एका दीर्घकाव्याचं चरित्र

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गौतम बुद्ध आणि गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची पाश्चिमात्य जगाला ओळख झाली ती मुख्यत्वे सर एडविन अॅर्नाल्ड यांच्या ‘द लाइट ऑफ एशिया’ किंवा ‘द ग्रेट रिन्युन्सिएशन’ या दीर्घ कवितेमुळे.
Book
BookSakal

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गौतम बुद्ध आणि गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची पाश्चिमात्य जगाला ओळख झाली ती मुख्यत्वे सर एडविन अॅर्नाल्ड यांच्या ‘द लाइट ऑफ एशिया’ किंवा ‘द ग्रेट रिन्युन्सिएशन’ या दीर्घ कवितेमुळे. जुलै १८७९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या दीर्घ कवितेने जगभरातल्या अनेक अभ्यासकांना, विचारवंतांना भुरळ घातली होती. गौतम बुद्धांचा जीवनप्रवास मांडणाऱ्या ‘ललितविस्तर’ या तिसऱ्या शतकातल्या ग्रंथाच्या आधारे लिहिलेल्या या दीर्घ कवितेचा मराठी आणि हिंदीसह तीसपेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादही झाला आहे.

अभ्यासक-लेखक म्हणून परिचित असणारे माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री, राज्य सभा सदस्य जयराम रमेश यांनी त्यांच्या ‘द लाइट ऑफ एशिया - द पोएम दॅट डिफाइन्ड द बुद्धा’ या ताज्या पुस्तकात सर एडविन अॅर्नाल्ड यांच्या या महत्त्वाच्या साहित्यकृतीचा अत्यंत रंजक प्रवास उलगडला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच रमेश म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे हे ताजे पुस्तक सर अॅर्नाल्ड यांच्या दीर्घकाव्याचे चरित्र आहे.

भारतातली अरण्ये, वन्यजीव, नद्या, समुद्र किनारे आणि एकूणच पर्यावरणाच्या संरक्षण, संवर्धनासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेली कामगिरी मांडणाऱ्या ‘इंदिरा गांधीः अ लाइफ इन नेचर’ या पुस्तकानंतर प्रसिद्ध झालेले रमेश यांचे हे तिसरे पुस्तक. त्याआधी त्यांची इंदिरा गांधी आणि सनदी अधिकारी पी.एन. हक्सर यांच्यावरचे ‘इन्ट्वाईन्ड लाइव्हज् : पी.एन. हक्सर अॅण्ड इंदिरा गांधी’ आणि ‘अ चेकर्ड ब्रिलियन्सः द मेनी लाइव्हज् ऑफ व्ही.के. कृष्ण मेनन’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली होती.

‘प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच (सर एडविन अॅर्नाल्ड यांच्या) या पुस्तकाने इंग्लंड हलवून सोडले, आणि नंतर थोड्याच काळात अमेरिकेत आणि युरोपातही या पुस्तकाचा बोलबाला झाला. एकोणिसाव्या शतकात गौतम बुद्धांच्या जीवनाचा आणि तत्त्वज्ञानाचा नव्याने अभ्यास करणाऱ्यांसाठी हे दीर्घकाव्य एक मैलाचा दगड ठरले,’ असे रमेश ‘द लाइट ऑफ एशिया’चा प्रवास उलगडताना लिहितात.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून साहित्यापासून ते विज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रांमधल्या अनेक व्यक्तींवर गौतम बुद्धांवरच्या या दीर्घकाव्याचा प्रभाव पडला होता. त्यात स्वामी विवेकानंद होते, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. बौद्ध धर्माचे श्रीलंकेतील एक गाढे अभ्यासक अनगारिका धर्मपाल यांच्यासह नोबेल पारितोषिक मिळविणारे रूडयार्ड किपलिंग, रवींद्रनाथ टागोर, डब्ल्यू.बी. यिट्स, इव्हान बुनिन, टी.एस. इलिएट यांच्यासह लिओ टॉलस्टॉय, डी.एच. लॉरेन्स हे साहित्यिक, भौतिकशास्त्राचे नोबेल मिळविणारे सी.व्ही. रामन, पिरिऑडिक टेबल्स् शोधणारे रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव्ह, दानशूर स्कॉटिश-अमेरिकन उद्योजक अॅन्ड्र्यू कार्नेजी अशा अनेकांना ‘द लाइट ऑफ एशिया’ने मोहवून टाकले होते.

चौदा दक्षिण आशियायी, आठ उत्तर आणि ईशान्य आशियायी आणि तेरा युरोपीय भाषांमध्ये गेलेल्या दीर्घ कवितेने जगभरात अनेक नृत्यनाटिकांना, संगीतिकांना, नाटकांना प्रेरणा दिली आहे. अमेरिकेत. कॅनडात, जर्मनीत. युरोपात अनेकांनी त्यावर डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहिले, संशोधनात्मक लेख लिहिले. त्यातला अगदी अलीकडचा प्रबंध गेल्या वर्षी फेब्रुवारीत लिहिला गेला. मूकपटांच्या जमान्यात, १९२५ मध्ये, जर्मन चित्रपट निर्मात्यांच्या सहकार्याने या दीर्घकाव्यावर आधारित पहिला चित्रपटही झळकला. हा चित्रपट इंग्रजी, जर्मन आणि हिंदी असा त्रिभाषक होता आणि त्याच्या हिंदी आवृत्तीचे नाव होते, ‘प्रेमसंन्यास’. मात्र, गौतम बुद्धांवरचा पहिला भारतीय चित्रपट म्हणजे दादासाहेब फाळके यांचा ‘बुद्धदेव’. ‘प्रेमसंन्यास’च्या दोन वर्षे आधीच तो प्रदर्शित झाला होता. पण दादासाहेब फाळके यांच्या या चित्रपटाविषयी अधिक काही सांगता येत नाही, असेही रमेश नोंदवितात. निरंजन पाल यांनी ‘प्रेमसंन्यास’ची पटकथा लिहिली होती. निरंजन हे क्रांतिकारक बिपिनचंद्र पाल यांचे चिरंजीव.

