वास्तववादी चित्रचिंतन 

वास्तववादी चित्रचिंतन 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जवळपास संपूर्ण जग लॉकडाउन आहे. भारतातसुद्धा दोन महिन्यांपासून ‘लॉक’ आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा भयावह परिस्थितीत डॉक्‍टर, नर्स, वॉर्डबॉय, पोलिस, स्वच्छता कर्मचारी आणि अत्यावश्‍यक सेवा देणारी यंत्रणा आपला जीव धोक्‍यात घालून कोरोना महामारीशी धैर्याने लढत आहे. अशा या कठीण परिस्थितीचे साक्षीदार झालेले कलावंत वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. जनजागृती करीत आहेत. काही कलावंत या भयावह परिस्थितीशी लढण्यासाठी सर्वसामान्यांना जगण्याची सकारात्मकता देण्याचे काम करीत आहेत. असेच एक आहेत कल्याणमधील के. सी. गांधी शाळेचे कलाशिक्षक. अमोल पाटील त्यांचे नाव. आपल्या वेगवेगळ्या चित्रकलाकृतींतून त्यांनी समाजप्रबोधनासह संकटाशी लढणाऱ्या योद्‌ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘साऱ्या विश्‍वाचा एकच ध्यास, एकजुटीने करू कोरोनाचा सर्वनाश’ या आशावादी घोषवाक्‍यासह चित्रकलाकृतींतून पाटील यांचे प्रबोधनाचे कार्य सुरू आहे .

पाटील यांनी ‘परतीचा प्रवास’ या शीर्षकांतर्गत रेखाटलेल्या चित्रांतून दृश्‍यस्वरूपात वास्तववाद मांडला आहे, परंतु त्या चित्रांतील रंगभाषा वास्तवादापलीकडेही काही वेगळे सांगू पाहात आहे. लॉकडाउनमुळे उद्योग, कामधंदे बंद झाल्यामुळे परप्रांतीय कष्टकरी, मजूर आपल्या कुटुंबकबिल्यासह संसार डोईवर घेऊन रेड झोनमधून गावाकडच्या ग्रीन झोनकडे पायपीट करत निघाले आहेत. चालत जाताना त्यांचे तळपाय अक्षरशः फाटले आहेत. तळपायाचे वेदनादायी चित्रण मन सून्न करते. या प्रवासात त्यांना शेतात असणारे बुजगावणे तोंडाला मास्क लावून, हातात ग्लोज घालण्याचा संदेश देत आहे. चित्रकाराला कदाचित या चित्रातून सर्वसामान्य जनताही आज अशीच बुजगावणे झाली असल्याचे सांगायचे असावे. चित्राच्या पार्श्‍वभूमीसाठी त्यांनी रक्त, रेड झोन व कोरोनाचे काही भाग लाल भडक रंगाद्वारे दाखविला आहे. हिरव्या रंगाच्या झोपड्यांचा काही भाग ग्रीन झोन दर्शवला आहे. आजच्या वास्तवाचे हे विदारक दृश्‍य पाटील यांनी चितारले आहे. कोरोनाने प्रदूषित झालेल्या शहरी भागातील स्थलांतर गावाकडे जाताना आता ग्रीन झोनमधील गावे प्रदूषित होण्याचे भयविचार त्यांच्या चित्रात मांडण्याचा प्रयास केला आहे. वास्तवाधारित चित्रांसह असंख्य चित्रांची निर्मिती पाटील यांनी लॉकडाउनच्या काळात केली. काही चित्रांत त्यांनी निसर्गावर भाष्य केले आहे. काही चित्रांत या लॉकडाउनदरम्यान कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय यंत्रणा, पोलिस, अत्यावश्‍यक सेवेतील सैन्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

लॉकडाउनदरम्यान आलेल्या विश्‍वविख्यात कवी, चित्रकार रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त एका संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अमोल पाटील यांच्या ‘ओढ’ या कलाकृतीस ‘रवींद्रनाथ टागोर स्वदेश रत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या चित्रात त्यांनी कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्याचा संदेश दिला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील एका छोट्या गावात बालपण गेलेले अमोल पाटील यांनी एटीडी, जीडी आर्ट पेंटिंग, आर्ट मास्टर्स असे कलाशिक्षकासाठी आवश्‍यक असणारे शिक्षण घेऊन ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये के. सी. गांधी विद्यालयात अध्यापनाचे व्रत स्वीकारले. या ज्ञानदानासोबतच त्यांचे पेंटिंग आणि शिक्षणासंबंधित लेखनकार्य सुरू आहे. बालपण ग्रामीण भागात गेल्याने त्यांच्या चित्रांत समृद्ध ग्रामसंस्कृती डोकावत असते. ती त्यांच्या कलाकृतींची श्रीमंती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com