सहेला रे...आ मिल गाए! (मधुवंती बोरगावकर)

मधुवंती बोरगावकर
रविवार, 14 जानेवारी 2018

किशोरीताई नेहमीच म्हणायच्या : ‘‘आकार हा कोणत्याही गायकाला कॉपी करणारा नसावा, तर तो आकार निखळ, शुद्ध असला पाहिजे. शिवाय, तयारीपेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे गायकाकडून रागाचा, बंदिशीचा भाव जपला जाणं. तो जपला जायला हवा.’’

किशोरीताई नेहमीच म्हणायच्या : ‘‘आकार हा कोणत्याही गायकाला कॉपी करणारा नसावा, तर तो आकार निखळ, शुद्ध असला पाहिजे. शिवाय, तयारीपेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे गायकाकडून रागाचा, बंदिशीचा भाव जपला जाणं. तो जपला जायला हवा.’’

मला शास्त्रीय संगीताची तालीम माझ्या कुटुंबातूनच मिळाली आणि कुटुंबातूनच माझ्या सांगीतिक वाटचालीची सुरवात झाली. लातूरमधल्या बोरगावकर या सांगीतिक कुटुंबातल्या चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व मी करते. लातूरमध्ये ज्या वेळी शास्त्रीय गायनाची मैफल असायची, त्या वेळी तंबोरा बाहेरगावाहून आणावा लागत असे. अशा काळात लातूरमध्ये माझ्या पणजोबांनी म्हणजे पंडित बाबा बोरगावकर यांनी शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार होण्यासाठी स्वत: बानूबाई करीम खाँ (अब्दुल करीम खाँ यांच्या पत्नी) यांच्या मार्गदर्शनानुसार लातूरमध्ये शास्त्रीय संगीत विद्यालय सुरू केलं. काही काळातच संगीतक्षेत्रातले अनेक दिग्गज कलावंत संगीतविद्यालयात येऊन गेले. पंडित भीमसेन जोशी, प्रभा अत्रे, कीर्ती शिलेदार, जयमाला शिलेदार, जगदीश खेबुडकर यांनी विद्यालयाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. असा सांगीतिक कौटुंबिक वारसा लाभल्यामुळं लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे संस्कार माझ्यावर घरातूनच घडत गेले. माझे वडील आणि गुरू पंडित सूरमणी बाबूराव बोरगावकर यांनी आम्हा भावंडांना एकत्र बसवून शास्त्रीय संगीताची तालीम दिली, तर पणजोबा, तसंच आजोबा गोविंदराव बोरगावकर न चुकता रोज रियाजाचा तास घ्यायचे. माझ्या वडिलांकडून मला शास्त्रीय गायनाचं व संवादिनीचं शिक्षण मिळालं, तर माझे काका पंडित तालमणी राम बोरगावकर तबलावादक असल्यामुळं तालवाद्याचं शिक्षण मला त्यांच्याकडून लहानपणीच मिळालं. एकीकडं शालेय शिक्षणाची शर्यत पार पाडत असतानाच दुसऱ्या बाजूला शास्त्रीय संगीताची तालीम सुरू होती. सांगीतिक वारसा असल्यामुळं लहानपणापासूनच माझ्या मनात शास्त्रीय संगीताबद्दलची ओढ निर्माण झालेली होतीच.  त्या काळी वडिलांसोबत अनेक मैफलींना जाण्याची संधी मिळाली. काही वेळा वडिलांना तानपुऱ्यावर साथ केली; यामुळं माझ्या मनात आत्मविश्वास निर्माण होत गेला. ‘स्वरसाधना समिती’तर्फे घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय शास्त्रीय संगीत स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला. त्या वेळी मी सात वर्षांची होते.पुढं काही वर्षांततच पुण्यात मला ‘संगीतोन्मेष’ पुरस्कारही मिळाला. माझ्या स्वरप्रवासातले हे टप्पे मला नेहमीच प्रोत्साहन देणारे ठरले.

