महाराष्ट्रातील उन्हाळा : पैलू आणि स्वतःची काळजी

जसा पावसाळा आणि हिवाळा कधी तरी तीव्र होतो, तसेच उन्हाचेही आहे. उन्हाळ्यातील चार महिन्यांतील काही दिवस असे असतात की त्याचे चटके असह्य होतात. अशी उन्हाळ्याची लाट येतच असते.
maharashtra summer
maharashtra summersakal

- अभिजीत मोडक

जसा पावसाळा आणि हिवाळा कधी तरी तीव्र होतो, तसेच उन्हाचेही आहे. उन्हाळ्यातील चार महिन्यांतील काही दिवस असे असतात की त्याचे चटके असह्य होतात. अशी उन्हाळ्याची लाट येतच असते. एप्रिल-मेमध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटा येऊ शकतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आपल्याकडे ‘वैशाख वणवा’ कविता फार काळापासूनच प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ असा, की आपल्याकडे वसंत आणि ग्रीष्म ऋतू उन्हाळ्याचे दिवस मानले जातात. मार्च ते मध्य जून म्हणजे मान्सून आगमन होईपर्यंत उन्हाळा जाणवतो. महाराष्ट्रातील विविध प्रदेशांनुसार हवामान बदलते. म्हणजे सामान्य तापमान तिथल्या भौगोलिक रचनेवर आणि समुद्रकिनारा किंवा संबंधित ठिकाण किती अंतर्भागात वसलेले आहे त्यावर हवामान ठरते.

समुद्रसपाटीपासून ते दख्खनचा पठार किती उंच आहे त्यावरही ठरते. उदाहरणार्थ, कोकण किनारी भागात, म्हणजेच मुंबई, डहाणू, रत्नागिरी आणि वेंगुर्ल्यात मार्च ते मे महिन्यांमधील सामान्य तापमान ३३-३४ अंश आहे. समुद्रकिनाऱ्यामुळे इथे खारे वारे तापमान नियंत्रित करण्यासाठी मदत करतात; परंतु दमट हवेमुळे वातावरणही दमट राहते.

अंतर्गत कोकणात जाताना समुद्र आपल्यापासून २० ते ६० किमी अंतरावर असतो. त्यामुळे समुद्री हवा तिथे पोहोचायला उशीर होतो. सामान्यतः दुपारी दोननंतर ती पोहोचते. त्यामुळे कोरडी हवा तापमान वाढवते. म्हणून ठाणे, कल्याण, बदलापूर, कर्जत आदी ठिकाणी जसजसे आपण अंतर्भागात जातो तसतसे सामान्य तापमान वाढत जाते.

उदाहरणार्थ, ठाण्यात सामान्य एप्रिलमधील तापमान ३७.५ अंश असेल तर बदलापूरमध्ये ते ३८.४ सेल्सियस असेल. कर्जतमध्ये तेच सामान्य तापमान ३९.६ अंश असेल. अशाच प्रकारे संपूर्ण कोकणात किनारा आणि अंतर्भागामधील तापमानात तुम्हाला फरक आढळेल.

आपण घाटमाथा ओलांडून दख्खनच्या पठारावर गेलो म्हणजे समुद्रापासून अजून १०० किलोमीटरपेक्षा अधिक लांब जातो. समुद्रसपाटीपासून ५०० ते ६०० मीटर उंचीवर जातो. म्हणजे त्याचा अर्थ येथे खारे वारे क्षीण होऊन पोहोचतात आणि सामान्यतः कोरडी हवा दिवसभर राहते. रात्रीचे तापमान अधिक कमी होऊ शकते, म्हणून दिवसा कडकडीत उन्हाचे चटके आणि रात्री आल्हाददायक वातावरण निर्माण होते.

म्हणून येथील नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावरील दमट हवा सहसा आवडत नाही; परंतु उन्हाळ्यात येथील सामान्य तापमान किनारी भागापेक्षा अधिक असते. उदाहरणार्थ, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मार्च ते मे महिन्यामधील सामान्य तापमान ३६ ते ३८ अंश असेच असते.

आता अजून अंतर्भागात गेलो की तापमानात आणखी वाढ होते. मराठवाडा आणि विदर्भ म्हणजे चारही बाजूंनी जमीन असलेले भूपरिवेष्टित प्रदेश. तिथे अरबी आणि बंगालचा उपसागर दोन्हीही ३०० ते ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहेत आणि उत्तर अन् पश्चिम दिशेच्या जमिनींमधून येणारे कोरडे वारे तिथे तापमान वाढवतात.

उदाहरणार्थ, छत्रपती संभाजीनगरमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात सामान्य तापमान ३९ ते ४० अंश सेल्सियस आहे. नागपुरात एप्रिल आणि मेमध्ये सामान्य तापमान अधिक तीव्र ४१ ते ४३ अंश सेल्सियस आहे. परिणामी विदर्भाला उष्ण प्रदेश म्हणूनही संबोधले जाते. तशीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्राचीही आहे. कारण जळगावमध्येही एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये सामान्य तापमान ४१-४२ अंश सेल्सियस आहे.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

साधारण दोन दिवस सलग सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सियस अधिक तापमान राहिल्यास त्याला उष्णतेची लाट आली असे संबोधले जाते. प्रत्येक प्रदेशानुसार त्याचे निकष वेगवेगळे आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास, मुंबईसह किनारी भागातील कोकणात ३८ अंश तापमानाला उष्णतेची लाट म्हटले जाते. अंतर्गत कोकणात हवामान विभागाकडून विशेष निकष नाहीत.