चरित्रविषय असलेल्या दीर्घकाव्याइतकाच हे काव्य रचणाऱ्या सर एडविन अॅर्नाल्ड यांचाही प्रवास रंजक आहे. महाराष्ट्राशी, विशेषतः पुण्याशी, अगदी जवळून नाते सांगणाऱ्या सर अॅर्नाल्ड यांचाही परिचय या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकांना नव्याने होतो. लंडन जवळच्या ग्रेव्हज्एन्डमध्ये २४ जून १८३२ रोजी जन्मलेले एडविन अॅर्नाल्ड वयाच्या अवघ्या पंचविशीत, त्यावेळच्या ‘पूना कॉलेज’चे प्राचार्य म्हणून पुण्यात आले होते. हे ‘पूना कॉलेज’ म्हणजेच आता द्विशताब्दी साजरी करणारे पुण्यातले प्रसिद्ध डेक्कन कॉलेज.

सर अॅर्नाल्ड १८५७ च्या अखेरीस पत्नी आणि लहान मुलासह पुण्यात आले. जेम्स मोल्सवर्थ यांच्याबरोबर पहिल्या मराठी-इंग्रजी शब्दकोशाची निर्मिती करणारे थॉमस कॅन्डी यांच्यानंतरचे ते पूना कॉलेजचे (नंतर डेक्कन कॉलेज) दुसरे प्राचार्य. दोन -सव्वादोन वर्षे अॅर्नाल्ड पुण्यात होते. कृष्णशास्त्री चिपळूणकरांकडून त्यांनी पुण्यात संस्कृत आणि मराठीचे धडे घेतले. संस्कृत आणि मराठीसह ग्रीक, लॅटिन, अरेबिक, पर्शियन, हिब्रू, जपानी अशा अकरा भाषांवर अॅर्नाल्ड यांचे प्रभुत्व होते. पुण्याच्या वास्तव्यात अॅर्नाल्ड यांनी मराठी आणि इंग्रजी शब्दसंग्रहासह ‘हितोपदेशा’चे भाषांतर प्रसिद्ध केले, वनस्पतिशास्त्राचा आणि आकाश निरीक्षणाचा छंद जोपासला, तत्कालीन सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीविषयी भाष्यही केले. लंडनला परतल्यानंतर सर अॅर्नाल्ड जवळजवळ चाळीस वर्षे लंडनच्या ‘डेली टेलिग्राफ’साठी मुख्य लेख लिहीत असत.

याच काळात महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या स्त्रिया आणि अस्पृश्यांसाठीच्या शिक्षणाच्या चळवळीने पुण्यामध्ये जोर धरला होता. महात्मा फुले यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या फेब्रुवारी १८५८मध्ये झालेल्या एका परीक्षेला पुण्याचे न्यायाधीश सी.एम. हॅरिसन यांच्यासोबत अॅर्नाल्डही उपस्थित असल्याची एक नोंद सापडते, मात्र महात्मा फुले आणि अॅर्नाल्ड यांची प्रत्यक्ष भेट झाली होती की नाही हे कळण्यास मार्ग नाही, असे रमेश नमूद करतात. एकोणिसाव्या शतकातल्या पुण्यातले कागद, कापूस आणि बर्फ उद्योगाचे प्रवर्तक असणाऱ्या पदमजी कुटुंबातले दोराबजी, सोराबजी आणि नौरोजी हे तीन बंधू, पुढे संस्कृत पंडित म्हणून मान्यता पावलेले रा.गो. भांडारकर हे त्यांचे त्यावेळचे विद्यार्थी.

तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांची प्रस्तावना लाभलेल्या दोन भागातल्या या पुस्तकाचा पहिला भाग वाचकांना सर अॅर्नाल्ड यांची ओळख करून देतो. अॅर्नाल्ड यांच्या दीर्घकाव्याला मिळालेली प्रसिद्धी, यश यांच्याबरोबरीनेच त्यावर झालेली टीका, या काव्याची भाषांतरे, सर अॅर्नाल्ड आणि भारत, श्रीलंका (त्यावेळचे सिलोन), अमेरिका व जपान तसेच महात्मा गांधी, श्री. अरबिंदो आणि स्वामी विवेकानंद यांच्यावर असलेला ‘लाइट ऑफ एशिया’चा प्रभाव या विषयांसह, या दीर्घकाव्याचा १८७९पासून सुरू झालेला प्रवास उलगडणारी आठ प्रकरणे पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आहेत.

विस्तृत संदर्भ आणि टीपा हे जयराम रमेश यांच्या लिखाणाचे आणखी एक वैशिष्ट्य. ते याही पुस्तकात दिसते. या संदर्भांमुळे आणि टीपांमुळे निवेदनाला वजन लाभतेच पण वाचकांनाही पुस्तक समजावून घेताना अधिकाधिक स्पष्टता मिळत जाते. सर अॅर्नाल्ड यांच्या दीर्घ काव्याच्या या चरित्राचे नव्या पिढीतील वाचक, अभ्यासकांकडून स्वागत होईल, याची खात्री वाटते.

पुस्तकाचं नाव :

‘द लाइट ऑफ एशिया -द पोएम दॅट डिफाइन्ड द बुद्धा’

प्रकाशक : इंडिया व्हायकिंग, न्यूयॉर्क

पृष्ठं : ४४८

मूल्य : ७९९ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com