गायन सुरू असतानाच माझं नेहमीचं शिक्षणही सुरू होतं. घरात वडील गायनाचे धडे देत होते, तर माझी आई सरोज बोरगांवकर ही संगीताची शिक्षिका  असल्यामुळं शाळेतही संगीताचं प्रशिक्षण मला मिळत गेलं. परिणामी, संगीत हा माझ्या आयुष्याचाच एक भाग बनून गेला. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण कला शाखेत घेण्याचा निर्णय घेतला. कारण, कला शाखेत संगीत हा विषय घेण्याचा पर्याय होता.
***

...आणि एक दिवस माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आला. बोरगावकर कुटुंबाच्या स्वरसाधनेतून लातूर इथं सरस्वतीमंदिर उभारण्यात आलं आहे. या मंदिरातल्या सरस्वतीदेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांना आमंत्रित करण्याचं ठरलं. ताईंनी त्यासाठी लगेच होकार दिला आणि ताई लातूरला आमच्याकडं तीन दिवस राहिल्या. त्या वेळी ताईंनी स्वरसाधनेच्या माध्यमातून सरस्वतीदेवीची केलेली आराधना पाहून मी स्तब्ध झाले. याच काळात मला ताईंच्या समोर पहिल्यांदा गायनाची संधी मिळाली. ताईंनी माझ्या गायनाचं कौतुक केलं. ताई परत मुंबईला गेल्यानंतर मी व माझा भाऊ मंगेश आम्ही दोघांनी ताईंकडं शास्त्रीय संगीताचं शिक्षण घ्यायला सुरवात केली आणि ताईंनी मला शिष्या म्हणून स्वीकारलं. वडिलांचं घराणं किराणा आणि ताईंचं घराणं जयपूर-अत्रौली...यामुळं ताईंकडं शिकत असताना माझी चांगलीच तारांबळ उडाली. ताईंनी मात्र मला ‘सा’ लावण्यापासून सगळं काही इतकं शिस्तबद्धरीत्या शिकवलं, की मी नकळतच त्यांच्या गायनाच्या जवळ गेले.‘आकार,’ एका स्वरावर थांबण्याचा श्वासाचा वेळ, तसंच  थाटांतले अलंकार आणि त्यांचा तिन्ही सप्तकांत विस्तार यांचा भरपूर रियाज ताईंनी करून घेतला.

ताई या कडक शिस्तीच्या होत्या, त्यांना नेहमी वाटायचं की प्रत्येकानं शिस्तीत राहावं...प्रत्येकानं नेहमी वेळेत यावं, यात विद्यार्थ्यांही आलेच...पण ताईंच्या शिस्तीच्या चौकटीत रुळण्यासाठी मला काहीसा वेळ लागला. सुरवातीला मी माझ्या वडिलांसोबत लातूर-मुंबई ये-जा केली. सलग आठ दिवस मुंबईत राहून मी ताईंकडं जात असे; पण ताई यावरून एकदा चिडल्या. मला म्हणाल्या : ‘‘तू आता मोठी आहेस, वडिलांशिवाय तू राहू शकतेस...’’

त्यांच्या या चिडण्याचा सकारात्मक परिणाम असा घडून आला, की माझ्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. यानंतर मी दादरला राहायला लागले.
ताईंनी बोलावलं की लगेच निघावं लागत असे. त्या वेळी माझ्याकडं स्वत:चं वाहन नव्हतं; त्यामुळं ‘बेस्ट’शिवायचा अन्य पर्याय माझ्याकडं नव्हता. मुंबईच्या वाहतुकीचा मला पहिले काही महिने अंदाज नव्हता; त्यामुळं ताईंच्या घरी प्रभादेवीला पोचेपर्यंत उशीर व्हायचा. गेलं की ताई समोरच्या खोलीतच बसलेल्या असायच्या. त्यामुळं ‘आज आपण नक्की ताईंची बोलणी खाणार’ असं मनात असायचं. मी नवीन असल्यामुळं सुरवातीला ताईंनी काणाडोळा केला; पण नंतर ताईंनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली. ताई त्या वेळी रागवल्यामुळं माझ्या एकूणच जीवनाला, गायनाला शिस्तीची किनार लाभली. ताई रागवत असत; पण त्यांच्या रागवण्यात प्रेम, माया होती. ताई रियाजाच्या खोलीत जायच्या तेव्हा तानपुऱ्याच्या नादावरून जे वातावरण निर्माण व्हायचं, त्यावरूनच ताई आज कोणता राग गाणार, हे समजून येत असे. शब्दांविना वातावरणावरूनच एखाद्या भावाची उत्पत्ती होत असे. इतकी त्यांची प्रतिभाशक्ती होती.