कारण तिथे हवामान केंद्राचा अभाव आहे; परंतु माझ्या स्वतःच्या अभ्यासानुसार, ठाणे ते कर्जत पट्ट्यात एप्रिलमध्ये ४२ ते ४४ अंश तापमान पोहोचल्यास उष्णतेची लाट आली असे म्हणतात. मार्चमध्ये ४०-४२ आणि मे महिन्यात ४०-४३ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले तर उष्णतेची लाट आली असे मानले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे-नाशिक-कोल्हापूर पट्ट्यात ४१ ते ४३ अंश तापमानाची नोंद झाल्यास उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ४३-४५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले तर एप्रिल ते मे या काळात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूरमध्ये ४५-४७ अंश सेल्सियस किंवा अधिक तापमान नोंदवले गेले तर एप्रिल ते मे या काळात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव परिसरातही असेच तापमान नोंदवले गेले तर उष्णतेची लाट आली असे म्हटले जाऊ शकते.

आता याचा अर्थ असा, की महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये मार्च, एप्रिल आणि मेमध्ये आपण साधारण दिवसाचे तापमान ४० ते ४७ अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची अपेक्षा करू शकतो आणि ते अधिकृतरीत्या लाकडी स्टीव्हनसन स्क्रीन बॉक्सच्या सावलीत मोजले जाते तेव्हा हवामान केंद्रात आणि ‘वास्तविक अनुभव’ आणखी वर जाऊ शकतो! कारण आपण थेट रस्त्यावरील उन्हातच चालतो. जर दुपारच्या सूर्याच्या संपर्कात असल्यास थेट तापमान ५०-५५ अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक बनते.

आता उष्माघात म्हणजे काय ते बघू. आपल्या शरीराचे सामान्य तापमान ३६ ते ३६.८ अंश सेल्सियस असते. त्यामुळे आपली क्षमता सामान्यतः ३६.५ अंशांपर्यंत तापमान सहन करण्याची असते. म्हणून आपल्याला २१ अंश सेल्सियसच्या खाली थंडी आणि ३७ अंशांच्या वर गरम वाटते.

उष्माघात उष्णतेशी संबंधित आजार आहे. असे तेव्हा होते जेव्हा शरीर तापमान नियंत्रित करू शकत नाही. शरीराचे तापमान झपाट्याने वाढते, घाम यंत्रणा अपयशी ठरते आणि शरीर थंड होऊ शकत नाही. शरीर साधारणतः घामाने थंड होते. मात्र, कोरड्या उन्हाच्या तीव्रतेमुळे घाम येत नसल्याने असा परिणाम दिसून येतो.

साधारणतः ३८ ते ३९ अंश तापमानात शरीरातील पाणी कमी होत असल्याचे जाणवते. म्हणजे डिहायड्रेशन होते. ४० ते ४१ अंशांत सूर्यप्रघात येऊ शकतो आणि सहसा ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानात उष्माघात येऊ शकतो; परंतु किनारपट्टीच्या परिस्थितीत फक्त घाम येणे पुरेसे नाही. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान वेगाने वाढू शकते.

जेव्हा आर्द्रता जास्त असते (६५ टक्क्यांपेक्षा जास्त) आणि तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असते तेव्हा आपल्याला ते ५० अंशांइतके जाणवू शकते. ज्याला आपण ‘रिअल फिल’ म्हणतो. त्यामुळे घामाचे तितक्या लवकर बाष्पीभवन होणार नाही आणि शरीराला उष्णता लवकर बाहेर टाकणे कठीण होईल. हे किनारपट्टीच्या उष्णतेच्या लाटेमध्ये होऊ शकते.

उष्णतेपासून स्वतःची काळजी करायची असेल तर काही साधे, पण महत्त्वाचे उपाय आहेत. दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान थेट उन्हात जाणे टाळा.

जायचेच असेल तर टोपी किंवा छत्री वापरा. डोके, मान, चेहरा आणि हाता-पायांवर ओलसर कापड ठेवा. मद्य आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा. त्यांच्या सेवनाने डिहायड्रेशन होते. त्याऐवजी लिंबू सरबत, कोकम, ताक, लस्सी किंवा उसाचा रस प्या. मुख्यतः हायड्रेटेड राहा. अतिउष्णतेच्या दिवसांमध्ये, विशेषतः घराबाहेर असाल किंवा शारीरिक हालचाल जास्त करत असल्यास पाणी पीत राहा. तिखट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. शिळे अन्न खाऊ नका.

मुलांना दुपारी कधीही उन्हात खेळायला पाठवू नका. त्यांना पार्क केलेल्या कारमध्ये एकटे सोडू नका. बाहेर तापमान ४० अंश असले तरी गाडी उन्हात पार्क केल्यास ते धोकादायक तापमानापर्यंत लवकर तापू शकते. त्यामुळे पार्क केलेल्या गाडीत लक्ष न देता सोडलेल्या मुलांना उष्माघाताचा सर्वाधिक धोका असतो. कारण तापमान पहिल्या अर्ध्या तासातच ५०-६० अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते, अगदी खिडकी उघडी असतानाही...

abhijitmodak86@gmail.com

(लेखक हवामान अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com