू लागतात आणि लुच्च्यांची पूर्ण सरशी न होता त्यांचे प्रमाण पुन्हा घटू लागते. काळाच्या ओघात लुच्चे खूप कमी झाले की सच्चे गैरसावध बनतात आणि पुन्हा लुच्च्यांचे फावते, त्यांचे प्रमाण वाढू लागते. नोवाकचे कथानक दाखवते की सच्चे पुरेसे चटकन सावध होऊन लुच्च्यांना टाळू शकत नाहीत आणि परिणामी या चक्रात कमी- जास्त होत राहिले तरी लुच्चेच बहुसंख्य असतात, नोवाकच्या हिशेबाप्रमाणे सरासरीने सत्तर टक्के! अर्थात अशा कथानकांहून वास्तव खूपच गुंतागुंतीचे आहे, पण तरीही या अभ्यासातून काय घडेल याचे बऱ्यापैकी आकलन होऊ शकते. 

जैन मतप्रणालीप्रमाणेही कालचक्र कायम फिरत राहते. काही काळ ते दुःखाकडून सुखाकडे प्रवास करते, हा असतो विकासकाल; उलट जेव्हा ते सुखाकडून दुःखाकडे फिरत असते तो असतो अवनतिकाल. नोवाकच्या कालचक्रात जेव्हा समाजात लुच्च्यांचे प्रमाण घटत असते तो ठरेल विकासकाल आणि वाढत असेल तो ठरेल अवनतिकाल. आज दावा केला जातो आहे की आपला विकासाचा गाडा भरधाव धावतो आहे. हे खरे असेल तर समाजात लुच्च्यांचे प्रमाण घटत असायला हवे. विचार करण्याजोगा विषय आहे, कारण मला तरी अशी काही चिन्हे अजिबातच दिसत नाही आहेत.

Web Title: Madhav Gadgil writes about mongoose