ताई नेहमी म्हणायच्या : ‘‘आकार हा कोणत्याही गायकाला कॉपी करणारा नसावा, तर तो आकार निखळ, शुद्ध असला पाहिजे.’’ त्यानंतर ताईंनी बंदिशी, त्यामध्ये आलाप, ताना हे शिकवलं. ताईंनी शास्त्रीय गयानाबरोबरच भजन, ठुमरी हेही शिकवलं. त्या म्हणायच्या :‘‘-मी जे गाते तेच तुम्ही गाऊ नका, तर तुम्ही गाण्यात माझ्यासारखी व्हेरिएशन्स/ नावीन्य आणायला शिका. कोणत्याही गीतप्रकारचा भाव जाणून त्यामध्ये कोणत्या पद्धतीचं नावीन्य जुळतं, कशा पद्धतीची आलापी हवी ते शिकलं पाहिजे.’’
-माझ्या वडिलांचं संगीतघराणं आणि ताईंचं संगीतघराणं दोन्ही वेगवगेळी होती, यामुळं माझ्या मनात सतत शंका असायची, की आपण शास्त्रीय संगीताच्या एक घराण्यात तालीम घेत असताना दुसऱ्या घराण्याचं गायन ऐकून त्याचा आपल्या गानशैलीवर प्रभाव पडला तर? जर प्रभाव पडला तर तो रास्त आहे का? ताईंनी कधीच संगीताच्या घराण्यांमध्ये भेदभाव केला नाही. ताईंनी आम्हाला सांगितलं : ‘‘प्रत्येक गायकाचं गाणं ऐका, प्रत्येक घराण्याच गाणं ऐका, ज्या ज्या चांगल्या गोष्टी प्रत्येकाकडून मिळतील त्या त्या तुमच्या गाण्यात आत्मसात करा.’’
***

मला आठवतं, की राग भीमपलास जवळपास आम्ही एक वर्षभर गात होतो, तरीही तो कधी एकसारखा वाटला नाही. त्यात रोज नावीन्य, चैतन्य वाटायचं. यामुळं एकाच रागाच्या अनेक छटा आम्हाला ताईंकडून शिकायला मिळाला. एकदा ताईंनी ‘दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रा’च्या युवकमहोत्सवात गाणं सादर करण्याची मला संधी दिली. त्या वेळी राग भीमपलास गायचा होता. कार्यक्रमाच्या आधी मी ताईंचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले. त्यांना मी विचारलं : ‘‘ताई, मी कार्यक्रमात भीमपलास गाणार आहे, माझं सादरीकरण चांगलं होईल का?’’

ताई इतकंच म्हणाल्या : ‘‘भीमपलास म्हणजे कारुण्य. तू गाताना ते कारुण्य प्रत्येक क्षणी दिसलं पाहिजे.’’ अशा पद्धतीनं ताईंनी संगीत हे कसं वैश्विक आहे, याचं आकलन आम्हाला दिलं. ताई सतत म्हणायच्या : ‘‘तयारीपेक्षा महत्त्वाचं असतं, ते म्हणजे गायकाकडून रागाचा, बंदिशीचा भाव जपला जाणं. तो जपला गेला पाहिजे.’’
गोवा इथल्या एका कार्यक्रमातही ताईंनी मला तानपुऱ्यावर साथ करण्याची संधी दिली, हे माझं अहोभाग्यच. त्या वेळी त्यांनी माझ्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आजही प्रेरणा देणारी, आत्मविश्वास देणारी वाटते. ताईंच्या शिकवणीची शिदोरी आयुष्यभर पुरेल अशी आहे. त्यामुळंच माझा हा स्वरप्रवास अखंडितपणे सुरू आहे.
शेवटी, ताई एका बंदिशीतून म्हणतातच ना  :
सहेला रे...आ मिल गाए...सप्तसुरन के भेद सुनाए...जनम जनम को संग न भूले...अब के मिले तो बिछुड न जाए...

सहेला रे...आ मिल गाए...जनम जनम को संग न भूले!

Web Title: madhuvanti borgaokar write article in saptarang